Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आज मतदान.. फायनल कॉमेन्ट्स
उपराजधानीत बसप निर्णायक
नागपूर, १५ एप्रिल

काँग्रेसचे विलास मुत्तेमवार, भाजपचे बनवारीलाल पुरोहित आणि बसपचे माणिकराव वैद्य या तीन

 

उमेदवारांमध्ये होणारी लढत, ज्येष्ठ साहित्यिक आणि भारिप-बमसंचे उमेदवार डॉ. यशवंत मनोहर यांच्यामुळे लक्षवेधी ठरली आहे. मात्र, यावेळी काँग्रेसला मतविभाजनाच्या धोक्यामुळे चुरशीच्या लढतीला तोंड द्यावे लागणार आहे.
विजयाचा मार्ग खडतर
अकोला, १५ एप्रिल

अकोला लोकसभा मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब धाबेकर, भाजप-शिवसेनाचे संजय धोत्रे आणि भारिप-बमसंचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत होत असली तरी काँग्रेस आणि भारिप-बमसंमध्ये होणाऱ्या बहुजन मतांच्या विभाजनाचा फायदा संजय धोत्रे यांना होणार असल्याचे उघड आहे.
दुहेरी ध्रुवीकरणाची रंगत
अमरावती, १५ एप्रिल

अमरावती राखीव मतदार संघातील शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षातील थेट लढतीला तिसरा कोनही लाभला आहे. प्रहार संघटना ‘मराठा कार्ड’ वापरण्यात सरस ठरली, तर निवडणुकीतील समीकरणे विस्कटून जातील. तरीही सेनेचे आनंद अडसूळ आणि रिपब्लिकन पक्षाचे डॉ. राजेंद्र गवई यांच्यात काटय़ाची लढत होईल.
काँग्रेस-भाजपत तुल्यबळ लढत
गडचिरोली, १५ एप्रिल

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात प्रारंभी जाणवणारी त्रिकोणी लढत आता ‘हत्ती’ माघारल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपाइं युतीचे उमेदवार मारोतराव कोवासे आणि भाजप-सेना युतीचे अशोक नेते यांच्यातच तुल्यबळ होणार आहे. तरीही बसपचे राजे सत्यवानराव आत्राम यांच्या ‘हत्ती’ मुळे मतविभागणीच्या शक्यतेची धास्ती या दोन्ही उमेदवारांनी घेतली आहे.
मतांच्या विभागणीचे गणित
भंडारा, १५ एप्रिल

राष्ट्रवादी, काँग्रेस व रिपाइंचे उमेदवार प्रफुल्ल पटेल या निवडणुकीत २००४ च्या पराभवाचा वचपा काढण्याची शक्यता वाढली आहे. यंदाच्या तिरंगी लढतीत प्रतिस्पर्धी भाजप-शिवसेनेचे शिशुपाल पटले आणि छावा संग्राम परिषदेचे अपक्ष उमेदवार नाना पटोले यांना मिळणाऱ्या दोन्ही काँग्रेस विरोधी मतांची विभागणी होणार असे स्पष्ट जाणवत आहे.
वरराजकीय प्रतिष्ठा पणाला
बुलढाणा, १५ एप्रिल

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात सरळ लढत होत असून दोघांना विजयाची समसमान संधी आहे. यापैकी कोण विजयी होईल हे सांगता येत नाही. राजकीय विश्लेषक देखील या निर्णयाच्या संदर्भात गोंधळून गेले आहेत.
सेना-काँग्रेस तुल्यबळ
यवतमाळ, १५ एप्रिल

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात शिवसेना व काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत होत आहे. युतीच्या भावना गवळी आणि आघाडीचे हरिभाऊ राठोड यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. बसपचे अ‍ॅड. दिलीप एडतकर (हत्ती) आणि यूडीएफ उमेदवार युनूस मणियार (कुलूप-किल्ली) या दोघांत तिसऱ्या क्रमांकावर कोण, यासाठी स्पर्धा आहे.
पुन्हा ‘चेहरेपालट’?
वर्धा, १५ एप्रिल

भाजपचे सुरेश वाघमारे विरुध्द काँग्रेसचे दत्ता मेघे यांच्यात थेट लढत असल्याचे स्पष्ट चित्र असून या मतदार संघातील ‘चेहरेपालट’ करण्याचा इतिहास मेघेंना दोन चाल पुढे नेणारा ठरत आहे. मुस्लिम, दलित व आदिवासी अशा काँग्रेसच्या पारंपरिक मतांमध्ये मेघेंनी हिंदी भाषिक मतांची जोड देण्यात यश साधल्याचे दिसून आले.
चटप फॅक्टर महत्त्वाचा
चंद्रपूर, १५ एप्रिल

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात चटप फॅक्टर महत्त्वाचा ठरला असून बहुजन, दलित व आदिवासी मतांचे ध्रुवीकरण नेमके कसे होते व त्याचा फायदा कुणाला मिळतो व शहरी मतदार कुणाला कौल देतो, यावरच या मतदारसंघातील तिरंगी लढतीत असलेले पुगलिया, अहीर व चटप यांचे भवितव्य ठरणार आहे.
सेनेला‘गड’ राखण्याचे आव्हान
रामटेक, १५ एप्रिल

रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे मुकुल वासनिक आणि शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्यात थेट लढत होणार असून अनुभवी व ‘हेवीवेट’ वासनिक यांच्या तुलनेत तुमाने हे नवखे व ‘लो-प्रोफाईल’ उमेदवार असल्याने या मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लागले आहे. गेल्या तीन निवडणुकीत बाजी मारणाऱ्या सेनेसमोर म्हणूनच गड कायम राखण्याचे आव्हान दिसते.