Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९

मनोमिलनाने सावरला बालेकिल्ला
दिनकर झिंब्रे

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचे मानसपुत्र राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला आधीच चांगला बांधला होता. पुढे तो राखण्यासाठी शरद पवार यांना चव्हाणांनी महाराष्ट्रात सुरू केलेले बेरजेचे राजकारण करावे लागले. काँग्रेसचे नेते छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांच्या तिकीट मिळाले नाही तरी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याच्या निर्धाराने राष्ट्रवादीत गर्भगळीत झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. शिवसेनेपुढे तर उमेदवार शोधण्याची पाळी आली होती.

निसटत्या बहुमतासाठी संघर्ष
राजेंद्र जोशी

उमेदवारी निश्चितीपासून ते प्रचारातील आरोप-प्रत्यारोपापर्यंत सर्वच टप्प्यांत साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराला जोरदार रंग भरला आहे. प्रारंभी पक्षीय पातळीवर लढविली जाईल, अशी अपेक्षा असणाऱ्या या निवडणुकीत बंडखोर उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांनी प्रचारातून थेट शरद पवारांना लक्ष्य केल्याने निवडणुकीला शरद पवार विरोधाचे एक मोठे वलय निर्माण झाले आहे. यामुळे १९९६ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या आणि १९९६ नंतर राष्ट्रवादीची हुकमत बनलेल्या या मतदारसंघात पवारांची अब्रू राखण्यात त्यांचे मातब्बर चेले किती कसोटीला उतरतात, यावर हा बालेकिल्ला राखण्याचे भवितव्य ठरेल.

‘लालू हरणार’ या प्रचारामुळेच लालू पुन्हा स्पर्धेत!
समर खडस

‘जबतक है समोसे मे आलू तब तक रहेगा बिहार मे लालू’, हे वाक्य एकेकाळी लालूप्रसाद यादव यांचे अत्यंत आवडते वाक्य होते. बिहार अगर जंगलराज है तो हम इस जंगल के शेर है, अशा डरकाळ्या फोडत लालूप्रसाद यादव यांनी बिहारवर १५ वर्षे राज्य केले. कसलेल्या पैलवानाप्रमाणे भर सभेत मांडीवर थाप मारत, है कोई माईका लाल जो हमे इस राजनीती के अखाडे मे ललकारे, अशी दर्पोक्ती करणाऱ्या लालूंची अवस्था या निवडणुकीत इतकी केविलवाणी झाली होती की, त्यांचा पक्ष दोन अंकी जागांपर्यंत तरी मजल मारेल की नाही, अशी शंका गल्लीतील नेतेही उपस्थित करू लागले होते.

बसपा आणि मनसेचा तडाखा कोणाला?
संदीप आचार्य
मुंबई, २० एप्रिल

सोशल इंजिनियरिंगचे गणित मांडत राज्यात ४८ जागा लढविणारी बहुजन समाज पार्टी आणि मराठी अस्मितेचा झेंडा फडकावत पहिल्यांदाच लोकसभेच्या १२ जागा लढविणाऱ्या राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे राष्ट्रवादी- काँग्रेस आणि शिवसेना-भाजपचे किती नुकसान करणार याकडे आता सर्वाचे लक्ष लागून राहीले आहे.

आयपीएलकडून आयपीसीकडे!
ठाणे, २० एप्रिल/खास प्रतिनिधी

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत २०-२० धूम-टू सुरू होण्याच्या आधीच लोकसभेच्या आयपीएलचा नारळ फोडला गेला. क्रिकेटच्या आयपीएलमध्ये खिलाडूवृत्ती आणि सदाचाराच्या हमीपत्रावर सगळ्या संघांच्या कर्णधारांनी क्रिकेटशौकिनांनी भरलेल्या स्टेडियमला साक्षी ठेवून स्वाक्षरी केली.

‘जिल्हाबंदी’ धुडकावून गोपीनाथ मुंडे यांचे सभांचे शतक!
मुंबई, २० एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्यावर ‘जिल्हाबंदी’ लागू करून त्यांचा प्रभाव कमी करण्याचा डाव उधळून लावत मुंडे हे राज्यात एकूण १०५ जाहीर सभा घेणार आहेत. यातील बहुतांश सभा पूर्ण झाल्या असून आता केवळ मुंबई, ठाण्यातील सभा होणे बाकी आहे. महाराष्ट्रात यापुढेही आपले टार्गेट शरद पवार हेच राहतील हे मुंडे यांनी आपल्या सभांत पवार यांच्यावर केलेल्या टीकेने स्पष्ट झाले आहे.

उत्तर मुंबईत मेहतांच्या प्रश्नांवर भाजप निरुत्तर !
मुंबई, २० एप्रिल/ खास प्रतिनिधी

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राम नाईक, काँग्रेस उमेदवार संजय निरुपम आणि मनसेचे शिरीष पारकर यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘उमेदवार परिचय’ कार्यक्रमाच्या वेळी भाजपचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला अडचणीचे ठरणारे प्रश्न उपस्थित करताच तेथे उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मेहता यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे उडालेल्या प्रचंड गोंधळामुळे अखेर हा कार्यक्रम आयोजकांना आवरता घ्यावा लागला.

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात बॅ. अंतुले यांना घरचा आहेर
अलिबाग, २० एप्रिल/ प्रतिनिधी

‘अंतुले सेक्युलर तर आम्ही काय ढोंगी?’ असा खडा सवाल पत्रकारांशी बोलताना उपस्थित करुन, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कुंटे यांनी रायगड लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस उमेदवार बॅ.ए.आर.अंतुले यांना माहेरचाच आहेर दिला आहे.

‘१२ वी पास’ संजीव नाईकांना निवडणूक आयोगाने केले ‘डॉक्टर’!
मुंबई, २० एप्रिल/प्रतिनिधी

ठाणे मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणारे राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजीव गणेश नाईक यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून ‘डॉक्टरेट’ प्राप्त केलेली नसूनही आणि त्यांनी स्वत:च उमेदवारी अर्जासोबत आपली शैक्षणिक अर्हता ‘इयत्ता १२ वी’ अशी दिलेली असूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नाईक यांच्या नावामागे ‘डॉक्टर’ अशी बिरुदावली स्वत:हून लावण्यास आक्षेप घेणारी एक याचिका आज मुंबई उच्च न्यायालयात केली गेली.

डाव्या व तिसऱ्या आघाडीमुळेच पवारांना पंतप्रधानपदाची संधी - आदिक
सोलापूर, २० एप्रिल/प्रतिनिधी

डाव्या आणि तिसऱ्या आघाडीला डावलून कोणालाही पंतप्रधान होता येणार नाही. काँग्रेसचा पंतप्रधान डाव्या व तिसऱ्या आघाडीला मान्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची संधी प्राप्त झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष गोविंदराव आदिक यांनी सांगितले. सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आदिक हे आले होते.

पक्षी- प्राण्यांविषयी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना अगाध प्रेम!
नवी दिल्ली, २० एप्रिल/ पीटीआय

निवडणूक चिन्हांसाठी पक्षी वा प्राणांचा उपयोग करण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली असली तरी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे पक्षी आणि प्राण्याबद्दलचे प्रेम विशेषत: निवडणूक काळात तरी जरा जास्तच वाढलेले दिसते आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्येसुद्धा प्राण्यांचा सर्रास वापर होतांना दिसून येत आहे. बहुजन समाज पक्षाचे दिल्लीतील उमेदवार मोहम्मद मुस्ताकीम हे उमेदवारी अर्ज भरताना आपल्या समर्थकांसह घोडय़ांवरून आले होते.

मुस्लिमांना लालूच दाखविल्याबद्दल पंतप्रधानांवर कारवाई करा- महेश जेठमलानी
मुंबई, २० एप्रिल/प्रतिनिधी
देशातील साधनांवर मुस्लीम समाजातील गोरगरीबांचा पहिला हक्क आहे हे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केलेले विधान हा मुस्लिमांना लालूच दाखविण्याचा प्रकार असल्याने निवडणूक आयोगाने पंतप्रधानांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना-भाजप युतीचे उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार महेश जेठमलानी यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

निवडणुकांचा बाजार
सोपान बोंगाणे
ठाणे, २० एप्रिल

विस्तारलेला भूगोल आणि मतदार संख्येचा संकोच अशा विचित्र रचनेमुळे सुमारे १२५ कि.मी. लांबीच्या पालघर मतदारसंघातील प्रचाराचे स्वरूपही बदलले आहे. २०-२५ कि.मी.चा प्रवास करून पाच-पन्नास उंबऱ्याच्या वस्तीत प्रचाराला जावे आणि उमेदवार वेशीबाहेर पडताच प्रचाराचा मांडव सुना व्हावा, या परिस्थितीला तोंड देताना नागरी-ग्रामीण-आदिवासी असा त्रिवेणी बाज असलेल्या पालघर मतदारसंघातील उमेदवारांची दमछाक सुरू आहे. अर्थात त्यावरही पक्षांकडे आणि उमेदवारांकडे उपाय आहेच, म्हणूनच आता मोखाडय़ासारख्या भागात आठवडय़ाचा बाजार हेच प्रचाराचे व्यासपीठ बनले आहे. निवडणुकांचा हा बाजार सध्या भलता फॉर्मात आहे.

जनता दलाची (से) ‘दे धक्का एक्सप्रेस’ वस्त्यावस्त्यांमध्ये दाखल
मुंबई, २० एप्रिल / प्रतिनिधी

उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांनी नाना प्रकारच्या क्लृप्त्या योजल्या असून मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनता दलाचे (से.) उमेदवार प्रा. अवधूत भिसे यांच्या प्रचार वाहनावर ‘जे घेतात टक्का, त्यांना द्या धक्का’ अशी घोषणा लिहिलेली आहे. इतकेच नव्हे तर या वाहनावर माजी पंतप्रधान दिवंगत व्ही. पी. सिंग, माजी पंतप्रधान देवैगौडा, कॉ. प्रकाश करात, कॉ. ए. बी. बर्धन आणि मृणालताई गोरे यांची छायाचित्रेही असून ‘चला राजकारणात बदल करूया’ असाही मजकूर लिहिलेला पाहावयास मिळत आहे.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघ परंपरा कायम राखेल - जोशी
मुंबई, २० एप्रिल / प्रतिनिधी

बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते अशा शालीन आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्वांनी सिंधुदुर्ग , रत्नागिरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यावेळीही ही परंपरा कायम राहणार असून कोकणातील मतदार शिवसेना-भाजपच्या सुरेश प्रभुंनाच लोकसभेत पाठवतील, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, खासदार मनोहर जोशी यांनी व्यक्त केला. सुरेश प्रभू यांच्या प्रचारार्थ जोशी यांची सभा देवरुख येथील सावरकर चौकात झाली. या वेळी बोलताना जोशी म्हणाले की, सुरेश प्रभू यांनी खासदार म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याची दखल अटलबिहारी वाजपेयींपासून ते काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत साऱ्यांनीच घेतली होती. त्यामुळेच त्यांना पुन्हा एकदा मोठे मताधिक्य मिळेल. रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा विकास पर्यटनाच्या दृष्टीकोनातून होणे आवश्यक आहे. मी मुख्यमंत्रीपदी असताना राज्य सरकारने तशी पावलेही उचलली होती. मात्र आता सिंधुदुर्गमध्ये खाणीच्या निमित्ताने निसर्गाचा समतोल ढासळत आहे.

उत्तर भारतीय निघाले गावाला
उमेदवार धास्तावले!
(बंधुराज लोणे) मुंबई, २० एप्रिल

ऐन निवडणुकीच्या हंगामातच उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे उत्तर भारतीय गावाला जाण्यासाठी निघाले आहेत. उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वे गाडय़ा फूल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील उमेदवार धास्तावले आहेत. उत्तर भारतीय मोठय़ा संख्येने गावी जात असल्याने त्याचा मतदानावर परिणाम होणार आहे. दर वर्षी उन्हाळी सुट्टीत सुमारे ४० लाख उत्तर भारतीय गावी जात असतात. या वर्षीही मोठय़ा प्रमाणावर उत्तर भारतीयांनी रेल्वेचे आरक्षण केले आहे. या वर्षी ९० दिवस आधी आरक्षणाची सोय करण्यात आल्याचा फायदा उत्तर भारतीयांना मिळाला आहे. मुंबई -ठाण्यात सुमारे २२ लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. यापैकी किमान ६०-७० टक्के मतदार गावी जाणार आहे. उत्तर भारतात लग्नाचा मौसम असून मुलांना सुट्टी लागताच हा समाज गावी जात असतो. उत्तर भारतीय गावी जाणार असल्याचा सर्वात जास्त फटका उत्तर आणि वायव्य मतदारसंघात बसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत उत्तर भारतीयांचे साधारण ३०-३५ टक्केच मतदान होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतीयांप्रमाणेच कोकणी माणूसही गावी जाण्याच्या तयारीत आहे. मात्र बऱ्याचदा मतदान करून गावी जाण्याचा प्रयत्न कोकणी समाज करीत असतो. उत्तर भारतीय आणि कोकणी समाज ऐन निवडणुकीच्या काळात गावी गेल्यास त्याचा फटका सर्व पक्षांच्या उमेदवारांना बसेल, असे मानले जात आहे.

दुसऱ्या टप्प्यातील प्रचार आज संपणार
मुंबई, २० एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्यातील २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठीच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात २५ जागांसाठी मतदान होणार असून यात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाडय़ातील जागांवर मतदान होणार आहे. उद्या शेवटच्या दिवशी २५ जागांसाठी रिंगणात असलेले उमेदवार आपली संपूर्ण शक्ती खर्च करून मतदार राजाचे मन वळविण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहेत. महाराष्ट्रात एकूण तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तिसऱ्या म्हणजे शेवटच्या टप्प्यात ठाणे व मुंबईतील १० जागांसाठी मतदान होणार असून त्याची तारीख ३० एप्रिल असणार आहे. त्यामुळे २३ तारखेचे मतदान उरकले की बहुतांश सगळ्या पक्षांचे नेते मुंबई व ठाणे येथे ठाण मांडून बसणार आहेत. मुंबईतील पाच जागांवर काँग्रेस तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार िरगणात असून या उमेदवारांसाठी सोनिया गांधी, शरद पवार, राहूल गांधी हे प्रचारासाठी मुंबई व ठाण्यात येणार आहेत. तर मुंबईमध्ये सेना व भाजपचे प्रत्येकी तीन उमेदावर रिंगणात असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे प्रचाराचा धडाका लावतील.

नवीन चावला आज मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार
नवी दिल्ली, २० एप्रिल / पीटीआय

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नवीन चावला उद्या एन. गोपालस्वामी यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. निर्वाचन सदनातील मोठय़ा राजकीय पेचप्रसंगामुळे गोपालस्वामी यांनी अधिक काळ पदावर राहू नये, अशी शिफारस करण्यात आली होती. ६३ वर्षीय चावला हे त्रिसदस्यीय समितीतील गोपालस्वामी यांच्याप्रमाणे आणखी एक ज्येष्ठ आयुक्त आहेत. पुढील वर्षी २९ जूनपर्यंत चावला पदावर असतील, जेव्हा ते ६५ वर्षांचे होतील. पाच टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्यादरम्यान पद स्वीकारणारे चावला हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आता उर्वरित चार टप्प्यांतील निवडणुका चावला यांच्या निदर्शनाखाली पार पडतील. चावला यांच्या पदोन्नतीमुळे ऊर्जासचिव व्ही. एस. संपथ निवडणूक आयुक्तपदाची उद्या सूत्रे स्वीकारतील.