Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उठा, मतदान करा
प्रवीण बर्दापूरकर

हा मजकूर आपण वाचत असाल तेव्हा १५ व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झालेले असेल. एव्हाना काहीजण मतदानाला बाहेर पडले असतील, काही बाहेर पडायच्या तयारीत

 

असतील तर, काहींनी दिवसाच्या उत्तरार्धात मतदान करण्यासाठी नियोजन केलेले असेल. मात्र, काहीजण मतदानासाठी मिळालेली सुटी एन्जॉय करण्याच्या किंवा काहीजण कंटाळा म्हणून किंवा काहीजण आपल्याला काय देणे-घेणे आहे मतदानाशी, असा टिपिकल मध्यमवर्गीय पांढरपेशा विचार करून किंवा काहीजण राजकारणाची नफरत म्हणून किंवा काहीजण काहीही कारण नसतानाही किंवा उल्लेख केलेल्यांपैकी काहीतरी वेगळे कारण म्हणून मतदानाला बाहेर पडणार नसतील, अशा सर्व मतदानाला बाहेर न पडण्याचा विचार असणाऱ्यांसाठी हे आवाहन आहे. - कृपया उठा आणि मतदान करा.
मतदान करणे हा आपला हक्क आहे. मतदान करून अयोग्य उमेदवाराला लोकसभेत जाण्यापासून वंचित ठेवणे आणि योग्य उमेदवाराला आपला प्रतिनिधी म्हणून निवडणे, हा या हक्काचा अर्थ आहे. लोकशाहीच्या सध्याच्या व्यवस्थेला केवळ नाके मुरडून घरात शांत बसण्यापेक्षा आपला मताधिकार बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. एक शंभर टक्के खरे आहे की, लोकशाहीचे सध्याचे स्वरूप गढूळलेले आहे. देशाचे सामाजिक आणि सांस्कृ तिक वातावरण असहिष्णुतेचे झालेले आहे. काळाच्या ओघात गुंड आणि धनशक्तीच्या प्रभावाखाली आलेले राजकीय क्षेत्रही याला अपवाद नाही. निवडून आलेले सर्वच लोकप्रतिनिधी सुसंस्कृत, समाजातल्या प्रत्येक घटकाशी बांधिलकी असणारे आणि समाजहिताचा विचार करणारेच आहेत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल, हेही खरे आहे. राजकीय व्यवस्थेतल्या बहुसंख्य लोकांनी लोकशाहीचा बाजार बटबटीतपणे मांडलेला आहे. सर्वसामान्य, तळागाळातला माणूस आणि लोकप्रतिनिधी यांच्यात कोणताही सकारात्मक दुवा नाही, किमान संवादही नाही मग सुसंवाद तर लांबच राहिला! शिवाय, निवडणुकीच्या बाजारात विजयाच्या पारडय़ात पैशाचे वजन जास्त झालेले आहे. मात्र, असे असले तरी यावर केवळ टीका करून चालणार नाही आणि त्याकडे दुर्लक्ष करून मतदानाला बाहेर न पडण्याची भूमिका घेऊन तर मुळीच चालणार नाही. निवडणुकीच्या रिंगणात जे कोणी उमेदवार आहेत, त्यापैकी त्यातल्या त्यात स्वच्छ चारित्र्याचा, कमी भ्रष्टाचारी, ज्याची संवेदनशीलता अजूनही बोथट झालेली नाही, असा उमेदवार निवडून देण्यासाठी आणि त्याच्यावर भविष्यात त्याने चांगला लोकप्रतिनिधी व्हावे हा अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यकच आहे. मत-मतांच्या गलबल्यात लोकशाहीचा संकोच झालेला आहे. ‘लोकशाहीला सीता होता येत नाही, कारण तिला अग्निपरीक्षेला पाठवण्याची शिक्षा विनाकारण दिली जाते. द्रौपदी होता येत नाही. कारण ती एकापेक्षा जास्त जणांना जबाबदार आहे. असाह्य़ आणि अबला अशी लोकशाहीची अवस्था झालेली आहे म्हणून आम्ही मतदाना बाहेर पडणार नाही’, असा विचार अलीकडच्या काळात काही सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत मांडत आहेत. व्यासपीठावरून केलेल्या भाषणात असे चमचमीत विधान करून टाळ्या केव्हाही मिळवता येतील मात्र, ही लोकशाही व्यवस्था स्वच्छ, सुदृढ आणि बळकट करण्यासाठी मतदारांनी स्वत:ला मतदानापासूनच लांब ठेवणे केव्हाही समर्थनीय ठरणार नाही, याची गंभीरपणे नोंद घेण्याची हीच वेळ आहे. प्रत्येकच मतदारसंघात सर्वच उमेदवार शंभर टक्के वाईट आहेत असे नव्हे. नागपूरचेच उदाहरण द्यायचे झाले तर दोन कवी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हणजे तथाकथित वाईटांना काहीतरी पर्याय उपलब्ध आहे हे विसरता येणार नाही. म्हणूनच या स्तंभाचा शेवट करताना कळकळीचे आवाहन म्हणा की विनंती हीच आहे की, कृपा करून मतदानावर बहिष्कार टाकू नका. शिवाय कोणालाही मतदान न करण्याचा अधिकारही या लोकशाही व्यवस्थेने आपल्याला दिलेला असल्याने मतदानाला जाऊन यापैकी कोणताही उमेदवार योग्य नाही हे सांगण्याचा आपला हक्क शाबूत आहे, हेही विसरता येणार नाही. किमान हा हक्क बजावण्यासाठी तरी प्रत्येकाने मतदानाला जायलाच हवे.
गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या जागर या स्तंभातला आजचा समारोपाचा मजकूर आहे. निवडणुकीच्या प्रचारात सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार जसा नाही, देशाचा आधार असलेल्या कृषी व्यवस्थेतल्या आत्महत्या केलेल्यांचा, आत्महत्या न केलेल्यांच्या पाणी, आरोग्य या गरजेचा उल्लेख नाही तसेच पर्यावरण, प्रदूषण, ग्लोबल वार्मिग अशा भविष्यातल्या अक्राळविक्राळ समस्यांचा साधा उच्चारही कसा नाही, याची दखल या स्तंभातील मजकुरातून घेण्यात आली. या देशाचे सामाजिक, सांस्कृतिक वातावरण दिवसेंदिवस गढूळ करवून असहिष्णुता, भ्रष्टाचार, गुंडगिरी, धनशक्ती अशा कुप्रवृत्ती कशा फोफावत आहेत, याचा आढावाही या स्तंभातून गेले पंधरा दिवस घेण्यात आला. ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी या स्तंभातील मजकुराला अतिशय मोठा प्रतिसाद देत अनेक सूचनाही केल्या. निवडणुकीचे राजकारण असले तरीही ‘जागर’ या स्तंभातील मजकूर पूर्णपणे अराजकीय ठेवण्यात आला.
अमूक उमेदवार किंवा पक्ष विजयी किंवा पराभूत होईल, असे प्रत्यक्षपणे तर सोडाच अप्रत्यक्ष्ोपणेही सुचवण्याचाही प्रयत्न या मजकुरातून करण्याचे आम्ही जाणीवपूर्वक टाळले. मात्र, असे असले तरी जी काही लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे त्यात राजकारणाचं हे बदललेलं स्वरूप अपरिहार्यच होतं आणि आहेही. कारण, सर्वसामान्य मतदारांनी या राजकीय व्यवस्थेला कंटाळून त्यापासून घेतलेली फारकत आहे. हे बदलायचं असेल तर आपल्याला त्याकडे तटस्थवृत्तीने बघत त्यापासून दूर पळता येणार नाही. म्हणूनच प्रत्येकाने मतदानासाठी बाहेर पडणे आवश्यक आहे. मतदार हा एका दिवसाचा राजा नाही तर संपूर्ण पाच वर्षांचा तो कर्ताधर्ता आहे, हे सिद्ध करायचे असेल तर आपणही आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. म्हणूनच उठा आणि मतदानाला जा, असे आवाहन करून हा स्तंभ आम्ही आजपासून थांबवत आहोत.