Leading International Marathi News Daily
रविवार, १९ एप्रिल २००९

‘इंडियन्स’च्या विजयात चमकले मुंबईकर
’ चेन्नई सुपर किंग्सवर १९ धावांनी विजय ’ सचिन सामनावीर ’ नायरची षटकारांची आतषबाजी

केप टाऊन, १८ एप्रिल / वृत्तसंस्था
सचिन तेंडुलकरची ५९ धावांची नाबाद खेळी आणि अभिषेक नायरचा १४ चेंडूतील ३५ धावांचा झंझावात यामुळे मुंबई इंडियन्स संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघावर १९ धावांनी विजय मिळवून आपले खाते उघडले. मुख्य म्हणजे सचिन आणि अभिषेक या मुंबईकरांनी आपल्या संघाला विजयाची भेट दिली. गेल्या वर्षी अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला पहिल्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सच्या सचिनलाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब मिळाला तर अभिषेक नायरला सर्वाधिक षटकार (तीन षटकार) लगावल्याबद्दल एक लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना १६५ धावा केल्या तर चेन्नईच्या संघाला २० षटकांत १४६ धावांपर्यंत मजल मारता आली.

सिंधुदर्गाच्या आखाडय़ाला अपहरणाचा रंग
नारायण राणे यांचे चुलत बंधू बेपत्ता
सावंतवाडी, १८ एप्रिल/खास प्रतिनिधी
कोकणातील शक्तिशाली नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपले चुलतबंधू अंकुश राणे यांचे अपहरण शिवसेनेच्या नेत्यांनी केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला. पोलिसांनी अपहरणाला नव्हे तर ते बेपत्ता झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चुलत बंधू अंकुश रामचंद्र राणे काल संध्याकाळपासून बेपत्ता झाले आहेत. श्वानपथकासह पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण आज संध्याकाळपर्यंत काहीही ठावठिकाणा समजू शकलेला नाही.

डीप फ्रीजरमध्ये अडकून गुदमरल्याने
दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू
जेजुरी, १८ एप्रिल/वार्ताहर
शीतपेये ठेवण्याच्या व्यावसायिक डीप फ्रीजरमध्ये अडकून श्वास गुदमरल्याने दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा फ्रीज मोकळा व बंद अवस्थेत होता. जेजुरीमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेमध्ये हृषीकेश जयमल्हार लाखे (वय ७) व शाहरूख अब्दुल खान (वय ८) या बालकांचा करुण अंत झाला. हृषिकेश लाखे हा येथील जिजामाता विद्यालयामध्ये इयत्ता दुसरीमध्ये तर शाहरुख खान हा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकत होता. आज सकाळी ही घटना समजताच सारे गाव हबकून गेले. अत्यंत शोकाकूल वातावरणात सकाळी १० वाजता या चिमुकल्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘मनापासून सांगतो’
मराठी अस्मितेला धक्का देण्याची हिम्मत करू देणार नाही

मुंबई, १८ एप्रिल / खास प्रतिनिधी

शिवसेनेनेच महाराष्ट्राच्या छाताडावर अस्तित्वात नसलेला उत्तर प्रदेश दिन नाचवला. छटपुजा महाराष्ट्रात शिवसेनेनेच सुरू केली. एकीकडे बिरहा, भोजपुरी गीत गायन, लाई-चना संमेलन करायचे तर दुसरीकडे ‘आम्हीच मराठी’ असा पुकार करायचा. शिवसेनेला त्यांच्या राज्यात दुकानांवर मराठी पाटय़ा का लावता आल्या नाहीत, असा सवाल करत यांच्यातील दांभिकता पाहून बिहारमधील नेतेही हादरतील, असा घणाघाती हल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मनापासून सांगतो’ या आपल्या निवडणूक जाहीरनाम्याच्या निमित्ताने मतदारांशी साधलेल्या संवादाद्वारे केला आहे. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये राज ठाकरे यांनी आज मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

फायनलिस्ट फेल
राजस्थानचा रॉयल्सचा ५८ धावांत फडशा
केप टाऊन, १८ एप्रिल / वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही आपल्या फिरकीची जादू संपलेली नाही, याची प्रचीती लेग स्पिनर अनिल कुंबळेने आणून दिली. बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाच्या या ज्येष्ठ खेळाडूने अवघ्या ६ धावा देत घेतलेल्या ५ बळींमुळे गतवर्षीचा इंडियन प्रीमियर लीगचा विजेता राजस्थान रॉयलचा संघ पहिल्याच सामन्यात गारद झाला. बंगलोर रॉयल चॅलेंजर्सला केवळ १३३ धावांवर रोखून फुशारकी मारणाऱ्या राजस्थान संघाला धावांचे शतकही ओलांडता आले नाही. त्यांचा संघ केवळ ५८ धावांत गारद झाला. त्याआधी, राहुल द्रविडच्या ६६ धावांमुळे आणि कर्णधार पीटरसनच्या ३२ धावांच्या खेळीमुळे बंगलोर संघाला १३३ धावांपर्यंत कशीबशी मजल मारता आली. राजस्थानच्या मस्करेन्हासने ३ बळी घेत बंगलोरला चांगलाच तडाखा दिला होता. त्यानंतर राजस्थानचा संघ ही लढत सहज जिंकेल असा होरा होता. पण प्रवीण कुमारने सलामीवीर स्मिथ व स्वप्निल अस्नोडकर यांना झटपट माघारी धाडल्यानंतर राजस्थानचा संघ त्यातून सावरलाच नाही. हेन्डरसन, युसूफ पठाण व रवींद्र जडेजा यांची वैयक्तिक ११ धावांची खेळी वगळता इतरांना त्यापुढेही मजल मारता आली नाही. कुंबळेला जेसी रायडरने २ बळी घेऊन मोलाची साथ दिली.
संक्षिप्त धावफलक - बंगलोर रॉयल चॅलेंजर्स ८ बाद १३३ (द्रविड ६६, पीटरसन ३२, मॅस्केरेन्हास २०-३) वि. वि. राजस्थान रॉयल्स (हेन्डरसन ११, युसूफ पठाण ११, जडेजा ११, कुंबळे ६-५, रायडर १४-२, प्रवीण कुमार ७-२).

आजचे सामने
* दिल्ली डेअर डेविल्स वि. किंग्ज इलेव्हन ४ वाजता
* डेक्कन चार्जस वि.कोलकाता नाइट रायडर्स ८ वाजता
*ठिकाण: न्यूलॅंड्स, केपटाऊन

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयसीएलचा अर्ज फेटाळला
दुबई, १८ एप्रिल / पीटीआय

आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या इंडियन क्रिकेट लीगला आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. या लीगला मान्यता मिळण्यासाठी केलेला अर्ज आयसीसीने आज फेटाळून लावला. इंडियन क्रिकेट लीगने मान्यता मिळविण्यासाठी आयसीसीकडे अर्ज केला होता. आयसीसीच्या बैठकीत या अर्जाची दखल घेण्यात आली. काळजीपूर्वक या अर्जाची पाहणी केल्यानंतर हा अर्ज फेटाळून लावण्याचा निर्णय घेण्यात आला. आयसीसीने आपली मागणी फेटाळून लावल्यास न्यायालयात धाव घेऊ असा इशारा आयसीएलने आधीच दिलेला आहे. त्यामुळे आता आयसीएल न्यायालयात जाणार हे जवळपास निश्चित आहे. आयसीएलचा अर्ज फेटाळतानाच या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचे भवितव्य मात्र अजूनही अधांतरीच आहे. परंतु जर आयसीएलमध्ये खेळत असलेले खेळाडू मुख्य प्रवाहात येऊ इच्छित असतील तर ते करताना क्रिकेटच्या मूळ ढाच्याला कुठेही धक्का लागता कामा नये तसेच खेळाडूंनाही अधिकृत आणि अनधिकृत क्रिकेट यातला फरक लक्षात राहावा, याचीही काळजी घेण्यास आयसीसीने सांगितले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कार्यकारिणीने इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार क्लेअर कॉनरला आयसीसीच्या क्रिकेट समितीत स्थान दिले. महिला क्रिकेटची प्रतिनिधी म्हणून यापुढे क्लेअर जबाबदारी पार पाडणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या महिला क्रिकेटची ती प्रमुखही आहे.

विद्यार्थिनीवर बलात्कार : महिला संघटनांची निदर्शने
मुंबई, १९ (प्रतिनिधी)

टाटा समाज विज्ञान संस्थेमधील (टीस) बलात्कारीत तरुणीची माहिती उघड होऊ शकेल अशा पद्धतीने वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे संतप्त झालेले टीस मधील विद्यार्थी आणि महिला संघटनांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात सदर वर्तमानपत्राविरोधात गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयावर निदर्शनेही केली.‘टीस’मधील अमेरिकी विद्यार्थीनीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी दाखल झालेला एफआयआरच एका इंग्रजी वृत्तपत्राने शब्दश: प्रसिद्ध केला. बलात्काराच्या घटनांमध्ये पीडिताची ओळख स्पष्ट होईल, अशा प्रकारे माहिती प्रसिद्धी करण्यास प्रसिद्धीमाध्यमांना मज्जाव करणारी कायदेशीर तरतूद अस्तित्वात आहे. असे असतानाही सदर वृत्तपत्राने अशी प्रकारे माहिती केल्याने २२८-ए अन्वये कायद्याचा भंग झाल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. या मोर्चात आवाज-ए-निस्वा, अक्षरा, आयडवा, सेहत, फोरम अगेन्स्ट ऑप्रेशन अगेन्स्ट वुमेन, लाबीया आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

व्यभिचाराचा ठपका ठेवून जोडप्याला तालिबानींनी घातल्या गोळ्या ..
इस्लामाबाद, १८ एप्रिल/पी.टी.आय.

एका जोडप्याने व्यभिचार केल्याचा आरोप ठेवून त्या जोडप्याला भर लोकांसमोर तालिबानी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले. या हत्येचे व्हीडीओ चित्रण तालिबानींनी डॉन या वर्तमानपत्राकडे पाठवून दिले. दोन आठवडय़ांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला काठीने बदडून काढल्याच्या तालिबानींच्या व्हीडीओमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. त्यानंतर वायव्य सरहद्द प्रांतातील या ताज्या घटनेमुळे तालिबानींनी या भागात आपली किती दहशत निर्माण केली आहे, ते स्पष्ट होत आहे. या जोडप्याचे वय चाळीशीच्या आसपास असून हा प्रकार वायव्य सरहद्द प्रांतातील हंगू जिल्ह्यात झाला आहे. ‘आपल्याविरोधातील सर्व आरोप खोटे आहे. कोणत्याही पुरुषाने आपल्याला अद्याप स्पर्श केलेला नाही. आपल्याला मारू नका, दया करा’ असे ही महिला या व्हीडीओत ओरडून सांगत असल्याचे दिसत आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी