Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

विधानसभा इच्छुकांसाठी लोकसभा ही अग्निपरीक्षाच!
खास प्रतिनिधी

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमुळे कुठल्या भागात कुणी काम केले, कुणी आतून दुसऱ्याला मदत केली हे कळणार असल्याने प्रामाणिकपणे आपापल्या उमेदवारांचेच काम करा; तरच विधानसभेसाठी तुमच्या नावाचा विचार होईल, अशी सूचना सर्वच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांनी दिल्याने

 

युती-आघाडीचे नेते खऱ्या अर्थाने कामाला लागल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
मनसेमुळे तीन ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे. भिवंडीतून काँग्रेसमध्ये सर्वाधिक म्हणजे २३ इच्छुक असल्याने तिथे अपेक्षेप्रमाणे बंडखोरी झाली. अन्य मतदारसंघात प्रमुख पक्षांमध्ये फारसे इच्छुक नसल्याने बंडाचे निशाण फडकले नाही. गतवर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने संजीव नाईक यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी होती. काही नेत्यांनी मग या जागेवर काँग्रेसचाच कसा हक्क आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. चार वर्षांत पालकमंत्री गणेश नाईक यांनी काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम राबविल्याने काँग्रेसचे प्रमुख नेते व पदाधिकारी प्रचारापासून तेव्हा दूरच राहिले. याचा फटका संजीव नाईक यांना बसला. या पाश्र्वभूमीवर आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी तसेच राज फॅक्टरमुळे युतीच्या नेत्यांनी व्यवस्थित नियोजन केले आहे. आणखी सहा महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. केवळ अर्थशक्ती तसेच वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची फाईल तयार करून उमेदवारी मिळणार नाही. यावेळी कंोणते नेते-पदाधिकारी आपल्या भागात उमेदवाराला ‘लीड’ मिळवून देण्यात यशस्वी होतात, त्या आधारे विधानसभा निवडणुकीचे तिकीट वाटप होईल, अशी स्पष्ट सूचना वरिष्ठांनी दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे युती व आघाडीचे पदाधिकारी रात्री उशिरापर्यंत बैठका घेऊन व्यूहरचना आखण्यात गर्क आहेत.
ठाण्यातील युतीचे उमेदवार विजय चौगुले यांची प्रतिमा वादग्रस्त असल्याने पदाधिकाऱ्यांना, गाफील राहू नका, असे बजावण्यात आले आहे. ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघातून प्रताप सरनाईक, अनंत तरे, राजन विचारे, नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे आदी सेना नेते इच्छुक आहेत. या व अन्य पदाधिकाऱ्यांना चौगुले यांना आपल्या विभागात जास्तीत जास्त मतदान कसे होईल, हे बघावे लागणार आहे. आघाडीतून ज्येष्ठ काँग्रेस नेते सुभाष कानडे, मनोज शिंदे, नारायण पवार, रवींद्र फाटक, दशरथ पाटील, देवराम भोईर, सुभाष भोईर, अशोक राऊळ आदींनाही विधानसभेत जाण्यासाठी अगोदर लोकसभेच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
कल्याणची जागा बऱ्याच भवति न् भवतिनंतर सेनेला मिळाली. वसंत डावखरे यांच्या विरोधात कमकुवत उमेदवार देणार, अशी चर्चा सुरू झाल्याने उद्धव ठाकरे यांनी मग सरळ ठाण्याचे खासदार आनंद परांजपे यांनाच कल्याणला पाठविल्याने ही लढत आघाडी व युती दोघांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. डावखरे यांनी सहा महिन्यापासूनच कल्याण व लगतच्या परिसरात काम चालू केले आहे. भाजप नेते जगन्नाथ पाटील यांना भिवंडीतून उमेदवारी दिल्याने डोंबिवलीतील पक्षकार्यकर्त्यांची नाराजी काही अंशी तरी दूर झाली. कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, कल्याण (प.), डोंबिवली, अंबरनाथ या पाच विधानसभा मतदारसंघातील रमेश पाटील, रवी पाटील, संतोष केणे, अलका आवळस्कर, अनिल पंडित, आमदार हरिश्चंद्र पाटील, महापौर रमेश जाधव, रवींद्र चव्हाण, पुंडलिक म्हात्रे, रमेश म्हात्रे, अप्पासाहेब शिंदे, गणपत गायकवाड, महेश तपासे, कमलाकर सूर्यवंशी, थोरात आदी युती-आघाडीचे नेते भावी आमदार म्हणून आपापल्या भागात ओळखले जात असल्याने त्यांच्यावर यावेळी विशेष जबाबदारी पडली आहे. भिवंडी भागातील तीन मतदारसंघात विद्यमान महापौर जावेद दळवी, मदन कृष्णा नाईक, साईनाथ पवार, सिद्धेश्वर कामूर्ती, कपिल पाटील, खालिद शेख, महादेव व्हटाल, विष्णू सवरा आदी विधानसभेचे संभाव्य उमेदवार असल्याने त्यांच्या विभागात लोकसभा उमेदवारांना किती मते पडतात, त्यावर यांचे राजकीय भवितव्य ठरणार असल्याचे मानले जाते. काही महिन्यांच्या अंतरानेच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार असल्याने युती-आघाडीच्या नेत्यांना आपापले जुने हिशेब चुकते करण्याची संधी यावेळी मिळणार नाही, एवढे नक्की!