Leading International Marathi News Daily
रविवार, १९ एप्रिल २००९

खांडेकर ‘मास्तरां’चा राग!
राजीव खांडेकर ‘मास्तर’ प्रेक्षकांवर खरोखरच अतिशय रागावलेले दिसतात. म्हणूनच आपल्या व्यापातून वेळ काढून त्यांनी ‘लोकरंग’मध्ये प्रेक्षकांचा ‘एक्स्ट्रा क्लास’ घेतला. पण खरं सांगू मास्तर? पूर्ण लेख वाचल्यानंतरही ‘न्यूज चॅनेल कसे पाहावे?’ हे काही ध्यानात आलं नाही बघा!
मास्तरांनी २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी घटनेच्या चित्रीकरणाच्या संदर्भात न्यूज चॅनेल्सवर झालेली टीका या एका मुद्दय़ावर पूर्ण लेख खर्ची घातला. मात्र, चॅनेल्ससंबंधीच्या अन्य अनेक बाबींसंबंधी त्यांनी सावधरीत्या मौन बाळगले. परत वरून ‘आपल्या
 

मीडियाचे सगळेच बरोबर असते किंवा आहे असे नाही. अजूनही उत्साहाच्या भरात काही चुका होऊन जातात..’ आणि ‘चॅनेल्सची गुणवत्ता वाढली पाहिजे, हे नक्कीच. आपली चॅनेल्स आणखी प्रगल्भ झाली पाहिजेत, हे खरे,’ अशी वाक्ये पेरून प्रेक्षकांना ‘श्रद्धा आणि सबुरी’चा सल्लाही ते देतात. पण मास्तर, बी. बी. सी.- सी. एन. एन. यासारख्या चॅनेल्सबाबत असं काही कानावर का येत नाही?
मुळात आपल्याकडे ‘न्यूज चॅनेल्स’ आणि ‘मनोरंजन चॅनेल्स’ अशा प्रकारची दोन वेगवेगळी चॅनेल्स आहेत का, हाच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कुठला चॅनेल दुसऱ्या चॅनेल्सच्या कार्यकक्षेत घुसून थैमान घालतो, हे अगदी मुख्य संपादकांनासुद्धा बऱ्याचदा माहीत असते की नाही, याबद्दल शंका आहे. वास्तव हे आहे की, जाहिरातींचा महसूल कमावण्याच्या हेतूने सहजगत्या उपलब्ध असलेल्या राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील ‘बातम्या’ (खरं तर गॉसिप्स) ‘गोळा’ करून (संपादित करून नव्हे!) ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून दिवसभर रवंथ करीत बसायचं, हाच बहुतेक इंग्रजी, हिंदी आणि सर्व भाषिक न्यूज चॅनेल्सचा उद्योग दिसतो. अर्थात काही अपवाद वगळता! समाजात विविध क्षेत्रांत घडणाऱ्या असंख्य गुणात्मक, समाजोपयोगी घटना व कार्यक्रमांना कव्हरेज देण्यासाठी ना या न्यूज चॅनेल्सकडे वेळ असतो, ना मुळात तशी वृत्ती त्यांच्याकडे असत.
आता वळूया चॅनेल्सवर वापरली जाणारी भाषा, शब्दांचे उच्चारण व चॅनेल्सवर दिसत असलेल्या बातम्या / संदेशांतील मराठी भाषेच्या व्याकरणाकडे!
माझा जन्म, बालपण व शिक्षण मध्य प्रदेशातले. मराठी हा विषय क्रमिक पाठय़पुस्तकांद्वारे पद्धतशीरपणे शिकण्याची संधी मला न मिळाल्याने मराठी बातम्या आणि मनोरंजन चॅनेल्स बघून, ऐकून मला माझे मराठी सुधारता येईल असे वाटले होते. परंतु कसलं काय! चॅनेल्सवरील हिंदी / इंग्रजीमिश्रित मराठी भाषा ऐकल्यावर वाटलं की, या भाषेत आणि आम्ही मध्य प्रदेशातले मराठी लोक जी मराठी बोलतो (ज्यावर महाराष्ट्रातले लोक टीका करतात. अगदी पुलंनीही आम्हाला सोडलं नव्हतं!) त्यात जास्त फरक नाहीच. बातम्यांत म्हणूनच ज्याला ‘म्हणून’ शब्दात ‘ण’ वापरायचा तो ‘ण’ वापरतो आणि ज्याला ‘न’ वापरायचा तो ‘न’ वापरतो. माहितीसाठी एका प्रतिष्ठित मराठी मनोरंजन चॅनेलवर दररोज रात्री आठ ते नऊदरम्यान ज्या दोन मालिका दाखविल्या जातात, त्यापैकी एका मालिकेत ‘पूर्वसूत्र’ हा शब्द ‘पूर्वसुत्र’ असा लिहिलेला दिसतो. तर दुसऱ्या मालिकावाल्यांना वाटते तो ‘पुर्वसूत्र’ असाच लिहिला पाहिजे.
मास्तर, आणखी एका गोष्टीबद्दल प्रबोधन कराल का? ‘दोन आणि दोन यांची बेरीज होते चार’ या ‘ष्टाईल’ने एकच वाक्य घोळून घोळून निरनिराळ्या पद्धतीने उद्गारून दिलेल्या बातम्यांवरून प्रेक्षकांच्या ज्ञानात किती आणि कुठली भर पडते? बातम्यांदरम्यान `Pause' घ्यायचा असतो (अगदी वाजपेयी छाप आवश्यक नाही!) या मूलभूत गोष्टीबद्दल वृत्तनिवेदकांना शिक्षण दिलं जातं की नाही, याबद्दल कुतूहल आहे. प्रशिक्षण ही तर फारच पुढची गोष्ट आहे.
यावर मास्तर म्हणतील, ‘भाषेच्या बाबतीत म्हणाल तर कुठल्याही भाषेत अन्य भाषेचे शब्द समाविष्ट होत असतातच व त्यामुळेच भाषेचा विकास होतो. आपण नाही का इंग्रजीतील कोट, बुट, पॅण्ट, टेबल, फारसीतील ‘दस्तावेज’, ‘इसम’, ‘कैफियत’, ‘कर्ज’, ‘कलम’ मराठीत सरसकट वापरतो, तसाच ‘रंगे हात’ ही लवकरच आपला शब्द बनेल.’ प्रश्न असा आहे की, योग्य मराठी शब्द उपलब्ध असूनही परकीय शब्द वापरायचा अट्टहास का?
मास्तर यावर म्हणतील, ‘जनसामान्यांत तशी भाषा वापरली जाते म्हणून आम्हीही वापरतो. आणि या माध्यमातील कालमर्यादेचे बंधन लक्षात घेता काना, मात्रा, ऱ्हस्व, दीर्घ या गोष्टी गौण आहेत हो!’
राहता राहिली एकाच बातमीचं ‘गुऱ्हाळ’ लावायची बात! अनेकदा असं दिसतं की, एखाद्या बातमीबद्दल पुढे प्रगती झाली असूनही सकाळच्या ‘पहिल्या धारे’च्या (माफ करा- ‘पहिल्या बातमीपत्रातील’ म्हणायचं होतं!) बातमीची टेप पुन्हा लावली जाते व दरम्यान पडद्यावर दाखविण्यात येणाऱ्या सूचनापट्टीत या प्रगतीचा ओझरता उल्लेख दिसतो. तासाभरानंतरही पुन:पुन्हा दाखविल्या जाणाऱ्या त्या बातमीच्या शब्दांत फेरफार करता येत नाही? पण तसं घडताना दिसत मात्र नाही.
आता शेवटचा मुद्दा म्हणजे चॅनेल्सची गुणवत्ता वाढविण्यासाठी, त्यांना प्रगल्भ करण्यासाठी काय केले जात आहे? आतापर्यंतच्या अनुभवावरून तर असेच ‘दिसते’ आणि ‘अनुभवायला’ मिळते की, याबाबतीत काहीच विशेष प्रयत्न केले जात नाहीत. अन्यथा दर सहा-आठ महिन्यांनी सुरू होणाऱ्या नव्या चॅनेल्समधील नव्या ‘रंगरूटां’मध्ये काहीतरी फरक जाणवला असता. अंतत: मी तर या निर्णयाप्रत आले आहे की, खासगी चॅनेल्सवरील पाच मिनिटांच्या जाहिरातींच्या जंजाळातून अध्र्या मिनिटाची बातमी ऐकण्यापेक्षा चक्क सरकारी दूरदर्शनवरील सलग बातम्या ऐकलेल्या बऱ्या!
- मोनिका कात्रे, उज्जन, मध्य प्रदेश.

‘कॉपी राइट’विरुद्ध बंड लताचेच!
१५ फेब्रुवारीच्या ‘लोकरंग’मधील सुनील देशपांडे यांच्या लेखासंबंधी पुढील माहिती द्यावीशी वाटते. (जी सगळ्यांना माहिती आहे!) माझ्या माहितीप्रमाणे लताने सर्वप्रथम ‘कॉपी राइट’विरुद्ध बंडाचा झेंडा रोवला. तिने ठरवले की, गायकांनासुद्धा ‘कॉपी राइट’मध्ये हिस्सा मिळाला पाहिजे. परंतु लबाड निर्मात्यांनी त्याला विरोध दर्शविला. (अर्थात तो लतापुढे टिकला नाही.) तथापि नंतर विचार करून सर्व निर्माते लताला शरण गेले आणि त्यांचे रेकॉर्डिग व्यवस्थित सुरू झाले. मात्र, व्ही. शांताराम आणि राज कपूर यांनी या गोष्टीला विरोध चालूच ठेवला. पण त्याचा किती उपयोग झाला व त्यात कोण जिंकले, कोण हरले, हा इतिहास आहे. ‘कॉपी राइट’ला विरोध करणाऱ्यांमध्ये मोहम्मद रफीसुद्धा होता. अर्थात मधल्या काळात लता-रफीची द्वंदगीते बंदच होती. रफी लताला शरण गेल्यावरच दोघे पूर्वीचे सर्व विसरून एकत्र गाऊ लागले. हा इतिहास आहे. तो या लेखात यायला हवा होता असे मला वाटते. यातील खरे-खोटे इसाक मुजावर यांच्याकडून तपासून घेता येईल.
- पद्माकर रणजित,
गोरेगाव, मुंबई.

‘दुर्मिळ’ असे लिहिणेच योग्य
अलीकडे ‘दुर्मिळ/ दुर्मीळ’ या शब्दाच्या वर्णलेखनाबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली दिसते. ‘दुर्मिळ’ हा शब्द अस्सल मराठी असला तरी तो एकपदी नसून, ‘दुर्+मिळ’ (मिळण्यास कठीण) अशा दोन पदांच्या संयोगातून बनलेला सामासिक शब्द आहे व ‘मिळणे’ हा धातु समासात आल्यावर दीर्घ होतो, असे दाखविणारा व्याकरणिक नियम नाही. म्हणून ‘दुर्मिळ’ हा शब्द ऱ्हस्वयुक्तच लिहिणे योग्य.
- सत्त्वशीला सामंत, पुणे

तो फोटो तालवादक कावस लॉर्ड यांचा!
२९ मार्चच्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘स्मरणरंजन’ सदरात ‘एका गाण्याचा छडा’ या लेखातील फोटोत संगीतकार सलील चौधरी यांच्या शेजारी बसलेल्या चष्मेवाल्या गृहस्थाची ओळख लेखकाला नीट पटविता आलेली नाही. कदाचित ते सलीलदांचे सहाय्यक कानू घोष असावेत, असे त्यांना वाटले. परंतु तो फोटो प्रसिद्ध तालवादक कावस लॉर्ड यांचा आहे. ‘नौकरी’ चित्रपटात नोकरीचा अर्ज टाईप करताना किशोरकुमार ‘अर्जी हमारी, मर्जी हमारी’ हे गाणे गातो. गाण्यातील प्रसंगाला वास्तवाचा स्पर्श देण्यासाठी कावस लॉर्ड यांनी गाण्यात सुरवातीला चक्क टाईपरायटरच्या ध्वनीचा ठेका म्हणून उपयोग केला आहे. अशा प्रकारचे प्रयोग करण्यात कावसजी माहीर होते.
- अरुण पुराणिक, अंधेरी, मुंबई