Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मतदाते ठरवणार उमेदवारांचे भवितव्य
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

विदर्भातील लोकसभेच्या दहाही जागांसाठी उद्या, गुरुवारी मतदान होणार असून जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत नेण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. आपल्या उमेदवाराला अधिकाधिक मतदान कसे होईल यासाठी खलबते सुरू असून त्याकरिता रणनीतीदेखील आखण्यात

 

येत आहे.
मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून संवेदनशील ठिकाणी खास दक्षता घेण्यात आली आहे. यवतमाळ-वाशीममध्ये सर्वाधिक २८ तर नागपुरात २७ उमेदवार रिंगणात आहेत. गडचिरोली-चिमूर आणि अकोला मतदारसंघात सर्वात कमी प्रत्येकी ११ उमेदवार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती अशी लढत होणार असली तरी, बहुजन समाज पक्ष, भारिप-बहुजन महासंघ, चंद्रपूरमध्ये स्वतंत्र भारत पक्षामुळे आघाडी व युतीची डोकेदुखी वाढून चुरस निर्माण झाली आहे. खासकरून नागपूर व बुलढाणा या मतदारसंघात नेमकी काय स्थिती राहील, याबाबत राजकीय पंडितांनाही अंदाज बांधता आलेला नाही. गेल्या पंधरवाडय़ापासून प्रचाराच्या रणधुमाळीमुळे राजकीय वातावरण तापले होते. आता सर्वत्र शांतता असली तरी मतदानासाठी मतदार बाहेर निघावे म्हणून खलबते सुरू झाली आहेत.
केंद्रीय मंत्रीद्वय विलास मुत्तेमवार व प्रफुल्ल पटेल तसेच आनंदराव अडसुळ, हरिभाऊ राठोड, शिशुपाल पटले, सुरेश वाघमारे, भावना गवळी हे मावळते खासदार या निवडणुकीत भाग्य आजमावत आहेत. याशिवाय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, दत्ता मेघे, नरेश पुगलिया, राज्याचे आरोग्य मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार अशोक नेते, नाना पटोले, ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर आणि राजे सत्यवानराव आत्राम आदी दिग्गज उमेदवारांचे भाग्यही उद्या मतदान यंत्रात बंद होणार आहे.
नागपूरमध्ये काँग्रेसचे विलास मुत्तेमवार व भाजपचे बनवारीलाल पुरोहित यांच्यात मुख्य लढत असली, तरी भारिप-बहुजन महासंघाचे डॉ. यशवंत मनोहर व बहुजन समाज पक्षाचे माणिकराव वैद्य यांच्यामुळे काँग्रेसला फटका बसणार आहे. बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी माघार घेत वैद्य यांना पाठिंबा दिला आहे. ओबीसींसाठी आक्रमक भूमिका घेणारे व उद्योग मंत्री नारायण राणे यांचे समर्थक प्रा. ज्ञानेश वाकुडकर हे अपक्ष म्हणून मैदानात आहेत.
रामटेकमध्ये काँग्रेसचे मुकुल वासनिक आणि शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्यात थेट लढत होणार असल्याचे दिसते. बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या सुलेखा कुंभारे आणि बसपचे प्रकाश टेंभुर्णे हे प्रमुख उमेदवारही मैदानात आहेत. कुंभारे आणि चवरे यांच्यामुळे कामठीत काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.
वर्धा मतदारसंघात काँग्रेसचे दत्ता मेघे आणि भाजपचे सुरेश वाघमारे यांच्यात थेट सामना होणार आहे. बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव अशी काटय़ाची लढत आहे. बसपचे वसंतराव दांडगे व भारिप-बहुजन महासंघाचे रवींद्र ढोकणे हेही रिंगणात आहेत. यवतमाळ-वाशीम मतदारसंघात चुरशीची निवडणूक होण्याची स्थिती आहे. यवतमाळ आणि वाशीम हे दोन्ही मतदारसंघ मिळून एक मतदारसंघ झाला असल्याने यवतमाळचे खासदार हरिभाऊ राठोड आणि वाशीमच्या खासदार असलेल्या भावना गवळी प्रतिस्पर्धी म्हणून आमने-सामने आहेत.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल व भाजपचे शिशुपाल पटले यांच्यात लढत होणार असली तरी काँग्रेसचे बंडखोर नाना पटोले यांनी रिंगणात उतरून पटेल यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. बसपाचे वीरेंद्र जयस्वाल हेदेखील मैदानात आहेत. अकोल्यात तीन तुल्यबळ उमेदवार मैदानात आहेत. भाजपचे मावळते खासदार संजय धोत्रे, काँग्रेसचे बाबासाहेब धाबेकर आणि भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर या तिघांमध्ये ही लढत होणार आहे. चंद्रपूरमध्येही भाजपचे हंसराज अहीर, काँग्रेसचे नरेश पुगलिया व स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप हे सर्वच दिग्गज उमेदवार आहेत. बसपचे दत्ता हजारे व भारिप-बहुजन महासंघाच्या खोब्रागडेंमुळे दलित मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. गडचिरोली-चिमूर या पुनर्रचित मतदारसंघात भाजपचे अशोक नेते, काँग्रेसचे मारोतराव कोवासे व बसपचे राजे सत्यवानराव आत्राम यांच्यात तिहेरी लढत आहे.
अमरावतीत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डॉ. राजेंद्र गवई यांच्यात लढत होणार असली तरी बसपाचे गंगाधर गाडे आणि ‘प्रहार’ संघटनेचे राजीव जामठे यांची उमेदवारी रिपाइंसाठी डोकेदुखी ठरली आहे.
मतदानासाठी प्रशासन सज्ज
मतदानाची वेळ
सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत. तत्पूर्वी यंत्रणेच्या तपासणीसाठी सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येईल.
नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, यवतमाळ अमरावती मतदार संघात १६ पेक्षा जास्त उमेदवार असल्याने केंद्रावर दोन मतदान यंत्र राहतील.
नागपुरात १ हजार ६६८ मतदान केंद्रावर आणि रामटेकमध्ये २ हजार २५ मतदान केंद्रांवर फिरती वैद्यकीय पथके तैनात केली जाणार आहेत.
रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदार संघात ८ हजार १८० अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूर आणि रामटेक मतदारसंघातील संवेदनशीलकेंद्रांवर सीसीटीव्ही आणि व्हिडिओ कॅमेऱ्याने चित्रिकरण.
मतदान यंत्रांत बिघाड झाल्यास त्यात दुरुस्तीसाठी ६ अभियंत्यांचे पथक