Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पारंपरिक मुस्लिम, दलित मते यंदा कमळाकडे वळतील
दयाशंकर तिवारी यांना विश्वास
नागपूर, १५ एप्रिल/ प्रतिनिधी

पारंपरिक मुस्लिम व दलित मते लोकसभा निवडणुकीत भाजपकडेच वळतील असा दावा आज भाजपच्या वतीने दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजप उमेदवार बनवारीलाल

 

पुरोहित आघाडीवर राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वाजपेयींच्या कार्यकाळात हजयात्रींच्या संख्येत पहिल्यांदा वाढ झाली. तसेच मदरशांमध्ये इंग्रजीचे शिक्षण वाजपेयींच्या काळातच सुरू झाले. काँग्रेसच्या बाजूने मतदान करणाऱ्या मुस्लिम समाजाच्या तोंडी यावेळी भाजपच्या घोषणा होत्या हे मोमिनपुरा भागातील मिरवणुकीमुळे सिद्ध झाले. तसेच नरेंद्र मोदींच्या सभेनंतर मुस्लिम समाजामध्ये कोणतीच आक्रमक प्रतिक्रिया उमटली नाही. खैरलांजी घटना आणि मनोरमा कांबळे प्रकरणात दलितांना न्याय न मिळाल्याने दलितांमध्ये काँग्रेसविरुद्ध सुप्त असंतोष धुमसत असून तो या निवडणुकीत मतदानाच्या रूपात व्यक्त होईल आणि ती सर्व मते, भारतीय जनता पार्टीला मिळतील, असा विश्वास दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
महापालिकेतील ताज्या घडामोडींमध्ये भाजप आणि दलित नगरसेवकांमध्ये कधी नव्हे एवढे विश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावाही दयाशंकर तिवारी यांनी केला. नागापूर मतदारसंघात लोधी समाजाचे जवळपास ५७ हजार आणि पारशी समाजाचे ३२ हजार मतदार आहेत. त्यांनी यापूर्वीच भाजपला समर्थन घोषित केले आहे. यावेळी ३ लाख ५० हजार नवीन मतदारांची नोंद झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी २ लाख ५० हजाराहून अधिक नवीन मतदारांना मतदार ओळखपत्र मिळवून दिले आहे, याकडे तिवारी यांनी लक्ष वेधले.
बनवारीलाल पुरोहितांसारखे ज्येष्ठ नागरिक व्यक्तिगतरित्या घरी येतात, याची सकारात्मक प्रतिक्रिया जनमानसात उमटली आहे. तसेच तिरंगी लढतीमुळे काँग्रेसच्या नकारात्मक मतांचा फायदा भाजपला होईल, असा दावाही दयाशंकर तिवारी यांनी केला.
भाजपचा दावा खोडला
दरम्यान, लोधी समाज संघटनेने त्यांचा पुरोहितांना पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा खोडून काढला आहे. संघटनेचे पदाधिकारी प्यारेलाल वर्मा, तुलसीदास वर्मा, प्रफुल्ल वर्मा, शिवपाल वर्मा आणि मुन्नालाल वर्मा यांनी यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्धीला दिले असून रामटेक आणि नागपूर येथे काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.