Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सलग ६५ तास गायनाचा मनीषचा विश्वविक्रम हाकेच्या अंतरावर
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

संगीत क्षेत्रात सलग ६५ तास मराठी-हिंदी गीते सादर करण्याचा एक आव्हानात्मक उपक्रम गायक मनीष भिवगडे यांनी हाती घेतला असून उद्या, गुरुवारी मध्यरात्री १ वाजता या उपक्रमाची यशस्वी

 

सांगता होणार आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात मनीष पाटील नावाच्या युवकाने डॉ. दत्ता हरकरे आणि काही गायक, वादक कलावंताना हाताशी धरून सलग ३६ तास विक्रम करण्यासाठी हिंदी मोरभवन येथे कार्यक्रम आयोजित केला होता. पण मनीष पाटीलने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डबाबत कुणाशीही पत्रव्यवहार न केल्यामुळे आयोजकांचा प्रयत्न पूर्णपणे फसला होता. पराभूत मनीष पाटीलने जिद्दीने ललित खोब्रागडे यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा विक्रमासाठी प्रयत्न सुरू केले. त्याने मनीष भिवगडे या गायकाचा सलग ६५ तास मराठी-हिंदी गीते सादर करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी म्हणजे मंगळवारी सकाळी ८ वाजता भिवगडे यांनी गायनाला प्रारंभ केला.
या जागतिक विक्रमासाठी मनीष भिवगडे यांनी ११८ मराठी-हिंदी गीतांची निवड केली आहे. उद्या, गुरुवारी मध्यरात्रीनंतर म्हणजे १ वाजता कार्यक्रमाची सांगता करून एक आगळावेगळा आणि अनोखा विक्रम भिवगडे आणि त्यांच्यासोबत साथसंगत करणारे सुनील माधव इंगळे व राजू काळे करणार आहेत. बोधी फाऊंडेशन व युथ वेलफेयर असोसिएशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्हेटरनरी कॉलेजच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाबाबत बोलताना ललित खोब्रागडे यांनी सांगितले, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डशी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यांचे पत्र आले आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या साईटचे प्रमुख पवन सोळंकी उद्या, सकाळी नागपुरात दाखल होणार असल्याची माहिती खोब्रागडे यांनी दिली आहे.