Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अग्निशामक दिनानिमित्त शहीदांचे स्मरण
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

अग्निशामक दिनानिमित्त महापालिकेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आगीच्या तसेच अन्य

 

घटनांमध्ये ज्या जवानांनी प्राणाची आहुती दिली, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर आयुक्त विष्णू बुटे, अतिरिक्त आयुक्त प्रकाश बोखड उपस्थित होते. त्यांनी सर्वप्रथम शहीद स्मृती चिन्हावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईत एस.एस. फोर्ट स्टिकिंग जहाजात स्फोट होऊन लागलेल्या आगीशी झुंज देताना अग्निशामक दलाचे ६६ जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १४ एप्रिल हा दिवस अग्निशामक दिन तसेच १४ ते २० एप्रिल पर्यंत अग्निशामक सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे विष्णू बुटे यांनी सांगितले. अग्निशामक दलाने आग विझवण्याच्या कार्यापुरतेच सिमित न राहता सवरेपरी सजग राहणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जवानांना सेवानिवृत्त अग्निशामक अधिकारी सुनील मेश्राम आणि प्रकाश बोखड यांच्या हस्ते स्मृती चिन्हे देऊन गौरवण्यात आले. यामध्ये विजय ठक्कर, दत्तात्रय भोकरे, संजय कापगते, चंद्रशेखर रणदिवे, मो. युनुस यांचा समावेश आहे. कार्यक्रमास महापालिकेचे सचिव हरीश दुबे, विशेष कार्यपालन अधिकारी रविंद्र पागे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी अग्निशामक दलाच्या जवानांनी विविध प्रात्याक्षिके सादर केली. कोराडी रोड, काटोल रोड व मौदा येथील प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी, संचालक, प्रशिक्षक उपस्थित होते.
अग्निशामक दलाचे प्रमुख अधिकारी चंद्रशेखर जाधव यांनी प्रास्ताविकातून ‘अग्निशामक दिन’ व ‘अग्निशामक सप्ताह’ आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. संचालन नरेंद्र बावनकर यांनी केले. उचके यांनी आभार मानले.