Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९

‘रेल्वे, शैक्षणिक प्रकल्पांना प्राधान्य’
अंबरनाथ ते कल्याण डोंबिवली परिसरातील सर्वाधिक नागरिक लोकलने मुंबईत नोकरी, व्यवसायासाठी जातात. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या समस्या सर्वाधिक या भागात आहेत. त्या सोडविण्याचा मी निकराने प्रयत्न करणार आहे. गेले आठ ते नऊ महिन्यात कल्याण परिसरातील विकास व समस्यांच्या प्रश्नांचे निराकरण करताना मला हे अनुभव आले आहेत. डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे. आशिया खंडातील एक सुशिक्षित शहर म्हणून डोंबिवलीचा नावलौकिक आहे. एक शैक्षणिक केंद्र म्हणूनही डोंबिवली नावारूपाला यावी म्हणून मी प्रयत्न करणार आहे. या भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे येथे जावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी डोंबिवली परिसरात शासकीय वैद्यकीय, इंजिनीअरिंग प्रकल्प सुरू करणे, याशिवाय विकासाचे प्रकल्प, रेल्वेशी संबंधित पालिकेचे पूल, रस्ते अशी अनेक कामे प्रलंबित आहेत.

मनसेच्या विरोधामुळे शाई धरणाचा लोच्या झाला रे!
ठाणे/प्रतिनिधी -
ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्चून शाई धरण बांधण्याबाबत सेना-भाजप- राष्ट्रवादी- काँग्रेस यांच्यात मतैक्य होत असतानाच जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोवर धरणाची एक वीटही लागू देणार नाही, असा सूर लावीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रस्तावित शाई धरणास विरोध दर्शविला आहे.
ठाण्याबरोबर मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली या महापालिकांच्या पाणी समस्येवर कायमस्वरुपी तोडगा ठरणारे शाई धरण व्हावे, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पासून पाठपुरावा करीत हे काम अंतिम टप्प्यात आणले आहे.

िधानसभा इच्छुकांसाठी लोकसभा ही अग्निपरीक्षाच!
खास प्रतिनिधी

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमुळे कुठल्या भागात कुणी काम केले, कुणी आतून दुसऱ्याला मदत केली हे कळणार असल्याने प्रामाणिकपणे आपापल्या उमेदवारांचेच काम करा; तरच विधानसभेसाठी तुमच्या नावाचा विचार होईल, अशी सूचना सर्वच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांनी दिल्याने युती-आघाडीचे नेते खऱ्या अर्थाने कामाला लागल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. मनसेमुळे तीन ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे.

मनसेचे परप्रांतीय विरोधातील आंदोलन; ब्रेक के बाद!
ठाणे/प्रतिनिधी

२००१ पर्यंत ठाणे जिल्ह्यात २६ लाख परप्रांतीय आले होते. आता ही संख्या खूप वाढली असून, परिस्थिती अशीच राहिली तर या राज्याचे मालक असूनही तुम्ही कोण अशी परप्रांतीयांकडून विचारणा होईल, असा इशारा देतानाच लोकसभा निवडणुकीसाठी ब्रेक घेतलेले परप्रांतीयाविरोधातील आंदोलन पुन्हा सुरू करण्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहापुरात केली.

शिवसेनेचा आनंद व विजय रथ सज्ज
ठाणे/ प्रतिनिधी

शिवसेना..शिवसेना..शिवसेना..या अवधूत गुप्तेच्या गीताने मागील निवडणूक ढवळून निघाली होती. त्याच धर्तीवर ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतंत्र गाणी शिवसेनेने तयार केली आहेत. ठेका धरायला लावणारे संगीत, तोंडात सहज गुणगुणता येणारे गाणे यांची स्वतंत्र सीडी शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे तयार करण्यात आली आहे. शिवसेना गीताबरोबर प्रचारादरम्यान उमेदवारांची ही गाणी आता प्रत्येक रस्त्यारस्त्यांवर ऐकायला मिळणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी आनंदरथ तयार करण्यात आला आहे; तर ठाणे लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार विजय चौगुले यांच्यासाठी प्रचाराचा विजयरथ सज्ज झाला आहे.

डोंबिवलीतील व्याघ्रेश्वरी देवीची आजपासून जत्रा
डोंबिवली / प्रतिनिधी

डोंबिवलीचे आणखी एक ग्रामदैवत म्हणजे व्याघ्रेश्वरी देवी. व्याघ्रेश्वरी देवीचा उत्सव आणि जत्रा
१६ एप्रिलपासून सुरू होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा असतो. दोन दिवस मंदिर परिसर देवीच्या दर्शनासाठी गर्दीने फुलून गेलेला असतो.
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव-ठाकुर्ली, देवीचापाडा येथे गावदेवीचे मंदिर आहे.

राज व शर्मिला ठाकरे यांचा जिल्ह्यात झंझावात!
ठाणे/प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीत उतरली असून, शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे शहरासह जिल्ह्यातील आपले तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्ह्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे याही त्यासाठी मैदानात उतरल्या असून, येत्या आठवडय़ात ठाकरे पती-पत्नीचा झंझावात ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी व कल्याण, डोंबिवली शहरात अवतरणार आहे.

पोटजातींमुळे मराठा समाजाचे नुकसान- अॅड. जाधवराव
ठाणे/प्रतिनिधी

मराठा समाजाचे नुकसान झालेल्या पोटजातींमध्ये रोटी - बेटीचा व्यवहार होणे आवश्यक आहे. मराठा हे संस्कार आणि संस्कृती असून ती सर्वानी जोपासण्याची आवश्यकता असल्याचे मत नवयुग विद्यापीठ ट्रस्टचे संस्थापक अॅड. विजयसिंह जाधवराव यांनी ठाण्यात व्यक्त केले.
ठाण्यातील मराठा मंडळाचा ४८ व्या वर्धापन दिनाचा सोहळा सहयोग मंदिर सभागृहात झाला. त्यावेळी प्रमुख वक्ते अॅड. विजयसिंह जाधवराव यांनी परखड मत व्यक्त करीत महाराष्ट्रातील मराठे कुठून आले, त्यांचा पेहेराव, चालिरीती, ९६ कुळी मराठे व त्यांचा इतिहास मांडला.
या विषयावरील संशोधनपर लेखन लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वास्तुविशारद प्रवीण जाधव यांनी नियोजित छत्रपती शिवाजी मंदिर या सांस्कृतिक केंद्राची वास्तू ठाण्यातील एक उत्कृष्ट आणि लक्षवेधी असेल, अशी ग्वाही दिली. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संदीप माने, उपाध्यक्ष नामदेव तावडे हे होते. मंडळाचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यांनी प्रास्ताविक, तर सरचिटणीस रवींद्र सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

अड. वनगा यांच्या प्रचारासाठी राजनाथ सिंह नालासोपाऱ्यात
ठाणे/प्रतिनिधी

पालघर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अॅड. चिंतामण वनगा यांचा मतदारसंघात झंझावती दौरा सुरू असून, येत्या आठवडय़ात त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांची नालासोपारा येथे जाहीर सभा होणार असल्याचे मतदारसंघाचे सहप्रचारप्रमुख ओमप्रकाश शर्मा यांनी सांगितले. अॅड. वनगा यांनी मतदारसंघातील प्रचाराच्या दोन फेऱ्या आतापर्यंत पूर्ण केल्या असून, १५ ते २२ एप्रिलदरम्यान ते मतदारसंघाचा झंझावाती दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालघर (१५ व १७ एप्रिल), तलासरी (१६ एप्रिल), जव्हार विधानसभा क्षेत्र मोखाडा तालुका (१८ एप्रिल), वसई ग्रामीण विभाग (१९ एप्रिल), विक्रमगड (२० एप्रिल), मनोर (२१ एप्रिल- सकाळी), नालासोपारा (२१ एप्रिल- सायंकाळी) आणि डहाणू (२२ एप्रिल) असा त्यांचा दौरा होणार असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांची जाहीर सभा २१ एप्रिल रोजी सायंकाळी नालासोपारा येथे होणार असून, या सभेची जोरदार तयारी सुरू असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

खासगी सुरक्षारक्षक पोलिसांना सहकार्य करणार!
ठाणे/प्रतिनिधी :
मावळ लोकसभा मतदारसंघात नवी मुंबईतील काही भाग येत असल्याने २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाप्रसंगी स्थानिक पोलिसांना खासगी सुरक्षारक्षकांनी मदतीचा हात दिला आहे. नवी मुंबईतील पोलिसांना पनवेलमध्ये जावे लागणार असल्याने २१ ते २३ एप्रिल असे तीन दिवस खासगी सुरक्षारक्षक पोलिसांना अहोरात्र सहकार्य करणार आहेत. पोलीस उपायुक्त (मुख्यालय) एन. डी. चव्हाण व सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख गुरचरणसिंग चौहान यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. पोलिसांसमवेत रात्रीची गस्त घालणे, परिसरातील सर्व पुतळ्यांची सुरक्षा, गर्दीच्या ठिकाणी तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांशी समन्वय साधणे यासारखी कामे खासगी सुरक्षारक्षक करणार आहेत. विशेष म्हणजे ही सेवा संघटनेने मोफत देऊ केली आहे, असे चौहान म्हणाले. पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी प्रथमच खासगी सुरक्षारक्षकांच्या क्षमतेवर विश्वास दर्शविला असून, यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावल्याचे ते म्हणाले. महत्त्वाचे सण तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध समारोह, संमेलने, खेळांचे सामने याप्रसंगी संघटनेने सरकारी यंत्रणांना नेहमीच सहकार्य करण्याची भूमिका ठेवली आहे, असेही चौहान यांनी स्पष्ट केले. उपायुक्त चव्हाण यांनीही त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले.

सर्व समाजाचे कार्यकर्ते सपा उमेदवारासोबत!
भिवंडी/वार्ताहर

भिवंडीतून समाजवादी पार्टीच्या वतीने निवडणूक लढवित असलेले आर.आर. पाटील यांच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. आर.आर. पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांसह मुरबाड रोडवरील रायते, दहागाव, कुळगाव-बदलापूर, कान्होर, भोईवाडा-कल्याण येथे जाऊन मतदारांशी संवाद साधला. तेथील जनतेने पाणी, वीज, आरोग्य यांसारख्या समस्या मांडल्या. निवडून आल्यानंतर या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मतदारसंघातील दुर्गम भागात जाऊन पाटील यांनी त्यांचेही प्रश्न समजून घेतले. त्यांच्या प्रचारात सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांबरोबर युवक, महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याने येथील लढत रंगतदार बनली आहे.

एक दिवसाच्या मोहापायी पाच वर्षे दु:खात घालवू नका - आनंद परांजपे
ठाणे/प्रतिनिधी :
मतदाराला मताची ‘किंमत’ आणि ‘मूल्य’ यातील कळते. एक दिवसाच्या मोहापायी पुढील पाच वर्षे दु:खात घालवू नका, योग्य उमेदवाराला मत द्या, असे आवाहन कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी कळवा येथील जाहीर सभेत केले. निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या फेरीत ठिकठिकाणी सेना-भाजप युतीतर्फे प्रचारसभा घेण्यात येत आहेत. माझे वडील प्रकाश परांजपे यांना चार वेळा तुम्ही मतदारांनी निवडून दिले, त्यांच्या पश्चात निवडून आल्यावर वडिलांनी लोकप्रतिनिधित्वाचे घेतलेले व्रत मी पुढे निष्ठेने चालवीन. तरुण मतदारांकडून मला जास्त अपेक्षा आहेत. प्रामाणिक, मेहनती, अभ्यासू खासदार म्हणून आपली ओळख असावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे परांजपे पुढे म्हणाले.

‘शाळा, महाविद्यालये ही सरस्वतीची मंदिरे’
कल्याण/वार्ताहर

शाळा, महाविद्यालये ही सरस्वतीची मंदिरे आहेत. या मंदिराचा पाया रचण्यासाठी त्यागमय अशा जीवनशैलीची गरज व्यक्त करून नानासाहेब भिडे यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीच्या नावाने दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीतून सुसंस्कृत नागरिक निर्माण होतील, असा विश्वास मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी व्यक्त केला. शहरातील जुन्या पिढीतील गुरुवर्य नानासाहेब भिडे मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्टचा रौप्यमहोत्सव आचार्य अत्रे नाटय़मंदिरात आयोजित केला होता. या सोहळ्यात डॉ. देशमुख बोलत होत्या. याप्रसंगी गुरुवर्य नानासाहेब भिडे स्मृती धर्मादाय ट्रस्टतर्फे गरजू-गरीब विद्यार्थी, तसेच विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांना शिष्यवृत्ती देण्यात आली. या कार्यक्रमास डॉ. शंकरराव मोडक, माधवराव भिडे, सुरेश बेहरे, अरविंद भिडे यांसह मान्यवर मंडळी उपस्थित होती. नमस्कार मंडळाच्या मुलींनी दोरीवरील मल्ल खांबावरची प्रात्यक्षिके व डोंबिवलीच्या क्षितीज या मतिमंद मुलांच्या संस्थेतील मुलांनी नृत्ये व गाणी सादर करून या कार्यक्रमाला बहार आणली.

राष्ट्रवादीचा नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात
ठाणे/प्रतिनिधी :
नवी मुंबईतील राष्ट्रवादीचा वादग्रस्त नगरसेवक रामआशिष यादव याला मंगळवारी रात्री रबाळे पोलिसांनी अटक केली. हाणामारीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला यादव हा राष्ट्रवादीच्या कार्यक्रमासाठी ठाण्यात आला होता. पालकमंत्री गणेश नाईक यांची बैठक आटोपल्यानंतर साध्या गणवेशातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकारामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडून त्यांची पोलिसांशी शाब्दिक चकमक उडाली. अखेर नौपाडा पोलिसांच्या मदतीने नगरसेवक यादव याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर कोणत्या स्वरूपाचा गुन्हा आणि राष्ट्रवादी कार्यालय की हरिनिवास सर्कल यापैकी कुठे अटक दाखवायची याबाबत पोलिसांमध्ये घोळ चालू होता.

लोढा लक्झरिया टेक्नोमध्ये मिळणार हायफाय सुविधा
ठाणे/प्रतिनिधी :
घरातील दिवे, पंखे, पडदे, मोबाइल फोनद्वारे चालविणारा, मैदानात खेळणाऱ्या मुलांवर सीसी टीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवणारा आणि २४ तास मिनरल वॉटरची सुविधा देणारा असा ठाण्यातील पहिलाच लक्झरिया टेक्नो गृहनिर्माण प्रकल्प लोढा ग्रुपने हाती घेतला आहे.
माजिवडा येथे प्रशस्त १४ एकर जागेवर जागतिक दर्जाच्या सुविधा असलेली ही ठाण्यातील पहिलीच टाऊनशिप असून ग्राहकांची सुरक्षितता, त्यांच्या गरजा आणि जीवनशैलीचा विचार करून हा प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती लोढा समूहाचे संचालक अभिषेक लोढा यांनी दिली. प्रत्येक गृहमालिकेत २७ मजल्यांच्या टॉवरमध्ये २, ३ व ४ बीएचकेची घरे असून, त्यात प्रत्येक घरासाठी स्वयंचलित प्रणाली, थेट घरापर्यंत जाणाऱ्या लिफ्ट, त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी स्विप कार्ड, शॉपिंग आर्केड, घरातील पंखे, एसी, मोबाइल फोनद्वारे बंद-चालू करता येतील. सार्वजनिक ठिकाणी, बागेत, मैदानात सीसी कॅमेरे, व्हिडीओ डोअरफोन, घरात गॅस डिक्टेटर्स, सेलफोन नियंत्रित सुविधा अशा अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय भव्य क्रिकेट मैदान, शाळा, मॉल याही सुविधा असणार आहेत. या आलिशान घरांसाठी प्रति चौरस फूट चार हजार २९३ रुपये दर ठेवण्यात आला असून, पुढील तीन दिवसांत बुकिंग करणाऱ्यांना बचतही करता येणार आहे, असेही लोढा यांनी सांगितले.

सावरकरांच्या विचाराचा वारसा युवा पिढीला -भूमकर
ठाणे / प्रतिनिधी

प्रत्येकाच्या मनामध्ये प्रखर राष्ट्रप्रेमाची भावना जागृत असेल तर या देशाकडे कुठलीही परकीय शक्ती वाकडय़ा नजरेने पाहण्याचे धाडस करणार नाही. मात्र यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जाज्वल्य विचारांचा वारसा युवा पिढीला द्यायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि.ह.भूमकर यांनी केले. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यातील व्यास क्रिएशन्सने प्रसिद्ध केलेल्या धगधगते यज्ञकुंड: वि.दा.सावरकरह्ण या ज्येष्ठ पत्रकार श्री.वा.नेर्लेकर लिखित चरित्र ग्रंथाचे प्रकाशन लुईसवाडी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या विशेष समारंभात करण्यात आले. त्यावेळी भूमकर यांनी सावरकरांचे विचार येणाऱ्या काळासाठी देशाला उपयुक्त असल्याचे सांगितले. एक लाख विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या प्रती देण्याचा संकल्प सोडण्यात आला. यावेळी लेखक नर्लेकर, डॉ.सुभाष म्हसकर, श्रीराम बोरकर, फेस्कॉमचे मधुकरराव कुलकर्णी, नीलेश गायकवाड यांची भाषणे झाली. संस्थेचे अध्यक्ष श्रीराम तथा दादा बोरकर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याचे अहवाल वाचन केले.

महाराष्ट्रातील नामवंत चित्रकारांचे प्रदर्शन सुरू
ठाणे/प्रतिनिधी

महाराष्ट्रातील नामवंत चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे कलाभवन येथे भरविण्यात आले आहे. आर्ट पार्ट या संस्थेतर्फे भरविण्यात आलेल्या या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच महापालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांच्या हस्ते झाले. कलाक्षेत्रातील कलाकारांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना मुंबई शहरानंतर चित्र प्रदर्शनासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी हे कलाभवन निर्माण करण्यात आले असून, त्याला चित्रकारांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रकारांची प्रदर्शने या ठिकाणी भरण्यास सुरुवात झाल्यानंतर ठाणे कला भवनला कला रसिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. या पाश्र्वभूमीवर आर्ट पार्ट या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ चित्रकारांचे चित्र प्रदर्शन ठाणे कलाभवन येथे भरविले आहे. महापालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ चित्रकार डॉ. द्विवेदी, श्रीमती निनासिंग, आर्ट क्युरेटर श्रीमती रुबी सक्सेना आदी मान्यवर उपस्थित होते. हे चित्र प्रदर्शन १९ एप्रिलपर्यंत कला रसिकांना पाहावयास मिळणार आहे. कापूरबावडी नाका येथील बिगबझारजवळ ठाणे कलाभवन आहे.

नामयाची वाणी- अमृताची खाणी
ठाणे / प्रतिनिधी

नामभक्ती मंडळ, ठाणे यांच्यातर्फे ‘नामयाची वाणी- अमृताची खाणी’ या कार्यक्रमाचा प्रयोग ‘सन्मान कट्टा’ येथे सादर झाला. या कार्यक्रमात संत नामदेवांच्या जीवनक्रमाचे सोप्या, सुटसुटीत शब्दांत नाटय़मय सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षां ढगे व इंद्रायणी दातार यांनी प्रभावीपणे केले. त्यांच्याबरोबर सुनीता कान्हेरे यांनी नाटय़प्रसंगातून नामदेवांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग साकार केले. नामदेवांचे अभंग, गौळण या काव्यप्रकारांचे आपल्या सुरेल स्वरात अरुणा बेंद्रे, ज्योती कोपरकर आणि स्मिता खाडे यांनी गीतगायन केले. यात अमृताहुनी गोड, दळिता कांडिता, पतितपावन, आधी रचिली पंढरी आणि रात्र काळी हे प्रसिद्ध अभंग गायले गेले. संवादिनीवर अरुणा बेंद्रे व तबल्यावर शाम पोवळे यांनी साथ दिली. कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. संत नामदेव व पांडुरंगाच्या गजरात कार्यक्रमाची सांगता झाली. भक्तिरसात मंत्रमुग्ध झालेल्या रसिकांतर्फे आणि सन्मान कट्टय़ातर्फे कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यात आल्या. संपर्क- २५४०१४३६.