Leading International Marathi News Daily
रविवार, १९ एप्रिल २००९

‘डोक्यात ही जत्रा भरली आहे गोष्टींची. अरे गोष्टींची खरी मजा ‘सांगण्यात’ असते ना! सांगताना गोष्ट आपली होऊन जाते..’ असं म्हणणारे काटदरेसर ‘शन्नां’च्या ‘अतिथी’ या कथेत भेटतात. खरं तर शन्नांच्या गोष्टीवेल्हाळ स्वभावाचं हेच सूत्र. म्हणून त्यांच्यातला कथाकार, कथाकथनकार देखील झाला, कादंबरीकार, पटकथाकार, नाटककार झाला. जवळपास अर्धशतक लिहिते असणारे शन्ना वयाच्या ऐंशीव्या वर्षी ‘प्रेमगंध’ नाटक लिहितात, यात त्यांच्या सदाबहार लेखणीचा आवाका ध्यानात येतो. तरीही सर्व साहित्य- नाटय़-चित्रपट क्षेत्रांत मुक्त संचार करणाऱ्या या मूळ कथाकाराचं, कथेच्या विश्वात स्वत:चं असं वेगळं दालन आहे.
शन्नांच्या कथा कधीच शब्दबंबाळ- पसरलेल्या नसतात, तर त्या घटना-आशयप्रधान बहुश: संवादात्मक असतात. त्यातून ‘माणूस’ जसा आहे तसा दाखविण्याचा प्रयत्न असतो. खरा-खोटा, योग्य-अयोग्य या मूल्यमापनात ते फारसे शिरत नाहीत, मग ती कथा गंभीर-विनोदी वा गूढ चमत्कारी असो. त्यांच्या ‘पर्वणी’ या कथासंग्रहातून शन्नांची सारी ‘रेंज’ कळते. यातल्या
 

सगळ्या बावीस कथांचा, पूर्व प्रसिद्धीकाळ साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकांतला असावा. कथा काहीशा जुन्या असल्या तरी जुनाट वाटत नाहीत. कारण कालसापेक्ष परिस्थिती वगळता माणूस, त्याची वृत्ती इथून तिथून सारखीच असते. अन् कुठल्याही कथेतून भेटणारी शन्नांची ‘माणसं’ हाच मूळ ‘कॅनव्हास.’ घटनांचं चित्रण-संवाद-शेवट ही सारी चित्रकारी, शन्ना स्टँप असणारी. विविध कथाचित्रांची ही जत्राच आहे.
‘भिडे, भिडे’ कथेतले देव्हाऱ्यापासून गमबुटापर्यंत, एवढंच नव्हे तर तिकिटं लावून आज्जीला पोस्टाने पाठविता येत नाही म्हणून कोकणात घेऊन जाण्याची गळ घालणारे भिडेंचे भन्नाट शेजारी हे माणसांचे नमुने. कथेचा काळ कोकण-रेल्वेपूर्व ‘येस्टी’चा असला तरी फरक पडत नाही. आज कदाचित कोकणचं कॅलिफोर्निया(!) झालंय एवढंच! ‘गुच्छ’ कथेतला ‘हॅरॉल्ड फ्राय’च्या सल्ल्यानसार, बायकोला बनविताना उडालेला नवऱ्याचा अपूर्व गोंधळ, ‘पर्वणी’तल्या मामामहाराजांवर शंभूकाकाची कुरघोडी- अर्थात बिनलंगोटीच्या वरची पायरी- तांब्यांचं कडं! तर ‘डावपेच’मधली बनवाबनवी, ‘चतुराई’तल्या सासूवर सुनेची कुरघोडी आणि ‘व्हिजिटिंग कार्ड’मधला अफलातून फार्सिकल गोंधळ! (शन्नांनी ‘फार्स’ प्रकार अजून का हाताळला नाही?) हे तसं कालसापेक्ष नसतंच. कारण नवरे- बायका- सासू- शेजारी- बुवाबाजी- मध्यमवर्गीय डावपेच- धाडसाच्या कल्पना कशा बदलणार! हे सारं हलक्याफुलक्या कथांतून समोर येतं.
‘छबी’मधल्या लहान मुलाचा मृत्यू झालेल्या आईची मानसिक अवस्था, ‘बाजीराव’मधल्या ‘पैलवानकी करायची तर बाईमाणसापासून चोवीस कलाक दूर राहायचं- लंगोट टाईट ठेवायचा,’ हा बशीरचाचांचा सल्ला मोडल्यावर बाजीराव पैलवानाला आलेला बायकांचा अनुभव, ‘कवडसा’मधील ‘सौ. रजनी रत्नपारखी’ या टोपणनावाने लेखन करणाऱ्या र. रं. झुरळेची सत्यकथा, ‘डंख’मधल्या सतत डंख मारणाऱ्या नवऱ्यावर शेवटी ‘कडी’ करणारी बायको, ‘बिरबलाची रेषा’मधली, दुसऱ्याऐवजी आपण स्वत:च बदलायचं, रेषेशेजारी दुसरी लांब रेषा काढायची, असं म्हणणारी गोखल्यांची आई, विरूप असणाऱ्या पण उत्कृष्ट भाषा-कविता शिकविणाऱ्या ‘भदेसरां’चं शेवटी फ्रेममेकर होणं, ‘त्रिधारा’मधील, चोरीच्या कमाईचं खाऊन चोरीची बुद्धी झाली म्हणणारे केतकरसर, पिंजऱ्यातले पोपट मुक्त करणारा गुंडदादा, कॅश द्या भेट नको- म्हणणारे के. आर. साहेब.. ही सारी माणसं त्यांच्या वेदनेसह काही कथांतून भेटतात.
या सर्वापेक्षा वेगळ्या काहीशा गूढ-चमत्कारिकतेच्या- फॅन्टसीच्या जवळ जाणाऱ्या कथादेखील ‘पर्वणी’मध्ये आहेत. ‘व्हेट्रिलॉक्वि’ हा ‘बोलनगरी’ कथेचा विषय, तर ‘सत्य वदे वचनाला’ कथेत हेमलताबाईंचं, बालगंधर्वाच्या गाण्यांचं पेटीवादन ऐकायला, मांजराच्या रूपात येणारे त्यांचे स्वर्गस्थ वडील, ‘वेल-कम इन’मधलं मांजरा-सशांच्या ‘ममीज्’बरोबर माणसांच्या ममीज् तयार करणारं, विकृत मनोवृत्तीचं, इटालियन-स्पॅनिश जोडपं, ‘अ कपल इन अ स्टोरी’मधलं- गोष्टीतला माणूस प्रत्यक्ष भेटला, की गोष्ट संपते’- म्हणून पुस्तकातली ७२ पुढची पानं कोरी होणं, या व अशा कथांबरोबर ‘इनव्हिजिबिलिटी’चा आजार असणाऱ्या ‘सुरस आणि चमत्कारिक’मधल्या डॉ. कित्तूर यांची फारशी न जमलेली, तीदेखील दीर्घकथा, देखील आहे.
शन्नांची भाषा विनाकारण आलंकारिक, बोजड कधीच नसते. वाहत्या भाषेच्या प्रवाहात काही चमकणारे कवडसे मात्र असतात. ‘पर्वणी’ या कथासंग्रहाची ही दुसरी आवृत्ती, अकरा वर्षांनंतर निघालेली. या आवृत्तीत कुठलीही प्रस्तावना नाही, लेखकाचे मनोगत नाही- दोन शब्द नाहीत, कथांच्या पूर्वप्रसिद्धीचे स्थल-कालसंदर्भ नाहीत, सूची नाही, मलपृष्ठावर ‘ब्लर्ब’ नाही. मुखपृष्ठदेखील पर्वणी या एका कथेशीच संदर्भ जोडणारं असलं तरी त्यातून शन्नांच्या कथांची विविधता व्यक्त होत नाही. कथांतर्गत माणसांचा ‘कोलाज्’ वा ‘न्यूट्रल’ असणं हा दुसरा मार्ग. प्रत्येक कथेच्या सुरुवातीला फुलांच्या परडीचं, ते देखील न बदलणारं चित्र, हे सारं कालबाह्य़ वाटतं. शन्नांच्या नावापुढे हे मुद्दे तसे किरकोळ, पण कदाचित म्हणूनच खडय़ासारखे खटकणारे.
‘मला घरीदेखील एकटय़ाने शांततेत लिहिता येत नाही, आजूबाजूला माणसांची चाहूल हवी’, असं म्हणणाऱ्या शन्नांना भेटलेली- त्यांच्या कल्पनेतली माणसं- जाणून घेण्याची ही एक ‘पर्वणी.’
पर्वणी : शं. ना. नवरे
नवचैतन्य प्रकाशन
पृष्ठे : २७८,
मूल्य : २६० रुपये
प्रभाकर बोकील