Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राज व शर्मिला ठाकरे यांचा जिल्ह्यात झंझावात!
ठाणे/प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीत उतरली असून, शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे शहरासह जिल्ह्यातील आपले तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्ह्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे याही त्यासाठी मैदानात उतरल्या असून, येत्या आठवडय़ात ठाकरे पती-पत्नीचा झंझावात ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी व कल्याण, डोंबिवली

 

शहरात अवतरणार आहे.
मनसेतर्फे ठाण्यात राजन राजे, कल्याणात वैशाली दरेकर आणि भिवंडीतून डी.के. म्हात्रे यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. मंगळवारी राज यांच्या जिल्ह्यातील शहापूर व कल्याण येथे झालेल्या जाहीर सभांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने कार्यकर्त्यांत चैतन्य संचारल्याचे मनसेचे जिल्हा संपर्कप्रमुख मनोज चव्हाण यांनी सांगितले.
वरील पाश्र्वभूमीवर १६ एप्रिल रोजी गुरुवारी राज ठाकरे यांची मीरा-भाईंदर येथील मेडकिया ग्राऊंड, गोल्डन नेस्ट सर्कलजवळ सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे, तर त्यानंतर २६ एप्रिल रोजी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील शेवटची प्रचार सभा ठाण्यातील भगवती हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
राज यांच्या वरील सभांखेरीज शर्मिला ठाकरे स्वतंत्रपणे कल्याण, ठाणे व भिवंडी मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. २० एप्रिल रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत त्या संपूर्ण कल्याण, २१ एप्रिल रोजी दिवसभर ठाणे शहर आणि शुक्रवार २४ एप्रिल रोजी त्या भिवंडी लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसावर होणारा अन्याय आणि सरकारची दुटप्पी भूमिका हे मुद्दे मतदारांना मोठय़ा प्रमाणावर अपील होत असून, राज ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी भारावलेला तरुण मतदार यावेळी मनसेला मोठय़ा प्रमाणावर मतदान करेल, असा विश्वासह१ चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.