Leading International Marathi News Daily
शुक्रवार, १७ एप्रिल २००९

चार राज्यांमध्ये नक्षलवाद्यांचे थैमान
निवडणूक अधिकाऱ्यांसह १८ ठार
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यास हिंसाचाराचे गालबोट

रांची, १६ एप्रिल/ पीटीआय
लोकसभा निवडणूक उधळून लावण्याच्या हेतूने माओवाद्यांनी आज पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान बिहार, झारखंड, छत्तीसगड, आणि ओरिसा या चार राज्यांमध्ये धुमाकूळ घालून १८ जणांना ठार मारले. त्यात पाच निवडणूक अधिकारी आणि दहा सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. छत्तीसगढ राज्यातील राजनंदगाव येथे निवडणूक अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे वाहनच त्यांनी उडवून दिले. त्यात पाच जण ठार झाले आणि दोन जण जखमी झाले.

अ‍ॅड. अब्बास काझमी कसाबचे नवे वकील
मुंबई, १६ एप्रिल / प्रतिनिधी

पाकिस्तानी वकील हवा ही दहशतवादी अजमल अमीर कसाब याची मागणी फेटाळून लावत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. ताहिलियानी यांनी आज अ‍ॅड. अब्बास काझमी यांची त्याचे वकील म्हणून नियुक्ती केली. उद्यापासून खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरूवात होणार असल्याचेही न्यायालयाने जाहीर केले. अ‍ॅड. काझमी यांनी १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील ३०हून अधिक आरोपींचे वकीलपत्र घेतले होते. अ‍ॅड. वाघमारे यांची नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर न्यायालयाने प्रकरणातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यामार्फत सत्र न्यायालयाच्या बार कौन्सिलच्या पॅनलवर नसलेल्या वकिलांना कसाबचे वकीलपत्र घेण्यास पुढे येण्याचे आवाहन केले होते.

बसपाला साथ ‘गजगामिनी’ची!
कीर्तिकुमार शिंदे, मुंबई, १६ एप्रिल

लोकसभा निवडणुकीसाठी बॉलीवूडमधल्या सिताऱ्यांना प्रचाराच्या रिंगणात उतरविणाऱ्या राजकीय पक्षांच्या यादीत आता मायावतींचा बहुजन समाज पक्षही सामील झाला आहे. पक्षाचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डी. एस. कुलकर्णी यांच्या प्रचारासाठी ‘गजगामिनी’फेम माधुरी दीक्षित येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. खुद्द डी. एस. कुलकर्णी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध डीएसके बिल्डर्सचे सर्वेसर्वा डी. एस. कुलकर्णी त्यांना बसपाने लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यापासून चर्चेत आहेत. चार लाखांहून अधिक ब्राह्मण मतदार असलेल्या पुणे मतदारसंघात आता डीएसकेंमुळे ‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’चा नारा घुमू लागला आहे. कुलकर्णीही त्यांच्या प्रचारसभांची सुरुवात ‘जय भीम’चा नारा देऊन करीत असल्यामुळे दलित- बहुजन मतदारांमध्ये त्यांच्याविषयी उत्सुकतेचे वातावरण आहे. त्यातच त्यांच्या प्रचारासाठी आता माधुरी दीक्षित येणार असल्यामुळे बसपाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे उधाण आले आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यात ५४ टक्के मतदान
पहिल्या टप्प्यातील निकालाबाबत
काँग्रेस व राष्ट्रवादी आशावादी
मुंबई, १६ एप्रिल / खास प्रतिनिधी

राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघांमध्ये सरासरी ५४ टक्के मतदान झाले. गतवेळच्या तुलनेत कमी मतदान झाले असले तरी काँग्रेस व राष्ट्रवादी चांगल्या यशाबाबत आशावादी आहेत. कमी मतदानाचा फटका नेहमी विरोधी पक्षाला बसतो, असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी चांगल्या जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही काँग्रेसला विदर्भात चांगले यश मिळेल, असा दावा केला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे मतदानावर परिणाम झाल्याचे मानण्यात येत आहे. कमी मतदानाचा फटका नेहमी सत्ताधारी आघाडीला बसतो, असे राजकीय वर्तुळात मानले जाते. अगदी गेल्या वर्षी ठाणे लोकसभा पोटनिवडणुकीत कमी मतदान होऊनही शिवसेनेचा उमेदवार जवळपास लाखाने विजयी झाला होता याकडे शिवसेनेचे नेते लक्ष वेधीत आहेत.

देशात पहिल्या टप्प्यात सरासरी
५८ ते ६२ टक्के मतदान
नवी दिल्ली, १६ एप्रिल/खास प्रतिनिधी

पंधराव्या लोकसभेसाठी आज १५ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये १२४ जागांवर झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानात नक्षलग्रस्त भागांमधील उग्र िहसाचाराचा अपवाद वगळता शांततेत पार पडले. पहिल्या टप्प्यात सरासरी ५८ ते ६२ टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने आज सायंकाळी व्यक्त केला. आज सायंकाळी निवडणूक आयोगाचे उपायुक्त आर. बालकृष्णन यांनी ही माहिती दिली. १४ कोटी ३० लाख मतदार असलेल्या आजच्या पहिल्या टप्प्यात मतदान सर्वसामान्यपणे शांततेत पार पडल्याबद्दल आयोगाच्या वतीने त्यांनी समाधान व्यक्त केले. रखरखत्या उन्हामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता असून निवडणूक आयोगाकडे पोहोचलेल्या प्राथमिक माहितीनुसार बिहारमध्ये १३ लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरी ४३ टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मतदानाचा मान लक्षद्वीपने पटकाविला. येथे ८६ टक्के मतदान झाले आहे. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील १६ जागांसाठी आज ४८ ते ५० टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. नक्षलग्रस्त झारखंडमध्ये ५० टक्के मतदान झाले, तर छत्तीसगढमध्ये सर्व ११ जागांसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी सरासरी ५१ टक्के ठरली आहे. केरळमध्ये आज सर्व २० जागांसाठी सरासरी ६० टक्के मतदान झाले. आंध्र प्रदेशातील विधानसभेच्या १५४ आणि लोकसभेच्या २२ जागांसाठी अंदाजे ६५ टक्के मतदान झाल्याचे बालकृष्णन यांनी सांगितले.

विदर्भात शांततेत सरासरी ५५ टक्के मतदान
नागपूर, १६ एप्रिल/ प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्य़ात धानोऱ्याजवळ नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात झालेली चकमक आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील सोनेरांगीतील गावकऱ्यांनी तलावाच्या मागणीसाठी तर, चंद्रपूर जिल्ह्य़ात १० गावातील मतदारांनी मूलभूत सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी मतदानावर टाकलेल्या बहिष्काराचा अपवाद वगळता आज विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान झाले. वाढत्या उन्हाचा फटका मतदानावर झाल्याचा दावा सर्व प्रमुख उमेदवारांनी केला असून प्राथमिक माहितीनुसार विदर्भात सरासरी ५५ टक्के मतदान झाले, असा अंदाज आहे. मतदानादरम्यान पोलीस बंदोबस्त चोख होता. मतदारयादीत नाव नसणे, ओळखपत्र नसल्याने मतदान करण्यास मनाई करणे व त्यातून निवडणूक कर्मचाऱ्यांशी वाद होण्याच्या घटना सर्वच ठिकाणी घडल्या. काही ठिकाणी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर, काही ठिकाणी सरासरी मतदान झाल्याची नोंद आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज सकाळी नागपूर येथील भाऊजी दप्तरी हायस्कूल या केंद्रावर पदभार स्वीकारल्यावर प्रथमच मतदान केले. नागपूरसह विदर्भात इतरही ठिकाणी सकाळी केंद्रावर रांगा होत्या. दुपारी महिलांची गर्दी होती आणि सायंकाळी पुन्हा केंद्रावर गर्दी झाली. ग्रामीण भागात शहराच्या तुलनेने मतदानासाठी उत्साह कमी होता. विदर्भात सर्वच मतदारसंघात तिरंगी लढत असून नागपूर, भंडारा-गोंदिया, बुलढाणा या मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी