Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९

छोटया पक्षांचे उमेदवार म्हणजे राहू-केतूच!
अभिजीत कुलकर्णी

किमान लोकसभा निवडणुकीत तरी उत्तर महाराष्ट्राने आजवर प्रमुख राजकीय पक्षांचीच पाठराखण केली आहे. एवढेच काय, अलीकडच्या काळात तर अपवाद म्हणूनही कधी बारीक-सारीक पक्ष वा अपक्षांची मते दखल घेण्याइतपत असल्याचे सुद्धा दिसून येत नाही. मात्र, अशा पक्षांचा कधी नव्हे तेवढा प्रभाव आज या परिसरावर दिसतो. परिणामी, यंदा सहा पैकी किमान चार ठिकाणी अशा पक्षांनी उभे केलेले प्रतिनिधी प्रमुख उमेदवारांच्या पत्रिकेत जणू राहू-केतू बनून आल्याचे पहावयास मिळते. जळगाव आणि रावेर येथे भाजप व राष्ट्रवादीत सरळ सामना असला तरी नाशिक, दिंडोरी, धुळे आणि नंदुरबार येथे अशा तिसऱ्या-चवथ्या उमेदवारांमुळे चांगलीच रंगत येणार आहे. नंदुरबार हा आदिवासी बहुल मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्लाच. परंतु, यावेळी त्याची तटबंदी काहिशी कमकुवत झाल्याचे भासत आहे, ते शरद गावित यांच्या उमेदवारीमुळे. शरद गावित हे आदिवासी विकास मंत्री, राष्ट्रवादीचे डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू.

महाराष्ट्राचा गुजरात करण्यासाठी हिंमतीची गरज : नरेंद्र मोदी
वार्ताहर / धुळे

आजवर मतांचे राजकारण करूनच सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने देशाचा नव्हे, तर स्वत:चाच अधिकाधिक विकास केला, अशी टीका करताना महाराष्ट्राचा गुजरात करून दाखविण्यासाठी हिंमत लागते, असा टोला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. गुजरातमधील जनतेलाही काँग्रेसने आश्वासनांवर झुलविले होते, पण आज गुजरात सर्वार्थाने समृद्ध आहे. गुजरातमध्ये नेहमीच ये-जा करणाऱ्या खान्देशवासियांना हे चांगलेच माहीत आहे, असेही त्यांनी सांगितले. धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार प्रतापदादा सोनवणे यांच्या प्रचारार्थ येथील पारोळा रस्त्यावर डोंगरे महाराजनगरमध्ये बुधवारी दुपारी झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांसह सोनिया गांधी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. सभेला सोनवणे यांच्यासह नितीन गडकरी, आ. जयकुमार रावल, आ. दादा भुसे, आ. गुलाबराव पाटील उपस्थित होते. खान्देशातील लोक मोठय़ा संख्येने गुजरातमध्ये येतात. गुळगुळीत रस्ता, दुतर्फा वीजेचे दिवे याचा अनुभव जेथून येण्यास सुरूवात होते, तेथून गुजरातची हद्द सुरू होते. गुजरात सुजलाम् सुफलाम् बनविण्यासाठी आपण वीस नद्यांची जोडणी केली. असे असताना काँग्रेस मात्र मतांचे राजकारण करीत आहे, असेही मोदी यांनी सांगितले. तीन रुपये किलो दराने गहू देण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचे हे आश्वासनही फसवे आहे. प्रत्यक्षात गेल्या सात वर्षांपासून आपण गुजरातेत दोन रुपये दराने गहू वितरित करीत आहोत. हाच गहू दोन रुपयांनी आमच्याकडे खरेदी करून तो महाराष्ट्रात तीन रुपये दराने विकण्याचा घाट आहे की काय, असा सवालही त्यांनी केला. गुजरातसाठी श्यामाप्रसाद मुखर्जीनी बलीदान दिले आहे, हे सोनिया गांधींना ठाऊक नाही. त्यांनी इतिहासाची पाने चाळायला हवीत, असा सल्ला मोदी यांनी दिला. यावेळी गडकरी यांनीही आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली. हेल्मेट आणि इन्व्हर्टर यांचाच व्यवसाय या सरकारने वाढविला. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळेत भारनियमन करुन त्यांचे नुकसान केले. शेतीला पाणी नाही. पिके करपतात म्हणून कृषीमंत्री पवारांच्या कारकीर्दीत शेतकरी आत्महत्या करत आहे, असे त्यांनी सांगितले.

महामार्गाच्या दुरुस्तीअभावी विकासावरही परिणाम
प्रश्न जिव्हाळ्याचे, वार्ताहर / जळगाव

वाहतुकीच्या दृष्टीने संपूर्ण शहराला अडचणीच्या ठरलेल्या धुळे-अमरावती या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रक्रियेला मंजुरी मिळून अनेक वर्ष उलटल्यानंतरही अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. एकिकडे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगात सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या विस्तारीकरणासाठी मात्र आजपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतलेला नाही. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मात्र जवळपास सर्वच उमेदवारांनी या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतुकीचा भार दिवसेंदिवस वाढत असताना तो कमी करण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी कोणताही उपाय आजतागायत लोकप्रतिनिधींनी सुचवला नाही. शहरातील कोंडी कमी करण्यास सहाय्यभूत ठरणारा गिरणा नदीवरील जुना पूल अजूनही दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहे. जिल्ह्य़ातील अनेक रस्ते व पुलांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. धुळे ते अमरावती या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळून अनेक वर्ष लोटली आहेत. या रस्त्याचे धुळ्यापर्यंतचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असले तरी जळगावपर्यंत विस्तारीकरणाची ही प्रक्रिया पोहोचू शकली नाही. सुमारे ४०० किलोमिटरच्या महामार्ग चौपदरीकरणाद्वारे वाहतूक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. सध्या या महामार्गाचा वापर कोलकाता व नागपूरमार्गे मध्यप्रदेशमध्ये जाण्यासाठी केला जातो. वाहनांची प्रचंड संख्या आणि त्यामुळे वाढणारी अपघातांची संख्या चिंतेचा विषय ठरला आहे. केंद्र शासनाकडून चौपदरीकरणाला मान्यता मिळाली असली तरी या भागातील कामाला प्रत्यक्ष सुरूवात झालेली नाही. शहरातील वाहतूक कोंडीलाही हा रस्ता कारणीभूत ठरला आहे. एरंडोलकडून येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पाळधी गाव सोडल्यानंतर बांभोरी गावातून जुन्या पुलावरून आधी सरळपणे शहरात प्रवेश करता येत होता. शहरातूनच हा रस्ता भुसावळकडे जात असे. जुना महामार्ग अशी या मार्गाची ओळख आहे. पुढे शहराचा विस्तार वाढल्याने महामार्ग गावाबाहेरून गेला. त्या अनुषंगाने गिरणा नदीवर मोठा पूलही बांधण्यात आला. नवा महामार्गही या परिसरातून जातो. नदीवरील लहान पुलाची अवस्था चांगली होती, तोपर्यंत शहरात प्रवेशासाठी वाहनधारक याच मार्गाचा उपयोग करीत असत. मध्यंतरी पुलाचा काही भाग कोसळला, आणि पुलाचा वापरही बंद झाला. सध्या केवळ महामार्गावरील नवीन पूल हा एकमेव पर्याय राहिला आहे. भुसावळकडून येणाऱ्या, एरंडोलकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी नवीन पुलावर होत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. शहरातून जाणाऱ्या महामार्गावर शिवकॉलनी, प्रभात कॉलनी, आकाशवाणी, अजिंठा हे मोठे चौक आहेत. भुसावळकडे जाताना कालिका मंदिर हा महत्वाचा चौक आहे. वाहतुकीचा भार वाढल्याने या मार्गावर अनेक लहान मोठय़ा अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. लोकप्रतिनिधींनी वाहतूक कोंडीचे मूळ कशात आहे, याचा विचार केलेला नाही. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यास असे अनेक छोटे-मोठे प्रश्न संपुष्टात येणार आहेत.