Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

डोंबिवलीतील व्याघ्रेश्वरी देवीची आजपासून जत्रा
डोंबिवली / प्रतिनिधी

डोंबिवलीचे आणखी एक ग्रामदैवत म्हणजे व्याघ्रेश्वरी देवी. व्याघ्रेश्वरी देवीचा उत्सव आणि जत्रा
१६ एप्रिलपासून सुरू होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा असतो. दोन दिवस मंदिर परिसर देवीच्या दर्शनासाठी गर्दीने फुलून गेलेला असतो.
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव-ठाकुर्ली, देवीचापाडा येथे गावदेवीचे मंदिर आहे. शेकडो वर्षांपासून

 

देवीची जत्रा या ठिकाणी भरते. श्री गावदेवी मंदिर संस्थानतर्फे देवीच्या उत्सवाचे संयोजन केले जाते. मंदिर संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे, माजी अध्यक्ष पुंडलिक म्हात्रे, सभापती वामन म्हात्रे आणि इतर विश्वस्तांच्या सहकार्याने हा उत्सव पार पडतो. दोन दिवसात सुमारे दीड ते दोन लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. पूर्वी ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेली व्याघ्रेश्वरी देवी आता कल्याण, डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई परिसरातील शहरवासियांची विशेषत: गुजराथी, बहुजन समाज, आगरी, कोळी, दाक्षिणात्य समाज यांचे श्रद्धास्थान झाली आहे.
दरवर्षी सप्तमी, अष्टमीला देवीचा उत्सव साजरा केला जातो. परंपरागत पद्धतीने भजन करीत देवीची पालखी काढली जाते. देवीला बोललेले नवस फेडण्यासाठी, दर्शनासाठी दोन दिवस मंदिराच्या आवारात रांगा लागलेल्या असतात. विविध प्रकारची दुकाने, आनंदमेळा आणि त्याचा स्वाद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. असा हा दोन दिवसांचा आनंदमेळा देवीच्या प्रांगणात भरलेला असतो.
देवीचा पाडा परिसरात पूर्वी घनदाट जंगल होते. देवी या भागात वाघावर बसून येत असे. या भागात वावर असल्याने देवी याच भागात लुप्त झाली. देवीच्या उत्सव काळात वाघ या ठिकाणी येत असे. व्याघ्रेश्वरीची बहीण रागाई ही बाजूलाच असलेल्या कुंभारखाणपाडा येथे निघून जाऊन स्थायिक झाली, अशी आख्यायिका आहे. याचवेळी रागाई देवीचा उत्सव साजरा केला जातो. देवीला कोंबडा, बकरा बळी देण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. गावांचे शहरीकरण झाल्याने गावदेवी आता शहरवासियांची देवी झाली आहे. उत्सवाचे दोन दिवस म्हणजे डोंबिवलीकरांसाठी एक पर्वणी असते. मंदिराच्या विस्तारीकरणाची संस्थानची योजना आहे.