Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘रेल्वे, शैक्षणिक प्रकल्पांना प्राधान्य’
अंबरनाथ ते कल्याण डोंबिवली परिसरातील सर्वाधिक नागरिक लोकलने मुंबईत नोकरी, व्यवसायासाठी जातात. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या समस्या सर्वाधिक या भागात आहेत. त्या सोडविण्याचा मी निकराने प्रयत्न करणार आहे. गेले आठ ते नऊ महिन्यात कल्याण परिसरातील विकास व समस्यांच्या प्रश्नांचे निराकरण करताना मला हे अनुभव आले आहेत. डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे. आशिया खंडातील एक सुशिक्षित शहर म्हणून डोंबिवलीचा नावलौकिक आहे. एक शैक्षणिक केंद्र म्हणूनही डोंबिवली नावारूपाला यावी म्हणून मी प्रयत्न करणार आहे. या भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे येथे जावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी डोंबिवली परिसरात शासकीय वैद्यकीय, इंजिनीअरिंग प्रकल्प सुरू करणे, याशिवाय विकासाचे प्रकल्प, रेल्वेशी संबंधित पालिकेचे पूल,

 

रस्ते अशी अनेक कामे प्रलंबित आहेत. ही विकासकामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. विशाल भौगोलिक स्थितीत विस्तारलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांशी संपर्क साधणे शक्य होऊन, त्यांचे विकास कामांसंदर्भाचे प्रश्न जाणून घेणे शक्य होणार आहे. वडील स्व. प्रकाश परांजपे यांनी यापूर्वी अनेक विकासकामे या भागात केली आहेत. तोच आदर्श समोर ठेवून मागील आठ ते नऊ महिन्यात मी खासदार म्हणून कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक रेल्वेविषयक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघातील नागरी समस्या काय आहेत, त्या कशा सोडवाव्या लागतील याची पूर्ण जाणीव मला झाली आहे. यापुढील काळात हे प्रश्न सोडविण्याचा मी प्रयत्न करणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून मी या निवडणूक रिंगणात आहे. सन १९९६ पासून माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली आहे. नागरिकांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे, तो सार्थ ठरविण्यासाठी मी नेकीने प्रयत्न करीन. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा युतीचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे माझा मार्ग सरधोपट आहे.
‘विकासाच्या मुद्दय़ावर सकारात्मक राजकारण’
विकासाचे, नागरी समस्यांचे जे प्रश्न वेळोवेळी नागरिक माझ्याकडे घेऊन आले, ते सोडविताना तो माणूस कोणत्या जातीधर्माचा, संस्थेचा आहे याचा मी कधीच विचार केला नाही. जनतेच्या या प्रश्नांची केलेली सोडवणूक हाच माझा बालेकिल्ला आहे. ठाणे जिल्हा एकसंध असला तरी, प्रत्येक भागाचे प्रश्न निराळे आहेत. कल्याण-डोंबिवली परिसराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्या प्रमाणात नागरिकांना नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. पालिका आर्थिकदृष्टय़ा सक्षम नाही. त्यामुळे या भागातील पालिकांना केंद्र व राज्य सरकारांकडून अधिक निधी मिळवून नागरी विकासाची कामे करून घेणे व पालिकांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकून ज्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकल्या त्यातून उतराई होण्यासाठी मी तळागाळापासून राज्य पातळीवरील जनहिताचे अनेक विकासाचे प्रश्न सोडवू शकलो. ‘एमएमआरडीए’, ‘जेएनएनयूआरएम’ योजनांमधून कल्याण पालिका हद्दीत अनेक विकासाची कामे सुरू आहेत. या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न केले. कल्याण रेल्वे जंक्शन करणे, डोंबिवली, मुंब्रा रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, ठाकुर्ली आणि कल्याणच्या मध्ये आणखी एक रेल्वे स्टेशन सुरू करणे, मुंब्रा ते डोंबिवली रेल्वेला समांतर रस्ता दोन-तीन वर्षांत पूर्ण करून घेणे, मुंब्रा, अंबरनाथ, कल्याण भागातील अल्पसंख्याक समाजासाठी पुरेशा उर्दू शाळा नाहीत. शाळा आहेत पण त्यात अनेक त्रुटी आहेत. हे प्रश्न पालिका, शासनाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करीन. वीज भारनियमन कमी करणे, वाढत्या वस्तीचा विचार करता कल्याण, उल्हासनगर परिसरात सुसज्ज शासकीय रुग्णालये नाहीत, ती सुरू करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
उल्हासनगरमधील ८५५ अनधिकृत इमारती तोडण्याचा निर्णय झाल्यानंतर जनहिताचा विचार करून मी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विधिमंडळात या विषयावर एक लक्षवेधी मांडून चर्चा घडून आणली. या प्रकरणी मी शासनाला या इमारतीं तोडण्याऐवजी दंडात्मक कारवाई करून अधिकृत करण्याचे निर्देश दिले. शासनाने हीच भूमिका न्यायालयात मांडून आपल्या निर्देशाचा नियम केला. वर्दळीच्या शिळफाटा रस्त्यावर मी सरकारशी कटुता घेऊन या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे, नूतनीकरणाचे आदेश शासनाला दिले. त्याची तातडीने अंमलबजावणी करून शासनाने हा रस्ता सुसज्ज केला आहे. या रस्त्यामधील पत्रीपूल ते दुर्गाडी हा गोिवदवाडी रस्ता पूर्ण करण्यासाठी मी स्वत: प्रयत्नशील असून हा रस्ता पूर्ण झाल्याशिवाय शासनाने या रस्त्यावर टोल वसूल करू नये असे मी शासनाला सूचित केले आहे. या निवडणुकीत शिवसेना हाच माझा प्रतिस्पर्धी आहे. मी वैचारिक आणि समाजहितैषी दृष्टिकोनातून माझा प्रचार कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने करीत आहेत.
‘नवनिर्माणाच्या स्वप्नपूर्तीसाठी निवडणूक रिंगणात’
बंद पडलेल्या कंपन्या, वाढती बेरोजगारी, रेल्वे प्रवास करणाऱ्या महिलांचे प्रश्न, रस्ते, पादचारी पूल, असंघटित महिलांचे प्रश्न, बी. ए., डी.एड., इंजिनिअरिंग, वैद्यकीय महाविद्यालये कल्याण-डोंबिवली भागात सुरू करणे असे विकास आणि नागरी समस्यांचे, मराठी माणसांचे अनेक प्रश्न या भागात आहेत. या प्रश्नांवर आतापर्यंत विशेषत: मराठी खासदारांनी दिल्लीत आवाज उठविलेला नाही. या दबलेल्या गळ्यातील आवाज बाहेर काढावा, या सर्व प्रश्नांवरून मराठी माणूस, महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान काय आहे ते दाखवून द्यावे, या इराद्याने मी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नवनिर्माणाची स्वप्ने प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी या निवडणुकीत उतरली आहे.
महाविद्यालयीन जीवनातून माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली. १९९५ मध्ये कल्याण- डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीत प्रचार सभांमध्ये मी सहभागी झाले. सन २००० च्या पालिका निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून येऊन शहर व प्रभागातील अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावले. अंबरनाथ, कल्याण, ग्रामीण ते मुंब्रा, कळव्यापर्यंतच्या मतदारांशी मी मनसे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपर्क साधत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादीने आयात उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे एकही महिला उमेदवार नाही. या मतदारसंघातील सर्व महिला भगिनी माझा नक्कीच विचार करतील. रेल्वेने प्रथम श्रेणीत व महिला डब्यांमधून प्रवास करणाऱ्या महिलांना अनेक समस्यांना तोंड देत प्रवास
करावा लागतो. महिला सुरक्षिततेचा मुद्दा अजून
दुर्लक्षित आहे. हे प्रश्न सोडविण्याचा मी प्राधान्याने विचार करीन. या भागात शासकीय डी.एड., बी.एड., इंजिनीअरिंग शैक्षणिक अध्यापन महाविद्यालय, आयटी सेंटर सुरू करण्याचा मी प्रयत्न करीन. कोपरजवळील पादचारी पूल लवकर होणेसाठी प्रयत्न, अन्य प्रांतातील खासदार भाषिक
मुद्दय़ावर एक होतात पण मराठी विषय चर्चेला आला की माना टाकून गप्प बसणारे अन्य
पक्षांचे खासदार त्यांना आपला स्वाभिमानी महाराष्ट्र, मराठी अस्मिता काय आहे, दाखवून देण्यासाठी, ती अबाधित ठेवण्यासाठी, जनहिताचा विचार करून मी या निवडणुकीत उतरले आहे.
संकलन - भगवान मंडलिक