Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मतदानासाठीची रूपरेषा;कार्यकर्ते रणनीतीत गुंग
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

गेले पंधरा दिवस विविध पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आज मतदानाच्या आदल्या दिवशी सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते यापुढील रणनीती आखताना दिसून आले. आचारसंहितेमुळे प्रचार बंद झाला असला, तरी उद्या, मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत आणण्याची रूपरेषा आखताना सर्वच कार्यालयातील कायकर्ते दिसत होते. तसेच पक्षाच्या ‘पोल मॅनेजर्स’नी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत आहे की नाही यासाठी कार्यकर्त्यांची रात्री

 

उशिरापर्यंत लगबग सुरू होती.
आचारसंहितेमुळे प्रचार थांबला असला, तरी मतदानापूर्वीचा दिवस सर्वच पक्ष आणि उमेदवारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. उघडउघड प्रचार करता येत नसल्याने आज कार्यकर्ते मतदानाच्या दिवशीची रणनीती आखताना दिसून आले. प्रचार संपल्याने आज कार्यकर्त्यांची सकाळ थोडी उशिराच सुरू झाली मात्र, त्यानंतर सर्वच प्रचार कार्यालये व उमेदवारांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत होती. प्रचारादरम्यान धावणाऱ्या गाडय़ांचा ताफा आज एकदम कमी झाला होता.
निवडणुकीच्या आदल्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांचे मुख्य लक्ष्य असते, ते शहरातील झोपडपट्टय़ा. या काळात या भागातील नगरसेवक आणि कार्यकर्ते अत्यंत महत्वाची भूमिका वठवतात. त्यामुळे संबंधित भागाची पक्षाच्या भाषेत ‘पॉकेट्स’ची जवाबदारी त्या-त्या वस्तीतील नगरसेवक व कार्यकर्त्यांवर सोपविण्यात येत होती.
शहराच्या सर्वच भागात अशी ‘पॉकेट्स’ असून यातील मतदात्यांचे मत शेवटच्या क्षणी अत्यंत महत्वाचे ठरते. त्यामुळे सर्वच पक्षांची अशा भागांवर अगदी करडी नजर असते. मतदानापर्यंत या सर्वाना ‘खूश’ ठेवता येईल यासाठीच सर्व रणनीती आखण्यात येत होती.
नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पार्टी यासर्व प्रमुख पक्षांसह इतरही काही पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. आचारसंहिता, निवडणूक निरीक्षकांची नजर या सर्व बाबी लक्षात घेऊन सर्वच पक्षांनी गेल्या १५ दिवसात प्रचार यंत्रणा राबविल्यानंतर आज दिवसभर छुप्या बैठकींमध्येच सर्व पक्षांचे कार्यकर्ते व्यस्त दिसले.
मतदारांची यादी, बुथनिहाय मतदार, बुथवर कार्यकर्त्यांची नियुक्ती या पारंपारिक कामांपेक्षाही मतदारसंघातील जातीनिहाय मतदारयादी पाहून कोणाचा कुठे प्रभाव आहे, संबंधित नेता कुणासोबत आहे, नाराज असेल तर त्याला वळविण्यासाठी काय करता येईल, झोपडपट्टय़ांवर कोणत्या नेत्यांचा प्रभाव आहे, कुठल्या भागात कोणत्या पक्षाची किती मते आहेत, पक्षाचे ‘प्लस पॉईन्ट’, ‘मायनस पॉईन्ट’ तपासणे, कमजोर असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपाययोजना करणे, त्यासाठी यंत्रणा कामाला लावणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निधीचे वाटप करणे या बाबी ‘पोल मॅनेजर्स’ ठरवतो. त्यामुळे पोल मॅनेजर्स सोबतच प्रत्येक पक्षात सर्वच बाबींची परिपूर्ण माहिती असणारे असे कार्यकर्ते असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली.