Leading International Marathi News Daily
रविवार, १९ एप्रिल २००९

असं म्हटलं जातं की, हिंदी चित्रपटांमध्ये पाश्र्वगायक आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रातले गायक जेव्हा एकत्र गातात, तेव्हा बाजी मारणारे भीमसेन जोशी किंवा अमीरखाँ नसतात, तर रफी वा मन्ना डे असतात.
गंमतीचा भाग सोडून देऊ, पण पडद्यावरच्या प्रसंगासाठी गाताना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या बुजुर्ग गायकांना अनेकदा ‘पडती’ भूमिका स्वीकारावी लागलेली आहे. आणि म्हणूनच की काय, चित्रपट संगीत व शास्त्रीय संगीत यांच्यातली अदृश्य दरी जास्तच रुंदावत गेली. ‘बसंत बहार’मधल्या ‘केतकी गुलाब जूही’ या जुगलबंदीसाठी शंकर-जयकिशन यांनी भीमसेन जोशींना मन्ना डे यांच्याकडून मात खायला लावली. ‘रानी रूपमती’मधल्या ‘बाट चलत नयी चुनरी
 

रंग डारी’ या गाण्यातही रफीसोबत गाणाऱ्या कृष्णराव चोणकर या मातब्बर गायकाचीही हीच गत झाली आणि सी. रामचंद्र यांचं संगीत असलेल्या ‘सरगम’मधल्या ‘तिनक तिन तानी’ या गाण्यात लताचा आवाज नायिका रेहाना हिला आणि सरस्वती राणे यांचा स्वर विनोदी भूमिकेतल्या दुय्यम नटीला देण्याचा प्रकार घडला.
‘बसंत बहार’च्या गाण्यात भीमसेनना हरवायच्या नुसत्या कल्पनेनंच (पंडितजींपेक्षा दोन वर्षांनी ज्येष्ठ असलेल्या) मन्ना डे यांची घाबरगुंडी उडाली होती. पण त्यांनी तो प्रसंग निभावून नेला आणि भीमसेनजींनीदेखील पडद्यावरची ‘हार’ खिलाडूपणे स्वीकारली. पण त्याआधी आलेल्या ‘बैजू बावरा’मधला प्रकार वेगळा होता. तिथं बैजू आणि तानसेन यांच्या जुगलबंदीसाठी पाचारण केलेले दोन्ही गायक शास्त्रीय संगीतातलेच होते. (या गाण्याच्या रेकॉर्डिगच्या वेळी घेतलेल्या या छायाचित्रात सर्वात डावीकडे दिसताहेत संगीतकार नौशाद. त्यांच्यासमवेत मध्यभागी आहेत प. द. वि. पलुस्कर आणि सर्वात उजवीकडे दिसताहेत उस्ताद अमीरखाँ.)
‘प्रकाश पिक्चर्स’ची बुडती नौका वाचविण्यासाठी निर्माते विजय भट्ट यांना हा चित्रपट काढण्याची कल्पना सुचविली ती नौशाद यांनीच. चित्रपटाचा निर्मितीखर्च कमी ठेवायचा असेल तर नर्गिस आणि दिलीपकुमार या स्टार जोडीऐवजी मीनाकुमारी आणि भारतभूषण यांना घ्यावं, हा सल्लाही नौशाद यांनीच दिला. बैजनाथ झालेल्या भारतभूषणला रफीचा, तर तानसेन बनलेल्या सुरेंद्रला उस्ताद अमीरखाँ यांचा आवाज देण्याची कल्पकताही त्यांचीच. (आमचा सुरेंद्र एवढा चांगला गायक असताना त्याला दुसऱ्याचा प्लेबॅक देऊ नका, अशी काही कळकळीची, तर काही धमकीवजा पत्रं नौशादना आली होती!) गाडं अडलं ते क्लायमॅक्सला येणाऱ्या तानसेन व बैजू यांच्या जुगलबंदीच्या वेळी. अकबरासमोर सादर होणाऱ्या या जुगलबंदीच्या प्रसंगासाठी रफी आणि अमीरखाँ हा सामना नौशादना योग्य वाटत नव्हता. इथं अमीरखाँसोबत तेवढय़ाच तोलामोलाचा गायक हवा, हा त्यांचा आग्रह होता. पहिल्यांदा त्यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांना विचारलं, पण उस्तादजींनी साफ नकार दिला. (पुढे ‘मुगल-ए-आझम’साठी याच नौशादकडे एका गाण्याचे वट्ट पंचवीस हजार रुपये कबूल करून घेऊन खाँसाहेब दोन गाणी गायले, तो भाग वेगळा!) मग विचार झाला तो पाकिस्तानातल्या छोटे गुलाम अली खाँ यांचा. पण तिथंही बात कुछ जमी नहीं. याच काळात ए. एम. व्ही. कंपनीतल्या जी. एन. जोशी यांनी नौशादना द. वि. पलुस्कर यांचं नाव सुचवलं. पं. नारायणराव व्यास यांचे शिष्योत्तम असलेल्या पलुस्करांचं गाणं ऐकून नौशादजींनी लगेचच त्यांची निवड केली. अमीरखाँ साहेबांनी तोवर तानसेनसाठी काही सोलो गाणी रेकॉर्ड केली होती. मनस्वी स्वभावाच्या अमीरखाँ यांना त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या गायकाकडून ‘हरायला’ कसं सांगायचं? ‘मी खूण करताक्षणी तुम्ही गायचं थांबवा,’ असं नौशादनी उस्तादजींना सांगून ठेवलं. तोडी आणि देस या दोन रागांमध्ये गुंफलेली ‘आज गावत मन मेरो झूमके’ ही रचना दोघांनीही तयारीनं गायली. गाणं विलंबितातून द्रुत लयीत जातं. दोघांच्या ताना टिपेला गेल्यावर तानसेनच्या तानपुऱ्याची तार तुटते आणि तो हरतो, असा तो प्रसंग होता. त्या विशिष्ट टप्प्यावर गाणं येताच नौशादनी अमीरखाँ यांना खूण केली. उस्तादजी गायचे थांबले. एक अजरामर जुगलबंदी साकार झाली. पडद्यावर आणताना दिग्दर्शकानंही त्या गाण्याचं सोनं केलं.
सुनील देशपांडे
sunildeshpa@yahoo.co.in