Leading International Marathi News Daily
रविवार, १९ एप्रिल २००९

मार्कुस स्टीफन हे नाव क्रीडाक्षेत्राचं आकर्षण असणाऱ्या अनेकांना आठवत असेल. हा होता एकेकाळचा विश्वविख्यात वेटलिफ्टर. १९९० ते २००२ अशी तब्बल १२ र्वष त्यानं जागतिक स्पर्धामध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं. बार्सिलोनातल्या ९२ सालच्या ऑलिम्पिकमध्येही तो खेळला आणि २००२ सालच्या सिडनी ऑलिम्पिकमध्येही खेळायची संधी त्याला लाभली. सिडनी ऑलिम्पिकची ज्योत जेव्हा त्याच्या देशातून सिडनीकडे निघाली होती तेव्हा ती सन्मानानं हातात मिरवण्याचं भाग्यही मार्कुसला लाभलं होतं. पण दुर्दैवानं यशानं मात्र त्याच्याशी पाठशिवणीचा खेळ चालवला होता.
यशासोबतची त्याची ही पाठशिवणी थांबवली ती मात्र कॉमनवेल्थ गेम्सनं. त्याच्या यशाविषयी त्याच्या देशाला इतकी खात्री होती, की १९८९ साली निव्वळ त्याला स्पर्धेत उतरता यावं यासाठी त्याच्या देशानं ‘वेटलिफ्टिंग फेडरेशन’ स्थापन केलं. ९० च्या ऑकलंड कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यानं भाग घेतला आणि पहिल्याच फटक्यात तीन गटांत
 

मिळून एक सुवर्ण व दोन रौप्य पदकं खिशात टाकली. ९४ च्या व्हिक्टोरिया गेम्समध्ये त्यानं पुन्हा तीन गटांत खेळत तीन सुवर्णपदकं पटकावली आणि मग त्याला त्याचा छंदच लागला.
९८ च्या क्वालालंम्पूर गेम्समध्ये असंच तीन गटांत उतरत त्यानं आणखी तीन सुवर्णपदकं पदरात पाडून घेतली. २००२ च्या मँचेस्टर गेम्समध्ये त्याचा हा अश्वमेधाचा घोडा अडवला गेला; पण तरीही त्यावर्षीही तीन रौप्यपदकं पदरात टाकून घ्यायला तो विसरला नाही.
२००३ नंतर मात्र त्यानं क्षेत्र बदललं. तो राजकारणात उतरला आणि पहिल्याच वर्षी आपल्या देशाचा संसद सदस्य बनला. काही काळ देशाचं शिक्षणमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपदही त्यानं सांभाळलं. ऑगस्ट २००७ मध्ये त्यानं अवघ्या पाच वर्षांच्या संसदीय अनुभवावर थेट राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरणं पसंत केलं. पहिल्या प्रयत्नात तो हरला; पण त्यानं हिंमत सोडली नाही. निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठीच्या धूर्त चाली खेळत त्यानं डाव टाकला आणि तो जिंकलाही. डिसेंबर २००७ मध्ये तो देशाचा राष्ट्राध्यक्ष बनला.
आंतरराष्ट्रीय राजकारणातली आपली ताकद त्याला बहुधा ठाऊक असावी. त्यानं देशाचं परराष्ट्रमंत्रीपद राष्ट्राध्यक्षाकडेच ठेवण्याची आजवरची प्रथा मोडली. नवा परराष्ट्रमंत्री नेमला. समर्थ, जाणकार व अभ्यासू शिक्षणमंत्री नेमला. जागतिक राजकारणाविषयी तो अनभिज्ञ असला तरी देशी राजकारणातले धोबीपछाड त्याला पुरते ठाऊक होते. घटनात्मक सुधारणांच्या आवरणाखाली आपले अधिकार संकुचित करणारं विधेयक विरोधक आणताहेत, हे त्याला कळत होतं. अविश्वास ठरावाची जुळवाजुळव सुरू आहे. हेही त्याला दिसत होतं. मात्र, मार्कुसनं नेमक्या चाली खेळत हे दोन्ही डाव उधळून लावले. उठावाचे प्रयत्न थोपविण्यासाठी अंतर्गत आणीबाणी जारी केली. निवडणुकांना सामोरं जायचं ठरवलं आणि त्यानं त्या बहुमतानं जिंकल्याही.
आज २००९ सालातही मार्कुस स्टीफनच देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था सक्षम व्हावी यासाठी खासगी बँकांना उत्तेजन देत वेगवेगळ्या पावलांसह तो आपलं स्थान पक्कं करतो आहे.
* * *
मार्कुस स्टीफन आज अवघा ४० वर्षांचा आहे. संसदेवर तो सर्वप्रथम निवडून आला वयाच्या ३४ व्या वर्षी आणि राष्ट्राध्यक्ष झाला ३८ व्या वर्षी.
नाऊरु हा त्याचा देश. नैऋत्य पॅसिफिकमधलं नाऊरु हे एक द्वीप प्रजासत्ताक. किरीबाती प्रजासत्ताकातलं बानबा बेटापासून नाऊरुचं अंतर जेमतेम ३०० किलोमीटर. मेलबर्न आणि हाँगकाँगमधून एअर नाऊरुनं मार्कुसच्या देशाला जाता येतं किंवा फिजी बेटातून एअर पॅसिफिकनंही नाऊरु जवळ पडतं. जगाच्या पाठीवरचं नाऊरु हे सर्वात लहान द्वीप प्रजासत्ताक.
नाऊरुचं क्षेत्रफळ अवघं २१ चौरस किलोमीटर. परीघ १९ किलोमीटर. लांबी जेमतेम साडेपाच किलोमीटर. आणि रुंदी तर अवघी चार किलोमीटर. मॅरेथॉनमध्ये भाग घेणाऱ्यानं मनात आणलं तर एका शर्यतीचं अंतर पुरं करताना या संपूर्ण देशाला दोन फेऱ्या मारून व्हाव्यात.
नाऊरुची लोकसंख्या १३-१४ हजार. १४ जिल्ह्यांमध्ये विभागलं गेलेलं हे राष्ट्र. डोमानेब हा त्यातला एक. यारेन हे डोमानेबमधलं शहरवजा मोठं वस्तीकेंद्र. यारेनमध्ये नाऊरुची सारी प्रशासकीय कार्यालयं आहेत. अगदी संसदही. आणि पंतप्रधानाचं कार्यालयही. पण तरीही यारेन हे राजधानीचं ठिकाण नाही. किंबहुना नाऊरु हा देश असा आहे, की ज्याला अधिकृत राजधानी अशी नाहीच. राजधानी नसलेला जगाच्या पाठीवरचा एकमेव देश म्हणजे नाऊरु.
संयुक्त राष्ट्र संघाचा विश्वस्त प्रदेश म्हणून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ग्रेट ब्रिटनकडे ताबा असलेल्या या टिकलीएवढय़ा देशाला स्वातंत्र्य मिळालं ते ३१ जानेवारी १९६८ ला. ‘सत्यमेव जयते’ हे जसं भारताचं बोधवाक्य, तसंच ‘श्रींची इच्छा सर्वप्रथम’ (God's will first) हे नाऊरुचं बोधवाक्य. पण ‘असत्यमेव जयते’ हा अनुभव जसा भारतीय राजकारण्यांबाबत सर्वदूर घेतला जात असतो, तसंच नाऊरुतही ‘श्रीं’च्या इच्छेबाबत दिसतं. तिथे इच्छा प्रमाण असते ती मार्कुस स्टीफन यांचीच.
कॅप्टन जॉन फर्न यानं हे बेट शोधून काढलं ते १७९८ मध्ये. फर्न या बेटावर प्रथम उतरला तेव्हा तिथल्या नागरिकांनी त्याचं जे हसतमुखानं स्वागत केलं, त्यानं भारावून जाऊन फर्ननं या बेटाचं नाव ठेवलं ‘प्लेझंट आयलंड.’ आज त्याही नावानं हे बेट जगात ओळखलं जातं.
तब्बल ९० वर्षांनंतर १८८८ मध्ये जर्मनीनं हे बेट मार्शल बेटांचा भाग म्हणून समाविष्ट करून घेतलं. त्यानंतर पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रेलियन एक्स्पिडिशनरी फोर्सनं त्यावर कब्जा मिळवला. १९२० मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं महादिष्ट प्रदेश म्हणून त्याचा ताबा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ग्रेट ब्रिटनकडे सोपविला. १९४७ मध्ये संयुक्त राष्ट्र संघानं विश्वस्त प्रदेश म्हणून या तीन देशांकडे इथल्या राज्यकारभाराची सूत्रं सोपविली. स्वातंत्र्याची स्वप्नं नाऊरुअन नागरिकांना पडायला लागलेली होतीच. १९५१ ते १९६६ अशी सलग १५ र्वष जागृती होत राहिली. १९६६ मध्ये विधीमंडळ स्थापन झालं. ६८ साली राष्ट्रसंघाचा विश्वस्त करार संपुष्टात आला आणि नाऊरु स्वतंत्र प्रजासत्ताक बनलं.
जानेवारी ७२ मध्ये निवडणुका झाल्या. १८ सदस्यांची संसद अस्तित्वात आली. संसदेने निवडलेला राष्ट्राध्यक्ष आणि त्याने नियुक्त केलेले आवश्यक चार-पाच मंत्री ही प्रथा सुरू झाली. बर्नार्ड दोवियोगो हे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्तेवर आले. पण राष्ट्राध्यक्षाचा पाळणा घटनेनुसार दर तीन वर्षांनी हलण्याऐवजी अधूनमधून वारंवार हलत राहिला आणि ३७ वर्षांत २७ राष्ट्राध्यक्ष नाऊरुनं पाहिले. मार्कुस स्टीफन हा त्यातला २७ वा!
* * *
भू-अंतर्गत हालचालींमुळे ४० मीटर उचलला गेलेला भूप्रदेश हे नाऊरुचं भौगोलिक रूप. या बेटाभोवती आहे प्रवाळ भिंतींचा वेढा. बेटाचा समुद्राकडील भाग उताराचा आहे. जमिनीच्या बाजूस वाळूची पुळण आहे. या पुळणीपलीकडचा १३५ मीटर ते २७५ मीटरचा पट्टा हा सुपीक भूमीचा आहे. पट्टय़ाभोवती पाच मीटर रुंदीचा रस्ता आहे. वस्त्या-वस्त्यांपर्यंत जाण्यासाठीचे रस्ते या मुख्य रस्त्यापासून फुटतात.
या सुपीक भूमीच्या पलीकडे उंच प्रवाळकडे आहेत. त्यावरचं विस्तीर्ण पठार फॉस्फेटसाठी प्रसिद्ध आहे. १८९० मध्ये या फॉस्फेटचा शोध लागला आणि जागतिक बाजारपेठेतील त्याची वाढती मागणी पुरी करता करता नाऊरुची अर्थव्यवस्था मजबूत होत गेली. १९०१ पासून प्रत्यक्ष फॉस्फेट खणले जाऊ लागले. आज १०८ वर्षांनंतर हे साठे संपुष्टात येत असल्याचे आता जाणवू लागले आहे. त्याचा फटका या देशाच्या अर्थव्यवस्थेला बसू लागलेला आहे.
नाऊरुला बंदर नाही. नांगर टाकून मोठी जहाजं किनाऱ्याला लावायची सोय नाही. परंतु मोठी जहाजं येत नसल्याने परिसरात मासळी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. फॉस्फेटचे साठे संपत आल्यानंतर आता नाऊरुच्या अर्थव्यवस्थेला ही मासळी निर्यातच हातभार लावते आहे. ऑस्ट्रेलियन डॉलर हे चलन. एक ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे साधारण ३६ रुपये. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत हा कितीतरी स्वस्त.
धर्म ख्रिश्चन. वंश पॉलिनेशियन. भाषा मायक्रोनेशियन आणि नाऊरुअन. शालेय शिक्षण, सरकारी कारभार आणि व्यापार मात्र इंग्रजीतून. शासनाकडे आणि मिशनऱ्यांकडे फारच थोडी जमीन. उरलेली जी काही आहे ती खासगी मालकीची. वय वर्षे ६ ते १६ शिक्षण सक्तीचं; त्यामुळे साक्षरांचं प्रमाण ९५ टक्के. पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया वा न्यूझीलंडला जाणाऱ्यांस भरपूर शिष्यवृत्त्या. परंतु शिक्षितांना नोकऱ्या नसल्याने देशाबाहेर जाणाऱ्यांचं प्रमाण जास्त. उद्योग नाहीतच, त्यामुळे ९५% नोकऱ्या या सरकारी उपक्रमांतल्याच.
आरोग्याच्या आघाडीवर मात्र नाऊरुची स्थिती बिकट. मधुमेह, क्षय व कुष्ठरोगाचं प्रमाण एकेकाळी भरपूर. वार्धक्य, अपंगत्व, आजारपण, वैधव्य, बालकांची सोय सरकारकडून होते. आरोग्याची ही दुरवस्था उद्भवते आहे ती प्रामुख्याने तयार अन्न आयात केले जात असल्यामुळे. जवळपास कुठलेच ताजे अन्न नाऊरुमध्ये बनत नाही. बहुतांश जीवनावश्यक वस्तू आयात कराव्या लागतात. क्वचितप्रसंगी तर पिण्याचे पाणीही आयात करावे लागते. हे सारे अन्न ‘जंक फूड’ या सदरात मोडते. भारतीय डॉक्टर- विशेषत: लहान मुलांच्या आजारांविषयी सल्ला देताना ‘जंक फूड टाळा’ असा सल्ला का देतात, ते यावरून ध्यानी यावे.
सुधीर जोगळेकर
sumajo51@gmail.com