Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘लॉर्ड्स’च्या कारखान्याला भीषण आग
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

ल्ल अकराही केंद्रांवरून अग्निशमन गाडय़ा दाखल
ल्ल दोन इमारती बेचिराख; ५० जवानांची झुंज
‘लॉर्ड्स’ कंपनीचे वस्त्र तयार करणाऱ्या वर्धमाननगरातील कारखान्याला बुधवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजताच्या सुमारास भीषण आग लागून कच्चा माल आणि तयार माल बेचिराख झाला.

 

काळ्या ठिक्कर पडलेल्या दोन इमारती तेवढय़ा शाबुत राहिल्या.
सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवर आयनॉक्ससमोर ‘लॉर्ड्स’ कंपनीच्या दोन इमारती असून त्यातील एका इमारतीत कार्यालय आणि दुसऱ्या इमारतीत कारखाना आणि गोदाम होते. बुधवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजताच्या सुमारास कारखान्यासमोरील दोघा रखवालदारांना कारखान्याच्या समोरील भागात आग लागलेली दिसली. या रखवालदारांनी आरडाओरड करून शेजारच्या इमारतीत राहणाऱ्यांना उठवले. कारखान्याचे मालक किशोर ठुठेजा तसेच अग्निशमन दलाला कळवण्यात आले. अग्निशमन दलाची एक गाडी पोहोचेपर्यंत आगीने विशाल रूप धारण केले. ज्वलनशील वस्तू असल्याने आग पेटायला वेल लागला नाही. त्यातच वारा असल्याने आग भडभडून पेटली. आगीच्या ज्वाळा व धूर आकाशात उंचच जात होत्या. पाच किलोमीटर अंतरावरून आगीच्या ज्वाळा व धूर दिसत होता, असे काही प्रत्यक्षदर्शीना सांगितले. दोन इमारतींमधील जागेतही माल ठेवण्यात आला होता. तो पेटल्याने शेजारच्या इमारतीतही आग पसरली. त्या इमारतीत लाकडी टेबल, कपाट व कागदपत्र होती. त्यांनाही आग लागली.
अग्निशमन दलाची एक गाडी तेथे आली. आगीचे स्वरूप पाहून या जवानांनी नियंत्रण कक्षाला सांगितले. नियंत्रण कक्षाने शहरातील अकराही केंद्रांवरून गाडय़ा तेथे रवाना केल्या. अकरा गाडय़ांनी अग्निशमन दलाचे जवान तेथे पोहोचले. पहिल्या गाडीतून आलेल्या जवानांनी लगेचच इतर नागरिकांच्या मदतीने कारखान्या शेजारच्या इमारतीमधून रहिवाशांना बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या इतर गाडय़ा पोहोचेपर्यंत आग चांगलीच पेटली. मुख्य अग्निशमन अधिकारी चंद्रशेखर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ५० अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवणे सुरू केले. दोन तासात आगीवर नियंत्रण आले. मात्र, दोन्ही इमारतीत आगीचा वणवा सुरूच होता.
इमारतीच्या मागील भागात कँटिनमधील गॅस सिलेंडर तसेच कार्यालयातील वातानूकुलित यंत्रामधील सिलेंडरचा स्फोट झाला. त्या आवाजाने कारखाना परिसरातील नागरिकांमध्ये आणखीच दहशत निर्माण झाली. अकरा गाडय़ांनी दहा फेऱ्या करून पाणी आणले. तरी कारखान्यातील आग विझत नव्हती. एका मोठय़ा क्रेनवर तसेच दोन्ही बाजूच्या इमारतींच्या गॅलरीत उभे राहून पाण्याचा मारा केला जात होता. इमारत बंदिस्त असल्याने अखेर एक जेसीबी बोलावण्यात आले. उजवीकडील इमारतीच्या समोरील लोखंडी शटर बाहेर ओढून घेण्यात आले. तेथील मोकळ्या जागेतून पाण्याचा मारा केला जाऊ लागला. दुपारी उजवीकडील इमारतीची भिंत जेसीबीने फोडून पाण्याचा मारा करण्यात आला. अग्निशमन दलाच्या ५० जवानांचा आग विझवण्याचा प्रयत्न तोकडा पडत होता, इतकी ही आग भीषण होती. दुपारी चार वाजताच्या सुमारास आगीचे लोळ कमी झाले. तरीही आतील भागात आग धुमसतच होती. तळघरात आग पेटलेलीच होती. त्यावर पाण्याचा मारा पोहोचत नव्हता. सायंकाळी आणखी एका बाजूने भिंत फोडण्यात आली. डावीकडील चार मजली इमारतीच्या आतील भागातील सर्व वस्तू बेचिराख झाल्या. आतून फक्त काळा धूर तेवढा निघत होता. संपूर्ण इमारत काळवंडली आणि इमारतीला तडे गेले. या दोन्ही इमारतीत मध्यरात्रीपर्यंत कुणीच जाऊ शकत नव्हते. या कारखान्याला आग लागण्याची ही दुसरी वेळ आहे.
आग लागल्याचे समजताच कारखान्याचे मालक किशोर ठुठेजा कुटुंबीयांसह तेथे आले. माजी नगरसेवक अशोक गोयल, एन. कुमार यांच्यासह शहरातील काही व्यावसायिकही तेथे पोहोचले. आग लागल्याचे वृत्त पंचक्रोशित पसरायला वेळ लागला नाही. नागरिकांची तेथे सकाळपासूनच गर्दी झाली. लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सुपारे यांच्यासह मोठा पोलीस ताफा तेथे तैनात करण्यात आला. वाहतूक पोलीस उपनिरीक्षक विजय सारभुकन व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैष्णोदेवी चौक ते हिवरी नगर चौकापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी लोखंडी कठडे लावून बंद केला. आग लागण्याचे कारण नक्की समजू शकले नाही. शॉट सर्किटने आग लागली असावी, असे बोलले जात होते. आगीत नक्की किती नुकसान झाले हे सांगण्यास किशोर ठुठेजा यांनी असमर्थता व्यक्त केली.
कारखाना पुढेही उभा होऊ शकतो मात्र प्राणहानी ही कधीही भरून निघत नाही. प्राणहानी झाली नाही म्हणून ईश्वराचे लाख लाख आभार असल्याचे भावुक उद्गार किशोर ठुठेजा यांनी काढले. कारखान्यात दोन महिन्यांपूर्वीच अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली. त्याचा उपयोगही पहाटे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचे स्वरूप एवढे भयंकर होते की त्याचा काहीच उपयोग झाला नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र कारखान्यात अग्निशशमन यंत्रणा नव्हती, असे मुख्य अग्निशमन अधिकारी चंद्रशेखर जाधव म्हणाले.
दरम्यान, आग लागल्याचे समजताच कारखान्याचे कर्मचारी तेथे पोहोचले. या ठिकाणी सुमारे ५०० कर्मचारी आहेत. या सर्वाच्या चेहऱ्यावर पुढे काय, असा प्रश्न कायम होता. काही महिला कामगारांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या कारखान्यात शर्ट, पँट, ट्राऊजर्स, टाय, चादरी वगैरे वस्त्रे तयार केली जातात. देशभरात तसेच विदेशातही हा माल जातो. त्यासाठी लागणारा पॉलिस्टर व सुती धागा, कापड हा कच्चा माल आणि तयार झालेला माल मोठय़ा प्रमाणावर ठेवण्यात आला होता. उजव्या भागाच्या इमारतीच्या तळ घरातही मोठय़ा प्रमाणावर मालाचे ढिग होते. हा सर्व माल आगीच्या भक्षस्थानी पडला. नक्की किती नुकसान झाले, हे कुणीच सांगू शकत नव्हते. मात्र, कच्चा माल, तयार माल, यंत्रसामुग्री, फर्निचर, इमारतीचे नुकसान वगैरे मिळून कोटीच्या घरात नक्कीच नुकसान झाले असेल, असेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. आगीमुळे पंखे तसेच इतर लोखंडी सामान वाकले.
तीन वर्षांंपूर्वी ग्रेट नाग रोडवर श्याम लोखंडे यांच्या इमारतीला अशीच आग लागली होती. तळघरात खच्चून भंगार असल्याने आग आतल्याआत धुमसत होती. इमारतीत आगीमुळे प्रचंड उष्णता निर्माण झाली. इमारतीमधील लोखंड वितळले आणि ही इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. आगीत आणि ढिगाऱ्याखाली दबून अकराजणांचा मृत्यू झाला. आजची आगीची घटना पाहून नागरिकांना या घटनेची आठवण झाली. आज सुदैवाने कारखान्यात कुणीच नव्हते.