Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९

शैक्षणिक शुल्क वाढीविरुद्ध पालकांचा शाळेवर मोर्चा
बेलापूर/वार्ताहर :
शैक्षणिक शुल्कात अवास्तव वाढ केल्याने ऐरोलीतील डीएव्ही पब्लिक शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध पालकांनी बुधवारी मोर्चा काढला होता. या मोर्चात सुमारे २०० पालक सहभागी झाले होते. सहावा वेतन आयोग लागू करण्याच्या कारणाखाली नवी मुंबईतील काही शिक्षण संस्थांनी शैक्षणिक शुल्कात मागील वर्षीपेक्षा तब्बल ६० ते ८० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे नेरूळच्या डीएव्ही शाळेपासून गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेले आंदोलनाचे लोण आता हळूहळू नवी मुंबईत पसरण्यास सुरुवात झाली आहे.

उरण पं. स.च्या सभापतीपदावरून शेकाप-सेनेत जुंपली
उरण/वार्ताहर -
उरण पं. स. सभापतीपदाचा वाद मंगळवारच्या शिवसेना-शेकापच्या सयुक्तिक बैठकीत उफाळून आल्याने या विषयावर दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. आमदार विवेक पाटील यांच्या उपस्थितीत सभापतीपदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याने त्याचा विपरीत परिणाम युतीच्या उमेदवारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उरण पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकाप-सेना आघाडीचे आठ सदस्य निवडून आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा धुव्वा उडवीत सर्वच आठ जागा युतीने काबीज केल्या. यामध्ये शिवसेना-४ व शेकाप-४ असे पक्षीय बलाबल असल्याने सभापतीपदाचा पेच निर्माण झाला होता. त्यावेळी सभापतीपदासाठी शेकाप-सेना या दोन्ही पक्षांनी दावा केला होता. अखेर दीड वर्षांसाठी का होईना, सभापतीपदाचा प्रथम बहुमान सेनेला मिळावा, अशी विनंती करण्यात आली होती.

पुस्तक विक्रीच्या ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणाला बसलेली खीळ दुर्लक्षित करण्यासारखी नाही
प्रतिनिधी -
महाबळेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा ‘नॅनो’ प्रयोग मराठीतील पुस्तक प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांना फारसा रुचलेला नाही. या छोटय़ा गावातील साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी संमेलनाच्या निमित्ताने इतक्या मोठय़ा प्रमाणात पहिल्यांदाच एका ठिकाणी विविध विषयांवरील हजारो पुस्तके हाताळायला व पाहायला मिळाली, ही बाब वाचक म्हणून स्वागतार्ह असल्याचे मत प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांच्या वर्तूळातून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याच वेळी गेल्या काही वर्षांतील साहित्य संमेलनांमध्ये पुस्तक खरेदीची जी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे झाली होती, त्याला महाबळेश्वर साहित्य संमेलनात खीळ बसली या गोष्टीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मतही प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

‘बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी एकत्र या’
पनवेल/वार्ताहर -
भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांचे जतन व प्रचार संपूर्ण देशभर झाला पाहिजे. त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी सर्वानी एकत्र या, असे आवाहन आमदार विवेक पाटील यांनी केले. कळंबोली येथे रिपाइं रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवप्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवाच्या निमित्ताने विविध लोकनृत्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला नवी मुंबईचे पोलीस आयुक्त रामराव वाघ यांनीही भेट दिली. याप्रसंगी शेतकरी कामगार पक्ष जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, जिल्हा सरचिटणीस विलास थोरवे, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, रिपाइं तालुका अध्यक्ष शरद पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष सुंदर शेळके, परीक्षित सारदळ, शहाजी जावेद, अनंत जाधव, सतीश धायगुडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश मोकल यांनी करून उपस्थितांची दाद मिळविली.

पगारवाढीसाठी आंदोलन करणाऱ्या ५० जणांना अटक
बेलापूर/वार्ताहर -
पगारवाढीसाठी कंपनीच्या गेटसमोर आंदोलन करणाऱ्या ५० कामगारांना अटक करण्यात आल्याची घटना बुधवारी शिरवणे येथे घडली. शिरवणे येथील औद्योगिक वसाहतीतील ओवीस केमिकल कंपनीत काम करणाऱ्या कामगार व व्यवस्थापनाच्या पगारवाढीसाठी अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या, मात्र व्यवस्थापनाने कामगारांच्या तोंडाला पाने पुसली. यामुळे संतप्त कामगारांनी बुधवारी कंपनीच्या गेटबाहेर निदर्शने केली. जमावबंदीचा आदेश लागू असल्याने पोलिसांनी ५० कामगारांना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात केली.

‘जेएनपीटी कामगार विश्वस्त पदासाठी तरुणांना संधी द्या’
उरण/वार्ताहर -
कामगार व स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जेएनपीटी कामगार विश्वस्त पदाची धुरा आता तरुणांकडे देण्याचे भावनिक आवाहन कामगार नेते डॉ. शांती पटेल यांनी कामगारांच्या सभेत केले. न्हावा-शेवा पोर्ट अॅण्ड जनरल वर्कर्स युनियनच्या कामगारांनी आयोजित केलेल्या बैठकीत ते कामगारांना मार्गदर्शन करीत होते.
डॉ. पटेल प्रणीत कामगार संघटनेची सभा ज्येष्ठ कामगार नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत युनियन स्थापनेपासूनच संघटनेची धुरा सरचिटणीस महादेव घरत वाहात आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे जेएनपीटीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. तसेच संघटनेत घरत यांनी पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्यांच्याच पुढाकाराने झालेल्या आंदोलनाने जेएनपीटीच्या श्ॉलो वॉटर बर्थचे होऊ पाहात असलेले खासगीकरण रोखण्यास यश मिळाले असल्याचा दावाही डॉ. पटेल यांनी केला. यामुळे जेएनपीटी कामगार विश्वस्तपदाच्या होणाऱ्या निवडणुकीत महादेव घरत यांच्यासारख्या तरुणांकडे विश्वस्तपदाची धुरा सोपवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी महादेव घरत, दीपक पाटील, श्रीकांत पाटील, समीर पंडित, विद्याधर राणे, यशवंत कोळी, एम. के. पाटील, नितीन माळी, शशांक जगताप, तुकाराम कडू यांनी कामगारांना एकजुटीचे आवाहन करून घरत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचाही संकल्प केला.

इंटक युनिट कामगारांचा आज पनवेलमध्ये मेळावा
उरण/वार्ताहर -
उरण, पनवेल, खालापूर तालुक्यातील इंटकच्या ६५ युनिटच्या कामगारांचा मेळावा गुरुवारी १६ एप्रिल रोजी पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे. कामगारांच्या समस्या व राजकीय घडामोडींबाबत विचारविनिमय करण्यासाठी आयोजित मेळाव्यात इंटकचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, रामशेठ ठाकूर, पनवेल नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर हे उपस्थित राहून कामगारांना मार्गदर्शन करणार आहेत.

नवी मुंबई अग्निशमन दलातर्फे अग्निशमन दिवस साजरा
बेलापूर/वार्ताहर -
अग्निशमनाचे कार्य करताना मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १४ एप्रिल हा अग्निशमन दिवस म्हणून पाळण्यात येतो. या निमित्त नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे प्रशासनाचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर व इतर उपस्थित मान्यवरांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी महाराष्ट्र राज्य अग्निशमन विभागाचे माजी सल्लागार विश्वनाथ मडकईकर, माजी उपअग्निशमन अधिकारी रोहिदास म्हात्रे, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक प्रकाश देशमुख, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी मनपाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे म्हणाले की, आपत्कालीन स्थितीत जनतेच्या जीविताची व मालमत्तेची काळजी घेण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान नेहमीच तत्पर असतात; मात्र दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा दुर्घटना घडू नये, यादृष्टीने जनतेत वैयक्तिक वा सामाजिक सुरक्षेबाबत जागरुकता केली पाहिजे. यासाठी १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील विविध विभागांत जनजागृतीवर व्याख्याने व प्रात्यक्षिके आयोजित केल्याचे राणे यांनी सांगितले. याप्रसंगी सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी, म्हणून अनिरुद्ध अॅकॅडमीतर्फे प्रात्यक्षिके दाखवून तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.