Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मनसेच्या विरोधामुळे शाई धरणाचा लोच्या झाला रे!
ठाणे/प्रतिनिधी -
ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्चून शाई धरण बांधण्याबाबत सेना-भाजप- राष्ट्रवादी- काँग्रेस यांच्यात मतैक्य होत असतानाच जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोवर धरणाची एक वीटही लागू देणार नाही,

 

असा सूर लावीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रस्तावित शाई धरणास विरोध दर्शविला आहे.
ठाण्याबरोबर मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली या महापालिकांच्या पाणी समस्येवर कायमस्वरुपी तोडगा ठरणारे शाई धरण व्हावे, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पासून पाठपुरावा करीत हे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. सुमारे ४५० कोटी रुपये खर्चाचे हे धरण कोणी बांधायचे, यावरूनही जलसंपदा विभाग आणि ठाणे महापालिकेत मतभिन्नता होती. मात्र १९ मार्च रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी निधीचा प्रश्न निकाली काढताना शाई धरण एमएमआरडीएने बांधावे, असे आदेश दिले आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सेना-भाजप युतीनेही शाई धरण हा मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचाराचा मुद्दा बनविला आहे. शहरी भागातील मतदारांची तहान भागणार असल्याने लोक खुश आहेत. त्यावेळी विस्थापित होण्याच्या धास्तीने ग्रामीण भागातील लोकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. शहापूर आणि मुरबाड तालुक्यांदरम्यान बांधल्या जाणाऱ्या प्रस्तावित शाई धरणामुळे १२ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ५२ गावांना विस्थापित व्हावे लागणार आहे. त्यामुळे या भागातील धरणविरोधी कृती समितीने निवडणुकीदरम्यान शाई धरणाविरोधात वातावरण तापवायला सुरू केले असून त्या भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेनेही त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार देवराज म्हात्रे यांच्या प्रचारसभेत याचे प्रत्यंतर आले. या सभेस शहापूर-मुरबाड तालुक्यातील लोक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांच्यात शाई धरणाबाबत चर्चा सुरू असतानाच व्यासपीठावरही त्याचे पडसाद उमटले. मनसेचे नेते सतीश प्रधान यांनी ठाणेकर असूनही शाई धरणास विरोध दर्शविताना शाई धरणासाठी युती आणि आघाडी एकत्रितपणे प्रयत्न करीत असले तरी धरणामुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांचे काय? आजवर या भागात अनेक धरणे झाली. मात्र त्या बदल्यात लोकांना काहीच दिलेले नाही. ज्या जमिनी दिल्या त्याही ओसाड. त्यामुळे यापुढे अशी फसगत सहन करणार नाही. जोवर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत काय करणार हे सांगितले जात नाही, त्यांचा प्रश्न सुटत नाही तोवर शाई धरणाची एक वीटही उभी राहू देणार नाही, असा इशारा प्रधान यांनी दिला. त्यास उपस्थित मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला. हाच धागा पकडत शाई धरणामुळे ३० हजार लोक विस्थापित होणार असून त्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय शाई धरणाचे काम सुरू होऊ देणार नाही, अशी ग्वाही म्हात्रे यांनी दिली. त्यामुळे शाई धरण अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.