Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९

४२ कि.मी. रेल्वे मार्गासाठी लागली बारा वर्षे
अमरावती-नरखेड रेल्वे मार्गाची शोकांतिका

मधुसूदन कुलथे, चांदूर बाजार, १५ एप्रिल

विदर्भातील अमरावती-नरखेड रेल्वे मार्गाचे भूमिपूजन तत्कालीन प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिंहराव यांनी २५ डिसेंबर १९९३ रोजी केले होते. १३८ किमी. ब्रॉडगेजच्या या रेल्वेमार्गाच्या निर्माण कार्याची सुरुवात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी व विद्यमान राष्ट्रपती व तत्कालीन खासदार प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. मात्र, १२ वर्षांत या रेल्वे मार्गाचे चांदूर बाजापर्यंतचेच तात्पुरते काम पूर्ण होऊ शकले. या नंतरच्या कामावर रेल्वे रुळसुद्धा बसले नाही.

उत्तमराव पाटलांना ‘कारणे दाखवा’
यवतमाळ, १५ एप्रिल / वार्ताहर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार उत्तमराव पाटील यांच्यावर प्रदेश काँग्रेस समितीने अखेर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची उमदेवारी मिळाली नाही, म्हणून उत्तमराव पाटील यांची नाराजी आपण समजू शकतो. मात्र, एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही नेत्याने मग तो कितीही मोठा असला आणि तो पक्षविरोधी कारवाया करीत असेल तर त्यांच्या विरुद्ध प्रदेश काँग्रेस समिती कारवाई करील, असा इशारा पूर्वीच दिला गेला होता, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मतदान केंद्रांवर प्रथमोपचाराची सोय
अमरावती, १५ एप्रिल / प्रतिनिधी

मतदानाच्या दिवशी कडक उन्हात मतदारांना आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास त्यांच्यावर मतदान केंद्रस्थळीच प्राथमिक उपचार करता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्य़ातील सर्वच मतदान केंद्रांवर औषधांची ‘किट’ ठेवण्याचा निर्णय घेतला असून पहिल्यांदाच मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान अमरावती जिल्ह्य़ात हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. उद्या, १६ एप्रिलला मतदान होणार आहे. कडक उन्हात शरीरातील पाणी कमी होणे, अतिसार, डोकेदुखी, उलटी अशा आजारांवर वेळीच उपाय करता यावेत, यासाठी मतदान केंद्रांवर औषधांची किट ठेवण्याची कल्पना जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मांडली.

विरोधकांजवळ मुद्दय़ांचा अभाव हेच काँग्रेस विजयाचे गमक -माणिकराव ठाकरे
यवतमाळ, १५ एप्रिल / वार्ताहर

काँग्रेस आघाडी सरकारच्या विरोधात सांगावा असा एकही मुद्दा विरोधकांच्या जवळ नाही यातच काँग्रेसचा विजय स्पष्ट झालेला आहे, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे केले. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे बुधवारी यवतमाळात आले होते. त्यांनी आपल्या निवासस्थानी मतदारसंघातील पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांच्या दिवसभर बैठकी घेऊन उमेदवारी हरिभाऊ राठोड यांच्या विजयासाठी जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले.

--------------------------------------------------------------------------

उपराजधानीत बसपा निर्णायक
नागपूर लोकसभा मतदार संघ

चंद्रशेखर बोबडे, नागपूर,१५ एप्रिल

गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून मताधिक्याने जिंकलेल्या नागपूरच्या एकमेव जागेवर यावेळी काँग्रेसला मतविभाजनाच्या धोक्यामुळे चुरशीच्या लढतीला तोंड द्यावे लागत आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या आणि महापालिका हद्दीपर्यंत सिमीत असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख ३७ हजार ७६२ मतदार असून २७ उमेदवार रिंगणात आहेत. विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार, माजी खासदार व भाजपचे उमेदवार बनवारीलाल पुरोहित आणि बहुजन समाज पक्षाचे माणिकराव वैद्य या तीन उमेदवारांमध्ये होणारी लढत, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत आणि रिपाइं आघाडी समर्थित भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार डॉ. यशवंत मनोहर यांच्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरली आहे.

काँग्रेस-भाजपत तुल्यबळ लढत
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ

सुरेश सरोदे, गडचिरोली, १५ एप्रिल

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला जाणवणारी त्रिकोणी लढत आता प्रचारात ‘हत्ती’ माघारल्याने दुहेरी लढतीत रूपांतरित झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाइं युतीचे उमेदवार मारोतराव कोवासे आणि भाजप-सेना युतीचे अशोक नेते यांच्यातच अतिशय काटय़ाची व तुल्यबळ लढत होणार आहे. बहुजन समाज पक्षाचे राजे सत्यवानराव आत्राम यांच्या ‘हत्ती’ मुळे मतविभागणीची शक्यता वर्तवली जात असल्याने या लढतीत कोण विजयी होणार, हे सांगणे अतिशय कठीण आहे. मात्र, ‘हत्ती’ मुळे संभाव्य मतविभागणीची दोन्ही उमेदवारांनी धास्ती घेतली आहे.

दुहेरी ध्रुवीकरणाची रंगत
अमरावती लोकसभा मतदारसंघ

मोहन अटाळकर, अमरावती, १५ एप्रिल

अमरावती राखीव मतदार संघातील शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षातील थेट लढतीला तिसरा कोनही लाभला आहे. प्रहार संघटना ‘मराठा कार्ड’ वापरण्यात सरस ठरली, तर निवडणुकीतील समीकरणे विस्कटून जातील. तरीही सेनेचे आनंद अडसूळ आणि रिपब्लिकन पक्षाचे डॉ. राजेंद्र गवई यांच्यात अटीतटीची लढत होईल. जातीय मतांचे ध्रुवीकरण यशस्वीपणे घडवून आणणाऱ्या उमेदवाराच्या गळयात विजयाची माळ पडेल. शिवसेना-भाजप युतीचे आनंदराव अडसूळ आणि रिपाइं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र गवई यांच्यात थेट लढत अपेक्षित होतीच पण, काल-परवा प्रहारच्या शक्तिप्रदर्शनानंतर या गृहितकाला हादरा बसला, तरीही प्रहारच्या मर्यादा आहेत.

मतांच्या विभागणीचे गणित
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

वामन तुरिले, भंडारा, १५ एप्रिल

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ करीत मतदारांना विकासाची स्वप्ने दाखवणारे जिल्ह्य़ाचे ज्येष्ठ नेते तसेच राष्ट्रवादी, काँग्रेस व रिपाइंचे उमेदवार प्रफुल्ल पटेल या निवडणुकीत २००४ च्या पराभवाचा वचपा काढण्याची शक्यता वाढली आहे. यंदाच्या तिरंगी लढतीत प्रतिस्पर्धी भाजप-शिवसेनेचे शिशुपाल पटले आणि छावा संग्राम परिषदेचे अपक्ष उमेदवार नाना पटोले यांना मिळणाऱ्या दोन्ही काँग्रेस विरोधी मतांची विभागणी होणार असे स्पष्ट जाणवत आहे. विभाजनाचा लाभ पटेलांना मिळणार.

विजयाचा मार्ग खडतर
अकोला लोकसभा मतदारसंघ

क्रांतीकुमार ओढे, अकोला, १५ एप्रिल

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांनी घेतलेली एक लाखाहून अधिक मतांची आघाडी भेदण्याचे अवघड गणित अद्यापही न सुटल्यामुळे अकोल्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब धाबेकर आणि भारिप-बमसंचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी विजयाचा मार्ग थोडा खडतरच झाला असल्याचे चित्र आहे. भारिप-बमसंशी युती करण्याच्या सर्व शक्यता संपल्यानंतर काँग्रेसने अकोल्यातून बाबासाहेब धाबेकर यांना उमेदवारी दिली. भारिप-बमसंचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरही स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

चटप फॅक्टर महत्त्वाचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर, १५ एप्रिल

मोठय़ा संख्येत असलेल्या बहुजन, दलित व आदिवासी मतांचे ध्रुवीकरण नेमके कसे होते व त्याचा फायदा कुणाला मिळतो व शहरी मतदार कुणाला कौल देतो, यावरच या मतदारसंघातील तिरंगी लढतीत असलेले पुगलिया, अहीर व चटप यांचे भवितव्य ठरणार आहे.

सेना-काँग्रेस तुल्यबळ, यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ
न.मा. जोशी, यवतमाळ, १५ एप्रिल

काँग्रेस, बसप यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप-सेना युतीच्या भावना गवळी यांना ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. कारण, काँग्रेसने भाजपातून हकालपट्टी झालेल्या हरिभाऊ राठोड यांना उमेदवारी दिली. भाजपला हरिभाऊंना पराभूत करायचे आहे, असे वातावरण होते. काँग्रेसचे उत्तमराव पाटील यांची उमेदवारी नाकारण्यात आल्याने संतप्त पाटील- समर्थकांची गठ्ठा मते गवळींना मिळतील, असे चित्र होते. त्यामुळे हरिभाऊंचाही आत्मविश्वास ढासळला होता. अन्य ज्या मतांवर राठोडांची मदार होती, त्यापैकी बंजारांची गठ्ठा मते राष्ट्रवादीचे मनोहर नाईक यांच्या अनुकूलतेशिवाय मिळत नाही.

सेनेला‘गड’ राखण्याचे आव्हान, रामटेक लोकसभा मतदारसंघ
नितीन तोटेवार, रामटेक, १५ एप्रिल

रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे मुकुल वासनिक आणि शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्यात थेट लढत होणार आहे. अनुभवी व ‘हेवीवेट’ वासनिक यांच्या तुलनेत तुमाने हे नवखे व ‘लो-प्रोफाईल’ उमेदवार आहेत. यामुळे या मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लागले असून गेल्या तीन निवडणुकीत बाजी मारणाऱ्या सेनेसमोर गड कायम राखण्याचे आव्हान दिसते.

राजकीय प्रतिष्ठा पणाला, बुलडाणा लोकसभा मतदारसंघ
सोमनाथ सावळे, बुलढाणा, १५ एप्रिल

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यातील ‘लढाई’ उत्कंठावर्धक असून यापैकी कोणाचे पारडे जड हे आज तरी सांगता येत नाही. राजकीय विश्लेषक देखील या मतदारसंघातील निर्णयाच्या संदर्भात गोंधळून गेले आहेत.

पुन्हा ‘चेहरेपालट’ घडणार? वर्धा लोकसभा मतदारसंघ
प्रशांत देशमुख , वर्धा, १५ एप्रिल

एकूण १६ उमेदवारांपैकी भाजपचे खासदार सुरेश वाघमारे व काँग्रेसचे दत्ता मेघे यांच्यात थेट लढत असल्याचे स्पष्ट चित्र असून या मतदारसंघातील ‘चेहरेपालट’ करण्याचा इतिहास मेघेंना विजयाच्या दिशेने दोन पावले पुढे नेणारा ठरत आहे. लाखभर मताधिक्याचा दावा करणाऱ्या मेघेंचा आत्मविश्वास बसपचे विपीन कंगाले कदाचित फोल ठरवू शकतात, तर हेच कंगाले वाघमारेंना विजयाचा आधार वाटतात. ‘बलाढय़’ मेघेंपेक्षा जास्त मते घेऊ शकतो, हा संदर्भ व भाजपची मते वाढत असल्याचा दाखला देत वाघमारेंना पुन्हा ‘कमळ’ फु लवू, असा विश्वास वाटतो. राजकीय गणितांना वर्धेकर मतदारांनी ‘चेहरेपालट’चे समीकरण ठेवत शून्यवत के ले. गत सहा लोकसभा निवडणुकीत सहा नवे चेहरे दिल्लीत पोहोचले. काँग्रेस-भाजप-काँॅग्रेस-भाजप या वाटचालीत आता काँग्रेसला कौल मिळणार, असा निष्कर्ष काँग्रेस काढत आहे. ओठातून आणि मुठीतूनही साखर पेरण्याची अंगीभूत वृत्ती असलेल्या मेघेंनी बंडखोरी, असंतोष, विश्वासघात अशी छिद्रे पहिल्याच टप्प्यात बुजवली. मुस्लिम, दलित व आदिवासी अशा पारंपरिक मतांना मेघेंनी हिंदी भाषिक मतांचीही जोड देण्यात यश साधले. सहाही विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी ‘तक्रारीला’ जागा नको व पुढे विधानसभेच्यावेळी ‘पंजा’वर मते मागावी लागणार म्हणून आघाडीचा धर्म पाळला. राष्ट्रवादी व रिपाइंच्या गटांनी मेघेंचे ‘उपद्रवमूल्य’ भोगावे लागू नये म्हणून, तर माकप, जद यांनी मेघेंची सावली प्रिय मानून प्रचारात शर्थ केली. भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा जिल्ह्य़ात कु णा घटकाला फ टका बसला नाही. विरोधी पक्षाचा खासदार म्हणून विकास कामांची गंगा आणू शकलो नसलो तरी याच भूमिकेमुळे आंदोलनाचे शस्त्र नेहमी उपसले, असे सांगणारे सुरेश वाघमारे, या घडीला तरी काँग्रेसच्या छुप्या असंतुष्टांची मदत मिळण्याचा विश्वास बाळगतात. सर्व प्रमुख पक्षांपैकी राज्यात केवळ वर्धेतच भाजपकडून उमेदवारी मिळालेले तेली समाजाचे ते एकमेव उमेदवार आहेत. जिल्ह्य़ातील आमदार राजू तिमांडे, प्रमोद शेंडे, व्ही. यू. डायगव्हाणे व माजी आमदार रामदास तडस यांनी मेघेंची बाजू घेतली असली तरी समाजाचा प्रश्नही त्यांच्यापुढे आहेच. तर केवळ समाजाची बाब घेऊन, जातीचे कुंपण केव्हाच ओलांडलेल्या मेघेंपुढे लढणे शक्य नसल्याचे वाघमारे ओळखून आहेत. पवारांचा किल्ला सोडून मेघे प्रथमच निवडणुकीला सामोरे जात आहेत. पवारवादी सुरेश देशमुख, हर्षवर्धन देशमुख, रामदास तडस व राजू तिमांडे हे नेते मेघे हे पवारांशिवायही समर्थ आहेत, हे समीकरण रूढ करणार काय, हे पुढेच कळेल. मात्र अशी सर्व तथ्ये मेघेंच्या लोकप्रियतेपुढे व्यर्थ ठरत असल्याचा इतिहास आहे. २००४ मध्ये कँग्रेसच्या प्रभा राव यांच्याविरोधात असलेली नकारात्मक लाट यावेळी निश्चितच नसल्याने त्यावेळी ‘आयता’ विजय मिळालेल्या वाघमारेंपेक्षा यावेळी विजयाचा लंबक निश्चितच मेघेंकडे झुकत असल्याचे चित्र आहे.

--------------------------------------------------------------------------

बहिष्कार मागे घेण्याचे नक्षलवाद्यांना आवाहन
गडचिरोली, १५ एप्रिल / वार्ताहर

सर्व नक्षलवादी संघटनांनी येत्या १६ एप्रिलचा मतदानावरील बहिष्कार मागे घेऊन जनतेला निर्भयपणे मतदान करू द्यावे, असे आवाहन भारत विकास प्रतिष्ठानचे विनायक पाटील यांनी येथे केले आहे. पत्रकार परिषदेत विनायक पाटील म्हणाले की, लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदानाचा हक्क विनायक पाटील म्हणाले की, लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदानाचा हक्क ही फार महत्त्वाची बाब आहे. मतदानाच्या प्रक्रियेतून सरकारे बनतात व त्याच माध्यमातून विकासाच्या वाटा सामान्य माणसापर्यंत पोहचतात या विकासामध्ये नक्षलवाद्यांनी अडसर ठरू नये. नक्षलवाद्यांनी सामान्य जनतेला सन्मान देऊन त्यांचा सामाजिक दर्जा उंचविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.रक्तहीन क्रांती करून महात्मा गांधींनी हा देश स्वतंत्र केला. त्याच देशात सरकार व नक्षलवादी एकमेकांशी बंदुकीच्या माध्यमातून भांडतात हे बरोबर नाही, असे ते म्हणाले. आम्ही आपल्याला विरोध करण्यासाठी ही भूमिका घेत नाही. सरकारची बाजूही घेत नाही. त्यांचेही चुकते तरी आपण मतदानाला सहकार्य करून लोकशाहीचा सन्मान करावा, असे आवाहन त्यांनी नक्षलवाद्यांना केले. नक्षलवादी संघटनांनी यासाठी संपर्क साधावा, असेही आवाहन विनायकराव पाटील यांनी केले आहे. त्यांचा पत्ता- भारत विकास प्रतिष्ठान, कवठा, ता. उमरगा, जिल्हा-उस्मानाबाद, मोबाईल क्रमांक- ९४२११९५९९९ असा आहे.

अन्न व पुरवठा मंत्र्यावर गुन्हा दाखल
भंडारा, १५ एप्रिल / वार्ताहर

राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री रमेश बंग यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंेदवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी संभाजीराव सरकुंडे यांनी पत्रपरिषदेत दिली. भाजपच्या तक्रारीवरून रमेश बंग यांच्यावर गुन्हा नोंदविल्याचेही त्यांनी सांगितले. भंडारा व गोंदिया जिल्ह्य़ात दोन ठिकाणी रेशन दुकानदारांना बोलावून राष्ट्रवादीच्या उमेदवाराकरिता काम करण्याच्या सूचना बंग यांनी दिल्याची तक्रार भाजपने नोंदविली होती. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रचाराकरिता २१ उमेदवारांपैकी १५ उमेदवारांना भंडारा जिल्ह्य़ात २२७ तर गोंदिया जिल्ह्य़ात ३५ वाहनांना पास परवाने देण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे यांनी दिली.

पटेलांना समर्थन देण्याचे विणकर परिषदेचे आवाहन
भंडारा, १५ एप्रिल / वार्ताहर

विणकरांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता लोकसभेत आवाज उठवणाऱ्या भाजप उमेदवार शिशुपाल पटले यांनाच विणकरांनी समर्थन द्यावे, असे आवाहन विणकर विकास परिषदेचे मुख्य संयोजक श्याम दलाल यांनी केले आहे. पटले यांनी विणकरांचे नेतृत्व स्वीकारून आंदोलने केली व स्वत:ला अटक करवून घेतली होती. विणकरांचा प्रश्न सोडविण्याचा संकल्प पटले यांनी घेतला आहे. त्यामुळे विणकरांनीही त्यांना लोकसभेत पोहोचविण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही दलाल यांनी केले आहे. बिडी मजुरांना दरमहा १५०० रुपये पेन्शन मिळावी, याकरिता खासदार शिशुपाल पटले यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे महाराष्ट्र बिडी मजूर पेन्शनर्स संघटेचे अ‍ॅड. विलास माटे यांनी समर्थन घोषित केले आहे.

वाहने प्रशासनाने ताब्यात घेतल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली
चिखली, १५ एप्रिल / वार्ताहर

निवडणूक प्रक्रियेत राज्य परिवहनाच्या बसेससह खासगी जीप, टॅक्सी इत्यादी वाहने निवडणूक विभाग व पोलीस प्रशासनाने घेतल्यामुळे प्रवाशांची अडचण झाली असून वाहतूक व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. लोकसभेसाठी गुरूवारी मतदान होणार आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात २७० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. या मतदारसंघात दोन लक्ष २४ हजार ७९५ मतदार आहेत. मतदारांमध्ये पुरुष मतदारांचे प्रमाण महिला मतदारांपेक्षा केवळ आठ हजाराने अधिक आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी आजपासूनच राज्य परिवहन महामंडळाच्या २१ बसेस, ३१ जीपगाडी, दोन ट्रक व चार राखीव जीपगाडय़ांचा ताफा आहे. पोलीस प्रशासनानेही कायदा व सुव्यवस्थेसाठी डझनभरापेक्षा जास्त खासगी वाहने भाडय़ाने घेतली आहेत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सींना (काळी-पिवळी) देखील यात समावेश आहे. काही वाहने मंगळवारपासूनच घेण्यात आली आहेत. बसेस, खासगी वाहने व टॅक्सींची रस्त्यावरील संख्या रोडावली असल्याने प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. बस वाहतुकीच्या हजारो किलोमीटर प्रवासाला कात्री लागली आहे.

मुरमाडी येथे क्षार जलसंजीवनी अभियान
भंडारा, १५ एप्रिल / वार्ताहर

लाखनी ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने राष्ट्रीय माता बालक आरोग्य संवर्धन कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी मुरमाडी येथे जलशुष्कता प्रतिबंधक क्षार जलसंजीवनी अभियान नुकतेच पार पडले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे प्रमुख डॉ. महेंद्र कदम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर म्हणाल्या, यावेळी उन्हाळा जास्त कडक असल्याने त्याचा जास्त दुष्परिणाम लहान बालकांच्या आरोग्यावर होत आहे. दुष्काळसदृश्य स्थितीमुळे, पाणी टंचाईमुळे, दूषित पाण्यामुळे बालकांना हगवण-उलटीसारखे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे येणाऱ्या जलशुष्कतेवर क्षार जलसंजीवनी हा रामबाण उपाय आहे.

‘ब्रॉडबॅण्ड’ सेवा बंदचा फटका
भंडारा, १५ एप्रिल / वार्ताहर

मागील आठ दिवसांपासून जिल्ह्य़ातील ब्रॉडबॅण्ड सेवा बंद असल्यामुळे विविध कार्यालयातील महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. दूरध्वनी विभाग याकडे लक्ष देत नसल्यामुळे सर्वत्र असंतोष व्यक्त केला जात आहे. जिल्ह्य़ात २० हजारांच्यावर दूरध्वनी ग्राहक तर हजाराच्या वर ब्रॉड बॅण्ड सेवेचे ग्राहक असून त्यांची दूरध्वनी, इंटरनेट सेवा कोलमडली आहे. जिल्ह्य़ातील मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर तालुके इंटरनेटसेवा कुचकामी ठरल्यामुळे सर्वत्र या सेवेविरोधात बोटे मोडली जात आहेत. निवडणूक प्रक्रियेतील लोकांना तर कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. निवडणूक आयोगाच्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्य़ातील काही तालुक्यातील ब्रॉड बॅण्ड सेवा तर महिना भरापासून खंडित आहे.

निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा
रिसोड, १५ एप्रिल / वार्ताहर

अकोला लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक सुनील बाबू यांनी रिसोड पोलीस ठाण्यात बैठक घेऊन निवडणूक यंत्रणा व पोलीस बंदोस्ताचा आढावा घेतला. याप्रसंगी निवडणूक निरीक्षक संपर्क अधिकारी गाडे, रिसोड विधानसभेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पातूरकर पोलीस निरीक्षक परशुराम राठोड उपस्थित होते. तालुक्यातील व शहरातील संवदेनशील मतदान केंद्राबाबत निवडणूक निरीक्षकांनी यावेळी चर्चा केली. मतदारसंघात व्हिडीओ कॅमेऱ्यामार्फत सुद्धा निरीक्षक, आचारसंहिता पथके भ्रमण करीत असल्याचे सांगितले. संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलिसांच्या नियुक्ती व आदर्श आचारसंहिता नियोजनाबद्दल निवडणूक निरीक्षक सुनील बाबू यांनी समाधान व्यक्त केले. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे राठोड यांनी सांगितले.

नाभिक समाजाचा मेळावा
शेगाव, १५ एप्रिल / वार्ताहर

नाभिक बांधवांनी एकत्रित येऊन संघटित व्हावे तरच न्याय मिळेल, असे प्रतिपादन नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष भगवान बिडवे यांनी केले. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने वर्धमान भवनात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाभिक महामंडळाचे अध्यक्ष हनुमंतराव साळुंके होते. उद्घाटन वामन देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किसनराव अंकुरकर, सूर्यकांत ताडवे, शिवनाथ लिंगायत, बाळासाहेब अंबुरकर, गणेश अंबुरकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक किसनराव अंबुरकर यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष बिडबे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन यशवंत माळी यांनी केले तर आभार खारोडे यांनी मानले. याप्रसंगी गजानन वखरे, शरद पिंपळकर, शतल अंबुरकर, संतोष कलमकार, गोपाल पांडे, नंदु पारसकर, गणेश पिंपळकार आदी उपस्थित होते.