Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
विशेष

तहसीलदार म्हणून कारकीर्द गाजविणारे तात्या आता ६५ वर्षांचे झाले आहेत. न्यायनिष्ठुर, स्वच्छ चारित्र्य, कर्तव्यदक्ष तात्यांना सरकारी कारकिर्दीत अशा गुणांना मिळतो तेवढा त्रास व ज्यांना त्यांच्या या गुणांची झळ पोहोचली नाही त्या सर्वसामान्य नातेवाईकांकडून मिळायचा तेवढा आदर पदरी घेत तात्या सेवानिवृत्त झाले. निवृत्तीसोबत मिळालेल्या मानधनाची विल्हेवाट लावल्यावर, मुलांमध्ये त्याचे वाटप झाल्यावर एकंदर आजूबाजूच्या मंडळींना तात्यांच्या जगण्यात फारसे स्वारस्य उरले नव्हते, खुर्ची गेल्यावर तिच्यासोबत मिळणारा मानही संपला; पण त्याचा तसा काही परिणाम तात्यांवर झालेला दिसला नाही. अनेक सामाजिक मंडळांमध्ये ते मानाचे पद सांभाळीत होते, ज्येष्ठ नागरिक संघात काम करीत होते. त्यांच्या चोख, तत्पर कामाची माफक स्तुतीही होत होती. ज्येष्ठ नागरिक संघाने आखलेल्या गेल्या सहली वेळी तात्या नॅशनल पार्कमध्ये जरासे बाजूला फिरायला गेले ते बराच काळ सापडले नाहीत. शोधाशोध केली तेव्हा दूरच्या वाटेवर वेगळ्याच दिशेने चालत जाताना सापडले. तेही परतीचा रस्ता शोधत होते, असे आढळले. घरी ही गोष्ट कळल्यावर सर्वाना आश्चर्य व काळजी वाटली; परंतु हळूहळू चर्चेतून तात्यांच्या पत्नीने व सुनेने काही अधिक माहिती दिली ती चिंताजनक होती. हल्ली तात्यांचा इंटरेस्ट कमी झाला होता. बराच काळ ते पान न पलटता पुस्तक धरून बसत असल्याचे लक्षात आले. बाजारातून पाच वस्तू आणायच्या तरी त्यात १-२ वस्तू ते विसरत होते. चहा दिला असतानाही लक्षात न राहिल्याने त्यांनी काही वेळा पुन्हा चहा मागितला होता. स्वच्छता व टापटीप यात फरक पडला होता. हल्ली त्यांना नावे पटकन आठवत नसत. तात्यांच्या लक्षात हे परिणाम आल्याने ते थोडे चिडचिडेही झाले होते. आपण विसरू लागलो आहोत हेच मान्य नसल्याने पत्नीशी वादविवादही सुरू झाले होते.

पुन्हा एकदा झिनझिनाट..

मराठी साहित्य परंपरेत काव्य प्रकाराला फार मोठी परंपरा असली आणि अगदी सातत्याने नवनव्या कवींचे काव्यसंग्रह प्रकाशीत होत असले तरी दुसऱ्या आवृत्तीचे भाग्य फार थोडय़ांच्या नशिबी असते. मराठी भाषेला ज्ञानपीठ मिळवून देणाऱ्या तिघांपैकी दोघे कवी आहेत, हे मान्य करूनही मराठीत कविता ही वाचनापेक्षा जास्त ऐकली जाते हे मान्य करावेच लागेल. चालीचा साज लेऊन गेय बनलेल्या कविता मोठय़ा प्रमाणात ऐकल्या जाऊन लोकप्रिय बनल्या. काही कवींनी स्वतच्या प्रभावी सादरीकरणाने आपल्या रचना लोकप्रिय केल्या. मंगेश पाडगांवकर, विंदा करंदीकर, वसंत बापट या त्रिकुटाने महाराष्ट्रभर काव्य गायनाचे कार्यक्रम सादर करून केले. त्यानंतरच्या पिढीत अशोक नायगांवकर, सौन्मित्र, अशोक म्हात्रे, अशोक बागवे, संदीप खरे आदी कवींनी मंचावरून आपापली कविता सादर करून लोकप्रिय केली. त्या कवींच्या पंक्तीत महेश केळुस्करांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. बाकीबाव बोरकरांच्या उपस्थितीत किशोरवयात पहिली-वहिली कविता वाचून त्यांना प्रभावीत करणाऱ्या महेश केळुस्करांनी पुढे त्यांचे भाकित खरे ठरवीत काव्यप्रांतात स्वतचे वैशिष्टय़पुर्ण स्थान निर्माण केले. विशेषत मालवणी भाषेतल्या त्यांच्या कविता लक्षवेधी ठरल्या. त्यातली झिनझिनाट तर केळुस्करांच्या एकुणच काव्य कारकीर्दीचा कळसाध्याय ठरली. वीस वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेल्या या कवितेचा समावेश असलेला ‘झिनझिनाट' हा काव्यसंग्रह मॅजेस्टिकने प्रकाशित केला. आता पकंज कुरूलकरांच्या ग्रंथायनने या काव्य संग्रहाची दुसरी आवृत्ती बाजारात आणली आहे. याबरोबरच केळुस्करांच्या राजकीय भाष्यकवितांचा ‘मस्करिका' हा संग्रहही प्रसिद्ध केला आहे. केळुस्कर म्हणतात, वर्षभरात साधारण पन्नासवेळा असे गृहित धरले तरी गेल्या वीस वर्षांत हजारएक वेळा ही कविता त्यांनी विविध व्यासपीठांवरून सादर केली. मुलत मालवणी भाषेतल्या या कविता तळ कोकणातील भावजीवन शब्दबद्ध करतात. बाबी, बाबल्या, माली इ. त्या मातीतील व्यक्तिरेखा केळुस्करांनी त्यांच्या कवितांमधून जिवंत केल्या आहेत. झिनझिनाटच्या लोकप्रियतेमुळे त्या सर्व कविताही पुन्हा एकदा नव्याने रसिकांसमोर आल्या आहेत.
‘मस्करिका' हा मुख्यत अर्ककाव्य पंक्तींचा संग्रह. प्राधान्याने राजकीय भाष्य करणाऱ्या या चारोळी सदृश रचना रोजच्या घडामोडींमधील विसंगतीवर नेमके बोट ठेवत वाचकांना हसता हसता अंतर्मुख करतात. उदाहरणार्थ- बोका चाललाय काशीला, उंदीर खातात लोणी, धनुष्यातून उलटे बाण मारीत बसतात कोणी, आघाडीचा ‘धर्म' पाळा, घेऊन पापात वाटा, घाणी करून सार्वजनिक, सोवळा प्रत्येक मोठा !
हल्ली नियतकालिकांमध्ये व्यंगचित्रांबरोबरच अशा चोरोळी रचनाही प्राधान्याने छापल्या जातात. महेश केळुस्करांच्या या रचनाही अशाच स्वरूपात विविध नियतकालिकांमधून छापून आल्या आहेत. त्या तात्कालिक घटनांवर आधारित असूनही कालबाह्य नसलेल्या या चारोळ्या त्या त्या काळातील घटनांचे स्मरण करून देतात. याच काव्यसंग्रहाच्या दुसऱ्या भागात केळुस्करांनी लिहिलेल्या काही विडंबनगीतांचाही समावेश आहे. एकाचवेळी दोन काव्यसंग्रहांचे त्यातही त्यातील एकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन हे मराठी कवीच्या आणि भाषेच्या दृष्टीने भूषणावह आहे.
प्रशांत मोरे
moreprashant@gmail.com

आठ जिल्हे. आठ मतदारसंघ. एकशे सत्तावन उमेदवार. आणि सुमारे सव्वा कोटी मतदार. लोकसभेच्या निवडणुकीतील मराठवाडय़ाचे हे ढोबळ चित्र. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात, गुरुवारी नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन मतदारसंघांतील ४४ लाख मतदार ५२ उमेदवारांमधून आपला नवा प्रतिनिधी निवडून देतील. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या मतदारसंघांमध्ये पुढच्या गुरुवारी (दि. २३) मतदान होईल. केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेव्हणे भास्करराव पाटील खतगावकर, राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांचे भवितव्य पहिल्या टप्प्यात ठरत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, खासदारीकीची हॅटट्रिक साधू इच्छिणारे चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जयवंत आवळे, माजी मंत्री आणि उस्मानाबादचे एके काळचे सर्वेसर्वा डॉ. पद्मसिंह पाटील आदी दिग्गजांचा निकाल ठरेल. मराठवाडय़ातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. मागच्या आठवडय़ात झालेल्या वादळी पावसाने पाच जणांचा बळी घेतला; पिकांचे-फळांचे काही प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर एखादा दिवस निवळलेले तापमान राजकीय गरमागरमीच्या बरोबरीने वाढत गेले. ‘आम आदमी’ने हातातले काम सोडून, रोजगार बुडवून, उन्हातान्हात मतदानाला का यायचे, हे संपूर्ण प्रचारात काही कोणी मांडल्याचे दिसत नाही. गुरुवारी मतदान होणाऱ्या तीन मतदारसंघांमध्ये गेल्या १५ दिवसांमध्ये कोणत्या ठाम आणि ठोस मुद्दय़ांवर प्रचार झाल्याचे दिसले नाही. ‘मुद्दे आणि लाट नसलेली (आणि अर्थातच सामान्य माणसांना भवितव्य नसलेली) निवडणूक’ असेच या निवडणुकीचे वर्णन करावे लागेल. अन्य पाच मतदारसंघांमध्येही राहिलेल्या आठ दिवसांमध्ये असा काही नेमका मुद्दा समोर येण्याची लक्षणे आजवरचा प्रचार पाहता दिसत नाही. गेल्या १५ दिवसांतील प्रचार आणि नेत्यांची भाषणे पाहिली, तर हा सगळा ‘हवेत गोळीबार’ आहे, असेच स्पष्ट होते.