Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९

मराठी अस्मितेचा मुद्दा सध्या सर्वत्र गाजतो आहे. याच विषयाच्या अनुषंगाने नुकताच प्रदर्शित झालेला महेश मांजरेकर यांचा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटही चर्चेत आहे. त्या पाश्र्वभूमीवर, नाशिकमध्ये अशोक स्तंभ मित्र मंडळाने लावलेला आव्हानवजा आवाहन करणारा हा फलक लक्षवेधी ठरत आहे.

सगळ्यांचं समाधान..
भाऊसाहेब :
लै थकल्यावानी दिसतो, भावडय़ा..
भावडय़ा : मिरवणुकीत जावं लागलं ना भाऊंबरोबर, सगळीकडे हजेरी लावावी लागली. त्यामुळे जरा गणगण झाली.
भाऊसाहेब : या टायमाला येकदम जोरात झाली म्हने जयंती अन् मिरवणूक.
भाऊराव : जयंती नेहमीच अमाप उत्साहात साजरी होते. पण, यंदा निवडणुकीमुळे झाडून सारी नेतेमंडळी हजर होती. साहजिकच पेपरात फोटो-बिटो जास्त छापून आले, एवढचं.
भाऊसाहेब : म्हंजे, थ्वोरा-मोटय़ांच्या जयंतीची आठवन बी फकस्त निवडनुकीच्या वक्तालाच का?

‘विकासाभिमुखतेची गरज’
बऱ्याच वर्षांपासून नाशिक आता खूप डेव्हलप होणार, पुणे व मुंबईशी बरोबरी करणार, एक मोठे शहर म्हणून नावारूपास येणार अशी जोरदार चर्चा ऐकायला मिळते. प्रत्यक्षात मात्र नाशिकची प्रगती फार थंडपणे होताना दिसते आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव.
यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने ही चर्चा पुन्हा सर्वाच्या तोंडी आहे. नाशिक मतदार संघातून आजवर निवडून दिलेल्या बहुतेक खासदारांनी भ्रमनिरास केला आहे. नाशिकची भौगोलिक स्थिती विकासाला भरपूर पोषक आहे. कृषी उत्पादनांसाठी नाशिक व परिसर हा अधिकाधिक समृद्ध होत आहे. नाशिकचा भाजीपाला फार तर फार मुंबईपर्यंत पोहोचतो. द्राक्ष, डाळींब, कांदा उत्पादनांच्या निर्यातीला चांगली संधी आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना अनंत अडचणी येतात.

प्रश्नांची सरबत्ती अन् जोशी सरांचे गोलमाल धोरण
प्रतिनिधी / नाशिक

मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका, उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या झालेल्या भेटी-गाठी, राष्ट्रवादीबरोबरच्या छुप्या युतीमुळे काही मतदारसंघांकडे झालेले दुर्लक्ष या व अशा अनेक प्रश्नांना उत्तरे देताना सेनेचे वरिष्ठ नेते मनोहर जोशी यांनी गोलमाल भूमिका घेत वेळ मारून नेण्याचे धोरण अवलंबले. निमित्त होते, जोशी सरांच्या बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेचे. यावेळी बहुतांश प्रश्नांवर थेट भाष्य करण्याऐवजी त्यांनी उत्तरे खुबीने कशी टाळता येतील यावर भर दिल्याचे पहावयास मिळाले.

उद्योगवाढीसाठी वेगवेगळे लक्ष्य
प्रश्न जिव्हाळ्याचे; दृष्टी उमेदवारांची

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘नाशिक वृत्तान्त’च्या माध्यमातून केंद्र सरकारशी संबंधित स्थानिक पातळीवरील विविध प्रलंबित प्रश्नांकडे ‘प्रश्न जिव्हाळ्याचे’ या मालिकेतून लक्ष वेधण्यात आले. पण, केवळ प्रश्न मांडून उपयोग नाही, स्थानिक खासदारांकडून याबाबत पाठपुरावा झाला तरच नाशिकच्या विकासाला नवा आयाम मिळू शकतो. हे लक्षात घेता, लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा प्रस्तुत प्रश्नांकडे पहाण्याचा दृष्टीकोन कसा आहे, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांच्या काही योजना आहेत का, या विषयी जाणून घेतलेली त्यांची मते, त्यांच्याच शब्दात..

शोषणमुक्त समाज हे बाबासाहेबांचे ध्येय
एकिकडे विविध आरोप-प्रत्यारोपांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार गाजत आहे, तर जनतेमध्ये मात्र निवडणुकीविषयी फारशी उत्सुकता नाही. राजकीय पक्षांच्या कार्यपध्दतीविषयीच जनता नाराज असल्याचा सूरही त्यामुळे ऐकू येत आहे. या पाश्र्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या राजकीय विचारांचा आढावा घेणे महत्वपूर्ण. बाबासाहेबांचे विचार मांडणाऱ्या मालिकेतील हा शेवटचा लेख. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारात संसदीय लोकशाहीचा समन्वय राज्य-समाजवादाशी घालण्यात आला आहे. त्यांच्या राज्यसमाजवादाचा उगम दारिद्रय़ाविषयी आंबेडकरांना असलेल्या पोटतिडकीत आढळतो. त्यांनी दारिद्र्य जवळून पाहिले होते.

नाशकात बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी / नाशिक

ग्रँड मास्टर चेस अकॅडमी व नाशिक जिमखाना यांच्यातर्फे येत्या एक ते तीन मे या कालावधीत जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा होणार आहे. खुला, १५ व १० वर्षांखालील असे हे गट असतील. प्रत्येक गटाची स्पर्धा जलद एकदिवसीय पद्धतीने होईल. खुल्या गटासाठी प्रथम पाच तर उर्वरित दोन्ही गटातील पहिल्या तीन विजेत्यांना रोख स्वरूपात पारितोषिके दिली जाणार आहेत. तिन्ही गटात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला मालिकावीर पुरस्कार दिला जाणार आहे. नाशिक जिमखाना मैदानावर या स्पर्धा होणार असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले. स्पर्धेच्या प्रवेशिका शालीमार चौकातील नाशिक जिमखाना, कॉलेजरोडवरील करण बूक सेंटर, गंगापूर रोडवरील चतुरंग येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी ९४२३१-७५९८५, ९४२३४-८५७७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अत्याधुनिक सॅप कार्यप्रणाली
जळगाव / वार्ताहर

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘सॅप इआरपी’ या अत्याधूनिक सॉफ्टवेअरमार्फत संगणकीय कामकाज नुकतेच सुरू झाले. ही कार्यप्रणाली वापरत असताना अचुकता महत्वाची असल्याचे कुलगुरू प्राचार्य डॉ. के. बी. पाटील यांनी सांगितले. विद्यापीठाच्या अधीसभा सभागृहात सॅप प्रणालीचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सीएमसी लिमिटेडचे महाव्यवस्थापक एस. एस. साकळकर, कुलसचिव डॉ. एम. व्ही. बरीदे. प्रकल्प संचालक तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. बी. व्ही. पवार, वित्त व लेखा अधिकारी दिलीप शिंदे तसेच उपवित्त अधिकारी एन. एफ. पाटील यावेळी उपस्थित होते. या प्रणालीव्दारे कामकाजाचा प्रारंभ करणारे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ देशातील पहिले विद्यापीठ ठरले असल्याचे पाटील यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यापीठ अशी ओळख असलेल्या विद्यापीठाने हे नवे पाऊल उचलून विद्यार्थ्यांसाठी आणखी काही नवीन संकल्प करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.

येवल्याजवळील अपघातात एक ठार
येवला / वार्ताहर

येवला ते विंचूररोड जळगाव नेऊर शिवारात टाटा इंडीकाने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ठार झाला तर त्यांची पत्नी जखमी झाली. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. जळगाव नेऊरचे उपसरपंच अशोक रामचंद्र गायकवाड (३५) हे पत्नी अल्का गायकवाडसह मोटारसाकलने जात असताना ही धडक बसली. अशोक यांना येवला रुग्णालयातील उपचारानंतर नाशिक येथे रवाना करण्यात आले होते. रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पत्नी अल्का ही येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. कारच्या चालकाला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

देवळा बँकेला एक कोटीचा नफा
देवळा / वार्ताहर

२००८-०९ या आर्थिक वर्षांत येथील देवळा र्मचट्स को-ऑपरेटिव्ह बँकेस एक कोटी ८४ लाख रुपये नफा झाला असून सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. व्ही. एम. निकम यांनी दिली. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांअखेर भाग भांडवल एक कोटी ४५ लाख रुपये असून स्वनिधी ११ कोटी नऊ लाख ३० हजार रुपये आहे. मागील वर्षांपेक्षा ठेवी सहा कोटींनी वाढल्या असून त्या ३३ कोटी ८३ लाख रुपये इतक्या आहेत. बँकेची गुंतवणूक २२ कोटी ९६ लाखांची आहे. त्यापैकी कर्जवाटप २० कोटी ४८ लाखाचे झाले असून थकबाकीचे प्रमाण ५.३८ तर एन.पी.ए. चे प्रमाण शून्य टक्के असल्याचे डॉ. निकम यांनी सांगितले.

महेश बँकेला ६० लाखांचा नफा
नाशिक / प्रतिनिधी

येथील श्री महेश को-ऑपरेटिव्ह बँकेस २००८-०९ या आर्थिक वर्षांत एकूण ६० लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष बालकिसन धूत यांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षांत ४२४१ लाख रुपये ठेवी झाल्या असून २१६२ लाख रुपायंचा कर्ज पुरवठा सर्व प्रकारच्या क्षेत्रास केला आहे. बँकेची एकूण गुंतवणूक २०९१ लाख रुपायंची झाली असून, निव्वळ एनपीए १.५१ टक्के इतका कमी राखण्यात बँकेने यश मिळविले आहे. वसूल भाग भांडवल १४० लाख तर सभासद संख्या ५०४० इतकी झाली आहे. बँकेच्या तपासणी अहवालानुसार रिझव्‍‌र्ह बँकेने बँकेस ग्रेड १ दिली आहे तसेच बँकेस स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला असून मागील वर्षी सभासदांना नऊ टक्के प्रमाणे लाभांशाचे वाटपही करण्यात आले आहे. बँकेस सिन्नर व नाशिकरोड येथे शाखा सुरू करण्यास रिझव्‍‌र्ह बँकेकडून परवानगी मिळाली असून सिन्नर शाखा मे महिन्यात सुरू करण्याचे संचालक मंडळाने ठरविले आहे.

‘नाएसो’ तर्फे आदर्श शिक्षक व शाळांचा गौरव
नाशिक / प्रतिनिधी

येथील नाशिक एज्युकेशन सोसायटीचे थोर कार्यकर्ते गुरूवर्य व. चिं. सहस्त्रबुध्दे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २००८-०९ या शैक्षणिक वर्षांसाठी जिल्हास्तरावर आदर्श माध्यमिक शिक्षक व संस्था पातळीवर आदर्श माध्यमिक शाळांना गौरविण्यात येणार आहे. गुरूवारी सायंकाळी पाचला परशुराम साईखेडकर नाटय़गृहात हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (मेरी) महासंचालक मु. सं. मुंढे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने त्यांचे ‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शनपर व्याख्यान होईल. संस्था अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर हे अध्यक्षस्थानी असतील. पारितोषिक वितरण समारंभास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन संस्था उपाध्यक्ष रमेश देशमुख, प्रा. दिलीप फडके, पुरस्कार समितीचे अध्यक्ष य. दा. जोशी, निमंत्रक मीना भुसे यांनी केले आहे.