Leading International Marathi News Daily
रविवार, १९ एप्रिल २००९

‘बोक्या सातबंडे’ची ही तिसरी इनिंग. चित्रपटाच्या निमित्ताने दिलीप प्रभावळकरांनी ‘बोक्या’ आता तिसऱ्यांदा शब्दबद्ध केला आहे. १५ वर्षांपूर्वी बोक्या पहिल्यांदा शब्दांकित झाला श्रुतिकेच्या स्वरूपात. मग त्या नभोनाटय़ावर त्यांनी कादंबरी-मालिका लिहिली. आणि आता प्रभावळकरांनी पुन्हा एकदा चित्रपटासाठी पटकथा साकारली आहे.
बोक्या सातबंडे हा ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा मानसपुत्र. प्रभावळकरांची अभिनयातील कारकीर्द जशी लक्षणीय आहे, तशीच लिखाणातीलही. त्यांच्या बाबतीत एक अपूर्व योग असा की, ज्या चिं. वि. जोशींचा चिमणराव साकारून त्यांनी विलक्षण लोकप्रियता मिळवली, त्या चिं. वि. जोशींच्या नावाचा पुरस्कार त्यांना ‘कागदी बाण’ या पुस्तकासाठी मिळाला. ना. धों. ताम्हणकर यांच्या ‘गोटय़ा’ने त्यांचे स्वत:चे बालपण समृद्ध केलेच, शिवाय त्यांना ‘बोक्या’च्या रूपात बालसाहित्याच्या प्रांगणात
 

उतरण्याची प्रेरणाही दिली. त्या ना. धों. ताम्हणकरांच्या नावाचा पुरस्कार त्यांना ‘बोक्या सातबंडे’ पुस्तक मालिकेसाठी मिळाला. ‘बोक्या’ वाचताना प्रौढ वाचकाला ‘गोटय़ा’ची हमखास आठवण होते.
बोक्या सातबंडेची लौकिक अर्थाने वर्गवारी जरी ‘बालसाहित्य’ म्हणून होत असली तरी प्रत्यक्षात ते कुणाही वाचकाला आवडते, खिळवून ठेवते, स्वत:च्या बालपणात घेऊन जाते. आणि पालक म्हणून आपल्या मुलाचे भावविश्व आपण किती जाणून घेतोय, याची जाणीवही करून देते. बोक्या सातबंडेचे लेखन फारच चित्रमय आहे. त्यातील संवाद, मध्यमवर्गीय वातावरण, सहनिवासाची रंगत हे सारे इतके चित्रवत लिहिले गेले आहे की, त्याचे वाचनही चित्राविष्काराची अनुभूती देऊन जाते. त्यामुळे बोक्याचे चित्रपट रूपांतरण तसे उशिराच झाले म्हणायचे. कारण त्यावर चित्रपट बेतणाऱ्याला भरपूर प्लॉटस् आपसूक मिळून जावेत, अशीच या कादंबरी-मालिकेची धाटणी आहे.
बोक्या आता मोठय़ा पडद्यावर झळकला आहे. त्याबद्दल दिलीप प्रभावळकरांशी गप्पा मारल्या. हा लाडका मानसपुत्र दृश्यरूपात साकारण्याचा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा प्रभावळकर नव्या उत्साहाने पुन्हा लेखनाला बसले आणि त्यांनी त्याची पटकथा-संवाद लिहिले. ‘बोक्या’ची ही तिसरी इनिंग. त्याचे नशीब असे की, प्रभावळकरांनी तो आता तिसऱ्यांदा शब्दबद्ध केला आहे. १५ वर्षांपूर्वी बोक्या पहिल्यांदा शब्दांकित झाला श्रुतिकेच्या स्वरूपात. ‘आकाशवाणी’साठी प्रभावळकरांनी १२-१३ भागांची नभोवाणी मालिका लिहिली होती. अर्थात तेही ‘आकाशवाणी’तून माधव कुलकर्णी यांनी त्यांना तगादा लावला म्हणूनच. प्रभावळकर स्वत:ला ‘संपादकांचे लेखक’ म्हणवतात. त्यांचे आतापर्यंतचे बहुतांश लेखन हे कोणातरी संपादकांच्या तगाद्यामुळेच झालेले आहे. ‘षटकार’ मासिकाने त्यांच्याकडून ‘गुगली’ सदर लिहून घेतले; जे पुढे ‘गुगली’, ‘नवी गुगली’ या पुस्तकांच्या रूपात आले. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीत १९९६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘अनुदिनी’ सदराचे पुढे त्याच नावाने पुस्तक प्रकाशित झाले. कालांतराने त्यावर ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही टीव्ही मालिका झाली आणि मग त्याच ‘अनुदिनी’ पुस्तकाने ‘श्रीयुत गंगाधर टिपरे अर्थात अनुदिनी’ हे नवे नाव धारण केले. मालिकेच्या यशाचा फायदा पुस्तकविक्रीलाही झाला.
प्रभावळकर जसे अभिनय आणि लेखन या दोन्ही भूमिका समर्थपणे निभावतात, तसेच त्यांचे हे दोन्ही आविष्कार परस्परपूरक ठरतात. ‘आकाशवाणी’वरचा त्यांचा बोक्या सातबंडे खूप लोकप्रिय झाला; हे बघून दिलीप माजगावकरांनी त्यांच्यासमोर पुस्तकाचा प्रस्ताव मांडला. नभोनाटय़ाचे बाड कादंबरी माध्यमात मांडण्यासाठी प्रभावळकर पुन्हा बैठक मारून बसले. तीन भाग साकारले. त्या तीन भागांची १९९४ ला पहिली आवृत्ती आली आणि एव्हाना त्याच्या ११ आवृत्त्या खपल्या आहे. दोन वर्षांपूर्वी प्रभावळकरांनी त्यात आणखी दोन भागांची भर टाकली. या नव्या कथा अगदी ताज्या संदर्भासह आल्या, त्यामुळे आजच्या बाल-कुमार वाचकांनाही त्या आपल्या वाटल्या. काही वर्षांपूर्वी ‘बोक्या’ टीव्ही मालिकेच्या रूपात आला. विनय आपटे यांनी १३ भागांची मालिकानिर्मिती केली होती, पण त्यात प्रभावळकरांचा सहभाग नव्हता. आता त्याचा सिनेमा काढायचा म्हटल्यावर प्रभावळकरांनी तिसऱ्यांदा ‘बोक्या’ पुन्हा या नव्या माध्यमासाठी लिहिला.
अलीकडे मुलांची वाचनाची रुची कमी झाली आहे, अशी ओरड असतानाही ‘बोक्या’ त्याला अपवाद ठरला. फारसे काही न वाचणाऱ्या लहान मुलांनीही किमान ‘बोक्या’ आवडीने वाचला. आई-वडिलांनी वाचून दाखवण्याचा उत्साह दाखवले तरी काही क्षणांत सटकी मारणाऱ्या मुलांनीही बोक्याचे पालकांनी केलेले अभिवाचन मात्र खुशीने ऐकले. वाचनाची आवड असणाऱ्या मुलांनी तर स्वत: ‘बोक्या’ची पारायणे केलीच आणि पालकांनाही ते वाचायला उद्युक्त केले.
‘बोक्या’ पुस्तकमालिका गाजली ती त्यातील व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावी चित्रणामुळे. तसंच वाचकांना हव्याशा वाटणाऱ्या भावविश्वाचा धागा अचूक पकडल्यामुळे. हा बोक्या अत्यंत चतुर व चलाख आहे. तो बिलंदरपणे उपद्व्याप करतो. पण त्याच्या खोडय़ा कुणाला त्रास देत नाहीत. उलट, तो अतिशय कनवाळू, परोपकारी, संवेदनशील आहे. त्याच्या सुस्वभावी व्यक्तिमत्त्वामुळे तो अतिशय लोभस वाटतो. त्याच्या घरातले सर्वाचे घट्ट परस्परबंध, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती आणि सहज, संतुलित वर्तणूक यामुळे सातबंडेच्या या एकत्र कुटुंबात वाचक गुंतून जातो. मध्यमवर्गीय मराठी माणसाला हवेहवेसे वाटणारे घर त्याला इथे सापडते. बोक्याचे घर एका कॉलनीत आहे. त्या सहनिवासातील ऊबदार, सुरक्षित वातावरणाचा रसरशीतपणा वाचकाला आकर्षित करतो.
आजची मध्यमवर्गीय मराठी मुले फार सुरक्षित चौकटीत वाढताहेत. त्यांना ‘बोक्या’सारख्या बिनधास्त वर्तणुकीचे स्वातंत्र्य नाही. इतका इब्लिसपणा करण्याची संधी नाही. म्हणून आजचे बालवाचक ‘बोक्या’ वाचताना थोडे अस्वस्थ होतात. ‘मला तुम्ही असं वागू द्याल का?’ असा प्रश्न ते थेटपणे पालकांना विचारतात. पण हीच मुले इतकी समजदारही आहेत की, या त्यांच्या प्रश्नावर पालकांचे निरुत्तर होणे स्वाभाविक आहे, ते परिस्थितीशरण आहे, हेही ते समजून घेऊ शकतात. आजचे समाजवास्तव त्यांना माहीत आहे आणि मुलांना सुरक्षा कवच देण्याच्या पालकांच्या मनोवृत्तीची कारणमीमांसाही ते जाणून आहेत. आणि म्हणूनच ‘बोक्या’च्या करामतीत ते अप्रत्यक्ष अनुभूतीचा आनंद लुटतात. ‘बोक्या’सारखे उद्योग स्वत:च्या लहानपणी केव्हा ना केव्हा केलेल्या पालकांना, आपल्या मुलांना आज असे मुक्त जीवन आपण देऊ शकत नाही, याचे शल्य जरूर स्पर्शून जाते.
प्रभावळकर स्वत: दादरच्या शारदाश्रम सहनिवासात वाढलेले आणि त्यांचा मुलगाही त्याच वातावरणातला. प्रभावळकरांचा बोक्या जेव्हा पहिल्यांदा जन्मला, तेव्हा त्यांचा स्वत:चा मुलगा त्याच वयोगटातला होता. प्रभावळकर म्हणतात की, तो बोक्याइतका बिलंदर नव्हता, (म्हणजे त्यालाही तशी संधी पुरेपूर मिळाली नव्हती तर! हुश्श!) पण त्याच्या मनोविश्वाची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे ‘बोक्या’ला घडवणे त्यांना सुकर गेले.
‘बोक्या’च्या कथेतील आजी हे व्यक्तिमत्त्व फारच दमदार आहे. ती आजी जरा जुन्या काळातील आहे. तिचे ‘चिन्मयानंदा, प्रदीपा’ असे आकारान्त संबोधन, नातवाच्या गुपितातला तिचा सहभाग, तिची भाषा यातून तिचे ‘आजीपण’ आजच्या काळातील नाही, तर ‘कालच्या’ काळातले वाटते. दिलीप प्रभावळकर याबद्दल म्हणतात की, ते व्यक्तिमत्त्व मी माझ्या आजीवरून बेतले आहे आणि म्हणून तिच्यापाशी तो काळ गोठला आहे.
‘बोक्या सातबंडे’च्या चौथ्या भागात एक हृद्य कथानक आहे. बोक्या आणि त्याचे मित्रगण क्रिकेट खेळत असताना त्यांचा बॉल बेलवंडी आजी-आजोबांच्या घरी जातो. त्या खडूस आणि विचित्र म्हाताऱ्यांकडून बॉल आणण्याचे कठीण आव्हान बोक्या पेलतो. पहिल्याच भेटीत तो त्यांना जिंकतो आणि मग त्यांच्या घरचाच होऊन जातो. मुलगा अमेरिकेत स्थायिक झाल्यामुळे एकटेपणाची हुरहुर अनुभवणाऱ्या बेलवंडी आजोबांचे भावविश्व बोक्या समजून घेतो आणि त्यांना आनंद देण्यासाठी धडपड करू लागतो. एकुलता एक मुलगा अमेरिकेत असणे आणि नातवंडांशी नाते न जुळू शकल्यामुळे आलेले वैफल्य पचवता पचवता हळवे झालेले, एकटे पडलेले आजी-आजोबा हे वास्तव आज घरा-घरांत आहे. त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणारा आणि त्यांना नातवाची सह-अनुभूती देण्याचा प्रयत्न करणारा बोक्या यांची ही कथा अफलातून आहे. चित्रपटात हा प्रसंग घेतला आहे. त्यात आजोबांचे व्यक्तिमत्त्व स्वत: दिलीप प्रभावळकरांनीच साकारले आहे. ‘गुळाचा गणपती’, ‘देवबाप्पा’ या जुन्या चित्रपटांत नायिकेची भूमिका बजावलेल्या चित्रा नवाथे यांनी प्रभावळकरांच्या पत्नीची- बेलवंडे आजीची- भूमिका साकारली आहे.
बोक्या सातबंडे हा चित्रपट यशस्वी झाला तर पुस्तक मालिकेचा खपही पुन्हा जोमाने वाढेल आणि आजच्या मुलांना वाचनाकडे नेल्याचे मोठे समाधान मिळेल, असे प्रभावळकर म्हणतात. एकच कथानक, व्यक्तिमत्त्व तीनदा वेगवेगळ्या माध्यमांसाठी लिहिणे ही सोपी बाब नाही. त्यामुळे चित्रपटाच्या निमित्ताने आणखी असंख्य बालवाचक पुस्तकाकडे वळले तर प्रभावळकरांची साधना फळाला आली, असे म्हणता येईल.
पुस्तकातील ‘बोक्या’ने मना-मनांत घर केलेले ‘बोक्या’प्रेमी वाचक चित्रपटाकडे मोठय़ा उत्सुकतेने बघताहेत. बोक्याच्या गुणांची लागण प्रत्येक वाचक-प्रेक्षकाला झाली पाहिजे!
शुभदा चौकर