Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
अग्रलेख

चमत्काराच्या प्रतीक्षेत डावे-उजवे

 

भाजप आणि कम्युनिस्ट यांच्यात बाकी काहीही साम्य नसले तरी एका बाबतीत त्यांच्या वृत्तीत साधम्र्य आढळते. दोघांनाही असा विश्वास आहे की, निवडणूक निकालांनंतर बेरीज, गुणाकार (वेळ पडल्यास भागाकारही) करून त्यांच्या संबंधित आघाडय़ांचे सरकार बनू शकेल. म्हणजे भाजप व तिसरी आघाडी यांचे संयुक्त सरकार नव्हे, तर भाजप आणि इतर काही पक्षांची मोट किंवा तिसरी आघाडी आणि डावे यांचे बिगरकाँग्रेस/बिगरभाजप सरकार. खरे म्हणजे काँग्रेसलाही असेच वाटते आहे की, इतर बरेच पक्ष काँग्रेसप्रणीत आघाडीत सामील होतील. याचा अर्थ हा की भाजप, डावे आणि काँग्रेस, तिघांना आता या प्रादेशिक-स्थानिक, भाषिक-सांस्कृतिक आणि जातीय पक्षांवर विसंबून राहावे लागणार आहे. परंतु भाजप आणि कम्युनिस्ट यांच्यातील साधम्र्य हे की ते स्वत: तात्त्विक आणि सात्त्विक असल्याचा आविर्भाव आणतात आणि प्रत्यक्षात वेळ पडल्यास तत्त्व आणि सत्त्व दोन्ही झुगारून द्यायला तयार असतात. लालकृष्ण अडवाणींनी रविवारी ठामपणे म्हटले आहे की, भाजप-प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अनेक पक्ष सामील होतील आणि त्यामुळे त्यांना बहुमत प्रस्थापित करता येईल. परंतु त्यांनी हे स्पष्ट केलेले नाही की खुद्द भाजपला किती जागा मिळतील. सध्याच्या राजकीय विश्लेषणानुसार आणि जनमत कौलांमधून व्यक्त होणाऱ्या अंदाजांनुसार भाजपला जास्तीत जास्त १४० जागा मिळू शकतात. खुद्द भाजपमध्येही कुणीही स्वत:ला १२०-१३० च्या पलीकडे जागा देऊ इच्छित नाही. म्हणजेच भाजपला किमान १४० जागा इतर पक्षांकडून जमा करायच्या आहेत. त्यापैकी अकाली दल आणि शिवसेना हे दोनच त्यांचे विश्वासू मित्र आहेत. त्यापैकी अकाली दल पंजाबमध्ये अडचणीत आहे आणि शिवसेनेची मते, निदान १२ ठिकाणी, राज ठाकरेंची मनसे वळवून घेणार आहे. गेल्या निवडणुकीत राज आणि नारायण राणे, दोघेही शिवसेनेत होते. आता ते दोघेही आक्रमकपणे सेनेच्या विरोधात उतरले आहेत. मधल्या काळात राणेंच्या काँग्रेसमधील वादंगामुळे त्यांचा दबदबा व प्रभाव काहीसा कमी झालेला असला तरी त्याचा सेनेला काही लाभ होणार नाही. त्याचप्रमाणे राज यांची मनसे मुख्यत: सेनेचीच अडचण करणार. शिवाय शरद पवारांच्या संबंधात शिवसेनेने त्यांची भूमिका संदिग्ध ठेवली आहे असेच चित्र सर्वत्र आहे. भाजपच्या विश्वासू मित्रांची ही परिस्थिती. मग इतर मित्रमंडळी ते कुठून जमा करणार? पूर्वीचे त्यांच्या ‘क्लब’चे सदस्य होते फारूख अब्दुल्ला, नवीन पटनाईक, चंद्राबाब नायडू. यापैकी फारुख अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स आता काँग्रेसबरोबर आहे. नवीन पटनाईक आणि चंद्राबाबू तिसऱ्या आघाडीबरोबर आहेत. शरद पवारांनी भाजपचे नवे ‘स्टार’ (आणि भावी पंतप्रधानपदांचे उमेदवार) नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केल्यामुळे, साहेबांबरोबरच्या मैत्रीचाही उपयोग नाही. जयललितांनी १९९८ साली भाजपला जे चटके दिले आणि १९९९ साली वाजपेयी सरकार पाडले, त्याचे व्रण अजूनही गेलेले नाहीत. करुणानिधींच्या द्रमुकची स्थिती वाईट आहे आणि आता जयललिता तिसऱ्या आघाडीबरोबर गेल्या तरी द्रमुक भाजपबरोबर जाऊ शकत नाही. करुणानिधींनी तर जाहीरपणे रामसेतू तोडून टाकण्याची घोषणा केली होती. नितीश कुमार त्यांच्या आघाडीत असले तरी मोदी-प्रणीत हिंदुत्वाच्या ते विरोधात असतात. भाजपने तर पुन्हा राममंदिर आणि वरुण गांधींचा भडकाऊ हिंदुत्त्ववाद अजेंडय़ावर आणल्यामुळे शरद यादवांचा जनता दलही विरोधाच्या पवित्र्यात आहे. उरता उरले आसाम गण परिषदेसारखे पक्ष- ते सर्व एकत्र आले तरी भाजप आघाडी दोन- सव्वादोनशेच्या पुढे जाऊ शकत नाही. असे असूनही अडवाणींनी दुर्दम्य आत्मविश्वास दाखविला आहे. हा आशावाद आहे की, चमत्कारावरची श्रद्धा? त्यांनी अर्ज भरताना १२ वाजून ३९ मिनिटांचा मुहूर्त निश्चित केला होता आणि देशातील तमाम धर्मगुरूंना, भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. कुठे तरी अडवाणींसाठी यज्ञही झाल्याचे कानावर आहे. आम्ही असे ऐकून होतो की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादात पूजा-पाठ, यज्ञ, मंत्रशक्ती वगैरे गोष्टी बसत नाहीत. निष्ठेने कार्य करण्याला तेथे अधिक महत्त्व आहे. मग जर तसे निष्ठेने कार्य केले असते आणि वरुणच्या व मोदींच्या नादी लागण्याऐवजी सामाजिक (व राजकीय) समरसतेचे काम केले असते तर भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता तरी होती. असो. कुणी सांगावे, समाजातील सुप्त हिंदुत्ववाद उफाळून आला आणि भाजपला सपाटून यश प्राप्त झाले तर अडवाणींची चमत्कारावरची श्रद्धा रास्त होती असेही सिद्ध होऊ शकेल. कम्युनिस्टांचा अशा श्रद्धांवर विश्वास नाही. त्यांचा विश्वास असतो लोकांवर आणि त्यांची श्रद्धा असते शास्त्रशुद्ध मार्क्‍सवादावर. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एक नेते-प्रवक्ते आणि विचारवंत म्हणजे सीताराम येचुरी. त्यांची प्रतिमा प्रकाश करात यांच्यापेक्षा ‘मवाळ’ अशी असली तरी पक्षशिस्तीच्या चौकटीत त्यांनी काँग्रेसविरोधी भूमिकाच आग्रहीपणाने मांडली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या शेखर गुप्ता यांच्याबरोबर झालेल्या ‘वॉक द टॉक’ कार्यक्रमात येचुरी यांनी म्हटले आहे की, भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांना दूर ठेवून इतर पक्षांचे एक संयुक्त सरकार बनू शकते. त्यात तिसऱ्या आघाडीचा पुढाकारही असेल आणि अशा बिगरभाजप-बिगरकाँग्रेस सरकारला कम्युनिस्टांचा पूर्ण पाठिंबा असेल. येचुरींना अभिप्रेत असलेला ‘डायलेक्टिकल चमत्कार’ आपल्याला १६ मे रोजी संध्याकाळी दिसून येईलच! भाजप आणि काँग्रेस यांना वगळले की, किमान २५० आणि जास्तीत जास्त ३०० जागा दूर झाल्या. उरलेल्या पक्षांपैकी शिवसेना आणि अकाली दल तिसरी आघाडी व कम्युनिस्टांबरोबर जाणार नाहीत. मायावती व जयललिता (प्रत्येकी ३० ते ४० जागा) या एकाच आघाडीत राहू शकत नाहीत. म्हणजे उरल्या पुन्हा दोन-सव्वादोनशे जागा. त्यांच्या आधारे तिसऱ्या आघाडीने पुरस्कृत केलेले सरकार कसे निर्माण होऊ शकेल? येचुरी यांनी त्या मुलाखतीत असेही म्हटले आहे की, बऱ्याच गोष्टी बदलल्या याचे भान पक्षाला बऱ्याच उशीरा आले. ही कबुली दिली हे बरे झाले. परंतु ज्यांना हे भान अगोदर आले होते त्यांची संभावना ‘पक्षद्रोही’ वा ‘अ‍ॅण्टी-कम्युनिस्ट’ अशी केली जात असे. व्ही. पी. सिंग यांच्या त्रिशंकू सरकारला भाजप आणि कम्युनिस्ट, दोघांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. त्या प्रयोगाचे कसे दिवाळे वाजले हे देशाने पाहिले आहेच. त्याचप्रमाणे १९७७ साली जनता पक्षाच्या तथाकथित ‘दुसऱ्या स्वातंत्र्या’ला आणि ‘संपूर्ण क्रांती’ला कम्युनिस्टांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. जनता पक्षाला लोकसभेत बहुमतही होते. परंतु त्यांना ती मोट पेलता आली नाही. जनता पक्ष आतूनच फुटला आणि आता तर, मार्क्‍सवाद्यांनी पुरस्कृत केलेल्या त्या पक्षाचा एकही आमदार वा खासदार देशात नाही. या सर्व घडामोडींमध्ये कम्युनिस्टांचे मापन असे होते की, भाजप व काँग्रेस हे एकाच माळेचे मणी आहेत- किंवा बिंब-प्रतिबिंब आहेत. परंतु १९९८ व १९९९ साली त्यातील भाजप नावाचे ‘बिंब’ सत्तेत आले. त्यांच्या कारकीर्दीत राजकारणाला अधिक उग्र हिंदुत्ववादी वळण लागले. त्यानंतर भाजपने ‘बिंब-प्रतिबिंब’ची भाषा सोडून दिली. येचुरी यांनी या मुलाखतीत म्हटले आहे की, काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे. एकूणच आर्थिक उदारीकरण, औद्योगिक विकासासाठी खासगी भांडवलाची आवश्यकता आणि भारताची ‘राजकीय बहुसांस्कृतिकता’ कम्युनिस्टांच्या उशिरा ध्यानात आली असे येचुरींना वाटते. गेल्या निवडणुकीनंतर त्यांनी सोनिया- डॉ. मनमोहन सिंग यांना पाठिंबा दिला ही तर सरळसरळ डांगेवादाची नवी आवृत्ती होती. परंतु मार्क्‍सवाद्यांनाच नव्हे तर भारतीय कम्युनिस्ट पक्षालाही कॉम्रेड डांगे या नावाचीही अ‍ॅलर्जी आहे. अशी अ‍ॅलर्जी झाल्यावर बिब्बा अंगावर उततो असे म्हणतात. कम्युनिस्टांच्या अंगावर तसा तो उतला आहे. याला ‘डायलेक्टिकल नेमेसिस’ असे म्हणावयास हवे. परंतु मार्क्‍सवादी वाङ्मयात अशा ‘विरोधविकासवादी कोलांटउडी’बद्दल शास्त्रशुद्ध मांडणी केलेली नाही. त्यामुळे सीताराम येचुरींनाही अडवाणींप्रमाणेच चमत्कारावरच विसंबावे लागणार आहे.