Leading International Marathi News Daily
रविवार, १९ एप्रिल २००९

स्त्री-पुरुष समानता असावी की नसावी?
- प्रिया दळवी, दहिसर

व्यासपीठावरून बोलताना जरूर असावी, मात्र खासगी मत बायकोला विचारून सांगतो...

वर्तमानपत्रांमध्ये दिले जाणारे भविष्य खरे ठरते का?
- सायली मुळये

मी सर्व वर्तमानपत्रांमधले फक्त चांगले भविष्यच वाचतो आणि एक ना एक दिवस ते खरे ठरणारच !

बायकोच्या घोरण्याचा तुम्हाला त्रास होतो का?
- वाघेश साळुंखे, वाजेगाव, सांगली

मला रात्रीचे कमी ऐकू येते.

तुम्हाला अभिनय जमला नसता तर तुम्ही काय झाला असता?
- सचिन मिसाळ, ठाणे

‘नट’.

डाव्या पक्षांना आंब्याबद्दल काय वाटत असेल ?
- सुहास फणसळकर, परळ

टोकाची पिळवणूक !

राज ठाकरे यांचे वेगळेपण कशात आहे ?
- अभिषेक सरमळकर, प्रभादेवी

बरेचजण मराठी मुद्दय़ावर चर्चा करत बसले. राज ठाकरे यांनी मराठी गुद्दय़ाला हात घातला !

आंबे लवकर पिकावेत यासाठी काही उपाय सांगा ना?
- वैशाली आम्रे, अंधेरी

टीव्ही ऑन करून आंब्याच्या पेटीसमोर कौटुंबिक मालिका लावा.

तुमचा वीक पॉइंट सांगाल का ?
- तात्या जगताप,वडुज

महाबळेश्वर!

चुंबन घेताना कुठली सावधगिरी बाळगावी ?
- जुई म्हैसकर, कुडाळ

‘या’ ओठाचे ‘त्या’ ओठाला कळता कामा नये.

गॅसवर दूध उतू जावं तसा शब्द उतू जाणारा एका गॅस सिलिंडर वितरकाच्या ऑफिसमधील संवाद.
रजनी- (एक गॅसग्राहक, ऑफिसमधील महिला कर्मचारी भारतीला म्हणाली-) गॅस नोंदवायचा आहे.
भारती- (समोरच्या वरील कोपऱ्यातील टी.व्ही.वरची नजर न हलवता शेजारी बोट करून) त्या फडताळेंकडे.
रजनी- (भारतीच्या शेजारील सिलेंडरसारख्या दिसणाऱ्या माणसाकडे बघून) ते तर कधीचे फोनवर बोलताहेत.
भारती- ते काही बायकोशी बोलत नाहीयेत.. बुकिंगच घेताहेत. (नजर टीव्हीवर)
रजनी- पण मग जरा तुम्ही नोंदवून घेतला तर..
भारती- (नजर टीव्हीवर) असं गॅसवर.. म्हणजे घाईवर असल्यासारख्या काय करता! त्यांच्या कामात मी लुडबूड केलेली चालत नाही त्यांना. काय हो फडताळे, घेऊ का यांचं बुकिंग?
फडताळे- (फोनवर बोलत असतानाच फोन जरा बाजूला करून) रिकाम्या सिलेंडरसारखा आवाज करू नका हो. तुम्ही

 

बुकिंग घेऊ नका, म्हणून बजावलंय ना! ओ काकू, या इकडं..
रजनी- (मागे.. इकडे तिकडे बघू लागलेली..)
फडताळे- (रजनीला) तुम्हीच.. गॅस सिलेंडरसाठी येणाऱ्या सगळ्या काकू अन् मावशीच. (पुन्हा फोनवर).. गाडी आली तर सिलेंडर.. गाडी केव्हा येईल नाही माहीत.. अरे, आता काय माझ्या घरचा सिलेंडर काढून तुमच्याकडे आणून लावू का..! (हा फोन आपटून दुसरा वाजणारा फोन उचलून).. नंबर बोला..
रजनी- पासष्ट बासष्ट सदुसष्ट
फडताळे- (रजनीला) तुमचा नाही हो. तुम्ही कार्ड दाखवा. (फोनवर) नाव नको नंबर बोला.. कुलकर्णी तर कचऱ्यानं असतात. डिरेक्टरीत कुलकर्णी किती आहेत सांगू का? (रजनीच्या हातातलं कार्ड हिसकावून घेऊन) तुमचं बुकिंग आणखी अकरा दिवसांनी होईल. आधीचा सिलेंडर देऊन दहाच दिवस झालेत.
रजनी- कसं शक्य आहे? आधीची मिळाल्याची तारीख दीड महिन्यापूर्वीची आहे बघा ना!
फडताळे- (फोनवर) अहो, मग असं सांगा ना..
रजनी- तेच तर सांगतेय ना.
फडताळे- (रजनीला)अहो, तुम्हाला नाही हो म्हणालो.. (फोनवर) नवीन कनेक्शनसाठी..? फोनवर कसं काम होईल? (फोन ठप्प.. दुसरा उचलून तसाच धरून रजनीला), मग आमचा कॉम्प्युटर काय खोटं बोलतोय का?
रजनी- कॉम्प्युटरमध्ये गॅस.. सॉरी.. माहिती तुम्हीच भरता ना?
फडताळे- (रजनीला) आमचा सिलेंडर देणारा माणूस सांगतो ना.. तीच माहिती कॉम्प्युटरमध्ये जाते.
रजनी- (वैतागून) तो खोटं बोलू शकतो ना.. आमच्या नावावर सिलेंडर दुसऱ्याला देऊन..
फडताळे- (फोनवर) नंबर बोला.. अहो, तुम्हाला सांगितले ना १० दिवस लागतील.. तुम्ही रोज फोन करून त्रास का देता?.. गाडी आली का पाहायला?.. ही काय रेल्वे स्टेशनची सेवा आहे का? पुन्हा फोन कराल तर आणखी दहा दिवस लागतील. (फोन आपटून मोठी ढेकर देत रजनीला) मग मी काय करू?
भारती- (टीव्हीवर नजर ठेवून) फडताळे, तुम्हीच जाऊन बसा यांच्या रिकाम्या सिलेंडरवर.. तुमच्या गॅसेसचा तेवढाच उपयोग. (जोरात हसली.)
फडताळे- (भारतीकडे बघून) काम ना धाम! लीक झालेल्या सिलेंडरसारख्या फसफसताय काय?
रजनी- (फडताळेला) मग मी खोटं बोलते का? दहा दिवसांपूर्वीची तारीख तरी आहे का कार्डवर.. ना दिल्याची ना नोंदवल्याची. मी बोलू का तुमच्या माणसाशी?
फडताळे- (आलेला आणखी एक फोन हातात धरून रजनीला) मग आम्ही कशाला आहोत इथं? शेगडीला गॅस नळीतनंच जातो ना?
रजनी- कुत्र्याच्या शेपटासारखी वाकडी झालीय ती नळी. बोला, गॅस नोंदवून घेताय की तक्रार?
फडताळे- (दुर्लक्ष करून फोनवर) नंबर बोला.. हं १० दिवसांनी.. (फोन ठेवून रजनीला) काकू, सांगितलं ना? (पुन्हा फोन वाजताच उचलून) नंबर बोला.. नोंदवला ना आताच.. (फोन ठेवून रजनीला) काय करता..? (पुन्हा फोन वाजताच उचलून) नंबर बोला. अहो आताच्या आता तिसऱ्यांदा.. किती वेळा बुकिंग घेऊ.. (मान हलवून) मग आधी सांगायचं ना रेग्युलेटर बदलायचाय म्हणून. (फोन लांब केल्यावर पलीकडून त्रासिक आवाज रजनीलाही स्पष्ट ऐकू आला. ‘‘मी नंबर सांगताच पुढचं न ऐकता तुम्ही तीन तीन वेळा गॅस नोंदताय.. मी काय करू?’’) बरं आणा तुमचा रेग्युलेटर आणि ५० रुपये.. नाही आमच्या माणसाबरोबर नाही देता येत नियमानं. तुम्हाला नाही येता येत तर मग पंतप्रधानांना पाठवू का? तुमच्याकडे रेग्युलेटर काढायला अन् बसवायला, त्यांच्या सरकारनं नियम केला म्हणून.. (फोन बंद करून, रजनीला) कुठं तक्रार करताय, काकू?
रजनी- गॅस कंपनीकडेच करते तक्रार, तुमच्या एजन्सीचा रेग्युलेटर बदलण्याची वेळ आलीय म्हणून.
श्रीपाद कुलकर्णी

उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांनी आपल्या संपत्तीचा तपशील द्यावा, अशी अट असल्यानं सर्व उमेदवार आपली संपत्ती उघड करत होते. या संपत्तीचे तपशील जसजसे प्रसिद्ध होऊ लागले तसतसा बादशहा अस्वस्थ झाला. एक दिवस हे सगळं असह्य झालं आणि त्यानं हा विषय बिरबलाकडे काढला. ‘बिरबला, हे सगळे तपशील झूठ आहेत, हे कळतं ना तुला? निव्वळ धूळफेक आहे ही.’ बिरबल म्हणाला, ‘खाविंद, उमेदवारांनी दिलेला सर्व तपशील तांत्रिकदृष्टय़ा अगदी अचूक आहे!’ बादशहा त्यावर जवळपास ओरडलाच, ‘अरे, तू काय बोलतो आहेस हे? त्या अमूक अमूकनं माझ्याकडे गाडी नाही आहे, असं लिहून दिलंय, ते खरं आहे? त्या तमूक तमूकनं आपली संपत्ती ५० कोटी आहे, असं म्हटलं आहे. एवढीच संपत्ती? आणि तेही तुला खरं वाटतं?’ बिरबल हसत हसत म्हणाला, ‘खाविंद, त्या उमेदवारांनी जो तपशील दिलाय तो तांत्रिकदृष्टय़ा अचूक आहे, असं म्हटलंय मी; तो सत्य आहे असं मी म्हणत नाही.’ आता बादशहाचा पारा जरा चढलाच, तो बिरबलाकडे जरा रागानंच पाहत म्हणाला, ‘मग आपण या सगळ्यांची चौकशी केली पाहिजे. एकेकाला तुरुंगात डांबलं पाहिजे.’ बिरबल बादशहाला शांत करत म्हणाला, ‘त्याचा काहीही उपयोग होणार नाही खाविंद. त्यांनी दिलेला तपशील अचूक आहे, असं निष्पन्न होईल आणि त्यातून आपलीच बेअब्रू होईल.’ बादशहा गोंधळला; ‘अरे पण तूच तर म्हणतो आहेस ना, सगळी माहिती खोटी आहे म्हणून!’ बिरबल बादशहाला समजावत म्हणाला, ‘हुजूर, ही सगळी मंडळी हुशार आहेत. आपली संपत्ती ते आपल्या नावावर ठेवत नाहीत. कायदे कसे वाकवावेत, हे त्यांना ठाऊक असतं.’ ‘मग या मंडळींना शिक्षा काय?’ बादशहा करवादून म्हणाला. बिरबलानं बादशहाचा हात धरला आणि म्हणाला, ‘खाविंद, माझ्यासोबत या.’ बादशहाला घेऊन बिरबल बाजारपेठेत गेला. एका नागरिकाला थांबवून बिरबलाने त्याला विचारले, ‘काय हो, ते अमूक तमूक म्हणतात, माझ्याकडे स्वत:ची कार नाही.’ यावर तो सामान्य माणूस गडगडाटी हसला आणि म्हणाला, ‘स्वत:ची कार नाही? स्वत:च्या अंगावर असलेले कपडे मालकीचे आहेत असे ते कबूल करतात, हे काय कमी आहे?’
बादशहानं प्रश्नार्थक चेहऱ्यानं बिरबलाकडे पाहिलं. बिरबल म्हणाला, ‘लोकशाहीमध्ये या उमेदवारांनी लोकांचाच विश्वास गमावला आहे, याहून मोठी शिक्षा कोणती?’
बादशहाला बिरबलाचं उत्तर पटलं. परंतु ते ऐकून त्याला नेहमीप्रमाणं आनंद झाला नाही. दोघे कितीतरी वेळ चुपचाप चालत राहिले!

भेट घडे आजला..
मतदानाच्या वाटेवरती, वचन दिले तू मला
पाच वर्षांनी खूण सापडे, ओळखले का मला?।।
वदलीस तू, मी ‘खावित्री’ मी
‘चांखुंतला’ मी, मी ‘दाम’यंती
‘भाव’ भिन्न अन् बोटी धोती
विजयाचा पूर तेधवा दिल्लीला पातला।।
अफाट ‘रम’तो जीव राजकारण
मते मिळविता कोठून मीलन
जीव भिकेला हा तुज वाचून
सभेमधुनी सुसाट फिरता भेट घडे आजला।।
- मुबारक शेख

बाकी शून्य कहाणी
भाटगिरीच्या खेळामधली राजा आणिक राणी
खुर्चीवरचा डाव भोंगळा बाकी शून्य कहाणी ।।धृ.।।
राजा वदला मला कळेना पैशावाचून भाषा
तुंबडय़ा भरुनी घेऊ आधी मग गुंडाळू गाशा
ह्य़ा शब्दांना उत्तर नव्हते जनता केविलवाणी ।।१।।
ढेकर देऊन वदला राजा टाका अवघड फासा
उद्या पहाटे दुसरा ‘बकरा’ दूज्या ब्रँडचा ‘मासा’
त्या राणीच्या डोळा दाटे चिकनसूपचे पाणी ।।२।।
त्या राणीने टिपले डोळे चिकन ‘तेज’ खाताना
त्या राजाचा श्वास कोंडला ड्रिंक नवे घेताना
तहान-भुकेने व्याकुळ जनता गाते आर्त विराणी ।।३।।
टॅक्स लावूया नव्या युगाचे म्हणते अवखळ राणी
जनता आपली जरी उपाशी खाऊ आपण लोणी
निमूट सारे ऐकून घेई जनता नेक इमानी ।।४।।
स्विस अकाऊंट भरून टाकू नको उद्याची चिंता
दूर विदेशी मजेत राहू हवा कशाला गुंता
दोघे वदती एकमुखाने गूढ अटळ ही वाणी ।।५।।
नको जागृती, नको चेतना, नको विचारशलाका
दडपून टाका शब्द प्रभेचे किरणे जखडून टाका
चला कापूया पंख ‘शिवा’चे लिहितो खवचट गाणी ।।६।।
- शिवाजी घुगे

खूप आम्ही चरणार..
खूप आम्ही चरणार आम्हाला
काय कुणाची भीती
देवघेव अन् पैशापायी
राज्य घेतलं हाती ।।धृ.।।
जिंकावं अन् राज्य करावं
हेच आम्हाला ठावं
पद मिळवावं मग मिरवावं
हेच आम्हाला ठावं
चाऱ्यासाठी कुरण ठरावी
अशी मिळावी खाती ।।१।।
देवघेव अन्..
बकासुराने आम्हा शिकविली
कारभाराची रीत
खुर्चीसंगं लगीन लागलं
जडली येडी प्रीत
लाख रुपय्ये खाऊन करितो
सोन्याची ही माती ।।२।।
देवघेव अन्..
लाल बत्तीची ऐटही येते
खुर्चीपाठोपाठ
दैवाचे हे रांजण अवघे
भरते काठोकाठ
सत्य अहिंस गाडून टाकू
सत्ता मिळता हाती ।।३।।
देवघेव अन्..
खूप आम्ही..
-शांता लागू

प्रा. विसरभोळे होस्टेलवर राहायचे त्यावेळची गोष्ट. आंघोळ झाल्यावर बाथरूममध्ये काही विसरायला नको म्हणून बाहेर निघण्याआधी पाच वस्तू/ कामे मोजायची सवय लावून घेतली होती. (डिजिटलचा जमाना नं.). म्हणजे नं. १) पेस्ट, २) साबण..
त्या दिवशी प्राध्यापक महाशयांना बाहेर पडायला उशीर होऊ लागला तसे त्यांच्या मित्रांना घाईयुक्त काळजी वाटायला लागली. मित्रांनी दारावर थाप मारून विचारले काय, झाली का आंघोळ? आम्हाला पण करायचीय.
प्राध्यापक उत्तरले चार वस्तू मोजल्यात पाचवी आठवत नाही. सर्व मित्र ताबडतोब ओरडले अहो पाचवी वस्तू म्हणजे आतली कडी काढायची राहिलीय..
आणि प्राध्यापक विसरभोळे, कडी काढून टुणकन उडी मारून बाहेर आले.
- रवींद्र सो. विभांडीक, नाशिक.

राणी (शिवानीला) अगं शिवानी, मी काल दिवसभर तुला फोन करण्याचा प्रयत्न करत होते, पण दर वेळी फोन लावला की ‘‘हा फोन नादुरुस्त आहे. कृपया काही वेळाने फोन करा,’’ असा संदेश यायचा. काय झालंय काय तुझ्या मोबाईलला?
शिवानी- अगं, तो माझा नवा रिंगटोन आहे.
- अशोक परशुराम परब, ठाणे (प.)

एक अतिश्रीमंत तरुण इस्पितळात ‘गंभीर अपघात कक्षात’ अ‍ॅडमिट होता. आठ-दहा दिवसांनंतर तिथं डय़ुटीवर असलेल्या गुलजार नर्सला तिच्या मैत्रिणीनं विचारलं, ‘‘काय गं? काही प्रोग्रेस?’’
‘‘छे: गं, अगं तो तसा नाहीय’’.
- पुष्पहास पुरेकर, नागपूर.

एक मित्र दुसऱ्या मित्राला फोन करतो.
पहिला मित्र- हॅलो, प्रकाश आहे का?
दुसरा- खिडकी उघडा प्रकाश येईल.
- पूजा आंबेकर, नगर.

काही सामाजिक कार्यकर्ते स्मशानाला कुंपण घालण्यासाठी वर्गणी जमा करत शेठ करोडीमलकडे गेले. शेठजी म्हणाले, स्मशानाला कुंपण घालायची काय गरज आहे? आतला काय बाहेर येणार नाय, आन बाहेरच्या माणसाला आत जायची घाई नाय.
- सचिन पाटील, श्रीगाव.

वय उलटलेल्या एका चित्रपट अभिनेत्रीने एका डॉक्टरांना आपल्या तक्रारी सांगितल्या. शरीरातील सगळी हाडे दुखायला लागलीत, रक्तदाब कमी झालाय, डोळ्यांनी कमी दिसू लागलंय, चालताना थकवा येतोय.
तुमचे वय काय? डॉक्टरांनी विचारले. पुढच्या महिन्यात मला २७ वर्षे लागणार आहे. अभिनेत्री म्हणाली.
असं! डॉक्टर गंभीरपणे म्हणाले, ‘‘याचा अर्थ तुमची स्मरणशक्तीही मंद पावत चाललीय’’.
- मधुकर चुटे, नागपूर

पहिला मित्र- तू इतकं चागलं पोहायला कुठे शिकलास?
दुसरा- पाण्यात.
-विनायक कोशे, डोंबिवली.

One day a florist goes to a barber for a haircut. After the cut he asked about his bill and the barber replies, 'I cannot accept money from you. I'm doing community service this week.' The florist was pleased and left the shop.
When the barber goes to open his shop the next morning there is a 'thank you' card and a dozen roses waiting for him at his door.
Later, a cop comes in for a haircut, and when he tries to pay his bill, the barber again replies, 'I cannot accept money from you. I'm doing community service this week.' The cop is happy and leaves the shop.
The next morning when the barber goes to open up there is a 'thank you' card and a dozen donuts waiting for him at his door.
Later that day, a college professor comes in for a haircut, and when he tries to pay his bill, the barber again replies, 'I cannot accept money from you. I'm doing community service this week.' The professor is very happy and leaves the shop.

The next morning when the barber opens his shop, there is a 'thank you' card and a dozen different books, such as 'How to Improve Your Business' and 'Becoming More Successful.'
Then, a Member of Parliament comes in for a haircut , and when he goes to pay his bill the barber again replies, 'I cannot accept money from you. I'm doing community service this week.' The Member of Parliament is very happy and leaves the shop.
The next morning when the barber goes to open up, there are a dozen Members of Parliament lined up waiting for a free haircut.
अनिल देवसेकर
anil@sankalpan.com