Leading International Marathi News Daily
रविवार, १९ एप्रिल २००९

श्रीरामपूरसारख्या छोटय़ा ठिकाणाहून आलेल्या झहीरची प्रत्येक पावलावर अग्निपरीक्षा होत होती. गॉडफादर नव्हता. पण प्रामाणिकपणाची कदर करणारेही वाटेत भेटत गेले. कसोटी क्रिकेट खेळल्यानंतर स्थानिक क्लब क्रिकेटमध्ये खेळणारे हाताच्या बोटावर आहेत. झहीर हा त्यापैकी एक आहे.
झहीर खान परिपक्व होतोय. राहुल द्रविडचे ते स्वप्न होते. मागे एकदा तसे तो बोललाही होता. झहीरचा विकेट काढण्याचा स्ट्राइकरेट ३० च्या जवळ आला, की भारत जिंकायला लागेल, असं राहुल द्रविड म्हणाला होता. ग्रेग चॅपेल आणि किरण मोरे कंपनीने त्याला भारतीय संघातून हद्दपार केल्यानंतरही श्रीनाथला सातत्याने वाटत होतं, की झहीरच भारताच्या वेगवान गोलंदाजीचे भवितव्य आहे. मुंबई रणजी संघात १९ वर्षांचा असतानाच खेळविण्याचा द्रष्टेपणा संजय मांजरेकरने दाखविला होता; पण संजयच्या मनात भीती निर्माण करून झहीरला संघाबाहेर ठेवण्याचा दुष्टपणा मुंबईच्या काही नतद्रष्टांनी केला होता. तेव्हापासून झहीर मुंबईतून हद्दपार झाला. तो दिलीप वेंगसरकर यांनी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद स्वीकारेपर्यंत.
दरम्यानच्या काळात झहीर खूप बदलला. त्याच्या गोलंदाजीत, फलंदाजीतच परिपक्वता आली असे नाही तर त्याचा स्वभावही बदलला. तो माणसं ओळखायला शिकला. तो आता खऱ्या अर्थाने परिपक्व झाला. त्यामुळेच झहीर खान नावाचे अस्त्र आता प्रभावी ठरायला लागले.
त्याने कसोटी पदार्पण केले २००० ला तेव्हापासूनचा प्रवास खडतर होता. श्रीरामपूरसारख्या महाराष्ट्रातल्या एका छोटय़ा ठिकाणाहून आलेल्या या खेळाडूची प्रत्येक पावलावर अग्निपरीक्षा होत होती. गॉडफादर नव्हता. पण प्रामाणिकपणाची कदर करणारेही वाटेत भेटत गेले. कसोटी क्रिकेट खेळल्यानंतर स्थानिक क्लब क्रिकेटमध्ये खेळणारे हाताच्या बोटावर आहेत. झहीर हा त्यापैकी एक आहे. मुंबईत जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तेव्हा त्याने आपल्या नॅशनल क्रिकेट क्लबसाठीही
 

त्वेषाने गोलंदाजी केली. आठवडय़ांच्या विश्रांतीचा लाभ घेण्याऐवजी बडोदे आणि आता मुंबई संघासाठी खेळणे त्याने पसंत केले. भारतीय संघाने मालिकेत जेव्हा जेव्हा आघाडी घेतली तेव्हा तेव्हा निवड समितीच्या प्रमुखांनी त्याला विश्रांती हवी का, असे विचारले होते. तेव्हाही झहीरने विश्रांतीऐवजी संघासोबत राहणे पसंत केले. तेव्हा त्याने विनम्रपणे म्हटले होते. सध्या मी गोलंदाजीच्या ‘ऱ्हिदम’मध्ये आहे. म्हणून विश्रांती नको खेळतच राहतो. देशाने दिलेला पुरस्कार स्वीकारण्यासही वेळ नसलेल्या क्रिकेटपटूंच्या जमान्यात अशी वृत्ती जोपासणे जरा अवघडच आहे.
झहीरच्या या वृत्तीमुळेच त्याचे पाय खेचणारे जसे मिळाले तसे मदतीचा हात देणारेही मिळाले. सौरव गांगुलीकडे भारतीय संघाचे नेतृत्व असताना झहीरच्या गुणवत्तेला पुरेपूर न्याय मिळाला. राहुल द्रविडकडे नेतृत्व आल्यानंतर मात्र गडबड झाली. खरं तर राहुल द्रविडचा झहीरवर अधिक विश्वास होता; पण ग्रेग चॅपेल आणि किरण मोरे या दुक्कलीपुढे त्याचे काहीच चालले नाही. हट्टी आणि हेकेखोर ग्रेग चॅपेल यांच्या हो ला हो म्हणणाऱ्या निवड समितीच्या अध्यक्ष किरण मोरेची साथ भारतीय क्रिकेटचे बरेच नुकसान करून गेली. झहीर खानचा ऐन उमेदीचा काही काळ वाया गेला. झहीर खानची गोलंदाजी त्या काळात हवी तशी प्रभावी होत नव्हती हे खरे आहे; पण असे बॅड पॅचेस प्रत्येक क्रिकेटपटूच्या वाटय़ाला येतात. झहीर खानला मदत करण्याऐवजी संघाबाहेर काढण्याचा डाव साधला गेला. असं म्हणतात श्रीलंका दौऱ्यात संघाच्या बैठकीत झहीरने त्या वेळचे प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांना विचारले होते, की ‘मला का वगळले?’ या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी ग्रेग चॅपेल रागावले. त्यांनी झहीरला झटका देण्याची गरज असल्याचे संबंधितांना सांगितले. ‘मला का वगळले?’ हा प्रश्न विचारणे गुन्हा आहे का?
असा प्रश्न विचारणाऱ्या झहीरवर ‘अ‍ॅटिटय़ूड’ चांगला नसल्याचा शिक्का मारण्यात आला. निवड समितीला झहीरला वगळण्यासाठी एक कारणच मिळाले. झहीर भारतीय संघापासून दूर दूर गेला. एवढा दूर, की त्याला सातासमुद्रापलीकडे वुर्स्टरशायरचा आधार घ्यावा लागला.
हा आधार झहीरचे नशीब पालटून गेला. क्रिकेट उंचावर नेते, तसेच उपेक्षेच्या गर्तेतही फेकून देते. या अनुभवातून गेलेला झहीर कठोर बनला. कठोर मेहनत करून त्याने संपूर्ण कौंटी हंगाम खेळला. विश्रांती आपले वजन वाढविते. विश्रांतीमुळे गोलंदाजीची धार बोथट होते हे स्वत:पुरते सत्य त्याला उमगले. पूर्ण काऊंटी तो खेळायला लागला. संपूर्ण हप्त्यात क्रिकेट खेळल्याचा लाभ याला व्हायला लागला. प्रतिस्पध्र्याचे डावात १० बळी घेण्याइतपत क्षमता त्याच्यात आली. वुर्स्टरशायरनेही झहीरला साथ दिली. झहीरच्या भेदक गोलंदाजीचा डंका इंग्लंडभर वाजत असताना भारतीय निवड समिती मात्र डोळे आणि कान बंद ठेवून बसली होती.
नेहमीप्रमाणे झहीरला वगळण्यात आले. काऊंटी क्रिकेटमधील कामगिरी निवडीसाठी गृहीत धरण्याचा क्रिकेट बोर्डाचा निर्णय नंतर झाला. त्याआधी ही सुबुद्धी बोर्डाला झाली असती तर भारतीय क्रिकेटची गाडी काही काळ आधी रूळावर आली असती. काऊंटी क्रिकेट गाजविल्यानंतरही भारतीय संघात स्थान न देण्याचा निवड समितीचा निर्णय आश्चर्यकारक होता. कर्णधार राहुल द्रविडलाही अनेकांनी विचारले, की झहीरला घ्यायचेच नाही, असे तुम्ही ठरविले आहे का? त्यावर द्रविडचे उत्तर होते नाही, तो तर आमचा प्रमुख गोलंदाज आहे. तिकडे इंग्लंडमध्ये झहीरही द्विधा मन:स्थितीत सापडला होता. वुस्टर्रशायरचे तीन वर्षांसाठीची ऑफर त्याला आली. भारतीय संघातून तर त्याला कानाला धरून बाहेर काढण्यात आले होते. त्याच वेळी काही माजी खेळाडूंनी त्याला सबुरीचा सल्ला दिला. काहींनी धीर दिला. त्याचे प्रशिक्षक सुधीर नाईक यांनी मेहनत करीत राहा, फळ आज ना उद्या मिळणार, असे सांगितले. त्याच वेळी किरण मोरे यांची निवड समितीच्या अध्यक्षपदाची मुदत संपली. भारतीय क्रिकेट बोर्डाचे प्रमुखपद शरद पवार यांच्याकडे आले. दिलीप वेंगसरकर यांच्याकडे राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचा निर्णय झाला. त्याच वेळी बडोदे संघाला रामराम करून झहीर खान महाराष्ट्र संघातून खेळण्याचा विचार करीत होता. वेंगसरकर यांनी त्याला घाई करू नको, असे सांगितले. मुंबई हा संघ तुझा संघ आहे. आज मुंबईला वेगवान गोलंदाजाची गरज आहे. वेगवान गोलंदाजीचा सेनानी हवा आहे. मुंबईसारख्या अंतिम फेरी जिंकू शकणाऱ्या संघातून खेळल्यास अधिक सामने खेळण्याची संधी मिळेल. पर्यायाने तू निवड समितीसमोर अधिक काळ येऊ शकशील. झहीरने वेंगसरकर यांचा सल्ला मानला. वेंगसरकर यांच्या राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीबरोबरच झहीरचे बडोद्याने मोकळे केल्याचे पत्र व मुंबईकडून खेळण्याचे इच्छापत्र मुंबई क्रिकेट संघटनेला मिळाले. झहीरचा वनवास संपला. त्याचबरोबर भारतीय क्रिकेटचा विजयाचा दुष्काळ संपला. झहीरास्त्र नावाचे नवे अमोघ अस्त्र मैदानावर सुटले. अनुभवांनी समृद्ध असलेले हे अस्त्र आता प्रभावी ठरतेय. झहीर आपल्या सहकाऱ्यांना सल्ला देत सोबत घेत आहे. स्वत:ला आलेल्या वाईट अनुभवातून तो बरेच काही शिकला आहे.
विनायक दळवी

अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने तब्बल १३ वर्षांनंतर अजिंक्यपद पटकाविले आणि भारतीय हॉकी वर्तुळात पुन्हा एकदा उत्साहाचे वारे वाहू लागले. बीजिंग ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरल्यामुळे भारतीय हॉकीला बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी या विजयाचा नक्कीच उपयोग होऊ शकेल. मात्र या विजयामुळे भारतीय हॉकीचे गतवैभव वगैरे प्राप्त होईल, असे म्हणणे अतिशयोक्तीचेच ठरणार आहे. स्वत: भारतीय संघाचा कर्णधार संदीप सिंग यानेही हे गतवैभवाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून या विजयाचा फार उधो उधो करू नये, असेच जणू सुचविले आहे. संदीप सिंगच नव्हे तर या विजयानंतर भारतीय हॉकीतील ज्येष्ठ-श्रेष्ठ खेळाडूंनीही आनंद व्यक्त करतानाच सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यावरूनच हा विजय भारतीय संघाला आत्मविश्वास देणारा आहे, हे खरे आहे, पण त्यामुळे हुरळून जाऊ नये, हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे, असेच दिसून येते.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय हॉकीची ढासळती स्थिती ही एक प्रमुख समस्या बनली होती. अजूनही त्यातून हॉकी बाहेर पडली आहे, असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. कधी काळी ऑलिम्पिकचा बादशाह असलेला भारतीय संघ गतवर्षी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पात्रही होऊ शकला नाही. भारतीय हॉकीच्या अवस्थेवर नेमके भाष्य करणारी अशीच ही घटना होती. एखाद्या देशाच्या राष्ट्रीय खेळाची झालेली ही दुरवस्था हॉकीचाहत्यांसाठी वेदनादायक होती. हॉकी अजूनही त्यातून सावरलेली नाही. पण अझलन शाह हॉकी स्पर्धेतील विजयामुळे या जखमांवर निश्चितच फुंकर घातली जाईल. असे असतानाही या विजयाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहाण्याची गरज आहे. येत्या मे महिन्यात भारत आशिया चषक हॉकी स्पर्धेत खेळणार आहे. त्या अनुषंगाने हा विजय भारतीय संघाला आत्मपरीक्षण करण्यासाठी उपयोगी येऊ शकेल.
मलेशियात झालेल्या या स्पर्धेत जर्मनी, स्पेन, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया आदि आघाडीचे संघ सहभागी झाले नव्हते, ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही. या संघाच्या उपस्थितीत भारतीय संघाची कामगिरी कशी झाली असती हे पाहणे औत्सुक्याचे ठरले असते. जर जगभरातील अव्वल संघाविरुद्ध खेळूनही भारताने विजेतेपदाला गवसणी घातली असती तर खऱ्या अर्थाने भारतीय खेळाडूंच्या गुणवत्तेची कसोटी लागली असती. भारतातील ज्येष्ठ-श्रेष्ठ हॉकीपटूंनीही नेमकी हीच भूमिका मांडली. प्रमुख संघ आणि खेळाडू खेळत नसतील तर बऱ्याचवेळा खेळातील दोष नेमके हेरणे कठीण होते. या चुका समोर येत नाहीत. अझलन शाह हॉकी स्पर्धेतही आघाडीचे संघ सहभागी न झाल्यामुळे भारतीय संघातील सगळेच दोष समोर आले नसतील. त्यामुळे या विजयामुळे आपला खेळ सुधारला आहे, असे म्हणून बेसावध राहण्याचे टाळायला हवे. भारताचे माजी ऑलिम्पिकपटू बलबीरसिंग यांनी या विजयानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, ‘बचावात आपण अजूनही पुरेसे सक्षम नाही. अखेरच्या क्षणी गोल वाचविण्यातही आपण कमी पडतो.’ बलबीरसिंग यांनी विषद केलेली ही वस्तुस्थिती आहे. पेनल्टी कॉर्नर्सचे गोलमध्ये रूपांतर करण्यात आपल्याला येणारे अपयश हीदेखील भारतीय संघाची कायमची डोकेदुखी म्हणता येईल. या आणि अशा चुका टाळण्यासाठी वर्षांनुवर्षे आपण प्रयत्न करीत आहोत, पण त्यात यश येताना दिसत नाही. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये याच चुका आपला घात करीत आल्या आहेत. आगामी आशिया चषक स्पर्धेत या चुकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण अझलन शाह हॉकी स्पर्धेतील यशस्वी घोडदौड कायम राखणे हे आता आणखी एक नवे आव्हान भारतीय संघापुढे असेल. या चुका टाळल्या तरच ही वाटचाल कायम राहू शकेल. या निमित्ताने पुन्हा एकदा प्रशिक्षकाविषयीची चर्चेने मूळ धरले आहे. भारताचा माजी कर्णधार धनराज पिल्ले याने मात्र विद्यमान प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांनाच पाठिंबा दर्शविला आहे. आगामी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम पाहता भारतीय संघाला परदेशी प्रशिक्षक असावा, अशी मागणी काहीजणांकडून होत असली तरी सद्य:स्थितीत त्या मागणीला फारसे मनावर घेता कामा नये. कारण आतापर्यंत परदेशी प्रशिक्षक नेमल्यानंतरही भारतीय हॉकीने फार मोठी मजल मारली होती, असे काही दिसलेले नाही. गेरार्ड राक, रिक चार्ल्सवर्थ यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीत भारतीय संघाची वाईट अवस्थाच होती. त्यापेक्षा भारतीय प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आपण चांगली कामगिरी केलेली आहे. वासुदेवन भास्करन हे त्याचे चांगले उदाहरण म्हणता येईल. हरेंद्रसिंग यांची प्रशिक्षक म्हणून गतकामगिरी फारशी समाधानकारक नसली तरी त्यांना संधी दिल्यानंतर निदान त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरीसाठी पुरेसा वेळही द्यायला हवा. एखाद्या स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर प्रशिक्षक बदलणे, कर्णधार बदलणे हे समस्येवरचे उत्तर होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय खेळाडू, त्यांची कामगिरी, त्यांचा दर्जा भारतीय हॉकीची एकूण स्थिती यांची जाणीव परदेशी प्रशिक्षकापेक्षा भारतीय प्रशिक्षकालाच चांगली ठाऊक असते, यात दुमत नसावे. मग विनाकारण परदेशी प्रशिक्षक आणून संघाचा समतोल बिघडविण्याचे काम का करावे? परदेशी प्रशिक्षक नक्कीच बदलत्या आंतरराष्ट्रीय हॉकीच्या अनुषंगाने सहाय्य करू शकतात, पण म्हणूनच केवळ ती कसर भरून काढण्यासाठी प्रशिक्षक नेमता येऊ शकेल. तूर्तास भारतीय संघाने मिळविलेल्या अझलन शाह चषक स्पर्धेतील विजयामुळे भारतीय हॉकीला दिलासा मिळाला आहे. याचा उपयोग कुठेतरी भारतीय हॉकी पुन्हा रुळावर आणण्यासाठी होऊ शकेल, असे वाटते. ते कितपत शक्य होईल, हे येणारा काळच ठरविल.
महेश विचारे

विजेंदरसिंगने बीजिंग ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत मुष्टियुद्धाचे ब्राँझपदक पटकावित भारताच्या मुष्टियुद्ध क्षेत्रात इतिहास घडविला. विजेंदरसिंगचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी पुण्याचा मुष्टियोद्धा संजय कोलते उत्सुक आहे. ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट अंतर्गत संजयला आर्थिक सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. ही ‘सुवर्ण’संधी त्याला साधायची आहे.
बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या संधीपासून वंचित राहिल्यानंतर अनेक खेळाडू निराश झाले. परंतु संजय कोलते याने मनोधैर्य गमावले नाही. लंडन येथे २०१२ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत विजेंदरसिंगचा कित्ता गिरवायचा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत तो अतिशय मेहनत करीत आहे.
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक मिळविणारा विजेंदरसिंग याचा सहकारी संजय हा देखील मुष्टियुद्ध खेळावर निस्सीम प्रेम करणारा खेळाडू आहे. स्वत:च्या चुकांबाबत विजेंदर संजयचे मार्गदर्शन घेत असतो. विजेंदरला ऑलिम्पिकची संधी मिळाली व त्या संधीचे त्याने सोनेही केले. संजयची संधी मात्र हुकली. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत तो अपेक्षेइतकी कामगिरी करू शकला नाही. ही संधी हुकली तरी संजय डगमगला नाही. नवी दिल्ली यथे होणारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व लंडन येथे होणारी ऑलिम्पिक स्पर्धा या दोन्ही स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत पदकाला गवसणी घालण्याचे त्याचे स्वप्न आहे.
स्वत:च्या चुकांमुळे ऑलिम्पिक स्पर्धेची संधी हुकली असे मानून घ्यायला मन मोठे असावे लागते. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेबाबत आपण कोठेतरी कमी पडलो याची संजयला जाणीव आहे. त्यामुळेच त्याने या चुका टाळण्यासाठी व आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अधिकाधिक उत्तुंग यश मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
संजयचे वडील मिलिटरी डेअरी फार्ममध्ये नोकरी करतात, तर आई गृहिणी आहे. दोन मोठय़ा बहिणी व एक भाऊ अशा परिवारात वाढलेला संजय सुरुवातीस हिंदुस्तान अ‍ॅन्टीबायोटिक्स कंपनीच्या फुटबॉल मैदानावर फुटबॉल खेळायला जात असे. या मैदानाजवळ असलेल्या मुष्टियुद्ध रिंगमध्ये कंपनीचे खेळाडू नियमित सराव करतात. त्यांचा सराव पाहून संजयलाही आपण मुष्टियुद्ध खेळावे, असे वाटू लागले. फुटबॉल संपल्यानंतर या खेळाडूंचा सराव अतिशय एकाग्रतेने पाहणाऱ्या संजयची शरीरयष्टी, नजर व नकळत त्याच्याकडून होणाऱ्या मुष्टियुद्धाच्या हालचाली तेथील मुष्टियुद्ध प्रशिक्षक बळवंत सुर्वे यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटल्या नाहीत. त्यांनी संजयला मुष्टियुद्ध खेळायला येणार का, असे विचारले तेव्हा संजयच्या आनंदाला पारावार उरला नाही. अर्थात संजयपुढे प्रश्न होता तो घरच्यांच्या परवानगीचा!
बेताचीच आर्थिक स्थिती असलेल्या त्याच्या आई-वडिलांनी मुष्टियुद्धासाठी येणारा खर्च लक्षात घेऊन सुरुवातीस परवानगी दिली नाही. मात्र त्याचा निर्धार पाहून त्यांनी परवानगी दिली आणि १ नोव्हेंबर १९९८ मध्ये संजयच्या मुष्टियुद्ध कारकिर्दीस प्रारंभ झाला. अवघ्या १५ दिवसांच्या सरावानंतर संजयने राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदकाचा वेध घेतला, तेव्हा त्याच्या आई-वडिलांनीही आपल्या मुलाचे नैपुण्य ओळखले आणि त्याला प्रोत्साहन देण्यास प्रारंभ केला. संजयने त्यानंतर सबज्युनियर व ज्युनियर गटामध्ये अनेक राज्य स्तरांवरील स्पर्धामध्ये पदकांची लयलूट केली.सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत त्याने एक सुवर्ण व तीन ब्राँझपदके जिंकली, तर कुमार गटात त्याने एक सुवर्णपदक मिळविले. वरिष्ठ गटातही त्याने सुवर्णपदकाचा वेध घेतला.
राष्ट्रीय स्तरावरील त्याचे यश पाहूनच आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटच्या मुष्टियुद्ध तज्ज्ञांनी संजयची त्यांच्या अकादमीसाठी निवड केली. २००२ मध्ये या अकादमीत आल्यापासून संजयच्या कामगिरीचा आलेख चढताच राहिला. जागतिक कॅडेट स्पर्धा, जर्मनीमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धा, दक्षिण आशियाई स्पर्धा आदी स्पर्धामधील रौप्यपदके त्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. क्यूबा, उजबेकिस्तान आदी देशांमध्ये त्याने अव्वल दर्जाच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणामुळे शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीमध्ये वाढ होण्यास मदत झाली. एकाग्रता वाढण्यासही ही शिबिरे उपयुक्त ठरल्याचे संजयने आवर्जून सांगितले.
लाइटफ्लाय गटात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संजयची मुष्टियुद्ध कारकीर्द २००४-०५ मधील दीर्घकालीन आजारामुळे संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. तथापि मनाने कणखर असलेल्या संजयने या आजारास हिकमतीने तोंड दिले. आई-वडिलांनी त्याला खेळ सोडण्याचा सल्ला दिला, मात्र संजयने हा सल्ला जुमानला नाही. आजारातून तंदुरुस्त झाल्यानंतर फिनिक्स पक्ष्याच्या भरारीप्रमाणे त्याने कठोर मेहनत केली व अनेक स्पर्धा गाजविल्या. जागतिक सेनादल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. एएसआयमध्ये तो सी.ए. कुटप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
मुष्टियुद्धामध्ये कारकीर्द करण्यास त्याला सुरुवातीस घरच्यांकडून विरोध झाला; परंतु या खेळामध्ये सुरुवात केल्यानंतर त्याने मिळविलेले यश पाहून त्याला घरच्यांकडून मुष्टियुद्ध कारकिर्दीसाठी संपूर्ण सहकार्य मिळत आहे. एवढेच नव्हे तर त्याचा भाऊ पांडुरंग यानेही मुष्टियुद्धाचेच प्रशिक्षण घेण्यास प्रारंभ केला आहे. संजयने आजपर्यंत विविध स्पर्धा व सराव शिबिरांच्या निमित्ताने अनेक देशांचा दौरा केला आहे. या दौऱ्यामुळे स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडविण्यास मदत झाली, तसेच जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक असणारे मनोधैर्य या खेळामुळेच निर्माण झाले असे संजयने सांगितले.
‘एएसआय’ संस्थेमध्ये आखून दिलेल्या सराव पद्धतीनुसार तो दोन-तीन सत्रांमध्ये स्पर्धात्मक मुष्टियुद्ध व पूरक व्यायाम करीत असतो. या खेळासाठी शाकाहारी व मांसाहारी असा दोन्ही प्रकारचा आहार तो घेत आहे. मात्र आता त्याने मांसाहार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. संतुलित आहारामुळे शारीरिक क्षमता वाढते, असे त्याचे मत आहे. एएसआयमधील प्रशिक्षणपद्धतीमुळे आपली मुष्टियुद्ध कारकीर्द अधिक समृद्ध झाली असेही त्याने सांगितले. विजेंदरसिंगबरोबर अनेकवेळा त्याने विविध स्पर्धामध्ये भाग घेतला असल्यामुळे दोघेही चांगले मित्र झाले आहेत. विजेंदरच्या ब्राँझपदकामुळे संजयचा आत्मविश्वास उंचावला आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत त्याने तन- मन सरावावर केंद्रित केले आहे.
संजयच्या पदकांच्या ध्येयामध्ये आर्थिक मदतीचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मुष्टियुद्ध संघटक जय कवळी यांनी संजयला ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट मोहिमेत संधी मिळवून दिली आहे. ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय क्रीडापटू व प्रशिक्षक प्रकाश पदुकोण, गीत सेठी, नीरज बजाज यांनी संजयचे आजपर्यंतचे यश तसेच त्याच्याकडे पदक मिळविण्यासाठी असलेले नैपुण्य पाहूनच ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट अंतर्गत संजयला आर्थिक सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.या शिष्यवृत्तीमुळे संजयच्या यशाचा मार्ग सुकर झाला आहे. आता त्याच्यावर जबाबदारी आहे ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (२०१०) व लंडन ऑलिम्पिक स्पर्धा (२०१२) मध्ये पदक मिळविण्याची!
मिलिंद ढमढेरे