Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
नवनीत

अनेक आगम ग्रंथांत महावीरांना वंदन करून त्यांची वाणी जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या इ. स. पहिल्या शतकातील आचार्य कुंदकुंदाना वंदन केलेलं असतं. आद्य कुंदकुंदाचार्यानी अनेक आगम ग्रंथ लिहिले. जैन तत्त्वज्ञान लोकभाषेत अतिशय सूक्ष्मपणे, अभ्यासपूर्ण लिहून लोकांपर्यंत

 

पोहोचवलं. आचार, विचारांचं, अहिंसेचं महत्त्व सांगितलं. श्रावक धर्म, मुनिधर्म, कर्माचं तत्त्वज्ञान, जग कसं बनलं, त्या सहा द्रव्यांचं यथार्थ वर्णन, आत्मा, श्रद्धा, चारित्र्य खरं ज्ञान आदी विविध विषयांवर त्यांनी सविस्तर भाष्य केलंय. श्रावकांच्या षट्क्रियांमध्ये ते म्हणतात-
दाणं पूया मुक्खं सावय धम्मे सावया तेज विणा ।
झाजाज्झययं मुक्रंव, जइ-धम्मे तं विणा तहा सो वि ।।
श्रावक धर्मात दान व पूजा मुख्य आहेत, याशिवाय श्रावक होऊ शकत नाही. ध्यान व अध्ययन मुनी होण्यासाठी मुख्य गोष्टी आहेत असं म्हटलंय. रयणसार ग्रंथात अतिशय बारकाव्यानिशी त्यांनी श्रावक धर्माविषयीचे नियम सांगितले आहेत. अगदी कमी शब्दांत केवढा अर्थ भरलाय हे लक्षात येतं.
गुण, वय, तव, सम पडिमा दाणं
जलगाळणं अणत्थमियं दंसण णाण चरित्रं, किरिया तेवण्ण सावया भणिया ।।
श्रावकाच्या त्रेपन्न क्रिया त्यांनी सांगितल्यात. वड, पिंपळ, पाकर, कटुंबर, अंजीर या फळांत सूक्ष्म जीव असतात, ते खाऊ नयेत व तीन मकार (मद्य, मांस, मधू) या आठ गोष्टी त्याज्य समजाव्यात. बारा व्रतं- पाच अणुव्रतं, तीन गुणव्रतं, चार शिक्षाव्रतं, बाहय़ तप व अभ्यंतर तप अशी बारा तपं, अकरा प्रतिमा आणि आहारदान, औषधदान, शास्त्रदान (ज्ञानदान) व अभयदान ही चार दानं विचारपूर्वक देणं अशा त्रेपन्न क्रिया पाळणारा तो श्रावक.
हे नियम पाळणारा कुणीही कुठल्याही जातीतला माणूस सहज सुखी होईल, त्याच वेळी जगही सुखी होईल. साऱ्या कलहापासून हिंसेपासून दूर राहील.
लीला शहा

कोणता अशनी हा धोकादायक अशनी समजला जातो? धोकादायक अशनींचा वेध घेण्यासाठी काही विशेष यंत्रणा उभारली आहे का?
लहान आकाराच्या अशनींनी घडवलेला विध्वंस प्रादेशिक स्वरूपाचा असतो, तर दीड किलोमीटरहून मोठय़ा आकाराच्या अशनींनी घडवून आणलेला विध्वंस हा सार्वत्रिक स्वरूपाचा असतो. पृथ्वीच्या आजूबाजूला वावरणाऱ्या चाळीस मीटरहून मोठय़ा अशनींची संख्या दहा लाखांहून जास्त असावी. यातील एक किलोमीटरहून मोठय़ा अशनींची संख्या सुमारे अकराशे इतकी आहे. या अशनींपैकी कोणते अशनी खरोखरच धोकादायक आहेत, हे ठरवताना अशनींच्या आकाराबरोबर हे अशनी पृथ्वीच्या कक्षेच्या किती जवळ येतात, याचासुद्धा विचार केला जातो. स्वीकृत व्याख्येनुसार १५० मीटरपेक्षा मोठा असणारा आणि पृथ्वीच्या कक्षेपासून पंचाहत्तर लाख किलोमीटरच्या आत येऊ शकणारा अशनी, हा धोकादायक अशनी मानला जातो. (हे अंतर पृथ्वी आणि चंद्र या दरम्यानच्या सरासरी अंतराच्या सुमारे वीसपट भरते.) ही व्याख्या धूमकेतूंनाही लागू होते. धोकादायक धूमकेतूंची संख्या ही धोकादायक अशनींपेक्षा बरीच कमी आहे. आजमितीस ज्ञात असलेल्या धोकादायक अशनींची संख्या एक हजाराहून अधिक आहे. धोकादायक अशनींचा शोध अमेरिकेतील नीट, लिनीअर, लोनिऑस, स्पेसवॉच, कॅटॅलिना स्काय सर्वे यांसारख्या प्रकल्पांकडून घेतला जात आहे. स्पेसवॉच या प्रकल्पाकडून यासाठी १.८ मीटर व्यासाच्या मोठय़ा दुर्बिणीचा वापर केला जात आहे. स्पेसगार्ड फाऊंडेशन ही विविध देशांतल्या वेधशाळांशी संबंधित असणारी युरोपस्थित संस्थाही यादृष्टीने प्रयत्नशील आहे. चिलीत उभारल्या जात असलेल्या ‘लार्ज सिनॉप्टिक सर्वे टेलिस्कॉप’ या ८.४ मीटर व्यासाच्या प्रचंड दुर्बिणीकडूनही इ. स. २०१६ सालापासून धोकादायक अशनींचा शोध घेतला जाणार आहे. या दुर्बिणीकडून इ. स. २०२५ सालापर्यंत ३०० मीटरहून मोठय़ा आकाराच्या ९० टक्के धोकादायक अशनींचा शोध अपेक्षित आहे.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

केवळ आपल्या मुद्राभिनयाने जगभरातील रसिकांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता चार्ली चॅप्लिन! लंडनमध्ये १६ एप्रिल १८८९ रोजी चार्लीचा जन्म झाला. त्याचे आई-वडील दोघेही नाटकात काम करत. त्याच्या आईचा आवाज एकाएकी गेल्याने तिला वेड लागले. वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईने छळ सुरू झाला आणि त्याचे बालपण हरपले. लहानपणी त्याने गाणे, नकला, प्रसंगी काच कारखान्यात कष्टाची कामे करून पोटाची गरज भागवली. त्याचा भाऊ सिडेन याच्यामुळे त्याला ‘फ्रेंड-कार्नो’ या नाटक कंपनीत काम मिळाले आणि अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. ‘मेकिंग अ लिव्हिंग’ ही त्याची पहिलीच फिल्म. त्याच्यानंतर आलेली ‘किड ऑटो रेसेस अ‍ॅट व्हेनिस’ ही फिल्म त्याच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरली. यातूनच चार्लीची ती अजरामर व्यक्तिरेखा उभी राहिली. ढगाळ विचार, जॅकेट, त्यावर आखूड कोट, सोल गेलेले मोठे बूट, डोक्यावर हॅट, छोटी मिशी आणि हातात काठी घेतलेला चार्ली पाहिला की प्रेक्षकांच्या हसून हसून मुरकुंडय़ा वळत. यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. ‘द ट्रॉम्प’, ‘इझी स्ट्रीट’, ‘द किड’, ‘द सर्कस’, ‘वूमन ऑफ पॅरिस’, ‘मॉडर्न टाइम्स’ असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्याने दिले. ‘दि ग्रेट डिक्टेटर’ हा त्याचा हिटलरवरील विडंबनात्मक चित्रपट तुफान गाजला. कम्युनिस्ट असल्याचा त्याच्यावर आरोप झाल्याने त्याने अमेरिका सोडली. उशिरा का होईना अमेरिकेला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. त्याला सन्मानाने अमेरिकेत बोलावले. विशेष ऑस्कर पुरस्काराने त्याला सन्मानित केले. इंग्लंडनेही त्याला ‘सर’ हा किताब बहाल केला. ख्रिस्त आणि नेपोलियनवर चित्रपट काढण्याचे त्याचे स्वप्न मात्र अपुरे राहिले. १९७७ साली हा अजरामर कलाकार काळाच्या पडद्याआड गेला.
संजय शा. वझरेकर

संध्याकाळ तांबडी झाली होती. महादबा शेतावरचे काम आटपून गावातल्या घराकडे निघाला होता. त्याला शेताच्या मध्यभागी विस्तवाचा ढीग जळताना दिसला. तो धावत तिथे पोहोचला. पाहतो तर निखाऱ्याच्या टोकावर एक काळुंद्रा दुष्ट चेहऱ्याचा आणि विस्तवासारख्या डोळय़ांचा छोटासा माणूस बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकट हसू होते. पक्ष्याच्या पंखासारखे कान असलेला तो फूटभर उंचीचा सैतान महादबाला दरडावून म्हणाला, ‘‘का आलास इथे!’’ महादबा म्हणाला, ‘‘अरे, तू असा गुप्त खजिन्यावर बसल्यासारखा का इथे बसला आहेस?’’ आपले टोकदार हिरवे दाद दाखवून सैतान गलिच्छ हसला, ‘‘अरे, तू जन्मात पाहिलं नसशील इतकं सोनं-चांदी इथं पुरून ठेवलंय.’’ महादबा जरा वेळ गप्प झाला. हा खरं बोलणं शक्य नाही, असं त्याला वाटलं. एव्हाना महादबाची भीती कमी झाली होती. तो धीटपणे म्हणाला, ‘‘हे शेत, ही जमीन माझी आहे. त्यामुळे या जमिनीत जे काही आहे तेही माझंच आहे.’’ ‘‘हो! तुझं होईल हे धन. हे बघ, माझ्याकडे धन खूप आहे, पण जमिनीतून उगवणारे तुझ्या शेतातले हे धान्य माझ्याकडे नाही. तुझ्या शेतात जे उगवेल त्यातले निम्मे दोन वर्षे तू मला दे. मी तुला हे धन देईन.’’ महादबाने विचार केला, हा लबाड आहे. असे फुकाफुकी धनदौलत देणाऱ्यातला नाही. मला फक्त लालूच दाखवत असावा. याच्या लबाडीला भुलता कामा नये. तो सैतानाला म्हणाला, ‘‘तुझी मागणी मला मान्य आहे.’’ सैतान हिरव्या दातांनी अगदी खुशीत हसला. महादबा म्हणाला, ‘अर्धे वाटायचे तर जमिनीवरचे तुझे. खालती उगवेल ते माझे, अशी अर्धी वाटणी करू या.’ सैतान कबूल झाला. त्या वर्षी महादबाने भुईमूग, गाजरे, बीट, बटाटे शेतात लावले. पीक आले. जमिनीवर आलेला पाला सैतानाच्या वाटय़ाला आला. भुईमूग शेंगा, गाजरं, बटाटे, बीट महादबाला मिळाले. सैतान सावध झाला. तो म्हणाला, ‘‘या वर्षी जमिनीवर येईल ते तुझे. खाली उगवेल ते सगळे माझे.’’ महादबाने गहू, मका, टोमॅटो, फरसबी लावले. शेत बहरले. धान्य, फळभाजी डवरले. पुन्हा सैतानाच्या वाटय़ाला मुळय़ाच आल्या. तो फार संतापला. थयथयाट करत एका दरडीत नाहीसा झाला. महादबाचे काहीच नुकसान झाले नाही. आलेले सैतानी संकट आले तसे नाहीसे झाले. (. . . ग्रीम बंधूंच्या कथेवरून)
लबाड आणि दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांशी आपण त्यांच्याप्रमाणे दुष्टपणे वागू शकत नाही, कारण आपण दुष्ट नसतो. त्यांच्याशी भलेपणाने वागले तर आपले नुकसान होते. आपल्याला त्रास होतो. अशा प्रकारच्या माणसांशी चातुर्याने वागून त्यांच्या दुष्टपणाची परतफेड करता येते. आजचा संकल्प- समोरची व्यक्ती कशी आहे ते पाहून मी योग्य त्या प्रकारे वागेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com