Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
राज्य

पंतप्रधान मजबूत हवा की मजबूर? - नरेंद्र मोदी
नंदुरबार, १५ एप्रिल / वार्ताहर

काँग्रेसने जनतेच्या दु:खाची पर्वा न करता राजकारण केले, त्यामुळेच विकास हवा असेल तर परिवर्तन करणे हाच उपाय आहे, असे सांगतानाच पंतप्रधान मजबूत हवा की मजबूर हे ठरविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार डॉ. सुहास नटावदकर यांच्या प्रचारार्थ येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

नेभळट सरकार उलथवून टाका -उद्धव ठाकरे
कोल्हापूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

हिंदुस्थानात नेभळट सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे आपले कोणीच काही वाकडे करू शकणार नाही, हा अतिरेक्यांचा वाढत चाललेला आत्मविश्वास गाडून टाकण्यासाठी मनमोहन सिंग यांचे सरकार या निवडणुकीत पाडून टाका, असे आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री येथील सासने विद्यालयाच्या मैदानावर प्रचारसभेत बोलताना केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजय देवणे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेला करवीरवासीयांनी प्रचंड गर्दी केली होती.

औष्णिक वीज, मायनिंग प्रकल्प आदी मुद्दय़ांचा लक्षणीय प्रभाव
अभिमन्यू लोंढे , सावंतवाडी, १५ एप्रिल

औष्णिक वीज आणि मायनिंग प्रकल्प यामुळे सिंधुदुर्गच्या पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होणार असल्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत आघाडीवर आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार नीलेश राणे, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सुरेश प्रभू, बसपाचे उमेदवार डॉ. जयेंद्र परुळेकर, क्रांतीसेना उमेदवार अजय जाधव व अध्यक्ष उमेदवार सुरेंद्र बोरकर हे सिंधुदुर्गचे आहेत.

‘कोकणपण’ जपूनच विकास हवा! - सुरेश प्रभू
खास प्रतिनिधी , रत्नागिरी, १५ एप्रिल

कोकणाचे आर्थिक मागासलेपण दूर करताना या प्रदेशाची वैशिष्टय़े, अर्थात ‘कोकणपण’ जपूनच विकास करायला हवा, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार सुरेश प्रभू यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांशी मतदारांचा संवाद घडवून आणण्याचा अभिनव उपक्रम रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने येथे आयोजित करण्यात आला. प्रभू आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी त्यामध्ये भाग घेतला. काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. नीलेश राणे मात्र उपस्थित राहिले नाहीत.

मेळावे घेण्यावर उमेदवारांचा सर्वाधिक भर
संगमेश्वर, १५ एप्रिल/वार्ताहर लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे त्याची व्याप्ती पूर्वीपेक्षा वाढल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपासून मिळणाऱ्या २५ दिवसांच्या कालावधीत गावोगाव संपर्क करणे अशक्य असल्याने सर्वच उमेदवारांनी तालुका हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात प्रचार सुरू ठेवला आहे. यातही एकत्रित मेळावे घेऊन अधिकाधिक गावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, गाफील राहू नका -अजित पवार
लोणावळ्यात शनिवारी शरद पवारांची जाहीर सभा
लोणावळा, १५ एप्रिल/ वार्ताहर
लोणावळ्यात पानसरे यांच्या प्रचारार्थ शनिवार दि. १८ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, कृषिमंत्री शरद पवार यांची लोणावळ्यात सकाळी १० वाजता जाहीर सभा होणर असल्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.

मतदान केंद्रांवर प्रथमोपचाराची सोय
अमरावती, १५ एप्रिल / प्रतिनिधी

मतदानाच्या दिवशी कडक उन्हात मतदारांना आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास त्यांच्यावर मतदान केंद्रस्थळीच प्राथमिक उपचार करता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्य़ातील सर्वच मतदान केंद्रांवर औषधांची ‘किट’ ठेवण्याचा निर्णय घेतला असून पहिल्यांदाच मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान अमरावती जिल्ह्य़ात हा प्रयोग राबवण्यात येणार आहे.

उत्तमराव पाटलांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
प्रदेश काँग्रेस समितीची कारवाई
यवतमाळ, १५ एप्रिल / वार्ताहर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार उत्तमराव पाटील यांच्यावर प्रदेश काँग्रेस समितीने अखेर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची उमदेवारी मिळाली नाही, म्हणून उत्तमराव पाटील यांची नाराजी आपण समजू शकतो. मात्र, एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही नेत्याने मग तो कितीही मोठा असला आणि तो पक्षविरोधी कारवाया करीत असेल तर त्यांच्या विरुद्ध प्रदेश काँग्रेस समिती कारवाई करील, असा इशारा पूर्वीच दिला गेला होता, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

अ‍ॅड. ठाकूर यांचा मतदारांशी संवाद
महाड, १५ एप्रिल/वार्ताहर रायगड मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी गावागावामध्ये जाऊन माध्यमांतून मतदारांशी थेट संवाद साधणे सुरू केले आहे. गुहागर, खेड, मंडणगड, पोलादपूर, महाड, गोरेगाव या ठिकाणी त्यांनी पदयात्रा काढल्या. ज्या गावाला ते भेट देत असत त्या गावातील डॉक्टर, वकील आणि काही प्रमुख नागरिकांच्या भेटी घेऊन आपली भूमिका त्यांना समजावून सांगितली. काँग्रेसने आपल्यावर अन्याय केला असल्याचे सांगत ते म्हणाले, सुरुवातीला आम्ही श्रेष्ठींच्या सांगण्यावरून पाच उमेदवारी अर्ज दाखल केले होते. वरिष्ठ नेत्यांनी त्याला मान्यताही दिली. असे असूनही अंतुले यांचा अर्ज नसतानाही त्यांना पक्षाने उमेदवारी दिली. वास्तविक जिल्ह्यामध्ये अंतुले यांना तीव्र विरोध केला जात होता, याची कल्पना पक्षश्रेष्ठींना असताना त्यांची उमेदवारी लादण्यात आली आणि अशा लादलेल्या उमेदवाराला आम्ही विरोध केला. आपल्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी अंतुले यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला. त्यामुळे जिल्ह्यातील काही ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून आपण निवडणूक लढवीत आहोत, असे ते म्हणाले.

रेशनिंगचा चोरलेला २६ टन गहू जप्त
खोपोली, १५ एप्रिल/वार्ताहर शासकीय गोदामातील २६ टन रेशनिंगचा गहू चोरून खालापूर तालुक्यातील खासगी फ्लोअर मिलला विकण्यासाठी नेणाऱ्या दोघा इसमांना पोलिसांनी ट्रक व मुद्देमालासह अटक केली. शासकीय अखत्यारीतील भिवंडी व रे रोड येथील एफ.सी.आय.च्या गोदामात ठेवलेला, रेशिनग पुरवठय़ाचा २६ टन गहू घेऊन निघालेले दोन ट्रक खालापूरचे पो.नि. एच.एम. पाडळकर यांनी सावरोलीजवळ अडविले. कागदपत्रांची पडताळणी करताना पोलिसांचा संशय बळावला. खालापूर तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी सूर्यकांत तिकोणे यांनी घटनास्थळी सहकारी पथकासह भेट देऊन सखोल तपासणी केली. तेव्हा गोदामातील चोरलेला हा २६ टन रेशनिंगचा गहू होनाड हद्दीतील रवीकमल फ्लोअर मिलला परस्पर विकण्यासाठी घेऊन जाण्यात येत होता, असे निष्पन्न झाले. पुरवठा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी महादेव मोहिते (४०, रा. मांडवे, ता. खटाव) व नसरुद्दीन खान (३२, रा. उत्तर प्रदेश) या दोघांना अटक केली.

अ‍ॅड. वनगा यांच्या प्रचारासाठी राजनाथ सिंह नालासोपाऱ्यात
ठाणे, १५ एप्रिल/ प्रतिनिधी

पालघर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांचा मतदारसंघात झंझावती दौरा सुरू असून, येत्या आठवडय़ात त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांची नालासोपारा येथे जाहीर सभा होणार असल्याचे मतदारसंघाचे सहप्रचारप्रमुख ओमप्रकाश शर्मा यांनी सांगितले. अ‍ॅड. वनगा यांनी मतदारसंघातील प्रचाराच्या दोन फेऱ्या आतापर्यंत पूर्ण केल्या असून, १५ ते २२ एप्रिलदरम्यान ते मतदारसंघाचा झंझावाती दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालघर (१५ व १७ एप्रिल), तलासरी (१६ एप्रिल), जव्हार विधानसभा क्षेत्र मोखाडा तालुका (१८ एप्रिल), वसई ग्रामीण विभाग (१९ एप्रिल), विक्रमगड (२० एप्रिल), मनोर (२१ एप्रिल- सकाळी), नालासोपारा (२१ एप्रिल- सायंकाळी) आणि डहाणू (२२ एप्रिल) असा त्यांचा दौरा होणार असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांची जाहीर सभा २१ एप्रिल रोजी सायंकाळी नालासोपारा येथे होणार असून, या सभेची जोरदार तयारी सुरू असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

शिवरायांचा इतिहास जगापुढे पोहोचविणार -अंतुले
पेण, १५ एप्रिल/वार्ताहर

शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगापुढे पोहोचविण्याचे काम आपण करणार आहोत. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ‘हिंदू’ स्वराज्याची नव्हे. शिवसेनेच्या लोकांनी शिवाजी महाराजांना लहान करू नये, अशी विनंती बॅ. अ. र. अंतुले यांनी येथे केली. काँग्रेस व आरपीआयचे उमेदवार अंतुले यांच्या प्रचारार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते दत्ता पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील आदी उपस्थित होते. भारत एक सशक्त शक्ती म्हणून पुढे येईल, असा विश्वास व्यक्त करून अंतुले पुढे म्हणाले की, आपण लोकसभेसाठी रायगडातून उभे राहणार नव्हतो. परंतु सर्व मित्रपक्षांनी केलेल्या आग्रहाखातर निवडणूक लढवित आहे. माझी ही शेवटची निवडणूक आहे. माझ्या पक्षातील कार्यकर्ता माझ्यासमोर उभा राहतो, ही बाब भूषणास्पद नाही, असे सांगून अंतुले पुढे म्हणाले, मी राजकारणी नाही, तर सामाजिक कार्यकर्ता आहे. माझ्याकडून आतापर्यंत लोकोपयोगी काम झाले. यापुढेही भावी पिढीच्या स्मरणात राहील, असे सामाजिक काम करण्यासाठी आपणास मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

एसटीत ५० हजारांचे दागिने हातोहात लंपास
इचलकरंजी, १५ एप्रिल / वार्ताहर
खचाखच भरलेल्या एसटीमधून ५० हजार रुपये किमतीचे दागिने हातोहात लंपास करण्याचा प्रकार सोमवारी येथील बसस्थानकात घडला. चोरटय़ाचा तपास करण्यासाठी बस पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तेथे ५५ प्रवाशांची तपासणी करण्यात येऊनही हा ऐवज सापडला नाही. पोलिसात चोरीची नोंद झाली आहे. आक्काताई पांडुरंग पाटील (रा. जगन्नाथ चौक, पुणे) ही महिला माहेरी आलेल्या विद्या धनंजय थोरवत (वय २४, रा. टाकळवाडी, ता. शिरोळ) या मुलीस सासरी सोडण्यासाठी आली होती. पुण्याहून एसटीने येथे आल्यावर मायलेकी दुपारी अडीच वाजता इचलकरंजी-खिद्रापूर या एसटीमध्ये चढल्या. विद्या थोरवत यांनी सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवले होते. ही पर्स त्यांनी बॅगमध्ये ठेवली होती. बसमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने थोरवत यांनी पर्स ठेवलेली बॅग प्रथम बसमध्ये नेली. ती सीटवर ठेवून खाली ठेवलेल्या तीन बॅगा नेण्यासाठी त्या उतरल्या व पुन्हा गर्दीतून त्या आईसह बॅग ठेवलेल्या सीटजवळ पोहोचल्या. या अवधीत बॅग उचकटून चोरटय़ाने ५० हजार रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स लंपास केली होती.