Leading International Marathi News Daily
रविवार, १९ एप्रिल २००९

भिकू आणि आकणी हे नवरा बायको रूढी-परंपरेला परिस्थितीमुळं भोकरासारखी चिकटलेली, तर रूढी-परंपराही त्यास्नी जळूसारखी चिकटलेली. तापून कडक झाल्याली टिमकी भिकू वाजवू लागला. बाशिंग वाजत खोताच्या वाडय़ावर निघालं. बाशिंग वाजत आलं, तशी लगीनघरात एकच घाई-गडबड उडाली. मांडवातला कुणीतरी कारभारी माणसानं घरातल्या बायका-माणसास्नी हाळी दिली.
‘‘अय, बाशिंग आणलया बघा!’’ मग सगळ्या मांडवात अन् लगीनघरातल्या गोंधळात आणखीनच भर पडली. बायकांची धांदल उडाली. भिकू चव्हाण मांडवात कसनुसा चेहरा घेऊन दीनवाणी उभारलेला. त्याचं लेकरू दिलप्या आशाळभूत नजरेनं सगळ्या मांडवभर बघू लागलं. आकणी मात्र अगतिकतेनं कुंकवाचं करंडं घेऊन बाशिंग पुजायला येणाऱ्या बायकास्नी निरखीत होती.
मांडवातल्या वातावरणातली उदासीनता बघून आकणीचं पातळाचं स्वप्न मनातच विरघळलं होतं. तिचा उत्साह मावळला
 

होता. तरीही उगं उगं जणू आपल्याच घरचं लग्न हे अशा थाटात हसऱ्या तोंडानं वावरत ती उत्साह दाखवत होती. भिकूचीही अवस्था काहीशी अशीच झाली होती.
बाशिंग जोत्याच्या कट्टय़ावर ठेवलं. बायका हळदी-कुंकू लावून बाशिंग पुजू लागल्या. प्रत्येक बाईच्या तोंडाकडं बघून आकणी गालातल्या गालात बळंबळं हासल्यागत करत होती. लग्नाचा आपल्यालाही किती आनंद झालाय, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होती. पण तिच्या डोळ्यांसमोर उन्हातान्हात गुरागत राबणारा आपला नवरा आणि कवळ्या वयात रात-दिन त्याला मदत करणारं पोरगं पोटभर लाडू-चिवडा खात बसलेली दिसत होती.
बायका बाशिंग पूजत नावं घेत होत्या. एकमेकीला नाव घ्यायचा आग्रह करीत होत्या. चेष्टामस्करी अन् हास्याला उधाण आलं होतं.
आकणीनं संगं आणलेलं साळुतं वरमायकडं दिलं.
आंब्याच्या पानांचं तोराण भिकू चौकटीला बांधू लागला. दिलीपनं मांडवातल्या बापय माणसांच्याकडं आंब्याचं ढाळं दिलं. कर्तीसवरती माणसं मांडवाला मोठय़ा हिरीरीनं आंब्याचं ढाळं बांधू लागली. कुणी टाचा वर करून, कुणी पायाखाली काय घावंल ते घेऊन, तर कुणी एखादं बारकं पोरगं खांद्यावर घेऊन.
बाशिंग पुजून झाल्यावर भिकूनं लागल्या हातानंच त्यातलं एक बाशिंग मोळं ठोकून चौकटीला बांधलं. आत जाऊन एक देव्हाऱ्याला बांधलं.
मांडवात तोवर टोप, उलथान, जग, पेलं, वगराळ ही जेवणाची भांडी आली. मग तर जास्तच कालवा उठला.
भिकूचं काम झालं होतं, पण तो तिथंच घुटमळू लागला. कारण आपल्याकडं कुणीतरी बघावं, मानपान करून फराळाचं काय तरी वटय़ात घालून आपल्याला वाटंला लावावं म्हणून.
मांडवात लगीनघाई चालली होती. सगळ्यांची पळापळ दिसत होती. कुणी पाणी भरायला, भटय़ारं, चौरंग आणायला, तर कुणी द्रोण-पत्रावळी आणायला पळत होतं. काही काही जण नुसतीच कावाकाव करून फोरमनकी करीत होतं. कुणाचंच लक्ष भिकू चव्हाणाकडं नव्हतं.
या सगळ्या धांदलीत कुणीतरी विनाकारण आपल्यावर खॅस करायला नको म्हणून भिकू आपल्या बायको-पोरासकट ताटकळत कुसवाकडंच्या पेंडंच्या तोंडाला उभा राहिला होता.
वरबाप-वरमाय भावकीत तांदूळ द्यायला म्हणून नटूनथटून वाडय़ातनं बाहेर पडलेली बघून आकणीला वाटलं, त्यास्नी म्हणावं का, की आमास्नी वाढतासा का? आमी जातू!.. पण उगंच आनिक आडवं पडल्यागत हुयाचं, म्हणून ती मूग गिळून गप बसली.
आसली कसली लगीनघाई म्हणायची? वरबाप- वरमायनं आपली दखल घेतली न्हाय. आता दुसरं कोण आपल्याकडं बघणार? आता दत्तू खोताचंच आपल्याकडं कवा ध्यान जातंय कुणास ठावं! या विचारात उशिरापर्यंत ताटकळत उभा राहिलेला भिकू गुडघ्याचं मेटं मोडून पायाच्या चंप्यावर बसला. कंटाळून गेलेल्या दिलीपला थंड वाजून आल्यागत झालं होतं. तो आता चांगलाच झिटाळल्याला होता. तरीही काहीच कुरकुर न करता काटकीनं भुईची माती टोकरत बुड टेकून सप्पय बसला होता. आकणी मात्र आजून उभीच होती.
‘तिन्हीसांचं माणसाला राग येतो. कुणाचा तरी काव खायला नगो..’ या विचारानं दोन वेळा घराच्या उंबऱ्यापातूर गेलेली आकणी काहीच न बोलता मागं फिरली होती. तिला काही बोलायचं धाडसच झालं नव्हतं.
आता मात्र आकणीला दम निघेना. ‘कोण काय म्हणायचं त्ये म्हणू दे. शिव्या का देईनात- अंगाला काय भोकं पडत न्हायती!’ या विचारानं पुन्हा मन घट्ट करून ती तिसऱ्यांदा उंबऱ्यापाशी गेली. ‘आय-माय’ म्हणून कुणाला तरी ती हाक मारणार, इतक्यात देवाला गेल्याला नवरा मुलगा, कुरवल्या, कुरवलं आन् माणसांची गर्दी वाडय़ात घुसली. तशी आकणी पुन्हा माघारी फिरली. ते बघून भिकूलाही वाटायला लागलं- ‘आता राहू दे फराळाचं. उगं कुणाचा तरी काव खायला नगो. चार माणसात पानउतारा होऊन तमाशा व्हायला नगो.’
भिकूनं आपला विचार आकणीला बोलून दाखवला. पण आकणी तिथनं हालायला तयार नव्हती. तिला रात्रीच्या जेवणाचा प्रश्न पडला होता. रात्री पोटाला काय खायचं? उतरंडीच्या गाडग्या-मडक्यातलं किडूकमिडूक सारं पाक संपलं होतं. येऊन-जाऊन दोन वेळचं मुटकं होतील इतकाच वलिवलेल्या गव्हाच्या सोजीचा बारीक कोंडा तळातल्या मडक्यात काय तो शिल्लक होता.
बायकोला माघारी फिरलेली बघून भिकूनं तिला विचारलं-
‘‘काय झालं गं?’’
‘‘आवं कुणाचं ध्यानच न्हाय. आपल्याच धांदलीत दिसत्याती. त्यात ही लायट एक जापानलीया. आजून त्यांचा बत्त्याच पेटवायचा सरंजाम आवरंना झालाया. जरा दम धरल्याला बरा!’’
‘‘लायटीची तर कायम बॉम्बच हाया. हये बघ, न्हाय तर राहुदेच आता! नाद सोडूया! इदुळावक्ती घरात लक्ष्मी येती. न्हाय ती वाढायची आपल्यास्नी!’’
‘‘आवं, आसं कसं? मांगाचा मान करायचा ऱ्हातेली व्हय कुणी? त्येच्याबरोबर फराळाचंबी वाईच कायतरी देतीलीच की!’’
‘‘छॅ! आयला! तुला बघ दांडगी आशा!’’ तो वैतागून म्हणाला.
‘‘मंग रातीला काय खायाचं?’’
‘‘कर माडगं!’’
‘‘जाऊन लोटक्यात बघा. उडदाचा पार सपारा झालाया. मूठ-पसा हुलगं ठेवलंवतं, त्येच परवादिशी खाल्यालं म्हायती हाया नव्हं?’’
‘‘मंग उंडं कर! बाजरी तर हाया नव्हं?’’
‘‘त्ये कशाबर खायाचं? गुळवणीला गूळ नगं?’’
‘‘बायकांच्या जातीला कितीबी आणून द्या, पुरवून चालवायचं जमतंच न्हाया.’’
आकणी गप्प बसली. ती मनात म्हणत होती- ‘कसं पुरवायचं-उरवायचं आसतं त्ये बायकांच्या जलमाला गेल्याबिगार न्हाय समजायचं.’
‘‘मंग शेंगुळी करतीस?’’ पुन्हा एक वेळच्या जेवणाचं गणित भिकू मांडत होता. त्यावर आकणी समजुतीच्या सुरात म्हणाली,
‘‘आवं, मला परपंचातलं कळत न्हाय का? इठ्ठलआण्णाची बाळुताई नुस्तं पीठ दितू म्हणलीया. म्हणून म्या तुमास्नी म्हणलीवती. आजून कवा तिनं दिलंया?’’
विठ्ठल आण्णाच्यात सारवान काढायला म्हणून आकणी गेली होती. त्यावेळी त्याची सून कशाला तरी भिजीवल्याल्या तुरी भरडत होती. त्येचं चाळून निघंल त्ये पीठ ती आकणीला देतो म्हणाली होती.
सगळं सुचवून झाल्यावर भिकू उदासवाणी हाताचा मुटका गालाला लावून नीट समोर मांडवात बघत बसला. त्याचा पडलेला चेहरा बघून आकणीला कींव आली. कामा-कामानं घाईला आलेल्या अन् उपासमार होत असलेल्या आपल्या नवऱ्याची दशा बघून तिच्या डोळ्यांत टचकन् पाणी आलं. नकळत पदरानं तिनं ते पुसून घेतलं अन् नवऱ्याला म्हणाली-
‘‘वाईच जुंधळ्याचं पीठ ठेवती आंबत. त्येची पिऊ सकाळच्या पारी आंबील. रातीचाच प्रश्न हाया. लेकरू काय तरी गुळमाट मागतंया. म्हणून हात पसरून भीक मागायची हाया!’’
पोटच्या गोळ्यासाठी आईचं काळीज वड घेत होतं.
भिकू-आकणीचा कुसवाकडंला एक वेळच्या भुकेचा प्रश्न कसा मिटेल, हा विचार चालू होता, तर मांडवात कारभारी माणसांच्यात वरातीला मुरळ्या आणायच्या की मोरांगी नाचवायच्या, यावरून गोडधोड खाऊन भरल्या पोटानं हासत-खिदळत गप्पा चालल्या होत्या.
‘‘म्याच बघतो मागून. बस हिथंच दिलपाजवळ,’’ आसं म्हणून भिकू उठून मांडवात गेला.
आकणी दिलीपजवळ हातात फाटक्या पातळाचा धडपा अन् जर्मलचा तांब्या घेऊन बसली. दिलीप वैतागून गेला होता. तो तसाच काखंला टिमकी मारून, अंगाचा मुटका करून घुगून बसला होता.
भिकू खोताजवळ गेला. खोत समोरच्या माणसांच्याबरोबर बाण्या मारत उभा होता. त्याच्या गोष्टी आत्ता संपतील, मग संपतील म्हणून भिकू अपराधी भावनेनं त्याच्यासमोर ताटकळत उभा होता.
मांडवात आता बत्त्या लागल्या होत्या. मानपान अन् फराळाच्या वडीनं थांबलेला भिकू चव्हाण कंटाळून गेला होता. शेवटी धाडस करून विनवणीच्या सुरात तो दत्तू खोताला हात जोडत कळवळून म्हणाला-
‘‘मालक! मांगाला वाढतायसा नव्हं काय तरी?’’
अंगावरती एकदम पाल पडल्यासारखा खोत चपापला अन् पडलेली पाल झटकावी तसा हसल्यागत करून गडबडीनं म्हणाला-
‘‘आँ ऽऽ त्येच्या आयला राह्य़लंच बघा! बस त्या तिकडं. हो एका बाजूला!’’ तसा भिकू पुन्हा आकणीजवळ जाऊन बसला. त्यानं खोताकडं नजर टाकली. तर खोत पुन्हा पहिल्यासारखा आपल्याच नादात आहेरावरून चाललेल्या गप्पांत दंग झाला होता.
काही वेळानं आकणीच भिकूला म्हणाली-
‘‘म्या एकदा इचारून बघती!’’
आकणी खोताजवळ गेली अन् गयावया करत म्हणाली-
‘‘दादा वाढतायसा नव्हं काय तरी आमास्नी?’’ तसा दत्तू खोत भानावर आला. पण तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत तो घरात गेला अन् आपल्या बायकोसोबत टॉवेल, टोपी, झंपर-पीस अन् नारळ घेऊन बाहेर आला.
आकणीचं मन हारकलं. भिकू-दिलीप जाग्यावरनं उठून अपराध्यागत आकणीच्या मागं येऊन उभा राह्य़ली.
‘‘हं भिकू! ये बरं पुढं!’’ असं म्हणून दत्तू खोतानं भिकूच्या हातात घाईगडबडीनं टॉवेल, टोपी, झंपर-पीस अन् नारळ ठेवला. हे बघून दत्तू खोताला त्येच्या भावकीतल्याच एकानं टोमणा मारला.
‘‘ही आनिक स्वाँग काय म्हणायचं? नवऱ्या मुलाच्या आत्तीलाच न्हायवी बाशिंग आणायला सांगायचं? तशी मोठी माणसं म्हणा हं तुम्ही!’’
त्या बोलण्याकडं दुर्लक्ष करून ती झिट दत्तू खोतानं भिकू चव्हाणावर काढली. तो भिकूला म्हणाला-
‘‘बरं! झालं नव्हं आता? हाला आता चटक्यात!’’ हे ऐकून भिकूच्या मनाला हजार इंगळ्या डसल्या. रीतीभातीचं आता पहिल्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. जणू उपकाराचंच बोलणं होतं. त्यातूनही न्याट धरून आकणी म्हणाली-
‘‘काय फराळाचं गॉडध्वॉड वाढतायसा नव्हं?’’
‘‘हये बघा. वाढलं आसतं खरं, आता समदी गडबडीत हायती!’’
तो तर भिकूला मोकळाच दिसत होता.
‘‘हाला, आता सकाळच्याला तांदळालाच या! हे बघ भिकू, तांदूळ चुकवायचं न्हायती. तांदूळ पडल्यावर जेवूनच जायाचं! काय? ऐकतुयास नव्हं?’’
भिकूनं दिलीपकडं नजर टाकली. दिलीप खाली मान घालून सारं निमूटपणे सहन करीत उभा होता. भिकूच दत्तू खोताला अजिजीनं म्हणाला- ‘‘आवं पर, आज राच्चं पोटाला काय?’’ चुकून तोंडातनं गेलेलं भिकूचं वाक्य र्अधच राहिलं अन् एखादा चवताळलेला बोका जसा फिस्कारून अंगावरती यावा तसा खोत खेकसला-
‘‘रोज राच्चं काय उपाशीच ऱ्हाता काय रं? काय लेका मर्दानू?’’
‘‘लेकरासाठी तरी थोडकं काय तरी वाढा की!’’ त्यातूनही आकणीनं जिकिरी केलीच. तशी दत्तू खोताची बायको रॉकेलची चिमणी भडकावी तशी भडाकली. म्हटली- ‘‘जमल्याला पै-पावन्यांत काय म्हणून आमची घालीवताय? काय म्हणून ह्य़ो तमाशा करायला लागलायसा? एकदा सांगीतल्याव कळत न्हाय? का छप्पनदाव सांगायलाच पायजेल? कोण मोकळं न्हाय तुमास्नी वाढायला. समदी आपआपल्या कामात्नी हायती!’’
भिकू-आकणीचा खार्रदिशी चेहरा पडला. खाली माना घालून तिथंच ती रोवलेल्या खुंटय़ासारखी उभी होती. रागरंग बघून दिलीपच आकणीच्या पदराला हलकासा हिसका देत म्हणाला, ‘‘राहूं दे आयवं! जावया आपल्या घरला.’’
‘‘आरं, एका बाजूला तरी व्हा की मेल्यांनो! पावणंरावळं येतेती- जातेती नव्हं? काय म्हणून वाटंत उभं राहिलायसा?’’ खोताची बायको पुन्हा खेकसली.
भिकू चव्हाण बायको-पोरासकट कुसवाकडंला गेला. दिलीप आता कळ काढायला तयार नव्हता. तो सारखा घायकुतीला आल्यागत करत होता. तो आकणीला म्हणाला, ‘‘आयव! छल की घरला!’’
‘‘आरं दिलपा बाळा, आमी नवरा-बायकू काय उपाशी ऱ्हाव रं! पर चार दिस झालं- तुझ्या तरी पोटाला सवनी हाय का ह्य़ा आसल्या आजारपणात तरी?’’ आकणी पोराची समजूत काढत म्हणाली.
‘‘नसू दे, उपाशी मरू, पर ह्य़ा आसल्या डुकरांच्यापुढं कशाला उगंच हात पसारतीयास?’’ आसं दिलीप म्हणताच आकणीनं त्येचं तोंड एकदम दाबून धरत इकडं-तिकडं कुणी ऐकतंय का, त्ये बघून दिलीपला काळजीच्या सुरात म्हणाली, ‘‘आरं, आसं म्हणू नै बाळा. जरा दम धरलास म्हणून काय बिघडंल?’’
‘‘तुमचं तुमी दम धरा, मला थंड वाजून आल्यागत झालीया!’’
भिकूनं पोराच्या कपाळाला हात लावून बघितला. साधारण ताप जाणवताच तो आकणीला म्हणाला, ‘‘पोराला ताप भराया लागलाया. त्ये राहूं दे तिकडं समदं! त्ये फडकं, तांब्या घी आन् छल पैलं वाटंला लागुया. काय एका दिसानं उपाशी मरत न्हाया!’
भिकू निर्वाणीचं बोलल्यावर आकणीचा नाइलाज झाला.
वाईट तोंडानं भिकू चव्हाणाचं बिऱ्हाड घराच्या वाटंला लागलं. पोटातल्या भुकेच्या आगीनं टिमकीच्या तालावर बाशिंग वाजवत आनंदानं नाचत आलेलं पाय दु:खीकष्टी होऊन, जड अंत:करणानं खुरडत खुरडत आल्यापावली परत चाललं होतं.
हिंमत पाटील