Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मनसेचे परप्रांतीय विरोधातील आंदोलन; ब्रेक के बाद!
ठाणे/प्रतिनिधी

२००१ पर्यंत ठाणे जिल्ह्यात २६ लाख परप्रांतीय आले होते. आता ही संख्या खूप वाढली असून, परिस्थिती अशीच राहिली तर या राज्याचे मालक असूनही तुम्ही कोण अशी परप्रांतीयांकडून

 

विचारणा होईल, असा इशारा देतानाच लोकसभा निवडणुकीसाठी ब्रेक घेतलेले परप्रांतीयाविरोधातील आंदोलन पुन्हा सुरू करण्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहापुरात केली.
भिवंडी मतदारसंघातील मनसेचे उमेदवार देवराज म्हात्रे यांच्या प्रचारार्थ शहापुरात ग. वि. खाडे विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी ही घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर सतीश प्रधान, विनय भोईटे, संजय घाडी आदी मान्यवर उपस्थित होते. अध्र्या तासाच्या आपल्या भाषणात राज यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
नागपुरात जनता उन्हात असताना बसपाच्या अध्यक्षा मायावती सहा एसी लावून व्यासपीठावर बसल्या होत्या. आज बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर माझे नाव आणि फोटो घेऊन कधी लोकांसमोर जाऊ नकोस, असे त्यांनी मायावतीला ठणकावून सांगितले असते, अशी टीका करून राज यांनी आपला मोर्चा परप्रांतीयांकडे वळविला. शरद पवारांना पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पडू लागल्यापासून मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे असे वाटू लागले आहे. मग मराठी आणि महाराष्ट्रासाठीच मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले तेव्हा त्यांना बेदम मारहाण करायला पोलिसांना आदेश कोणी दिले. राष्ट्रवादीच्याच गृहखात्याने ना? असा सवाल करून राज म्हणाले की, सर्व बाजूंनी महाराष्ट्रावर होणारा अन्याय सहन होत नाही म्हणूनच आपण परप्रांतीयांविरोधात आंदोलन छेडले असून, आता केवळ लोकसभा निवडणुकीसाठी ब्रेक घेतलाय. निवडणुका संपताच पुन्हा आंदोलन सुरू होईल. कायदा न पाळणाऱ्यांची बाजू घेणाऱ्या सरकारला जे काय करायचे आहे, ते त्यांनी करावे. मला जे करायचे आहे ते मी करणारच, असे आव्हानही त्यांनी दिले.
काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत जे केले, त्याच मार्गाने भाजपही चालला असून, ३०० वर्षांपूर्वी समुद्रमार्गे शत्रू येण्याचा इशारा छत्रपती शिवाजी महाराजांनी देऊनही आपल्या राज्यकर्त्यांच्या अकलेत भर पडत नाही. मग कशासाठी महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करायच्या, असा सवाल करून राज पुढे म्हणाले, स्वीस बँकेतून पैसे परत आणण्याची भाषा केली जात आहे. पण महाराष्ट्रातील बँकांमध्ये झालेल्या घोटाळ्यांमध्ये सर्वसामान्य माणसाचे लाखो रुपये बुडलेत त्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. केवळ लोकांची माथी भडकवून निवडणुका जिंकण्याचा खेळ भाजपने चालविला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी राज्यभरात १२ उमेदवार उभे केले असून, मनसेच्या मागे आपली ताकद उभी करा, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवून दाखवतो, असे भावनिक आवाहनही त्यांनी शेवटी केले.