Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सर्वच पक्षांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची धावपळ
नागपूर १५ एप्रिल/ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असताना विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली असून पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांंना त्यांची कामे वाटून दिली जात आहेत. जाहीर प्रचार संपला असला तरी घरोघरी जाऊन काही महिला कार्यकर्त्यां उमेदवारांच्या नावाची पत्रकं व ओळखपत्रे देण्याचे काम करीत असल्याचे विविध वस्त्यांमध्ये

 

दिसून आले.
गणेशपेठ भागातील मॉडेल मिलजवळ असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालयात सकाळपासून कार्यकर्त्यांची वर्दळ दिसून आली. मतदार यादीमध्ये अनेक लोकांची नावे नसल्याच्या तक्रारी कार्यालयात करण्यात येत असून सुधारित याद्या मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग दिसून आली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बनवारीलाल पुरोहित यांनी कार्यालयात फेरफटका मारुन काही प्रमुख कार्यकत्यार्ंशी चर्चा केली. उद्याची व्यवस्था कशी काय आहे याची माहिती जाणून घेत काही लोकांना उद्या कार्यालयात ठाण मांडून बसून राहण्याचे आदेश देण्यात आले.-
प्रचार प्रमुख आमदार देवेंद्र फडणवीस यांनी कार्यालयात येऊन काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि ते उत्तर नागपुरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला रवाना झाले. प्रत्येक भागात वॉर्डनिहाय बुथ तयार करण्यात आले असून त्या बुथवर याद्या पोहोचल्या की नाही, कोण कुठल्या बुथवर बसणार याची व्यवस्था केली जात होती. भाजपच्या नगरसेवकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून ज्या ठिकाणी भाजप आणि मित्रपक्षाचा नगरसेवक नसेल तिथे त्या भागातील प्रमुख कार्यकर्त्यांंकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
घाट रोडजवळील विलास मुत्तेमवार यांच्या प्रचार कार्यालयात सकाळपासून पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची ये जा सुरू असली तरी खरी गर्दी ग्रेट नाग रोडवरील मुत्तेमवार यांच्या मुलाच्या कार्यालयात दिसून आली. मुख्य प्रचार कार्यालयात दुपारच्यावेळी शहर काँग्रेसचे दोन पदाधिकारी आणि दहा ते बारा महिला-पुरूष कायकर्ते बसले होते. शहरातील विविध भागात बुथची व्यवस्था कुठे कुठे केली आहे तिथे कोण कार्यकर्ते बसणार यांची माहिती पदाधिकारी घेत होते. अनेक भागात उमेदवारांच्या नावाची पत्रके पोहचली नसल्याच्या तक्रारी कार्यालयात येत होत्या. त्याप्रमाणे व्यवस्था केली जात होती. उद्या प्रत्येक भागात गाडय़ांची व्यवस्था करण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जात होत्या.
विलास मुत्तेमवार यांनी सकाळी कार्यालयात जाऊन काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि ते बाहेर पडले. कार्यकर्त्यांना सूचना देण्याचे काम नीट करा, असे आदेश त्यांनी दिले. कार्यालयात कार्यकर्त्यांची लगबग दिसत नसली तरी कार्यकर्त्यांची ये जा सुरू होती. काँग्रेसच्या देवडिया भवनातील कार्यालयात मात्र दुपापर्यंत सामसुम होती. कार्यकर्ते येत होते आणि कोणी दिसत नाही म्हणून परत जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेशपेठमधील कार्यालयात कार्यकर्त्यांची ये जा सुरू होती. काही कार्यकर्ते सभागृहात चर्चा करीत बसले होते. उद्या कोण कुठल्या भागात राहणार याविषयी चर्चा केली जात होती. शिवाय विदर्भातील निवडणुकीचे अंदाज बांधले जात होते. मानेवाडा भागात बहुजन समाज पक्षाच्या कार्यालयात सकाळच्यावेळी फारशी कार्यकर्त्यांची लगबग दिसून आली नाही. दुपारी बारानंतर मात्र एक एक करीत कार्यकर्ते येऊ लागले. उमेदवारांच्या नावाचे पोस्टर, बॅनर, स्टीकर याद्या घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. बुथवर बसणाऱ्या कार्यकत्यार्ंची नावे ठरविली जात होती. प्रत्येकाला कामाचे वाटप केले जात होते. काही ज्येष्ठ मंडळी बाहेरच्या पोर्चमध्ये निवडणुकीवर चर्चा करीत बसले होती. माणिकराव वैद्य सकाळी नऊच्या सुमारास कार्यालयात आले. त्यांनी काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली व ते जनसंपर्कासाठी बाहेर पडले.