Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शिवसेनेचा आनंद व विजय रथ सज्ज
ठाणे/ प्रतिनिधी

शिवसेना..शिवसेना..शिवसेना..या अवधूत गुप्तेच्या गीताने मागील निवडणूक ढवळून निघाली होती. त्याच धर्तीवर ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या

 

प्रचारासाठी स्वतंत्र गाणी शिवसेनेने तयार केली आहेत.
ठेका धरायला लावणारे संगीत, तोंडात सहज गुणगुणता येणारे गाणे यांची स्वतंत्र सीडी शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे तयार करण्यात आली आहे.
शिवसेना गीताबरोबर प्रचारादरम्यान उमेदवारांची ही गाणी आता प्रत्येक रस्त्यारस्त्यांवर ऐकायला मिळणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी आनंदरथ तयार करण्यात आला आहे; तर ठाणे लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार विजय चौगुले यांच्यासाठी प्रचाराचा विजयरथ सज्ज झाला आहे.
या प्रचाररथांमध्ये दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या गाण्यांची सीडी लावण्यात येणार आहे. दोघांचे विरोधक राष्ट्रवादीचे वसंत डावखरे व संजीव नाईक मात्र खुल्या गाडीतून सध्या प्रचार करीत आहेत. शिवसेनेने दोन्ही उमेदवारांची ओळख, कामाची पद्धती, शिवसेनेचे कार्य याची महती गाण्यातून सांगताना सुरुवातीलाच स्वर्गीय आनंद दिघे यांचे स्मरण देखील गाण्यातून केले आहे. ठेका धरायला लागणारी ही गाणी मतदारांना किती आकर्षित करणार, हे प्रचारादरम्यान दिसून येईल.
साहेब एक मिनीट..
रात्रीची वेळ. स्थळ-लोकसभेच्या एका उमेदवाराचे कार्यालय. दिवसभराच्या प्रचारानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करीत, दुसऱ्या दिवसाचे प्लॅनिंग आखीत उमेदवार चर्चेत बसलेला. समोर शंभरएक कार्यकर्ते बसलेले. पांढरा सदरा, कुर्ता घातलेला एक माणूस येतो. साहेब.एक मिनीट.जरा बाहेर या, आपल्याशी खाजगीत बोलायचे आहे..समोर शंभरएक कार्यकर्ते बसलेत, बरं हा माणूस कोण ते देखील ठाऊक नाही. उमेदवाराची थोडी पंचाईत होते. स्वत:ला सावरून उमेदवार म्हणतो, काही अडचण नाही, सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत, तुम्ही बिनधास्त बोला.सगळ्यांसमोर कसा विषय काढायचा म्हणून तो माणूस चुळबूळ करू लागला. असं करा, माझ्या बाजूच्या खुर्चीवर बसा आणि हळूच सांगा.उमेदवाराच्या सुचनेनुसार तो माणूस तसे करतो. साहेब..आपला एक उमेदवार आहे, तीनचार हजार मते खाईल, तुमची तयारी असेल तर, सांगा. तुमच्याकडून काही मदत मिळेल का.? त्या माणसाच्या बोलण्याचा रोख लक्षात घेत उमेदवाराने देखील सांगितले. चांगली गोष्ट आहे. मी तुमच्या उमेदवाराला मदत करायला तयार आहे. बोला, काय आणि कशी मदत करायची. उमेदवाराचा होकार पाहून मध्यस्थी करायला आलेला माणूस थोडा खुश झाला. साहेब, तुम्हीच ठरवा काय मदत करणार ते. उमेदवार देखील राजरकारणात चांगला मुरलेला. तुमच्या उमेदवाराची पत्रके वगैरे काही छापायची असतील तर, मी छापून देईन, एक प्रिंटरवाला आपलाच कार्यकर्ता आहे. बोला, किती पत्रके छापायची आहेत..उमेदवाराच्या त्या उत्तरावर मध्यस्थी करायला आलेला माणूस काय समजायचे ते समजला. पुढच्या मिनिटात तो काहीही न बोलता तेथून गायब झाला.