Leading International Marathi News Daily
रविवार, १९ एप्रिल २००९

आज वाजपेयींना जरा बरं वाटत होतं. आरामदायी पलंगावर ते उठून बसले आणि मग भिंतीला पाठ टेकवून पाय लांब केले. त्यांचा नोकर संजय यानं वाजपेयींच्या पाठीला उशीचा आधार दिला आणि त्यामुळं वाजपेयींना अधिकच बरं वाटू लागलं. हळद घातलेल्या गरमागरम दुधाचा कप संजयनं वाजपेयींच्या ओठांना लावला. वाजपेयींनी एक घोट घेतला आणि म्हणाले, ‘जरा टीव्ही चला दो, बहोत दिनोंसे कुछ देखा नहीं है’ संजयनं टी. व्ही. सुरू केला. पडद्यावर मधुबालाचं गाणं सुरू होतं. वाजपेयींच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. ते संजयला म्हणाले, ‘इसे पहचानते हो?’ संजयनं नकारार्थी मान
 

हलवली. वाजपेयी भूतकाळात गेल्यासारखे कातर झाले आणि म्हणाले, ‘क्या हिरोइने थी उस जमानेकी, सुंदरता तो ऐसे थी जैसे चांद के आईनेमे वसुंधरा अपना रूप देख रही हो..’ यातलं काहीही संजयला कळलं नाही. त्यानं आपलं कर्तव्य आठवत वाजपेयींना बजावलं, ‘आपको जादा बात करनेसे मना किया है डॉक्टरने, आप टीव्ही देखीये, कुछ बोलीये मत!’ आपल्या घरेलू नोकराचा हा प्रेमळ राग पाहून वाजपेयींच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा जरा अधिकच रुंदावली व ते म्हणाले,
‘कुछ बोलीये मत
कहती है दुनिया,
अजी, बोलने के लिये
अब बचा क्या है?’
संजयनं त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहिलं आणि म्हणाला, ‘ये कविता आपने अभी बनायी?’ होकारार्थी मान हलवत वाजपेयी म्हणाले, ‘हां, हम तो हलवाई है भई, जब मन चाहे, जलेबी बनाले, जब मन चाहे, लड्डू.’ संजयनं कौतुकानं वाजपेयींकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘न्यूज चैनल देखना है आपको?’ तोवर मधुबालाचं गाणं संपून कतरिना कैफ पडद्यावर आली होती. त्यामुळं वाजपेयी म्हणाले, ‘इस बंदरिया को देखनेसे तो अच्छा है के समाचार देखे.’
संजयनं चॅनल बदलला. टी. व्ही.वरचा अँकर टीपेच्या आवाजात सांगत होता, ‘जोडतोड की राजनीती हर रोज एक नया रंग दिखा रही है, कल जो अपने थे वो आज अपने नही है, और कल जो पराये थे वह आज हाथ थामकर चल रहे है..’ वाजपेयींनी संजयकडे प्रश्नार्थक चेहऱ्यानं पाहत विचारलं, ‘ये क्यों चिल्ला रहा है?’ संजय म्हणाला, ‘अभी आठ दिन पहले तो आपको बताया था, लोकसभा के चुनाव है.. ये उसीके बारेमें बोल रहे है.’ वाजपेयींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होतं. ते स्वत:शीच पुटपुटले, ‘लोकसभा का चुनाव है? मुझे तो किसीने कुछ कहा नही है..’

पडद्यावर लालकृष्ण अडवाणी आले. त्यांनी आपण पंतप्रधानपदासाठी योग्य आणि सर्वसंमतीचे उमेदवार आहोत हे सांगायला सुरुवात केली. वाजपेयी ऐकता ऐकता संजयकडं पाहत म्हणाले, ‘क्या ये अभी तक प्रधानमंत्री बने नहीं?’ संजयनं नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, ‘नहीं. जब पार्टीको मेजॉरिटी मिलेगी, तभी तो ये प्रधानमंत्री बनेंगे. अभी नहीं मिली है.’ वाजपेयी क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले, ‘कौनसी पार्टी?’ संजयनं त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहिलं आणि विचारलं, ‘आपको याद नहीं है? आपकी पार्टी! भारतीय जनता पार्टी!’ वाजपेयींच्या चेहऱ्यावर काही आठवल्याची चिन्हं दिसेनात. ते हरवलेल्या सुरात म्हणाले, ‘जनसंघ का क्या हुवा?’ संजयला हा प्रश्नच कळला नाही. तो जरा काळजीत पडला आणि म्हणाला, ‘क्या सचमुच भूल गये आप? भाजपा! आप ही तो प्रधानमंत्री थे. इस पार्टीके!’ मग अचानक वाजपेयींना आठवलं, ‘अच्छा, भाजपा! याद आया.’ आणि दुसऱ्या क्षणी काहीतरी आठवून ते म्हणाले, परमोद कहाँ है, वह नहीं दिखाई दे रहा है..’’ संजयला वाटलं, आपण उगाचच टी. व्ही. सुरू केला. तो किंचितसा वैतागूनच म्हणाला, ‘आपको बताया तो था, परमोदजी अब इस दुनियामे नहीं है, अब काँग्रेस की सरकार है और चुनावके बाद पता नहीं किसकी आयेगी..’ संजय टी. व्ही. बंद करण्यासाठी सरसावला; तेव्हा टी.व्ही.वर शरद पवार दिसू लागले होते. वाजपेयी संजयला थांबवत म्हणाले, ‘क्या ये भी अभी तक प्रधानमंत्री नहीं बन पाये?’ संजयनं टी. व्ही. बंद केला आणि म्हणाले, ‘नहीं. सब लोग एक साथ कैसे प्रधानमंत्री बनेंगे?’

संजयनं टी. व्ही. बंद करून वाजपेयींना नीट झोपवलं. त्यांच्या अंगावर शाल पांघरली. फॅनचा स्पीड वाढवला आणि म्हणाला, ‘अब आराम किजीए, दो बजे मैं उठाऊंगा आपको भोजन के लिये.’ वाजपेयींनी हात हलवून त्याला निरोप दिला आणि म्हणाले, ‘अच्छा, अगर कोई आये तो कह देना मै सिर्फ सुबह मिलता हूँ लोगोंसे!’ ‘ठीक है’ म्हणत संजय बाहेर पडला. बाहेर स्वयंपाकी होता, तो संजयला म्हणाला, ‘इन की तसल्ली के लिये भेज दू किसीको मिलने के लिए, कल सुबह?’