Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘कोण जिंकणार, कोण हरणार’ चर्चेला जोर
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

उद्या, गुरुवारी पंधराव्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत असून मतदान आटोपताच कोण जिंकणार आणि कोण हरणार याची चर्चा सुरू होणार आहे. निकाल घोषित झाल्यानंतरच या

 

चर्चेला विराम मिळणार आहे.
मंगळवारी सायंकाळी प्रचार तोफा थंड झाल्या. गेल्या पंधरा दिवसांपासून सामान्य नागरिकांनी प्रत्येक उमेदवारांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आहे. प्रचारादरम्यान उमेदवारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी भरपूर आश्वासने दिलीत. तर काही उमेदवारांनी मात्र निवडून आल्यानंतर काम दिसेल असे सांगितले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सामाजिक संस्थांमध्ये उमेदवारांना समर्थन देण्याची शर्यतच लागली होती. असे असले तरी समाजातील निरक्षर व निवडणुकीपासून दूर असलेल्या मतदारांनी कुणाला मते द्यावी, हे ठरवलेले नाही. तसेही सामान्य मतदारांना पक्षाच्या अधिकृत चिन्हाशिवाय उमेदवारांच्या नावाविषयी फारसे देणे-घेणे नसते. सुशिक्षित मतदारांनी कुणाला मते द्यायची, हे ठरवून टाकले आहे. प्रमुख तीन-चार उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आपलाच उमेदवार निवडून येत असल्याची स्वप्नं दिवसाढवळ्या पडत आहेत.
निवडणुकीपासून दूर असलेला व तटस्थ भूमिकेतून बघणारा जिज्ञासू मतदार मात्र मतदानानंतर कोण विजयी होणार याची चर्चा करणार आहे. त्यासाठी त्यांनी वॉर्ड, विभाग, जातीय आधार याचे निकष ठरवले आहेत. कोणत्या वॉर्डात किती मते मिळतील, कोणत्या वस्तीत काय शिजले, कोणत्या झोपडपट्टीत कोणाचे वारे होते, याचा अंदाज बांधला जाणार आहे. ग्रामीण भागात कोणत्या गावाचा कुणाकडे कल होता, याचीही साधक बाधक चर्चा होईल. यानंतर विधानसभा मतदार संघानिहाय मतदानाची बेरीज वजाबाकी केली जाईल. मग, अमूक उमेदवाराला एवढी मते मिळतील आणि तमूक उमेदवार एवढय़ा मताने निवडून येईल, असे निष्कर्ष काढले जातील. मतदानाची टक्केवारीही यात गृहित धरली जाईल.
विविध वृत्तवाहिन्याही त्यांचे अंदाज मांडतील. हे अंदाज किती नि:पक्ष असतात, हे त्यांचे त्यांनाच माहीत. कोणत्या नेत्याच्या सभेला किती जनसमुदाय उपस्थित होता, यावरही चर्चा होईल. ‘कत्ल की रात’मध्ये उमेदवारांकडून कोणत्या वस्तीला कोणत्या स्वरुपात लाभ झाला याच्यावरही काथ्याकूट होईल. या सर्व घटकांची जो तो आपापल्या परीने चर्चा करणार आहे. या चर्चेवर आधारित सट्टाबाजारातही तेजी येईल. या सर्व चर्चेला १६ मे रोजी पूर्णविराम मिळेल. यानंतरही कुठे ‘गढ्ढा’ पडला याची पंधरा ते वीस दिवस चर्चा राहील.