Leading International Marathi News Daily
रविवार, १९ एप्रिल २००९

जगातील अनेक संग्रहालयांची निर्मिती ही राजे-संस्थानिकांच्या आश्रयाने किंवा त्यांच्या कलाप्रेमामुळे घडलेली आहे. आपल्याकडील बडोदे, जयपूर, म्हैसूर, हैदराबाद, औंध, कोल्हापूरचे न्यू पॅलेस ही यातली काही ठळक उदाहरणे! सांगलीचे छोटेखानी संग्रहालय पाहिले आणि इथल्या कलासक्त राजाचे असेच स्मरण झाले.
श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांच्या रसिकतेचे हे दर्शन! त्यांनी आणि त्यांच्या वंशजांनी गोळा केलेल्या विविध कलावस्तूंमधूनच सांगलीचे हे संग्रहालय आकारास आले. सांगलीच्या राजवाडय़ातच थाटलेल्या या संग्रहालयाचे उद्घाटन ९ जानेवारी १९५४ रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले आणि कलेचा हा वारसा जनतेसाठी खुला झाला.
अवघ्या हजार एक वस्तू, पण त्या प्रत्येकामध्ये इतिहासाच्या त्या काळपट्टय़ांबरोबर कलेचे सौंदर्य ओतप्रोत भरलेले! चित्रकला, शिल्पकला, हस्तकला आणि अशाच कितीतरी कलाकृतींचा हा मेळा! त्याला स्पर्श करतच आपला हा प्रवास सुरू होतो.या प्रवासात पहिली नजर ठरते ती इथल्या ऐतिहासिक चित्रांवर! शे-दोनशे वर्षांपूर्वीची नैसर्गिक रंगात साकारलेली ही चित्रे म्हणजे जणू या संग्रहालयाचा आत्माच वाटतात. जेम्स वेल्स, ए. एच. मुल्लर, रावबहादूर धुरंधर, जी. पी. गांगुली, आबालाल रहेमान अशा दिग्गज कलाकारांच्या या कलाकृती इथे मूर्त-अमूर्ताचा खेळ उभा करतात. उच्च सौंदर्यदृष्टी, तरल भाव आणि रंग-रेषांचे आश्यर्यकारक रेखाटन हे या चित्रांचे पैलू.
 

जेम्स वेल्स हा तर ब्रिटिश चित्रकार! १७९० ते ९२ दरम्यान त्या वेळेच्या प्रेसिडेंट चार्ल्स मॅलेट याच्या शिफारशीवरून त्याने भारतातील अनेक संस्थानिकांची समोर बसवून चित्रे काढली. यात सवाई माधवराव पेशवे आणि नाना फडणवीसही होते. ही दोन्ही अस्सल चित्रे आज सांगली संग्रहालयात आहेत. दोनशे वर्षे झाली, पण माधवरावांच्या गळय़ातील मोत्यांचा तो हार आजही चकाकतो आहे आणि नानांच्या नजरेतील जरब अद्याप टिकून आहे.
वेल्सप्रमाणे मुल्लर हादेखील विदेशी वंशाचा. पण त्याने भारतीय संस्कृती, इतिहास आणि पंरपरेलाच आपलेसे केले आणि मग एकाहून एक विस्मयकारक चित्रांना जन्म दिला. मुल्लर यांची पंधरा चित्रे इथे आहेत. यात ‘रामायणा’तील सर्वाधिक! पण खरी नजर स्थिरावते ती त्यांच्या ‘गंगावतरण’ चित्रावर! तीन-साडेतीन फुटांच्या या चित्रात गंगा आणि तिला आपल्या जटेत घेणारा शंकर त्या देखाव्यात संकेतापुरतेच दाखवले आहेत. पण यामुळे चित्राचा विषय आणि त्या मागचा विचार मात्र खोल परिणाम साधून जातो. धुरंधर हेदेखील मुल्लरांचे समकालीन! तैलरंग, जलरंग, क्रेऑन पेन्सिल आणि पावडर शेडिंगमधील त्यांची पंचवीसएक चित्रे इथे आहेत. ज्यामध्ये त्यांची ती शिवकाळ जागवणारी प्रसिद्ध चित्रेही येतात. यातील निद्रेत असणाऱ्या छत्रपती शिवरायांना दृष्टान्त देणाऱ्या आई भवानीचे चित्र तर सत्य-स्वप्न, भास-आभासाचा मोठा खेळ वाटते. आबालाल रहेमानांची शिवकाळावरची चित्रेही अशीच परिणाम करणारी!
तंजावर शैलीतील मेणात बनवलेले एक चित्रही या संग्रहालयात आहे. बाळकृष्ण असा त्याचा विषय! आज तीनशे वर्षे झाली, पण काळाची पावले या चित्राकडे वळू शकलेली नाहीत. जी. पी. गांगुलीही असेच आणखी एक जातीचे कलाकार! त्यांचे ‘धुक्यातील आगगाडी’ हे चित्र पाहताना कलाकाराचे संवेदनशील मनच बाहेर येते.असे म्हणतात, कलामहर्षी बाबुराव पेंटर या संग्रहालयात दिवसभर एखाद्या चित्रापुढेच खुर्ची टाकून बसत. बाबुराव सडवेलकर या दुनियेत स्वत:ला कोंडून घेत. कला आणि कलाकारांसाठी असे क्षण सुवर्णाचे ठरतात.
चित्रांप्रमाणेच शिल्पांचीही इथली न्यारी दुनिया! संग्रहालयाच्या दारातच तो रोमन संस्कृतीतील मक्र्युरीचा पुतळा आतमध्ये काहीतरी निराळे आहे असे सांगत असतो. मग पुढे काही वेळातच ओळीने ते शिल्पवैभवही भेटू लागते. इजिप्तशियनची पृथ्वीदेवता इसिस, न्यायदेवता ओसिरिज, गायक मुसे, तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस, रशियन राजा पीटर दी ग्रेट, शूर अलेक्झांडर, रोमनांचा राजा ट्रोजन, जुलमी बादशहा निरो, ज्युलिअस सिझर, इजिप्तची राणी क्लिओपात्रा, रोमनांची युद्धदेवता अशी अनेक पात्रे या शिल्पांमधून ओळख देऊ लागतात. या साऱ्यात आमच्या रयतेचा राजाही भेटतो आणि इंग्लंडची व्हिक्टोरिया राणीही दिसते.
शिल्पांच्या या दुनियेत लक्ष जाते ते ‘शबरीच्या वेशातील पार्वती’वर. गणपतराव म्हात्रेंची ही कलाकृती सौंदर्यदृष्टी, प्रमाणबद्धता आणि सौष्ठवाचे यथार्थ दर्शन घडवते. १९०२ मध्ये दिल्ली येथे लॉर्ड कर्झनने आयोजित केलेल्या राष्ट्रीय प्रदर्शनात या शिल्पाला सुवर्णपदक मिळाले होते. पुढे काही वर्षांनंतर बळवंत गोविंद पोतदार यांनीही पुन्हा हाच विषय घेऊन ही शबरी पुन्हा वेगळय़ा रचनेत काष्ठशिल्पात घडविली.
या संग्रहालयात जगातील काही महत्त्वाच्या स्मारकांची मॉडेल्स आहेत. पिसाचा तो झुकता मनोरा! कधी शे-दीडशे वर्षांपूर्वी संगमरवरात बनवलेली त्याची ही पुरुषभर उंचीची प्रतिकृती इथे अद्याप झुकलेल्या अवस्थेत ताठ उभी आहे. फत्तेपूर सिक्रीची चिस्तीची कबर आणि ताजमहालची जामा मशीद संगमरवरातून सफाईने साकारल्या आहेत. जपानमधील गौतम बुद्धाचे सुवर्णमंदिर इथे आहे. एवढेच काय, सांगलीच्या आयर्विन पुलाची प्रतिकृतीही या स्मारकाची माहिती देते.
तांब्या-पितळेची कलात्मक भांडी, हस्तिदंती चटया, उठावाची काष्ठशिल्पे, चंदनाच्या पेटय़ा, चंदनाच्या सालीपासून तयार केलेल्या चवऱ्या, चंदनी पंखे, करंडे, हस्तिदंतीवरील चित्रकाम, िपपळपानावरची चित्रे, पितळी बैलगाडय़ा, हंडय़ा, झुंबरे, प्रतापगडावर भवानी मातेच्या मंदिरात सापडलेल्या कलात्मक दिव्यांच्या माळा या साऱ्यांमध्ये इतिहासाबरोबर कलाही सापडते. सौंदर्याची दृष्टी दिसते. संग्रहालयाच्या पहिल्या वस्तूपासूनच दिसणारा हा चेहरा त्या संग्रहालयालाच कलेच्या राऊळाचे रूप देऊन जातो.
(हे संग्रहालय सोमवार सोडून अन्य दिवशी कार्यालयीन वेळेत अल्प दरात सर्वासाठी खुले आहे. संपर्क- बळवंत करवीरकर, दूरध्वनी- ०२३३-२३७६९१३)
अभिजित बेल्हेकर
abhibelhekar@gmail.com