Leading International Marathi News Daily
सोमवार, २० एप्रिल २००९

बेपत्ता अंकुश राणे यांचा मृतदेह सापडला
सावंतवाडी, १९ एप्रिल/वार्ताहर

कोकणातील शक्तीशाली नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे नाटय़मयरित्या बेपत्ता झालेले चुलत बंधू अंकुश रामचंद्र राणे यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह कासार्डे ब्राह्मणवाडी येथे आढळून आल्याने येथे एकच खळबळ उडाली. अंकुश यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनी ओळखला असल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला. कणकवली तालुक्यातील वरवडे येथे नारायण राणे यांचे बंधू राहत.

स्लमडॉगफेम रूबीनाला विकण्याचा वडिलांचा प्रयत्न
स्टिंग ऑपरेशनमध्ये सौदा उघड * वडील रफिक कुरेशी यांचा इन्कार
लंडन १९ एप्रिल/पीटीआय
अत्यंत धक्कादायक अशा घटनेत स्लमडॉग मिलिऑनर या ऑस्करविजेत्या चित्रपटातील बाल अभिनेत्री रूबीना अली कुरेशी हिला तिच्या वडिलांनी बेकायदेशीर दत्तक सौदा करून दोन लाख पौंडांना विकण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. एका ब्रिटिश टॅब्लॉईडने या घटनेचे स्टिंग ऑपरेशन केले त्यात ही धक्कादायक गोष्ट उघड झाली. दरम्यान रूबिनाचे वडील रफिक कुरेशी यांनी या संपूर्ण प्रकरणाचा इन्कार केला असून मुलीला विकण्याचा कुठलाही विचार माझ्या मनात कधीही आला नाही असे म्हटले आहे. रफीक कुरेशी यांनी न्यूज ऑफ द वर्ल्ड या टॅब्लॉईडच्या वार्ताहराकडे रूबीना कुरेशीचा ताबा देण्यासाठी दोन लाख पौंड म्हणजे (चार हजार अमेरिकी डॉलर) इतक्या रकमेची मागणी केली. हा वार्ताहर दुबईतील शेख या श्रीमंत व्यक्तीचा एजंट म्हणून तिच्या वडिलांकडे तिला दत्तक घेण्यासाठी म्हणून गेला होता.

अहिल्याताई रांगणेकर यांचे निधन
मुंबई, १९ एप्रिल/प्रतिनिधी

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या, स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी आणि सर्वाच्या परमआदरणीय ‘ताई’ अहिल्या रांगणेकर यांचे वृद्धापकाळाने माटुंगा येथील निवासस्थानी आज पहाटे झोपेत निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे पती पांडुरंग रांगणेकर यांचे निधन झाले होते. अहिल्याताईंच्या पश्चात अजित व अभय हे दोन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अहिल्याताईंचे पार्थिव अंतिम दर्शनाकरिता वरळी येथील ‘जनशक्ती’ या पक्षाच्या कार्यालयात उद्या सकाळी ११ वाजल्यापासून ठेवण्यात येणार आहे. (अग्रलेख : लाल शलाका!)

अडवाणींविषयी काढलेल्या उद्गारांबद्दल खेद नाही
नवी दिल्ली, १९ एप्रिल/पी.टी.आय.
पंतप्रधानपदाचे भाजपचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी आपल्यावर सातत्याने वैयक्तिक चिखलफेक करीत होते. मात्र काँग्रेसने पंतप्रधानपदासाठी अधिकृतपणे आपले नाव जाहीर केल्याने अडवाणींच्या या चिखलफेकीला प्रत्युत्तर देणे आवश्यक बनले होते. या प्रतिहल्ल्याबद्दल आपल्याला कोणताही खेद वाटत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी चलाखीने आज पुन्हा अडवाणी यांच्यावर हल्लाबोल केला. त्याचबरोबर हे ‘शाब्दिक युद्ध’ आता अधिक काळ चालू नये, असे आपले मत असल्याचे सांगत आपल्या राजकीय हुशारीचाही पुन:प्रत्यय दिला.

करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर मी आजही ठाम!
अंतुले यांच्या फटकेबाजीमुळे मुख्यमंत्री अडचणीत
महाड, १९ एप्रिल/ खास प्रतिनिधी
२६/११ रोजी मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यासंदर्भात शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल मी जे संसदेत बोललो त्यावर मी आजही कायम आह़े गेली ६० वर्षे देशातील गरीबांची सेवा प्रामाणिकपणाने करणारा अंतुले जर देशद्रोही असेल तर या देशात एकही नागरिक देशप्रेमी नाही, असे अत्यंत बेधडक विधान रायगड मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार व केंद्रीय मंत्री ए. आर. अंतुले यांनी आज महाड येथे एका जाहीर सभेत केले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेही यावेळी उपस्थित होते. अंतुले यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शरद पवार पंतप्रधान होणे म्हणजे मोठा चमत्कार -विलासराव
सोलापूर, १९ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेसाठी २७२ चा जादूई आकडा सहजपणे पार करील, असा विश्वास व्यक्त करीत या परिस्थितीत शरद पवार हे पंतप्रधान झाले तर तो एक मोठा चमत्कार ठरेल, असा टोला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लगावला. सोलापूर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी देशमुख हे रविवारी येथे आले होते.

दिल्ली डेअरडेव्हिल्स, डेक्कन चार्जर्सचे सोपे विजय
केप टाऊन, १९ एप्रिल / वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्याच्या लढतीत दुसऱ्या दिवशी दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि डेक्कन चार्जर्स यांनी आपापल्या लढती जिंकून खाते उघडले. पावसाने व्यत्यय आणलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यात दिल्लीने १० विकेट्स राखून सहज विजय मिळविला. तर दुसऱ्या लढतीत डेक्कन चार्जर्सने सावध आणि संयमी खेळ करीत कोलकाता नाइट रायडर्स संघावर ८ विकेट्सनी मात केली. पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात पंजाब संघाला प्रथम फलंदाजी करताना १०४ धावा करता आल्या. त्याला प्रत्युत्तर देताना पुन्हा पावसाचे आगमन झाले आणि दिल्लीपुढे केवळ ६ षटकांत ५४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. मात्र त्यांनी त्यांनी २४ धावा केलेल्या असल्यामुळे २५ चेंडूंत ३० धावांचे लक्ष्य त्यांच्यापुढे ठेवण्यात आले. सेहवाग (३८, ४ चौकार) व गंभीर (१५) यांनी ते सहज पार केले. सामनावीर व्हेटोरीने तीन बळी घेत पंजाबवर अंकुश ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या सामन्यात आर.पी. सिंगने २२ धावांत घेतलेल्या ४ बळींमुळे कोलकाता संघ कसाबसा धावांचे शतक (१०१) गाठू शकला आणि डेक्कन चार्जर्सने हे आव्हान केवळ दोन फलंदाज व जवळपास ६ षटके शिल्लक राखून पार केले. चार्जर्सच्या रोहित शर्माने ३ चौकार व २ षटकारांसह ३६ तर हर्शेल गिब्सने ४३ धावांची नाबाद खेळी करून आपल्या संघाचा विजय साकारला.

पहिली चार वर्षे पवार लोकसभेत अभावानेच दिसले- मंडलिक
कोल्हापूर, १९ एप्रिल / विशेष प्रतिनिधी

प्रत्येक पंधरवडय़ाला अमेरिकेत उपचार घेऊन स्वित्र्झलडमार्गे भारतात येणारे शरद पवार चौदाव्या लोकसभेतील पहिली चार वर्षे सभागृहात अभावानेच दिसले. त्यामुळे जे सभागृहाकडे फिरकत नाहीत त्यांना माझ्या कामकाजाची माहिती कशी असणार ? असा टोला माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी शनिवारी सायंकाळी गैबी चौकातील जाहीर सभेत लगावला आणि उपस्थितांनी शेले, टोप्या हवेत भिरकावून कागलच्या भिष्माचार्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. कागलच्या प्रसिध्द गैबी चौकात चार दिवसांपूर्वी शरद पवारांची जाहीर सभा झाली होती. या सभेच्या गर्दीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शनिवारी सायंकाळी या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी झालेल्या मंडलिकांच्या जाहीर सभेने कागलच्या गर्दीचा उच्चांक केला. आजवरच्या ४० वर्षांच्या इतिहासात कधी नव्हे इतकी गर्दी कागलकरांनी पाहिली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे होते. कॉ. पानसरे यांनीही पवारांवर शरसंधान केले. देशाच्या राजकारणात शरद पवार हा खूप मोठा नेता आहे असे समज असेल तर तो प्रथम काढून टाका. कारण हा पश्चिम महाराष्ट्रापूरता मर्यादित नेता आहे, असे ते म्हणाले.

२८ लाखांच्या मुद्देमालासह दोन नेपाळींना अटक
ठाणे, १९ एप्रिल/प्रतिनिधी

सुरक्षा रक्षकाची नोकरी करताना त्याच सोसायटीत घरफोडी करून नेपाळमध्ये पसार होण्याच्या तयारीत असलेल्या दोन नेपाळींना राबोडी पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. शंकर चंद्रा लामा आणि परसादे झंकर बहादून साऊर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते दोघेही नेपाळमधील असून राबोडी येथील मॉडर्न टॉवरमध्ये वॉचमन म्हणून काम करीत होते. त्यांनी याच टॉवरमधील मोहम्मद तन्वीर शेख यांच्या घरात चोरी करून रोख १२ लाख ९३ हजार व १६ लाखांचे दागिने असा ऐवज लुटला होता, हे दोघेही नेपाळमध्ये जाण्याच्या तयारीत असताना उत्तर प्रदेशातील गौरीफन्टा येथे त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई उपनिरीक्षक सतीश घोटेकर, डी. शिपाई डी. के. गायकवाड, जे. के. पवार यांनी केली. अधिक तपास निरीक्षक एस. बी. निघोट करीत आहेत.

भिवंडीत गॅस्ट्रोचा कहर; दोन बालकांचा मृत्यू
भिवंडी, १९ एप्रिल/वार्ताहर

येथील गायत्रीनगर - मनसुराबाद वसाहतीमधील लोकांनी नाल्यात असलेल्या कूपनलिकेचे दूषित पाणी प्यायल्याने ८८ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. यामध्ये दोन बालकांचा मृत्यू झाला, तर १६ जण अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नजीम मोहम्मद इस्का अन्सारी (२ वर्षे १० महिने), अमीन अजीब खान (९ महिने) अशी मरण पावलेल्या बालकांची नावे आहेत. मनसुराबाद येथील वसाहतीत दोन दिवसातून एकदाच टॅंकरने पाणी पुरवठा होत असल्याने तेथे पाण्यासाठी झुंबड उडते. अनेकांना पाणी मि़ळत नसल्याने नाल्यात खोदलेल्या बोअरवेलचे पाणी ते वापरत. त्यातूनच ही घटना घडली. रविवारी प्रशासनाने ही बोअरवेल तातडीने बंद केली.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
प्रत्येक शुक्रवारी