Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मतदानासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभेसाठी उद्या होणाऱ्या मतदानाप्रसंगी शहरात अर्धसैनिक दलाच्या जवानांसह पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गडबड करणाऱ्यास काही क्षणातच जेरबंद करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांचा धोका लक्षात घेऊनच बंदोबस्ताची

 

आखणी करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
नागपूर लोकसभा मतदार संघात एकूण १७ लाख ४५ हजार ७०२ मतदार असून १ हजार ६६८ मतदान केंद्र आहेत़ १५९ झोनमध्ये ते विभाजित करण्यात आले आहेत. रामटेक लोकसभा मतदार संघाचे १७६ बुथ व ४६ इमारतींना नागपूर शहर पोलिसांकडूनच बंदोबस्त पुरविण्यात आला आह़े शहर पोलीस दलाचे ६ पोलीस उपायुक्त, ७ सहायक पोलीस आयुक्त, ३४ पोलीस निरिक्षक, १३६ सहायक पोलीस निरीक्षक व उप निरिक्षक, २ हजार ३८५ शिपाई, ३३५ महिला शिपाई, ६५० गृहरक्षक बुधवारी सकाळीच तैनात झाले. त्यांच्या मदतीला रेल्वे सुरक्षा दल तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
शहरात १६ संवेदनशिल मतदान केंद्र असून तेथे अतिरिक्त पोलीस तैनात राहतील. नागपूर शहर दहशतवाद्यांच्या नकाशावर आहेच. नक्षलवाद्यांपासूनही असलेला धोका लक्षात घेता पोलिसांनी नियोजनपूर्वक बंदोबस्ताची आखणी केली आहे. साध्या वेषातील गुप्तचर मोठय़ा प्रमाणात तैनात असून ते विविध ठिकाणी कानोसा घेतील. शहरात दर काही पावलांवर पोलीस राहतील. प्रत्येक मतदान केंद्रावर सशस्त्र पोलीस तैनात आहेतच. मतदान केंद्राच्या परिसरातही पोलीस राहतील. याशिवाय पोलिसांची २२ पथके ठिकठिकाणी गस्त घालतील. आकस्मिक घटना घडल्यास २२ विशेष गुन्हे प्रतिबंधक पथके व २२ गुन्हे तपास पथके नेमण्यात आली आहेत. पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखालील स्ट्रायकिंग फोर्स शहरात सतत गस्त घालतील. पोलिसांनी त्यासाठी खाजगी चारचाकी वाहने अधिग्रहित केली आहेत. प्रत्येक चौरस्त्यावर पोलीस तैनात राहतील. गरज भासल्यास नियंत्रण कक्षात राखीव ताफा सज्ज राहील. मतदान केंद्र आणि त्या परिसरात प्रवेश करणाऱ्यांवर पोलिसांची नजर रोखलेली राहील. प्रत्येक पथकात टिअर बॉक्सने सुसज्ज जवान राहतील. एनसीसीच्या कॅडेट्सचीही मदत घेण्यात येत आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे सुरक्षा दल तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. दहा अतिसंवेदनशिल व सोळा संवेदनशिल मतदान केंद्र व त्या परिसरात पोलिसांनी विशेषत्वाने काळजी घेतली आहे. आचारसंहितेचे वा कायद्याचे उल्लंघन करण्याचा थोडाजरी प्रयत्न झाल्यास पोलीस अशांना लगेचच जेरबंद करतील. बॉम्बशोधक व नाशक पथकालाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. जनतेला कुणी आमीष आणि प्रलोभन दाखवत असल्यास ५६१२२२, २४६४३३३, २५६६८३२, किंवा १०० या दूरध्वनी क्रमांकावर माहिती द्यावी. मतदारांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर काही राजकीय पक्षांनंी किंवा उमेदवारांनी संदेश पाठविले व त्याबद्दल काही संशय निर्माण झाला तर ते संदेश खालील ९६७३६१५८२१, ९६७३६१५८२२, ९६७३६१५८२३, ९६७३६१५८२४, ९६७३६१५८२५ या भ्रमण ध्वनींवर पुन: प्रक्षेप्रित करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम सायंकाळी सशस्त्र पोलिसांच्या गराडय़ात कळमना मार्केट परिसरात रवाना करण्यात येतील.