Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
विविध

मणिरत्नम रुग्णालयात; प्रकृतीत सुधारणा
चेन्नई, १५ एप्रिल/पीटीआय

प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांना छातीत वेदना व श्वास घेण्यात त्रास होऊ लागल्यामुळे काल रात्री येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ते पुन्हा काम करू शकतील, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. ‘रोजा’, ‘बॉम्बे’, ‘दिल से’, ‘गुरू’ यांसारखे दर्जेदार चित्रपट देणाऱ्या ५२ वर्षीय मणिरत्नम यांना यापूर्वी २००४ मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्या वेळी ते ‘युवा’ या चित्रपटाच्या निर्मितीत व्यग्र होते. सध्या ते ‘रावण’ या चित्रपटावर काम करीत असून त्यात अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय अणि विक्रम यांच्या भूमिका आहेत.

मंगळवारी सुहास जोशींच्या मुलाखतीचा कार्यक्रम
वनिता समाजची नवी कार्यकारिणी घोषीत
नवी दिल्ली, १५ एप्रिल/खास प्रतिनिधी
वसंत ऋतुचे आगमन आणि चैत्रगौरीचे हळदीकुंक यानिमित्त दिल्लीतील वनिता समाजाच्या वतीने येत्या मंगळवारी, २१ एप्रिल रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आभाळमाया, ऊनपाऊस, मानसी यासारख्या मालिकांच्या संवाद लेखिका शोभा बेंद्रे त्यांच्याशी संवाद साधतील. हा कार्यक्रम १३, इन्स्टिटय़ूशन एरिया, लोधी रोड, नवी दिल्ली येथील संस्थेच्या सभागृहात दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

महिला मतदारांना मंगळसूत्रांचे
वाटप करण्याची भाजपची योजना!
अहमदाबाद, १५ एप्रिल/पीटीआय
मतदारांना भुलविण्यासाठी राजकीय पक्ष कोणत्या थराला जातील हे सांगता येणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर गुजरातमध्ये महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना कमळ हे भाजपचे निवडणूक चिन्ह मुद्रांकित केलेल्या पेंडंटसहित मंगळसूत्रांचे वाटप करण्याचा गुजरात भाजपचा विचार आहे. भाजपची ही कृती म्हणजे भारतीय संस्कृतीचा घोर अपमान करणारी असल्याची टीका काँग्रेसने केली.

अण्वस्त्रवाहू ‘पृथ्वी - २’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
बालासोर, १५ एप्रिल/पीटीआय.

जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या पृथ्वी क्षेपणास्त्राच्या सुधारित आवृत्तीची, पृथ्वी-२ ची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ३५० कि.मी.चा पल्ला असणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रांचाही मारा करू शकते हे विशेष उल्लेखनीय आहे.

‘स्वात’मध्ये शरियत कायदा लागू करण्याचा निर्णय अमेरिकेला नापसंत
वॉशिंग्टन, १५ एप्रिल/पीटीआय

स्वात खोऱ्यामध्ये शरियतचा कायदा लागू करण्याचा पाकिस्तानने घेतलेला निर्णय मानवी हक्कांची गळचेपी करणारा असल्याची टीका अमेरिकेने केली. याआधी शरियत कायदा लागू करण्यासंदर्भात पाकिस्तान सरकार व तालिबानी दहशतवाद्यांमध्ये झालेल्या कराराबद्दलही अमेरिकेने तीव्र नापसंती व्यक्त केली होती.

मुंबई हल्ल्यातील पाचवा संशयित भारताच्या ताब्यात देण्यास पाकचा नकार
इस्लामाबाद, १५ एप्रिल/ पीटीआय

मुंबईवर गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानने अटक केलेला पाचवा संशयित आरोपी शाहिद जमिल रियाझ याला चौकशीसाठी पाकिस्तान भारताच्या ताब्यात देणार नाही अशी माहिती राजनैतिक सूत्रांनी दिली आहे.

पक्षनिष्ठा व द्रमुकचे ‘मंगळसूत्र’
चेन्नई : पती-पत्नीमधील पवित्र नात्याचे प्रतिक म्हणून मंगळसूत्राचे महत्व असले तरी द्रमुक पक्षाच्या एका कार्यकर्त्यांच्या घरात मात्र मंगळसूत्राचा बंध हा त्या पक्षावर असलेल्या अविचल निष्ठेशी जोडला गेला आहे. तामिळनाडूमधील वृद्दाचलम नजिकच्या एम पट्टी या गावामध्ये सुब्रमननियन या द्रमुक कार्यकर्त्यांने आपल्या पक्षाचे उगवता सूर्य हे निवडणूक चिन्ह कोरलेले मंगळसूत्र आपल्या लग्नात (१९५७ साली) पत्नीसाठी बनवून घेतले होते. तामिळी भाषेत मंगळसूत्राला ‘थाली’ म्हणतात. ७४ वर्षे वयाचे सुब्रमननियन यांच्या पुढील तीन पिढय़ांतील नवरेदेवांनीही आपल्या पत्नीला अशा प्रकारचेच मंगळसूत्र देण्याची परंपरा कायम राखली आहे. सुब्रमननियन यांच्या तयार केलेल्या मंगळसूत्राचे अनुकरण एम पट्टी गावातील अन्य काही लोकांनीही केले व आपल्या पत्नीला द्रमुक पक्षाचे ‘उगवता सूर्य’ हे निवडणूक चिन्ह कोरलेले मंगळसूत्र भेट दिले आहे.