Leading International Marathi News Daily
रविवार, १९ एप्रिल २००९

१९५७ मध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. व्ही. एस. वाकणकर (विक्रम युनिव्हर्सिटी, उज्जन) यांना उज्जन-भोपाळ प्रवास करताना भीमबेटक्याचे अतिभव्य शिलाशृंग दिसले. विनायक, भोरनावली, भीमबेटका, लाखा जुआर (पूर्व), लाखा जुआर (पश्चिम), जोन्ड्रा, मुनी बाबाकी पहाडी अशी त्यांची वर्गवारी १९७४ साली डॉ. वाकणकरांनी केली. एकूण ६४२ खंडहर किंवा गुंफा तेथे असून त्यापैकी ५५ टक्के म्हणजे साधारणपणे ४०० गुंफा या रंगवलेल्या आहेत. लाल-पांढऱ्याव्यतिरिक्त हिरवा व पिवळा अशा रंगांमध्ये असलेली ही एकमेवाद्वितीय अशी जगातली अतिशय महत्त्वपूर्ण शिलाचित्रे आहेत. युनेस्कोने नोंदविलेल्या जगातील ‘२४ वर्ल्ड हेरिटेज साइटस्’मध्ये भीमबेटक्याचा उल्लेख व स्थान आहे.
कलानां प्रवरं चित्रं धर्मकामार्थ मोक्षदम् ।
मंगल्यं प्रथमं चैतद् गृहे यत्र प्रतिष्ठितम् ।।

(विष्णु धर्मोत्तर पुराण) (७०० अ.ऊ.)
‘कलांमध्ये सर्वोत्तम स्थान चित्रकलेला आहे, जे धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे चारही पुरुषार्थ प्रदान करते. घरात आपण जिथे चित्रे प्रस्थापित करतो, त्याने सारेच वातावरण मंगलमय होते.’ सातव्या शतकातील विष्णुधर्मोत्तर पुराणातील हा श्लोक प्रागैतिहासिक काळातील आदिमानवालाही जाणिवेच्या पातळीवर स्पर्श करून गेला असावा, असे भीमबेटक्याच्या गुंफांमधील शिल्पचित्रे पाहताना जाणवते. चित्रकलेचा प्रवास हा पुराश्मयुगातील Paleolithic शिलाचित्रांपासून सुरू झाला असं निर्विवाद म्हणता येईल. जगातील पहिले चित्रकार अश्मयुगात होऊन गेले, लिहिण्याची कला अस्तित्वात नसल्याने त्या अनाम चित्रकारांची नावे आज ठाऊक नाहीत. पण पुढच्या हजारो पिढय़ांना मार्गदर्शक ठरतील अशी चित्रे व खोदकामाचे नमुने (Petroglyphs) खंडहरांवर काढून अमर केले. अश्मयुगात
 

कागदांचा शोध नव्हता त्यामुळे दगडांवर, प्रस्तरांवर चित्रे खोदलेली किंवा काढलेली आढळतात. ऑस्ट्रेलियातील काकडू नॅशनल पार्कमध्ये, कलहारीच्या वाळवंटातील बुशमेननी काढलेली चित्रे, फ्रान्समधील लॅसॅक्सच्या गुंफांमधील अश्मयुगीन चित्रे अशी जगाच्या अनेक भागात प्रागैतिहासिक काळातील चित्रे आढळतात.
पूर्वेतिहास
भारतातच साधारणपणे १५० ठिकाणी शिलाचित्रांचे प्रस्तर, भिंती किंवा गुंफा आढळतात, त्यातील बहुतेक सर्व मध्यभारतातच आहेत. त्यातील सर्वात प्रेक्षणीय आणि भव्य अशी शिलाचित्रे विन्ध्य पर्वताजवळ भीमबेटका येथे आहेत. १९८८ साली प्रो. डब्ल्यू. किंकेड यांनी भोजपूरचा इतिहास सांगताना, त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाचा वेध घेताना आपल्या शोधनिबंधात ‘भीमबेटका या बौद्धधर्मीय गुंफा असाव्यात’ अशी नोंद केलेली आढळते. त्यानंतर साधारणपणे ७० वर्षांनंतर १९५७ मध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. व्ही. एस. वाकणकर (विक्रम युनिव्हर्सिटी, उज्जन) यांना उज्जन-भोपाळ प्रवास करताना भीमबेटक्याचे अतिभव्य शिलाशृंग दिसले, त्यांचा शोध घेत ते भोपाळपर्यंत व पुढे भोपाळपासून दक्षिणेकडे ४०/४५ कि.मी. वर भीमबेटक्याच्या ६४२ गुफांपर्यंत येऊन पोचले. साधारणपणे १९५८ ते १९७४ या काळात या सर्व गुंफा धुऊन, स्वच्छ करून त्यातील प्रागैतिहासिक शिलाचित्रांवर त्यांनी आपले संशोधन सादर केले आणि जगासाठी आदिमानवाने रेखाटलेले, कोरलेले व मुक्त छंदात विहरणारे कला-दालन अभ्यासकांव्यतिरिक्त इतरांसाठी खुले केले. एकूण सात डोंगर समूहात हा परिसर विभागला जातो. विनायक, भोरनावली, भीमबेटका, लाखा जुआर (पूर्व), लाखा जुआर (पश्चिम), जोन्ड्रा, मुनी बाबाकी पहाडी अशी त्यांची वर्गवारी १९७४ साली डॉ. वाकणकरांनी केली. एकूण ६४२ खंडहर किंवा गुंफा तेथे असून त्यापैकी ५५ टक्के म्हणजे साधारणपणे ४०० गुंफा या रंगवलेल्या आहेत. लाल-पांढऱ्याव्यतिरिक्त हिरवा व पिवळा अशा रंगांमध्ये असलेली ही एकमेवाद्वितीय अशी जगातली अतिशय महत्त्वपूर्ण शिलाचित्रे आहेत. युनेस्कोनी नोंदविलेल्या जगातील ‘२४ वर्ल्ड हेरिटेज साइटस्’मध्ये भीमबेटक्याचा उल्लेख व स्थान आहे. एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवणाऱ्या या गुंफा मध्य प्रदेशची राजधानी असणाऱ्या भोपाळच्या दक्षिणेला तासा-दीड तासाच्या अंतरावर आहेत. तिथे ५०/६० गर्द झाडीने वेढलेल्या खंडहरांचे समूह लागतात, ज्यावरची चित्रे साधारणपणे १००० ते ३५००० वर्षांपूर्वीची आहेत, अशी नोंद संशोधकांनी केलेली आढळते. शिवाय तेथे ब्राह्मी लिपीतील काही मजकूर दगडांवर कोरलेले आढळतात. खूप नंतर राजा भोजाने तिथेच जवळ एक शिव मंदिर बांधले, त्या अर्थवट मंदिराचे अवशेष आजही भोजपूर येथे पाहायला मिळतात, जवळच त्याने बांधलेला एक प्रशस्त तलाव आजही तिथल्या शेतीवाडीची गरज भागवतो आहे.
भीमबेटक्याच्या खंडहरांमध्ये सुंदर असा सॅण्डस्टोन आढळतो, जो कोरीव काम करण्यासाठी किंवा राहण्यासाठी अतिशय योग्य असा वाटतो. या गुंफांमधील चित्रे पाहताना आपण एकविसाव्या शतकात वावरतोय याचाही विसर पडतो. डोळ्यांत आणि मनात न मावणाऱ्या अशा अवाढव्य अक्राळविक्राळ आणि भव्य खंडहरांचे दर्शन त्याच्या प्रवेशद्वारातून आत जातानाच आपला संपूर्ण ताबा घेऊन टाकते.
लोकजीवन
भीमबेटक्याच्या गूढरम्य जागेत पुराश्मयुगापासून मनुष्य वस्ती होती. दगडाचीच जमीन आणि दगडाचेच छप्पर व भिंती अशा कपारीत त्यांची आश्रयस्थाने होती. साग, अमलताश, बेल, बोर, जांभूळ, महुआ, पळस, शिसम, टेंडू, चिंच, कडुनिंब, पिंपळ अशा वृक्षराजीने वेढलेल्या घनदाट जंगलात आणि वन्य पशुजीवनाच्या सान्निध्यात शिकार करून उपजीविका करीत होते. आत वाहणारे छोटे-छोटे ओहोळ, झरे, पाण्याची गरज भागवीत होते.
पुढे डॉ. वाकणकरांच्या नेतृत्वाखाली भीमबेटक्याच्या गुंफांचे जेव्हा साधारण १४ ते १६ वर्षे उत्खनन व अभ्यास झाला तेव्हा अनेक गोष्टी जगासमोर आल्या. दगडांची वेगवेगळ्या काळात वापरली गेलेली हत्यारे सापडली. ती एकत्र करून तिथेच एका कोपऱ्यात ती कालक्रमणेनुसार नोंदवून, पाहण्यासाठी मांडलेली आहेत. पुराश्मयुगात झाडावरची फळे तोडायला आणि शिकार करायला त्याला हत्याराची गरज पडत होती. विशिष्ट प्रकारच्या दगडाच्या कपच्या व प्राण्यांच्या हाडांच्या तीक्ष्ण टोकदार हत्यारांना लाकडाच्या मुठी करून शस्त्रे वापरली जात होती. या शस्त्रांविषयी अजून एक मजेशीर संदर्भ सापडतो. मृत शरीराजवळ मातीत पुरताना त्या शेजारी बाण, भाले, व छोटी हत्यारे ठेवायला तो विसरला नाही. या संदर्भात विचार करता मरणोत्तर आयुष्यावरचा त्याचा विश्वास किती दृढ होता, हे स्पष्ट दिसून येते.
मुक्त कला-दालन
भीमबेटक्याच्या अक्राळविक्राळ अतिभव्य गुंफा प्रागैतिहासिक काळातील आदिमानवाचे मुक्त कला-दालनच होय. त्यावर ५० हजार वर्षांपूर्वीचा चित्र इतिहास एकान्वयाने भेटतो. एकूण ६४२ गुंफांपैकी साधारणपणे ४०० च्या आसपासच्या गुंफांमध्ये रंगीत चित्रे आढळतात. हिरवा, पिवळा आणि रंगांच्या नानाविध छटा असणारी ही चित्रे फक्त भारतातच आढळतात. साधारणपणे २००० वर्षांपासून ते ३५०००- ५०००० वर्षे एवढा प्राचीन कालखंड या चित्रकारितेतून उलगडला जातो. ज्यामध्ये अनेक चित्रशैली भेटतात आणि त्या सात खंडांमध्ये विभागता येतात. काही ठिकाणी तर एकाच प्रस्तरावर पुन:पुन्हा काम केलेले दिसते. कदाचित त्या विशिष्ट जागा विशेष किंवा पवित्र वाटत असाव्यात. ही चित्रे काही केवळ गुंफा सजविण्यासाठी किंवा करमणुकीसाठी काढली असतील असं वाटत नाही. अश्मयुगातील या कलाकारांनी दगडाच्या पृष्ठभागावर, भिंतीवर किंवा दगडाच्याच छतावर चित्रकारी केलेली आढळते. काही चित्रे जिथे माणूस राहत होता, अशा ठिकाणी काढलेली तर काही शिलाखंडाच्या किंवा गुंफेच्या दर्शनी भागावर कोरलेली व चितारलेली दिसतात. ही गूढ चित्रे सामान्यपणे माणसाच्या तर्काला आव्हान करताना दिसतात. विशिष्ट जागा, शिलाखंड गूढ - जादुई तर वाटतातच तर कधी कधी धार्मिक विधींसाठी वापरात असावीत अशी रेखाटने दिसतात. काही ठिकाणी दु:ख विसरण्यासाठी तर कधी समर्पणभावाने परमशक्तीला समर्पित वाटतात. या चित्रांवरून त्यांची जीवनशैली व मानवी उत्क्रांतीचा आलेख उलगडताना दिसतो. काही चित्रांमधून कथा सांगायचा अट्टाहास तर भय, आनंद, काळजी अशा संमिश्र भावनांचे चित्रणही त्यात आढळते.
चित्रविचार
या प्रवासात पुराश्मयुगापासून ताम्रपाषाणयुगापर्यंत माणसाने ब्रश म्हणून खारीच्या शेपटय़ा, फर, मऊ लाकूड इत्यादीचा वापर केलेला आढळतो; तर बऱ्याच चित्रांमध्ये हाताच्या बोटांचा वापरही केलेला दिसतो. विशेषत: मध्याश्मयुगापासूनच्या चित्रांमध्ये २१ प्रकारच्या रंगछटा वापरलेल्या आढळतात. अर्थातच लाल-पांढरा अधिक प्रमाणात वापरलेला आढळतो. हिमेटाईटपासून लाल गेरू, चालस्डोनीपासून हिरवा, चुनखडीपासून पांढरा आणि काही खनिजांपासून बाकीचे रंग वापरलेले दिसतात. शिवाय हे रंग प्राण्यांची चरबी किंवा झाडांचा डिंक यात खलून वापरल्याने हजारो वर्षे ऊन, वारा, पाऊस, हवा या साऱ्याला तोंड देत आजही शाबूत आहेत. मध्य अश्मयुगातील चित्रांमध्येही समूहा-समूहानी शिकारीसाठी फिरणे बऱ्याच चित्रांमधून दिसते. हिंस्र प्राण्यांना पकडण्यासाठी सापळे व जाळ्यांसारखे विणलेले दोर, इत्यादी चित्रांमधून दिसतात. विशेष म्हणजे चेहऱ्याच्या सुरक्षेसाठी मुखवटे, पिसांचे मुकूट, शिंगे, झाडांच्या साली, पाने इत्यादीचा वापर केलेला दिसतो. प्राण्यांचे चित्रं जशीच्या तशी काढण्याकडे कल दिसतो. या चित्रांमध्ये प्राण्यांची रेखाटने भव्य तर त्यांच्या पुढे माणसांची रेखाटने खुजी छोटी व दुर्लक्षिलेली वाटतात. कधी कधी प्राण्यांच्या चित्रीकरणामध्ये आरपार दिसणारे अनेकविध तपशील भेटतात आणि आपल्याला थक्क करून टाकतात (X-ray type painting) कदाचित X-ray चा शोध पुढे जाऊन माणसाला याच संकल्पनांमधून लागला असावा.
हरिणाच्या पोटात हत्ती किंवा हरिणाच्या पोटात हरिण किंवा भुकेले हरिण दाखविताना पोटाचा भाग पूर्ण रिकामा, अतिशय स्वाभाविक अशीही चित्रे नवनव्या संकल्पना आणि स्वतंत्र विचारशक्तीची चुणूकच दाखवतात. शिकारीच्या चित्रांमध्ये प्राण्यांविषयीची भीती तर इतर काही चित्रात वात्सल्य, प्रेम अशा भावभावनांचे मिश्रण दिसते. तर कधी ससे, वाघ, चित्ते, हरिणे आपल्या पिलांबरोबर खेळतानाही दिसतात.
प्राण्यांची चित्रे काढताना खूप बारकाव्यांनिशी ती काढलेली आढळतात. तर माणसांची चित्रे काडेपेटीतील काडय़ांप्रमाणे हातापायाची रेखाटने, स्त्रिया थोडय़ाशा जाड रेघांनी किंवा क्वचित कुठे भरीव काढलेल्याही आढळतात. मुले खेळताना, पळताना, उडय़ा मारताना तर माणसेही नाचताना दिसतात. ड्रम किंवा ढोलक अशा वाद्यांचा समावेशही त्यात दिसतो. काही चित्रांत झाडांवरचा मध गोळा करताना, स्त्रिया दळताना आणि अन्न तयार करताना तर काही चित्रांमध्ये मुलं, स्त्रिया, पुरुष एकत्रही दिसतात. माणूस समूहाने राहत होता त्याची ती निशाणी दिसते. अनेक गुंफांमधून हाताचे ठसे, बोटांनी काढलेले ठिपके, चौकोन, त्रिकोण, गोल असे ग्राफिक आकार अशी गुंफण केलेली दिसते. आजही भारताच्या अनेक भागात हीच अभिव्यक्ती सणासुदीला चितारलेली दिसते. ‘पुन: चित्रणाचा आनंद’ त्याच त्याच जागांवर चित्र काढताना दिसून येतो. संशोधकाच्या मते त्याच त्याच जागेवर चित्र काढल्यामुळे काही ठिकाणी एकावर एक वीस-वीस थरही काढलेले सापडतात. प्रश्न असा पडतो की, एवढी अवाढव्य जागा असताना एकावर एक चित्रं काढायचा नेमका उद्देश काय असावा? कदाचित त्या विशिष्ट जागा भारलेल्या किंवा पवित्र असाव्यात. कारण काही चित्रांमध्ये तर शिकार यशस्वी व्हावी म्हणून विधिपूर्वक केलेले चित्रांचे सादरीकरण दिसते.
आताही सर्व चित्रे पुराश्मयुगातील की आधुनिक काळातील म्हणजे १०००/२००० वर्षांपूर्वीच्या माणसाने काढलेली आहेत असा प्रश्न ही चित्रे पाहणाऱ्या कुणालाही पडू शकतो. परंतु भीमबेटक्याच्या गुंफांमध्ये काढलेली चित्रे वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या शैलीत व विविध संकल्पनांच्या आधारे काढलेली दिसतात. थोडं बारकाईनं पाहिलं तर अनेक तपशील सापडतात. पूर्वी समूहाने शिकार करणारा माणूस नंतरच्या कालखंडात एकटाच शिकार करताना दिसतो. माणसं घोडय़ांवरच नव्हेत, तर रथांमधूनही जाताना दिसतात. सैनिक, युद्धे, वेशभूषा, केशभूषा अशा नानाविध विषयांचा बदलता आलेख आणि बदलती जीवनशैली यातून दिसते. मध्याश्म युगात टोळ्यांमधील युद्धाची चित्रे दिसतात; तर दुसरीकडे दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी एकत्र नाचताना दिसतात. अशा रेखाटनांमध्ये मुखवटे घालून किंवा काडय़ांसारखी एकेरी रेखाटने केलेली दिसतात. स्त्री-पुरुषांना एकाच प्रकारचे कपडे घातलेले दिसतात. या चित्रांचा अभ्यास करताना कितीतरी रहस्ये स्वत:हून उलगडत गेली. तरीही 'There is yet no method, to date rock pictures directly' असं Le Roi Gorhan यांनी भारतीय शिलाचित्रांचा अभ्यास करताना आपलं मत नोंदवले आहे. तरीही हा चित्रप्रवास साधारणपणे सात प्रमुख कालखंडांत झालेला दिसतो. कालनिश्चितता ही चित्रांबरोबर जिथे लिपी आणि चित्रे एकत्र आढळतात तिथे निश्चित चांगल्या प्रकारे ठरवता येते. ते कालखंड खालीलप्रमाणे-
१) उत्तर पुराश्म युग शेवटचा टप्पा (Upper Paleolithic Era) - या कालखंडातील चित्रांमध्ये रेषाकृती आढळतात. चित्रांमध्ये हिरव्या आणि लाल रंगछटा आढळतात, तर अवाढव्य आकाराचे प्राणी दिसतात. उदा. जंगली बैल, वाघ, गवे, ऱ्हाइनासोरस इ.
२) मध्याश्म युग (Mesolithic Era) - या काळातील चित्रे पुराश्म युगाच्या मानाने आकारांनी छोटी आढळतात. प्राण्यांव्यतिरिक्त माणसांचे समूह, शिकारीची दृश्ये आणि वापरातील शस्त्रे दिसतात. धारदार, टोकदार, भाले, धनुष्यबाण इ. समूह नृत्ये, पक्षी, वाद्ये, आई आणि मूल, गरोदर स्त्री, शववाहन, मद्यपान इ. हे चित्रांचे विषय आढळतात.
३) ताम्रपाषाण युग (Chalcolithic Era) - चित्रांप्रमाणेच या काळात ताम्रपाषाण युगातील मृद्भांडी घट आढळतात, तर गुंफांमध्ये राहणारी माणसे बाहेरच्या माळव्यातील इतर शेती करणाऱ्या लोकांच्या संपर्कात आलेली दिसतात आणि एकमेकांशी शस्त्रे आणि अन्न यांचा व्यवहार करताना दिसतात.
४/५) प्राचीन ऐतिहासिक काळ (Early Historical Era) - या काळातील चित्रे संकल्पनांवर आधारित आणि अलंकृत आढळतात. ती लाल, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगांनी रंगवलेली आढळतात. घोडेस्वार, धार्मिक सुचिन्हे, विविध प्रकारचे कपडे आणि वेगवेगळ्या लिप्यांचा वापरही आढळतो. धार्मिक श्रद्धा चित्रातून स्पष्ट दिसतात. यक्ष, वृक्षदेवता, आकाशस्थ उडणारे जादूचे रथ इ.
६/७) मध्य युग (Medieval Era) - या काळातील चित्रे भौमितिक आकारात दिसतात. रेखाकृती, संकल्पना चित्रे आणि कलात्मकतेचा अभाव असणाऱ्या चित्रशैली प्रचलित दिसतात. गुंफांमध्ये चित्रे रंगवणाऱ्या माणसांनी मॅगेनिज हिमटाइट, मऊ लाल दगड आणि लाकडाचा कोळसा असे रंग वापरलेले दिसतात. हे रंग झाडपाल्याचा रस किंवा कधी प्राण्यांच्या चरबीमध्ये खलून वापरलेले दिसतात. त्यामुळे एवढय़ा रासायनिक बदलातूनही ते आजवर टिकून आहेत. १९७३ साली प्रथमत: या गुंफांसंबंधीची माहिती उजेडात आली. आणि त्यानंतर त्याविषयी कुतूहल, चर्चाना सुरुवात झाली. मग जगाचे डोळे इकडे वळले. अल्ला मिराच्या गुंफांविषयी भरभरून बोलणाऱ्या तुम्हा-आम्हालाही समजले की, त्याहूनही जुन्या किंवा त्याही आधीच्या मानवी जीवनशैलीचा वेध घेणाऱ्या गुंफा भारतातच आहेत. तेव्हा अशा या भीमबेटक्याच्या गुंफा आपण एकदा तरी पाहायलाच हव्यात. अन्यथा पुराश्म युगापासूनच्या मानवी प्रगतीचा आलेख आपल्याला कोण कथित करील? आजच्या संगणक युगाचा वेग काही अचानक आलेला नाही. त्यासाठी आपल्या या पूर्वजांचे ऋणही आपल्याला मानावे लागतील. प्रत्येकाची जीवनाचा आस्वाद घ्यायची आणि जीवन आकलनाची कुवतही वेगळी. तेव्हा बुद्धीचा विकास कसा होत गेला याचेही सर्व सूक्ष्म दुवे या चित्रांमध्ये थेट सापडतात, ते असे -
१. काळाचा विसर - भीमबेटक्याच्या शिलाखंडामधील चित्रांमध्ये पाहणाऱ्याला उत्तर पुराश्म युगात घेऊन जाण्याची ताकद आहे. इथे आल्यावर क्षणभर तरी आपण एकविसाव्या शतकात आहोत याचा विसर पडतो.
२. शिलाखंड हेच चित्रांचा कॅनव्हास - साधारणपणे २००० वर्षे ते ३५००० वर्षे असा प्रदीर्घ कालखंडातील मानवी उत्क्रांतीचा इतिहास शिलाखंडाच्या माध्यमातून चितारलेला दिसतो. चित्रांमध्ये जगातील इतर शिलाचित्रांप्रमाणेच लाल आणि पांढऱ्या रंगाचा अधिक वापर, परंतु हिरवा, पिवळा, निळा अशा साधारणपणे १५/२० छटांचा समावेश (Pigmented rock art)
३. अचल वन्यप्राणी संग्रहालय - भीमबेटका हे मुक्त कलादालनाबरोबरच पुराश्म ते मध्ययुगीन न हालणाऱ्या प्राण्यांचे प्राणीसंग्रहालयच, कारण इथे भव्य शिलाखंडांवर भव्य प्राणी चितारलेले आहेत. हत्ती, हरिण, बैल, गेंडे, गवे इ. कितीतरी.
४. शिलाखंड व त्यांचे वैविध्यपूर्ण आकार- इथे कोरलेली चित्रे (petroglyph) व रंगवलेली चित्रे(rock paintings) एवढेच फक्त इथले आकर्षण नाही तर वैविध्यपूर्ण दगडांचे आकार नुसत्या गुंफाच नव्हे तर वरून लोंबकळल्यासारखे वाटणारे (overhanging rocks) अतिभव्य व क्वचित भितिदायक वाटणारे शिलाखंड.
५. वर्ल्ड हेरिटेजच्या अंतर्गत समावेश - २००३ मध्ये युनेस्कोनी या गुंफांना जगातील २४ महत्त्वाच्या वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा दिला.
या संस्मरणीय गुंफा आणि त्याचा मानवी आयुष्याशी निगडित असा अनन्वित वारसा बांबू आणि सागाच्या वृक्षराजींनी गेली अनेक र्वष सांभाळला. तर मग एव्हाना तुमचा निर्णय झालाच असेल भीमबेटक्याचे अनोखे कलादालन पाहण्याचा!
भारती माटे
bharati.taoarts@gmail.com

प्रश्नमंजूषा क्रमांक ६
(राजहंस प्रकाशनाच्या सहकार्याने)
उत्तरे
१. विक्रम सेठ यांच्या ‘अ सुटेबल बॉय’ या इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला?
उत्तर : ब. राजहंस. विक्रम सेठ यांच्या विक्रमी मानधन मिळवलेल्या ‘सुटेबल बॉय’ या बृहद इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद अरुण साधू यांनी ‘शुभमंगल’ या नावाने केला. तो राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केला होता.
२. ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीच्या लेखकाचे हे नाटक आहे-
उत्तर : ड. बेड टाइम स्टोरी. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रभावी लेखन करणाऱ्या किरण नगरकरांची ‘सात सक्कं त्रेचाळीस’ ही कादंबरी १९७४ साली प्रकाशित झाली. ‘बेड टाइम स्टोरी’ हे अनेक वर्षे बंदी असलेले नाटक महाभारताचा नव्याने अर्थ लावते. विशेषत: अस्पृश्य, आदिवासी आणि स्त्रियांच्या दृष्टिकोनातून.
३. ‘कोबाल्ट ब्ल्यू’ या कादंबरीच्या लेखकाचे हे नाटक आहे-
उत्तर : क. फ्रीझमध्ये ठेवलेले प्रेम. सचिन कुंडलकर या ताज्या दमाच्या तरुण लेखकाची ‘कोबाल्ट ब्ल्यू’ ही कादंबरी. त्याने दिग्दर्शित केलेले ‘द बाथ’, ‘रेस्टॉरंट’ सारखे चित्रपट आणि ‘फ्रीझमध्ये ठेवलेलं प्रेम’सारखी नाटके प्रसिद्ध आहेत.
४. ‘जी. ए. कुलकर्णी यांची वैयक्तिक व वाङ्मयीन जीवनकथा’ असे उपशीर्षक असणारी चरित्रात्मक कादंबरी कोणती?
उत्तर : ब. गूढयात्री. विद्या सप्रे- चौधरी या जीएंच्या शिष्येने लिहिलेले गूढयात्री हे पुस्तक जी. ए. कुलकर्णी यांच्या जीवनाचे पदर त्यांच्या साहित्याच्या आधारे उलगडते.
५. म. द. हातकणंगलेकर यांनी संपादित केलेल्या जी. ए. कुलकर्णी यांच्या कथासंग्रहाचे नाव काय?
उत्तर : अ. डोहकाळिमा. जीएंच्या सुरुवातीच्या चार कथासंग्रहातल्या निवडक कथांचे संपादन डोहकाळिमा या नावाने दीर्घ प्रस्तावनेसह हातकणंगलेकर यांनी केले.
खालील पात्रे ज्या नाटकात आहेत त्या नाटकाचे लेखक कोण?
६. प्रज्ञा, केबी, जगदीश, बीसी
उत्तर : क. श्याम मनोहर, यकृत, हृदय यासारखी अनोखी नाटके लिहिणाऱ्या श्याम मनोहर यांच्या ‘प्रेमाची गोष्ट?’ या नाटकातली ही पात्रे. डॉक्टर लागू आणि निळू फुले यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका होत्या.
७. खुदाबक्ष, पद्माकर, भगीरथ, गीता
उत्तर : ड. गडकरी. शब्दप्रभू राम गणेश गडकरी यांच्या अत्यंत गाजलेल्या ‘एकच प्याला’ या शोकांतिकेतली ही पात्रे. सुधाकर या वकिलाच्या जीवनाची मद्यपानाच्या व्यसनाने झालेली वाताहत गडकऱ्यांनी प्रभावीपणे या नाटकात रेखाटली आहे.
८. कमलाकर आराध्ये, विमला आराध्ये, कचऱ्या धिवार, देवयानी
उत्तर : ब. संजय पवार. ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ या संजय पवारांच्या नाटकातली ही पात्रे आहेत. उपेंद्र लिमये या गुणी नटानं या नाटकात कचऱ्या धिवराची प्रभावी भूमिका केली होती.
९. भुजंगनाथ, भद्रेश्वर, वल्लरी, कांचनभट
उत्तर : अ. देवल. ‘संगीत शारदा’ या गोविंद बल्लाळ देवलांच्या गाजलेल्या नाटकातली ही पात्रे. जरठ-कुमारी विवाहाचा उपहास करणारे हे नाटक.
खालीलपैकी कोणते नाटक दिलेल्या नाटककाराचे नाही?
१०. महेश एलकुंचवार
उत्तर : क. दीपस्तंभ. युगांत या त्रिनाटय़धारेला साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या महेश एलकुंचवार यांचे दीपस्तंभ हे नाटक नाही. ते नाटक प्र. ल. मयेकर यांचे होय.
११. मकरंद साठे
उत्तर : ड. कोण म्हणतं टक्का दिला? ‘अच्युत आठवले आणि आठवण’ आणि ‘ऑपरेशन यमू’सारख्या कादंबऱ्या लिहिणाऱ्या मकरंद साठय़ांची नाटके प्रायोगिक रंगभूमीवर विशेष गाजली. ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ हे मात्र संजय पवारांचे नाटक.
१२. रत्नाकर मतकरी
उत्तर : क. प्रतिबिंब. वाङ्मयाचे कथा, कादंबरी, नाटक असे विविध प्रकार हाताळणाऱ्या मतकरींची अनेक नाटके रंगभूमीवर विशेष गाजली. मात्र प्रतिबिंब हे नाटक त्यांचे नसून महेश एलकुंचवारांचे आहे.
विजेत्यांना ‘राजहंस’ प्रकाशनातर्फे
प्रथम - रुपये १००० ,
द्वितीय- रुपये ५००, आणि
तृतीय- रुपये ३०० अशी बक्षिसे दिली जातील.
अकरा किंवा त्याहून जास्त उत्तरे बरोबर देणाऱ्या सर्व स्पर्धकांना राजहंस प्रकाशनातर्फे सवलत कुपनांची भेट दिली जाईल.