Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
लोकमानस

पुनर्जन्म आणि वैज्ञानिक (!) संशोधन

 

‘पुनर्जन्म’ ही वर्षांनुवर्षे लोकांच्या मनात रुजलेली परंतु कोणताही वैज्ञानिक आधार नसलेली भ्रामक कल्पना आहे. डॉ. विद्याधर ओक यांनी ‘पुनर्जन्म : एक कल्पनातीत वास्तव’ या लेखात (२२ फेब्रुवारी) तिला वैज्ञानिक आधार देण्याचा प्रयत्न केला असून त्यासाठी अमेरिकेतल्या तथाकथित संशोधनाचे दाखले दिले आहेत. एखाद्या घटनेबाबत किंवा प्रश्नाबाबत केलेले निरीक्षण, प्रत्यक्ष प्रयोग आणि प्रयोगांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे काढलेले निष्कर्ष ही वैज्ञानिक संशोधनाची मूलभूत पद्धत आहे. वारंवार प्रयोग करून निष्कर्षांबद्दल खात्री पटल्यानंतर संशोधक हे निष्कर्ष, प्रयोगाच्या संपूर्ण तपशिलासकट, शोधनिबंधाद्वारे मांडतो. शोधनिबंध त्या त्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांकडून तपासले गेल्यानंतरच वैज्ञानिक नियतकालिकांत (peer-reviewed journals) प्रसिद्ध होतात. अशा रीतीने प्रसिद्ध झालेल्या संशोधनालाच वैज्ञानिक जगात मान्यता मिळते, त्यावर साधकबाधक चर्चा होते.
डॉ. ओक यांनी ज्या संशोधनाचे दाखले दिले आहेत ते सर्वच्या सर्व संशोधन पुस्तके आणि खाजगी वेबसाइट्स यावर प्रसिद्ध झालेले आहे. मेरिलिन मन्रो हिच्या पुनर्जन्माबाबत डॉ. अ‍ॅड्रियन फिंकलस्टाइन यांनी केलेले संशोधन हे,‘इतर समव्यावसायिक मनोविकार तज्ज्ञांतर्फे परीक्षण केल्या जाणाऱ्या शोधनिबंधाद्वारे ‘प्रसिद्ध करून’ शेरी म्हणजे मेरिलिनचाच पुनर्जन्म आहे असे प्रतिपादन डॉ. फिंकलस्टाइन यांनी केले,’ असे डॉ. ओक म्हणतात. परंतु हा शोधनिबंध कोणत्या वैज्ञानिक किंवा मेडिकल जर्नलच्या कुठच्या खंडात कोणत्या साली प्रसिद्ध झाला त्याचा तपशील ते देत नाहीत. त्यांनी दिलेल्या वेबसाइटवर जाऊन पाहिले असता डॉ. फिंकलस्टाइन यांच्याबद्दल जी माहिती मिळते ती अशी- डॉ. अ‍ॅड्रियन फिंकलस्टाइन, आध्यात्मिक तापनिवारक (spiritual healer), शिक्षक, संशोधक, लेखक, व्याख्याते आणि ‘गतजन्म उपचार पद्धतीचे’ जागतिक दर्जाचे तज्ज्ञ.. इत्यादी. त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या लेखांच्या यादीमध्ये एकही लेख ‘शोधनिबंधा’च्या स्वरूपात वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झालेला नाही. वेबसाइटवर उपलब्ध असलेली व्हिडिओ चित्रफीत म्हणजे सी.एन.एन. या चॅनेलवर ‘शो-बिझ’ या कार्यक्रमात घेतलेली डॉ. फिंकलस्टाइन यांची मुलाखत आहे. त्यात वैज्ञानिक संशोधनाविषयी फारच जुजबी माहिती आणि खळबळजनक बातमी अधिक असा मामला आहे. डॉ. ओक यांनी दिलेल्या अन्य वेबसाइट्सवरही शोधनिबंधाच्या स्वरूपातील संशोधनाचा एकही दाखला मिळत नाही.
या सर्व पाश्र्वभूमीवर ‘आत्मा म्हणजे चिप् आहे आणि ही चिप् अनेक जन्मांतून हिंडत विविध माणसांचे चांगले-वाईट गुण गोळा करते (फाइल बनवते)’ असली अजब कल्पना डॉ. ओक कोणत्याही पुराव्याशिवाय मांडतात आणि त्याच्या आधारे पु. ल. देशपांडे आणि डॉ. वसंतराव देशपांडे (आणि अन्य काही महान कलाकार) यांच्याकडे असलेली विविध कौशल्ये आणि कलागुण हे त्यांना त्यांच्या पूर्वीच्या जन्मांतून मिळालेले आहेत, असे बेधडक प्रतिपादन करतात याला काय म्हणावयाचे? या दोन महान कलाकारांनी आयुष्यभर अभ्यासपूर्वक विकसित केलेले कलागुण हे त्यांना पूर्वजन्मातून आयतेच मिळाले आहेत, असे म्हणणे हा खरेतर या दोन्ही दिग्गजांचा अपमान आहे. पण लक्षात कोण घेतो?
आत्म्याला ‘चिप्’ म्हटले की ती लगेच वैज्ञानिक कल्पना होते काय? असल्या अर्थहीन, बिनबुडाच्या कल्पना मांडायच्या आणि पुराव्याअभावी त्या स्वीकारायला वैज्ञानिकांनी नकार दिला की त्यांना ‘अहंकारी’ म्हणावयाचे किंवा असल्या कल्पना स्वीकारण्यासाठी लागणारे ‘खुले’ मन त्यांच्याकडे नाही असा कांगावा करायचा! या ‘खुल्या’ मनाविषयी एका इंग्रजी पुस्तकात वाचलेले वाक्य डॉ. ओकांच्या मांडणीच्या संदर्भात उपयुक्त ठरेल म्हणून इथे उद्धृत करण्याजोगे आहे- ‘आपण आपले मन (नवीन कल्पनांसाठी) खुले ठेवले पाहिजे हे निश्चितच, पण एवढे खुले नव्हे की त्यातून आपला मेंदूच बाहेर पडून जाईल. (We must certainly keep our minds open, but not so open that our brains fall out.) इत्यलम्.
डॉ. हेमू अधिकारी, मुंबई

पुनर्जन्म कल्पनेला आधार देताना जनुकशास्त्राकडे डोळेझाक
पूर्वजन्म, पुनर्जन्म, ज्योतिष, पुराण, वास्तुशास्त्र, आत्मा असल्या हजारो वर्षे आपल्या मनात ठाण मांडून बसलेल्या गोष्टी, जेमतेम ५०० वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या विज्ञानाने चक्क मोडीत काढलेल्या आहेत, तरीदेखील परंपरावादी मंडळींना ते सत्य पचविणे अत्यंत कठीण जाते. कारण या सर्व गोष्टी आपल्या प्राचीन संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, अशी त्यांनी मनोमन धारणा करून घेतलेली असते. (उदा. ज्योतिष हे वेदाचे सहावे अंग आहे इ. इ.) या परंपरावादी मंडळींत केवळ अडाणी, अशिक्षित मंडळी असतात असं नाही तर सुशिक्षित, उच्चशिक्षित तर काही वेळा शास्त्र शाखेची पदवी घेऊन त्यावर गुजराण करणारे उच्चविद्याविभूषितही असतात. डॉ. ओक व त्यांचे पुनर्जन्मावरचे लिखाण याची उत्तम साक्ष देतात.
लेखाच्या सुरुवातीस ओक यांनी जगातल्या डझनभर दिग्गजांची नावे देऊन त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास होता, असे सांगून आपल्या अतार्किक व अशास्त्रीय विचारांचा खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. कुठलेही अशास्त्रीय तत्त्व सिद्ध करण्यासाठी असल्या नावांचा काडीचाही उपयोग नाही हे ओक यांना सांगण्याची वेळ का यावी? आइन्स्टाइन यांनी एका भारलेल्या क्षणी, ‘विश्वाचा हा पसारा कुणी बरे निर्माण केला असावा..’ असे उद्गार काढले तर ‘देव’ या कल्पनेने ग्रासलेल्या लोकांनी, ‘आइन्स्टाइनचा देवावर विश्वास होता’, असा ढोल बडवायला सुरुवात केली होती!
‘पुनर्जन्म’ या कल्पनेचा पायाच मुळी अशास्त्रीय व अतार्किक आहे. तो असा, की माणसाच्या शरीरात म्हणे ‘आत्मा’ नावाची एक अदृश्य चीज असते. (ती नेमकी शरीराच्या कुठल्या भागात असते ते या विस्तृत लेखात नाही.) मृत्यूनंतर हा आत्मा शरीरातून बाहेर पडतो (नेमका कुठून?) आणि दुसऱ्या कुठल्यातरी नवजात बालकाच्या शरीरात प्रवेश करतो. मृत्यूनंतर शरीर नष्ट होते पण आत्मा जिवंत राहतो हे सर्वसामान्यांना पटावे म्हणून ओक म्हणतात, शरीर म्हणजे हार्डवेअर आणि आत्मा म्हणजे शरीरातील एक I. C. Chip (Integrated Circuit) अशास्त्रीय विषयाला शास्त्राच्या पंगतीत बसविण्यासाठी वैज्ञानिक संज्ञा उदा. मेमरी, हार्डवेअर, सॉफ्टवेअर असे शब्द वापरून भूलभुलैया निर्माण करण्याची ही अलीकडची पद्धत. शरीर जळाल्यावर, म्हणजे हार्डवेअर जळाल्यावर I. C. Chip कशी शिल्लक राहते? कारण तोही हार्डवेअरचाच भाग आहे. ओक साहेबांना ती I. C. Chip जळालेली चालणार नाही कारण त्यांच्या मते ती आत्मारूप असते व त्या I. C. Chip मध्ये माणसावरील संस्कार, कौशल्य साठवलेले (Stored) असते. (पुढच्या जन्मात हे कौशल्य लागले तर!) मुळात आत्मा नावाचा कसला पदार्थच अस्तित्वात नसल्याने भौतिकशास्त्राचे नियम त्याला लावणे सर्वथया चूक आहे.
ऊर्जा नष्ट होत नाही, तिचे स्थित्यंतर होते- या नियमाचा आधार घेऊन डॉ. ओक म्हणतात, ‘आत्मा हादेखील एक ऊर्जेचाच (चैतन्य) प्रकार आहे त्यामुळे तो नष्ट होत नाही. यालाच म्हणतात ‘बादरायण संबंध!’ डॉ. ओकांचा पुनर्जन्मावर विश्वास का, तर म्हणे तीन-चार वर्षांची मुले गायन-वादन करूच कशी शकतात? त्यांच्या मते ते पूर्वजन्मातही गायक-वादक असले पाहिजेत व गेल्या जन्मीची I. C. Chip (म्हणजे आत्मा) या जन्मातल्या त्यांच्या शरीरात आली असली पाहिजे. हा युक्तिवाद चुकीचा आहे. ओक यांना हे नक्की माहीत असेल, की मानवी शरीरातील जनुके एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतात. अनेकदा तर असेही आढळून आले आहे, की आधीच्या चार-पाच पिढय़ांतील जनुके विद्यमान पिढीत कार्यरत असतात. म्हणजे जनुके गायक-वादक पणजोबा/ खापर पणजोबाची असतील तर ती मुलेही अल्पवयात गायक-वादक होऊ शकतात.
प्राण येतो-जातो कसा याचे कोडे डॉ. ओकांना का वाटते? या निव्वळ जीवशास्त्रीय घटना आहेत. (माझ्या माहितीप्रमाणे ओकसाहेब स्वत: डॉक्टर आहेत.) पुनर्जन्माच्या पुष्टय़र्थ त्यांनी टोपलीभर वेबसाइट्सची नावे दिली आहेत. मीदेखील पुनर्जन्म म्हणजे एक ‘बकवास’ आहे, असे सिद्ध करणाऱ्या गाडाभर वेबसाइट्सची नावे सांगू शकेन. या संदर्भात जेम्स रॅण्डी व Skeptics संस्थेची वेबसाइट पाहावी. विज्ञान शाखेत पारंगत होऊन विज्ञानालाच हिणकस ठरविण्याची आम्हा भारतीयांची खोड संपेल, तेव्हाच खरे विज्ञानयुग देशात अवतरेल.
चंद्रसेन टिळेकर, अंधेरी, मुंबई