Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
व्यक्तिवेध

सळसळते आणि उमदे व्यक्तिमत्त्व, ओसंडून वाहणारा उत्साह, कायम हसतमुख आणि खळखळून वाहणारी प्रसन्नता. डॉ. विजया पाटील यांना ओळखणाऱ्यांना अजूनही हे खरे वाटत नाही की त्यांचे बुधवारी सकाळी मोटार अपघातात निधन झाले. मेडिकल क्षेत्रात त्या लोकप्रिय होत्या त्या त्यांच्या त्या स्वभावामुळे. त्या उत्कृष्ट डॉक्टर आणि स्त्रीरोगतज्ज्ञ होत्याच, पण कुशल संघटकही होत्या. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांचे संयोजन करण्यात त्यांची जी सहजता असे, त्यामुळे भले भले तज्ज्ञ थक्क होत असत. त्यांना त्या परिषदेतील विषयाचे उत्तम ज्ञान असेच आणि अशा परिषदा किती ‘ग्रेसफुली’ आयोजित करता येतात याचेही कौशल्य त्यांच्याकडे होते. त्या सर्वार्थाने ‘ग्लोबल’ होत्या आणि जितक्या अथकपणे त्या हाँगकाँग, लंडन, न्यूयॉर्क येथील त्या चर्चासत्रांना हजर राहायच्या तितक्याच तडफेने त्या राजकारणातही वावरायच्या. त्या जेव्हा मॅट्रिक झाल्या, तेव्हा त्यांच्या एकूण भावकीत व परिवारात मुलींनी जास्त शिक्षण घ्यायची प्रथा नव्हती. ग्रामीण परिसर आणि शेतीजीवन व त्याबरोबर रुजलेली मराठा पारंपारिकता हा सांस्कृतिक ठसा असलेल्या डॉ. पाटील यांना उच्च शिक्षण आणि तेही

 

वैद्यकीय शाखेचे, घेण्यासाठी प्रोत्साहन दिले वसंतदादा पाटील यांनी. वसंतदादा पाटील यांच्यावर स्वातंत्र्य चळवळीचा जो सामाजिक पुरोगामी संस्कार होता त्यापैकी एक होता स्त्रीशिक्षणाचा. वसंतदादांच्या पाठिंब्याशिवाय विजयाबाई लंडनला जाऊन उच्च वैद्यकीय शिक्षण घेऊच शकल्या नसत्या. मुंबईला त्यांचे स्वत:चे हॉस्पिटल होते पण त्या बॉम्बे हॉस्पिटलमध्येही शस्त्रक्रिया करण्यासाठी जात असत. एकूणच मेडिकल वर्तुळात त्यांचा मित्र-मैत्रीण परिवार प्रचंड होता. या वर्तुळात त्या हिरीरीने इंदिरा- राजीव- सोनिया गांधींची बाजू मांडत, बहुतेकांचा विरोध सहन करून. परंतु त्यांच्या प्रसन्नतेमुळे त्यांच्या मतांना विरोध करणारेही त्यांचे चाहतेच असत. विजयाबाईंच्या मैत्रीच्या संबंधात त्यामुळे कधीही बाधा आली नाही. विचाराने व वृत्तीने ‘काँग्रेस’ आणि अनेक लाटांवर काम केलेले असूनही, खरे म्हणजे पक्षाने विजयाबाईंच्या कार्याला, तडफेला, जिद्दीला आणि उत्साहाला योग्य ती दाद कधीही दिली नाही- त्यांचा संपर्क थेट सोनियांपर्यंत असूनही. त्या राजकीय दृष्टीने पाहता जरी महत्त्वाकांक्षी नसल्या तरी त्यांच्या कामाचा झपाटा व ‘इंटेग्रिटी’ पाहून पक्षाने त्यांना विधान परिषद वा राज्यसभेवर पाठवायला हवे होते. पण काँग्रेस पक्षात सध्या महत्त्वाकांक्षेसाठी काहीही करायची तयारी असलेल्यांनी स्वत:चे असे एक मतलबी वर्तुळ तयार केले आहे. या वर्तुळाने विजयाबाईंची कर्तबगारी पाहूनच त्यांना दूर ठेवले. काँग्रेसमध्ये, भाजप व शिवसेनेप्रमाणेच, एक समांतर सत्तास्थान तयार झाले आहे जे त्या त्या पक्षातील ‘हाय कमांड’लाही जुमानत नाही. विजयाबाईंच्या अंगात प्रचंड ऊर्जा होती. ती कारणी लागावी म्हणून त्या अगदी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या. (राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या कर्तृत्वाला न्याय मिळेल अशी भाबडी आशा तर त्यांना नव्हती?) विजयाबाईंचे राजकारण हा मुद्दा महत्त्वाचा असला तरी खरे त्यांचे गुण होते ते त्यांच्या एकूणच थबथबणाऱ्या उत्साहरसात. त्या जितक्या उत्तम सुग्रण होत्या तितक्याच सौंदर्यदृष्टीने पाहुणचार सजविण्यातही कुशल होत्या. शेती-बागायतीचे उत्तम ज्ञान तसेच आधुनिक फॅशन्सचेही त्यांना असे. त्या उत्तम ड्रायव्हिंग करायच्या आणि एकूणच अतिशय साहसी होत्या. या अपघातात त्यांचे निधन झाले, पण यापूर्वी यमराजाच्या दरवाजावरची बेल वाजवून त्या चार-पाच वेळा परत आल्या आहेत. डॉक्टर असल्यामुळे आजारपणे, अपघात, अकाली मृत्यू हे सर्व त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होते. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सलग ७२ तास त्या जखमींवर उपचार करण्यात व्यग्र होत्या. अशी सार्वजनिक आणि सुसंस्कृत जीवन असलेली व्यक्ती आपल्यातून अपघाताने गेली- ती पोकळी खरोखरच भरून येणे अशक्य आहे.