Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
क्रीडा

गोल्डन बॉय : फरिदाबाद येथील मानव रचना आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शूटिंग रेंजच्या उद्घाटन प्रसंगी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकाविणारा भारताचा अभिनव बिंद्रा.

शो मस्ट गो ऑन..
वडिलांच्या निधनानंतरही सुनिल खेळतच राहिला;आदर्श होता सचिनचा

नवी दिल्ली, १५/ पीटीआय

काहीही विपरीत घडले तरी हातात घेतलेले काम सोडायचे नाही, शो मस्ट गो ऑन हेच ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून हॉकीपटू एस. व्ही. सुनिलने वडीलांच्या निधनानंतरही नुकत्याच झालेल्या अझलन शाह हॉकी चषकातून माघार घेतली नाही. यावेळी त्याने डोळ्यासमोर आदर्श ठेवला होता तो मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा. १९९९ च्या विश्वचषकाच्या दरम्यान सचिनच्या वडीलांचे निधन झाले होते, पण सचिन त्यानंतरही देशासाठी खेळला होता. या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन सुनिलने अझलन शाह हॉकी स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला आणि स्पर्धेचे जेतेपद पटकावून वडीलांना एक आगळी-वेगळी श्रद्धांजली त्याने वाहिली.

..तर मी क्रिकेट सोडून देईन - हरभजन
धोनी, हरभजन पद्म पुरस्कार वितरण सोहळयाला अनुपस्थित

मुंबई, १५ एप्रिल / क्री. प्र.

भारतीय क्रिकेट संघाचा ऑफ स्पिनर हरभजनसिंग आणि वादविवाद यांचे घट्ट नाते आहे. यावेळी उपलब्ध असूनही पद्म पुरस्काराला अनुपस्थित राहिल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्यासह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हादेखील उपस्थित राहू शकला नव्हता. जाहिरातीच्या चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, या दाव्याचा मात्र त्याने इन्कार केला आणि हा आरोप सिद्ध झाला तर क्रिकेट सोडून देईन, असेही त्याने सांगितले. धोनी मात्र यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध नव्हता.

आयसीसीच्या बैठकीत लाहोर हल्ला, आयसीएलवर चर्चा
दुबई, १५ एप्रिल / पीटीआय

लाहोरमध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर झालेला दहशतवादी हल्ला आणि इंडियन क्रिकेट लीगने मान्यतेसाठी केलेला अर्ज हे विषय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चिले जाणार आहेत. येत्या शुक्रवारपासून आयसीसीच्या कार्यकारिणीची बैठक सुरू होत आहे.

बस एक कदम दूर..
ऑस्ट्रेलियाला मागे सारत भारत दुसऱ्या स्थानावर विराजमान
आयसीसी एकदिवसीय क्रमवारी

दुबई, १५ एप्रिल/ पीटीआय

न्यूझीलंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत मिळविलेला ४-१ असा विजय आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा झालेला दारूण पराभव या दोन्हीही गोष्टी धोनीच्या यंग ब्रिगेडच्या चांगल्याच पथ्यावर पडल्या असून २००२ नंतर पहिल्यांदाच भारताने नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

भज्जीची स्फोटक फटकेबाजी ठरू शकते आयपीएलचे आकर्षण
नवी दिल्ली, १५ एप्रिल / पीटीआय

आक्रमक व स्फोटक फटकेबाजीने क्रिकेटरसिकांना मोहात पाडणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या आवृत्तीचे भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज हरभजनसिंगही एक फलंदाज म्हणून आकर्षण असेल. आयपीएलमध्ये गोलंदाजही धुवाँधार फलंदाजी करू शकतात. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत माझीही आक्रमक व स्फोटक फलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल ,असा विश्वास हरभजनसिंगने व्यक्त केला.

सानिया दुसऱ्या फेरीत व्हीनसला भिडणार
चार्लस्टन, १५ एप्रिल/ पीटीआय

येथील फॅमिली सर्कल चषकाच्या पहिल्या फेरीत भारताच्या सानिया मिर्झाने कझाकीस्ताच्या सेसिल कारातेन्चेव्हाचा ६-४, ६-४ असा सहज पराभव केलेला असला तरी तिच्यावरचे दडपण अधिकच वाढले असेल. कारण स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत तिची गाठ पडणार आहे ती दुसऱ्या मानांकित अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्यबरोबर. फ्लोरीडातील स्पर्धेच्या दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविलेल्या सानियाचे मनोधैर्य या सामान्यादरम्यान चांगलेच उंचावलेले दिसले. दोन्हीही संघात सानियाच्या आक्रणालाचांगलीच धार दिसली. त्याचबरोबर जोरदार परतीच्या फटकांच्या जोरावर तिने कारातेन्चेव्हाच्या सव्‍‌र्हिसही चांगल्याच मोडीत काढल्या. पहिल्या सेटमध्ये एकही सेट न गमाविता सानियाने कारातेन्चेव्हाच्या दोन सव्‍‌र्हिस मोडीत काढल्या.

मुंबई इंडियन्सच्या होम मॅचमधील
सामनावीरास हिरेजडित चषक मिळणार
मुंबई, १५ एप्रिल/ पीटीआय
क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या दुसऱ्या इंडियन प्रीमिअर लीगचा दक्षिण आफ्रिकेत प्रारंभ होण्यास जेमतेम काही दिवस बाकी असून स्पर्धे दरम्यान सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या होम मॅचेसमधील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळविणाऱ्या खेळाडूस शेकडो हिरे व अनेक मौल्यवान खडय़ांचा वापर करून बनविलेला चषक प्रदान करण्यात येणार आहे. गीतांजली ज्वेलर्सने तयार केलेली ही ट्रॉफी दोन फूट उंच असून त्यात ५५० हिरे व ७८५ मौल्यवान खडय़ांचा वापर केला आहे.

धोनी, हरभजन दिल्लीत नव्हते - गृहमंत्रालय
नवी दिल्ली, १५ एप्रिल / पीटीआय

पद्म पुरस्कारांच्या वितरण सोहळयाला महेंद्रसिंग धोनी व हरभजन उपस्थित न राहिल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना गृहमंत्रालयाने हे दोघेही या कार्यक्रमासाठी राजधानीत उपस्थित नव्हते, असे स्पष्ट केले आहे. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे पद्म पुरस्कार विजेत्यांना आम्ही वितरण सोहळयाची माहिती महिनाभर आधी देतो. आम्ही १२ व १३ एप्रिल रोजी धोनी आणि हरभजनशी संपर्क साधून या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. पण ते तेव्हा राजधानीत नव्हते.

अनेक कणधारांची योजना मुंबई इंडियन्सकडे नाही -सचिन
नॉयडा, १५ एप्रिल / पीटीआय

कोलकाता नाइट रायडर्सच्या जॉन बुकॅनन यांनी संघात अनेक कर्णधारांची संकल्पना राबविली असली तरी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार सचिनला त्याच्याशी देणेघेणे नाही, आपल्या संघातही तो अशी संकल्पना राबविण्याच्या विचारात नाही. सचिनने सांगितले की, ‘त्यांना काय करायचे आहे ते करू द्या. मुंबई इंडियन्स संघात मला जे करायचे आहे ते मी करीन.’ बुकॅनन यांच्या या संकल्पनेत सचिनला नवे काही दिसत नाही. तो म्हणतो, कोणत्याही संघात सीनियर खेळाडू नेहमीच महत्त्वाच्या सूचना करीत असतात. त्यामुळे ही संकल्पना म्हणजे अनेक कर्णधारांची नव्हे तर अनेक डावपेचांची आहे. संघाचा कर्णधार हाच सर्व निर्णय एकटय़ाने घेत नाही. इतर खेळाडूही त्याला सुचवित असतात. त्यामुळे कर्णधारापाशी अनेक पर्याय उपलब्ध असतात.

धोनी विश्वासाला जागला -सचिन
राहुल द्रविड भारतीय क्रिकेटच्या कर्णधारपदावरून पायऊतार झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनीकडे नेतृत्वाची धुरा सोपवावी अशी सूचना सचिन तेंडुलकरने केली होती आणि त्याने दाखविलेला विश्वास धोनीने आज सार्थ करून दाखविला आहे, अशी भावना सचिनने व्यक्त केली. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यानंतर द्रविडने कर्णधारपद सोडल्यावर सचिनने धोनीचे नाव बीसीसीआयचे तत्कालिन अध्यक्ष शरद पवार यांना सुचविले होते.

मान्यता न दिल्यास आयसीएल कायदेशीर मार्गाने जाणार
मुंबई, १५ एप्रिल / क्री. प्र.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कार्यकारिणीच्या आगामी बैठकीत जर इंडियन क्रिकेट लीगला मान्यता देण्यात आली नाही, तर आयसीसीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आयसीएलचे प्रमुख सुभाष चंद्रा यांनी दिला आहे. आयसीसीची मान्यता मिळविण्यासाठी इंडियन क्रिकेट लीगचे जोरदार प्रयत्न सुरू असून गेली दोन वर्षे त्यांचा संघर्ष सुरू आहे. येत्या शुक्रवारपासून दोन दिवस आयसीसीची बैठक होणार असून त्यात आयसीएलच्या भवितव्यावर चर्चा होईल. सुभाष चंद्रा यांनी याबाबत सांगितले की, आम्ही या दोन वर्षांत सात स्पर्धांचे आयोजन केले. प्रत्येक स्पर्धेत नवे काही तरी करण्याचा प्रयत्न केला. आयसीसीच्या बैठकीत आम्हाला मान्यता मिळेल अशी मला आशा आहे, अन्यथा मला कायदेशीर मार्गाचा विचार करावा लागेल.