Leading International Marathi News Daily
रविवार, १९ एप्रिल २००९

मुलांच्या कल्पनेतील बोक्या सातबंडे प्रत्यक्षात कसा दिसावा, याची चाचपणी करण्यासाठी चित्रपटकर्त्यांनी राज्यस्तरावर बोक्याचं कॅरिकेचर (अर्कचित्र) काढून पाठवा, अशी स्पर्धा मुलांसाठी आयोजित करण्यात आली होती. याअंतर्गत मुलांनी चितारलेल्या बोक्याशी मिळताजुळता बोक्या शोधण्यासाठी मग शोध सुरू झाला.. आणि अखेरीस बोक्या सातबंडे या व्यक्तिरेखेला साजेसा अवखळ, साहसी, खोडकर नि हुशार अशी सारी विशेषणं ज्याला शोभून दिसतील, असा आर्यन नार्वेकर बोक्याच्या भूमिकेसाठी निवडला गेला. लहान मुलांचा नि लहान मुलांसाठी हे बिरूद मिरवणारा हा चित्रपट खरोखरीच लहान मुलांचाच व्हावा, यासाठी दिग्दर्शक, निर्माता नि ज्येष्ठ अभिनेत्यांनी विशेष काळजी घेतली. म्हणून आर्यनसह आलोक राजवाडे, निशा, अभिषेक, रोहित, पाश्र्व, विघ्नेश, अथर्व, मिहीर, पराग, तनिष्क, हितेश,
 

चिन्मय, रिद्धी, पार्थ, गौरव, श्रुती, कोमल, हृषिकेश या साऱ्या मुलांच्या टीमचं परस्परांशी टय़ुनिंग एकदम झकास जुळलं. आर्यनने हा डायलॉग असाच म्हणायला हवा, अस्साच अभिनय करायला हवा, असा आग्रह दिग्दर्शक राज पेंडुरकर यांनी कधीच केला नाही. उलट या व्यक्तिरेखेला आवश्यक असलेलं स्वातंत्र्य नि अवकाश त्यांनी नेहमीच या साऱ्या वानरसेनेला दिला. मुलांना कम्फर्टेबल वाटेल, असं वातावरण सेटवर ठेवलं आणि इतक्या मुलांसोबत काम करताना अर्थातच आवश्यक असलेला शांतपणा नि सहनशक्तीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होतीच.
या चित्रपटाच्या निमित्ताने आर्यन पहिल्यांदाच कॅमेऱ्यापुढे उभा राहिला. चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल त्याला फारशी माहिती नसल्यामुळे त्याला कॅमेऱ्याला सामोरं जातानाच दडपणही आलं नाही. चित्रपट हा दिग्दर्शकाचाच असतो, असं मानणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांनी चित्रपटासाठी म्हणून पुस्तकात आवश्यक असलेले बदल करण्यास आक्षेप घेतला नाही आणि आवश्यक तिथेच बदल करण्याचं स्वातंत्र्य दिग्दर्शकानेही जाणतेपणाने स्वीकारलं. आर्यनसोबत काम करणारी दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे, शुभांगी गोखले ही सारी मंडळी रंगभूमीवरची असल्यामुळे या साऱ्यांची धारणा ही आर्यनचा अभिनय हा उत्स्फूर्त असावा, हीच होती. हेही आर्यनच्या पथ्यावर पडलं.
या चित्रपटातील आर्यनच्या भूमिकेचं कौतुक झालं नि त्याला आणखी ऑफर्स आल्या तर.. या प्रश्नावर आर्यनची आई आणि ‘बोक्या सातबंडे’ या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या असिता नार्वेकर म्हणाल्या की, त्याने चित्रपटातील कामांकडे करिअर या दृष्टीने पाहायला हवं. मात्र त्या कामाचं महत्त्व कळायचं त्याचं आता वय नाही. त्याचं बालपण त्यानं मस्तपैकी एन्जॉय करायला हवं आणि अर्थात त्याने अभिनय हा शिक्षण सांभाळून करायला हवा. आर्यनला बाबांचा अर्थात अभिनेता संजय नार्वेकर याचा पाठिंबा हा आहेच. काही अडलं तर बाबा आहे, हे आर्यनला माहीत असतं. संजय ‘बोक्या..’च्या सेटवर एकदाच गेला. संजयने चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकावर पूर्ण विश्वास दाखवत आर्यनने अभिनय कसा करावा, याबाबत संजयने आर्यनला मुळीच पढवलं नाही.
या चित्रपटाच्या निर्मात्या कांचन सातपुते या पुण्यातील एका शिक्षणसंस्थेत प्राध्यापिका आहेत. मुलांसाठी काहीतरी करायचं, हल्लीची मुलं मराठी पुस्तकं कमी वाचतात, मुलांना वाचावंसं वाटलं पाहिजे, अशा भावनेतून त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होतोय, त्या दिवशी ‘राजहंस प्रकाशन’तर्फे ‘बोक्या सातबंडे’ची १२वी आवृत्ती प्रकाशित होतेय, हीदेखील आणखी एक जमेची बाजू.
मुलांच्या खाण्याची विशेष काळजी या शूटिंगदरम्यान घेतली गेली. मुलांच्या शाळा, परीक्षा यांचं वेळापत्रक लक्षात घेऊन चित्रपटाचे सीन्स डिझाइन केले गेले. पुण्यातील डीएसके विश्व आणि डीएसके स्कूल इथे चित्रपटाचं शूटिंग झालं. या चित्रपटादरम्यान पालकांचंही मोठं सहकार्य लाभल्याचं कार्यकारी निर्मात्या असिता जोशी यांनी सांगितलं. माझ्या मुलाला एवढासाच सीन कसा काय दिला, अशा प्रकारच्या शंकाकुशंका न घेता ‘बोक्या सातबंडे’ या चित्रपटामागचा ‘विचार’ पालकांनीही लक्षात घेतला, याबद्दलही असिता कृतज्ञता व्यक्त करतात.
सुचिता देशपांडे
suchitaadeshpande@gmail.com

सिनेमात काम करणं, हे माझं स्वप्न होतं.. बेबीज डे आऊट. होम अलोन, तारें जमींपर.. या साऱ्या लहान मुलांच्या फिल्म्स.. आपणही अशाच कुठल्यातरी पिक्चरमध्ये काम करावं, असं मला नेहमी वाटायचं. आईपाशी मी कितीतरी वेळा लकडाही लावला आणि बोक्याच्या भूमिकेसाठी जेव्हा मला विचारलं गेलं, तेव्हा आई-बाबांनी ‘हो’ म्हणून माझं हे स्वप्न पूर्ण केलं. अर्थात अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाही, ही अटही आईने घातली होतीच. ‘बोक्या सातबंडे’चं शूटिंग नाताळच्या सुटीत पार पडलं, त्यामुळे माझ्या तसंच इतर मुलांच्या शाळा वा अभ्यासात शूटिंगमुळे व्यत्यय आला नाही.
बेलवंडी आजोबा (दिलीप प्रभावळकर), बेलवंडी आजी (चित्रा नवाथे), बोक्याची आई (शुभांगी गोखले), बोक्याचे बाबा (विजय केंकरे), बोक्याची आजी (ज्योती सुभाष) अशा साऱ्या घरच्या मंडळींत मी अगदी रमून गेलो होतो. शुभांगी मावशी तर माझी आई नं. २ आणि विजय काका तर बाबा नं. २ झाले आहेत, इतकं त्यांनी मला सांभाळून घेतलं. साऱ्यांसोबत काम करायचा मजा आली. पण सर्वात आवडला तो माझा दादा बनलेला- आलोकदादा.
पिक्चरमध्ये स्टंट करायला तर खूपच मजा आली. सारेच स्टंट मी नाही सांगणार.. कारण तुम्हांला पिक्चर बघायचाय, हो ना? पण अगदीच राहवत नाही, म्हणून एक सांगतो. एक सीन आहे त्यात बस अगदी दरीत कोसळणार असते.. अगदी टोकावर आलेली बस जी अर्धी जमिनीवर नि अर्धी कडय़ाच्या पार पोहोचलेली. कधीही कोसळेल अशा अवस्थेत. त्या बसमध्ये मी वेगाने शिरत त्या बसचे बँडब्रेक करकचून दाबतो नि बस थांबते.. हा स्टंट मी केला, तेव्हा राजकाका (दिग्दर्शक - राज पेंडुरकर) एकदम टेन्शनमध्ये होता. सारखं कट, कट.. करत ओरडत होता. मला काही होणार तर नाही, असं त्याला वाटत असावं. तो सीन करताना मी तर खूप एक्साइट झालो होतो.
शूटिंगदरम्यान माझे साऱ्यांनी सॉलिड लाड केले. ही सारी मोठी माणसं मला जवळ घ्यायची. शूटिंगच्या वेळेस आईने मला खूपच मदत केली. ‘बोक्या सातबंडे’ची गोष्टही मला आईनेच वाचून दाखवली. पिक्चरमध्ये काम करताना मला याचा खूपच उपयोग झाला. पिक्चर करताना तर खूपच धम्माल आली. ‘बोक्या सातबंडे’ चित्रपटाचे तर आणखी भाग यायला पाहिजेत, असंही मला वाटू लागलंय.
शूटिंगच्या वेळेस मी नि आमच्या डझनभर बालगोपाळांच्या टीमने तर उच्छाद मांडला होता. शूटिंगच्या मधल्या वेळेस आम्ही क्रिकेट खेळायचो. शूटिंग चाललं होतं, त्या शेजारच्या मैदानात एका कोपऱ्यात कुत्र्याची छोटी छोटी पिल्लं आम्हांला दिसली. त्यानंतर जेव्हा केव्हा वेळ मिळायचो, तेव्हा आम्ही त्या पिल्लांच्या आसपास घुटमळायचो. त्या पिल्लांचे आई-बाबा आमच्यावर भुंकायचे. त्यामुळे त्यांच्यावर काहीजण लक्ष ठेवायचो नि तोपर्यंत त्या पिल्लांचे लाड करत बसायचो. त्या पिल्लांचे आई-बाबा येत असल्याची वर्दी मिळाली, की धुम्म पळत सुटायचो. एवढी सगळी मुलं नि तीही माझ्यासारख्याच वयाची म्हटल्यावर थोडी भांडणं, वादावादी ही होणारच, नाही का? त्यामुळे ती भांडणं सोडवायला कधीकधी आईला मध्ये पडावं लागायचं.
मला क्रिकेट नि फुटबॉल खेळायला आवडतं नि मस्ती तर कुठेही, कधीही करायला आवडते. दुसऱ्यांना थोडासा त्रास द्यायला आवडतो नि थोडंसं चिडवायलाही. माझा आवडता अभिनेता म्हणजे माझे बाबा - संजय नार्वेकर आणि आवडती नटी निर्मिती सावंत. कार्टुन्स बघायला मला खूपच आवडतं. सर्वात आवडतं कार्टुन म्हणजे बेन १०. बेस्ट कार्टुनचे जे जे म्हणून काही पुरस्कार असतील, ते बेन १० ला मिळायला हवेत. माझ्याकडेही बेन १०सारखं जादूचं घडय़ाळ असायला हवं होतं. म्हणजे मी काय धम्माल उडवून दिली असती, माहितीए? मला बेन१०ची भूमिका करायला खूप खूप आवडेल. खाण्यात विचाराल तर पनीर आणि रुमाली रोटी म्हणजे माझा जीव की प्राण.
मी पवईच्या हिरानंदानी फाऊंडेशन स्कूलमध्ये चौथीत शिकतो. बोक्या सातबंडेमुळे माझी चित्रपटात काम करण्याची इच्छा पूर्ण झाली खरी. पण अभ्यास हा करावा लागणारच. आईने माझी इच्छा पूर्ण केली. मग मला नको का तिची इच्छा पूर्ण करायला?
आर्यन नार्वेकर


त्याक्षणी कॅमेरा असता तर छान फोटो काढला असता.. असं आपण अनेकदा म्हणतो. बालमित्रांनो, तुमच्या हातात कुणी कॅमेरा दिला तर तुम्ही काय कराल?
लहान मुलांना असलेलं कॅमेऱ्याचं आकर्षण लक्षात घेऊन ‘स्वाया इंडिया’ (ship for world youth alumni associaltion - India) या दिल्लीच्या एका सामाजिक संघटनेनं मुलांना फोटो काढायला शिकवण्याचा अनोखा उपक्रम राबवला. या मुलांनी काढलेल्या अफलातून छायाचित्रांचं प्रदर्शन सध्या वरळीच्या अ‍ॅट्रिया मॉलमधील कॅनन लाऊंजमध्ये दु. १२ ते रात्रौ ९ या वेळात सुरू आहे. हे प्रदर्शन २२ एप्रिलपर्यंत दररोज सुरू राहील.
ही मुलं आहेत.. झोपडवस्तीत राहणारी. ज्यांनी कधी कॅमेरा यापूर्वी हाताळला नव्हता. या संस्थेतर्फे जानेवारी महिन्यात दिल्लीतील काही झोपडपट्टी विभागांमध्ये छायाचित्र काढण्यासंबंधीची एक कार्यशाळा घेण्यात आली होती. या उपक्रमाला कॅनन कंपनीचं मोलाचं सहकार्य मिळालं. या झोपडपट्टय़ांतील १० ते १४ वर्षांच्या मुलांना प्रख्यात फोटोग्राफर रोशन लाल यांनी कॅमेरा कसा हाताळावा, फोटो कसा काढावा आणि तो कसा डेव्हलप करावा, यासंदर्भात सहज आणि सोप्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं.
सुरुवातीला कॅमेरा पाहून बिचकलेली ही मुलं कॅमेरा हातात येताच सरावाने काही दिवसांतच खूप छान, बोलके फोटो काढू लागली. या मुलांनी छायाचित्रांद्वारे झोपडपट्टीतील लहान मुलांचं जगणं प्रभावीपणे टिपलं आहे. या छायाचित्रांमध्ये आईचं दूध पिणारी कुत्र्याची पिल्लं, रेल्वे रुळांवरच बैठक मारणारी महिला मंडळं, जवळच्या छोटय़ा डबक्यात कॅनमधून पिण्यासाठी पाणी भरणारी आणि तिथल्याच दगडावर कपडे धुणारी मुलगी, डुकरं आणि कुत्र्यांच्या संगतीत कोंडाळं करून झोपलेली मुलं, पाण्याची पाईपलाईन फुटल्यानंतर उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यात धुमाकूळ घालणारी मुलं अशा विविध फोटोंचा समावेश आहे. विशेष म्हणजे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणारी ही मुलं तरीही आनंदी दिसतात. हा फोटोंमधून टिपलेला हा विरोधाभास खूप काही सांगून जातो. या छायाचित्रणाच्या कार्यशाळेत रवी, मधु, भारती आणि किरण या चार मुलांनी विशेष नैपुण्य दाखवले. त्यांच्यामधील या सुप्त गुणांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने मुंबईत हे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
या छायाचित्रांच्या जोडीने गेल्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला या संकल्पनेवर मुलांनी काढलेली चित्रेही यात मांडण्यात आली आहेत. त्यापैकी काही निवडक चित्रांची कार्ड्सही बनवण्यात आली आहेत. आपल्या छायाचित्रांचं प्रदर्शन मुंबईत भरेल, असं आम्हांला स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं, त्यामुळेच आज हे प्रदर्शन पाहताना आम्हाला खूप आनंद होतोय, अशा शब्दांत रवी, मधु, किरण आणि भारती या लहानग्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
सुचित्रा प्रभुणे

साहित्य - जुनी गुळगुळीत मासिके, आईस्क्रीमच्या काडय़ा, हिरवा कार्डपेपर, गोंद, क्रेयॉन्स.
कृती - जुन्या गुळगुळीत मासिकांच्या पानापासून बदामाच्या आकाराची आकृतीत दाखविल्याप्रमाणे फुले कापून घ्या. (साधारण लाल-गुलाबी रंगांचे चित्र असलेला भाग पाहा.) अशाच प्रकारे हिरव्या रंगाच्या कार्डपेपरची छोटी-मोठी बदामी आकाराची पाने कापून घ्या आणि क्रेयॉन्सचे स्ट्रोक्स देऊन रंगवा.
आता ही फुले-पाने आईस्क्रीमच्या काडय़ांवर चिकटवा.
आधी आईस्क्रीमच्या काडय़ांना क्रेयॉन्सने शेडिंग करून घ्या.
आता या आईस्क्रीमच्या रंगीबेरंगी फुलांच्या काडय़ा पंख्याच्या आकारात एकमेकांना चिकटवा.
मधल्या बाजूस एखादे फूल वा पान चिकटवा म्हणजे पंखा आणखी आकर्षक दिसेल.
अर्चना जोशी

अंडय़ाचे पांढरे कवच एवढे पातळ असते की, त्याला हात लावतानाच ते तडकेल का, फुटेल का, अशी भीती वाटते. परंतु अंडय़ाचे कवच आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक मजबूत असते. निसर्गाने अंडय़ातील जिवाचे रक्षण करण्यासाठी बाहेरचे कवच पुरेसे मजबूत बनवलेले असते. हे कवच किती मजबूत असते, हे पाहण्यासाठी आपण तीन अंडी फोडून त्याच्या कवचाची एक तिपाई बनवून पाहू.
चांगल्या दारदार कात्रीने अंडय़ाच्या अध्र्या कवचाची किनार नीट गोलाकार कापून घ्या. नंतर सिमेंटच्या एखाद्या खडबडीत फरशीवर ही किनार घासून त्याची धार काढून टाका. एका रुमालाची दुहेरी घडी घालून तो जमिनीवर पसारा आणि त्यावर वर सांगितल्याप्रमाणे बनवलेली तीन कवचे ठेवा. कवचाखालचा रुमाल एखाद्या गादीसारखं काम करील. या तीन कवचांची तिपाई किती भाराचे वजन पेलेल, याचा काही अंदाज करता येईल का? आता या तिपाईवर हळुवारपणे पुस्तके ठेवत चला आणि अंडय़ाची कवचे केव्हा दबायला लागतात ते पाहा. हे वजन आणि तुम्ही अगोदर अंदाज बांधलेले वजन यात किती फरक पडला ते पाहा.
नैसर्गिक आकार आणि रचना स्वस्त आणि भक्कम असतात. माणूस निसर्गापासून खूप शिकला आहे आणि अजूनही शिकतो आहे.
डॉ. अरविंद गुप्ता, आयुका