Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९

सोलापुरातील बुद्धिवंतांचा सुशीलकुमार शिंदे यांना पाठिंबा
सोलापूर, २० एप्रिल/प्रतिनिधी

सुशीलकुमार शिंदे हे मातीशी इमान राखणारे आणि धाडशी निर्णय घेणारे तसेच प्रतिकूल परिस्थितीत झगडण्याची वृत्ती असणारे सर्वाच्या आवडीचे आहेत, असे मत सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी व्यक्त केले. सोलापूर राखीव लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी साहित्य, नाटय़, संगीत कला, क्रीडा, पत्रकारिता, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची स्नेहमेळाव्याचे आयोजन करताना बुद्धिवंतांनी त्यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांनी केले.

बँका व महामंडळे वाचविण्यासाठी शेतकरी कर्जमाफी- शरद जोशी
सांगली, २० एप्रिल / प्रतिनिधी

शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस डांगोरा पिटत आहे. पण त्यांचे शेतकऱ्यांवर प्रेम नाही. केवळ आपल्या बगलबच्च्यांच्या बँका व महामंडळ वाचविण्यासाठीच कर्जमाफी दिली गेली आहे, असे सांगत शरद पवार यांचे शेतकऱ्यांचे प्रेम हे पुतनामावशीचे असल्याची टीका खासदार शरद जोशी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केली. सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अशोक माने यांच्या प्रचारार्थ शरद जोशी हे सांगलीत आले होते.

वाळव्यात राष्ट्रवादीची फिल्डिंग टाईट
इस्लामपूर, २० एप्रिल / वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीमती निवेदिता माने यांना वाळवा तालुक्यातून ५० ते ६० हजारांचे मताधिक्य मिळालेच पाहिजे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने दिवसरात्र एक करून बूथवाईज काम करावे. जो कार्यकर्ता आपल्या कामात कसूर करेल, त्याला यापुढे आपले दार बंद असेल, असा रोखठोक इशारा देत गृहमंत्री जयंत पाटील यांनी उमेदवार श्रीमती निवेदिता माने यांच्या प्रचाराची वाळवा तालुक्यात फिल्डिंग टाईट केली. जो कार्यकर्ता प्रचारात व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मताधिक्यात मागे राहील, त्याची गय केली जाणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला.

पत्नीचा खून केल्याबद्दल जन्मठेप
कोल्हापूर, २० एप्रिल / प्रतिनिधी

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील हॉटेल राज डिलक्समध्ये आपल्या पत्नीचा रूमालाने गळा आवळून खून केल्यावरून श्रीकांत बापूराव गायकवाड याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. शुक्रे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारच्या वतीने अ‍ॅड. श्रीमती मंजूषा पाटील यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्ह्य़ाच्या बार्शी तालुक्यातील सारोळे या गावी राहणारा श्रीकांत गायकवाड याचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुलेही आहेत. पहिले लग्न लपवून ठेवून त्याने राजश्री नावाच्या युवतीशी दुसरे लग्न केले. राजश्री ही शाहूवाडी तालुक्यातील कडवे या गावी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस होती.

बंडखोरांची निष्ठा लोकशाहीला मारक -आर. आर. पाटील
गडिहग्लज, २० एप्रिल / वार्ताहर

पक्षनिष्ठा नावाचा प्रकार आज संपत चालला आहे. पक्षधोरणांपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानून काहीजण आपलं म्हणून निवडणूक लढवित आहेत. अपक्षांचे दुबळे सरकार देशाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे अशा अपक्षांना खडय़ासारखे बाजूला करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर.आर.पाटील यांनी केले. संभाजीराजे यांच्या प्रचारार्थ येथील नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेमध्ये बोलताना आर.आर.पाटील यांनी नाव न घेता मंडलिक यांच्यावर टीका केली. आयुष्यभर ज्यांनी पदे दिली, सत्ता दिली त्या नेत्याशी तुम्ही एकनिष्ठ राहू शकत नाही. तिकीट दिले नाही म्हणून बंडखोरी करणाऱ्यांची निष्ठा लोकशाहीला मारक आहे. पदे दिली तर निष्ठा, नाही तर हळूहळू निसटा, अशी प्रवृत्ती असणाऱ्या मंडलिकांना राजकीय जीवनात कुठे थांबावे हे कळलेच नाही. तरूण चेहऱ्याला संधी देण्यासाठी संभाजीराजेंची उमेदवारी दिली आहे. पण संभाजीराजेंच्या उमेदवारीला विरोध करून अपशकून करणाऱ्यांना योग्य धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मल्लाय्या नाईक, दत्ताजी देसाई, शीलाताई जाधव, अ‍ॅड.व्ही.एस.पाटील यांची भाषणे झाली. बाळासाहेब कुपेकर, भैयासाहेब कुपेकर, सतीश पाटील, शिवाजीराव खोत, संग्रामसिंह कुपेकर, वसंतराव यमगेकर, शारदा आजरी, वसंतराव नंदनवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक बी.एन.पाटील यांनी केले. आभार किरण कदम यांनी मानले.

‘शेती पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पवारांना विजयी करा’
फलटण, २० एप्रिल/वार्ताहर

संपूर्ण देशात ना. शरद पवारांसारख्या शेतकऱ्यांचा कैवारी आसलेला दुसरा नेता नसून शेतीपाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पवारांना मोठय़ा मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शरद पवार यांच्या प्रचारार्थ गोरवळी, हणमंतवाडी, यवळेवाडी, शिंदेनगर, पवारवाडी या भागात आयोजित जाहीर सभेत संजीवराजे बोलत होते. या वेळी सुरेशकाका पवार, महादेवराव पवार, हाजीमलंग बमेनवार आदी उपस्थित होते. शरद पवार यांच्या सहकार्यामुळे तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या नीरा देवघर व धोम बलकवडी धरणांची कामे पूर्ण झाली असून कालव्यांची कामे प्रगती पथावर आहेत. येत्या दोन वर्षांत माढा मतदारसंघातील दुष्काळी भागाचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही शरद पवारांनी दिली आहे. पवारांच्या रुपाने विकासकामांचे मोठे दालन आपल्यासाठी उघडले गेले असून पवारांना मत म्हणजे विकासाला मत आहे. तालुक्यातील जनतेने विरोधकांच्या कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता पवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन संजीवराजे यांनी केले.

घराणेशाहीचे पानिपत करा - अजित घोरपडे
सांगली, २० एप्रिल / प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी जनतेने परिवर्तनाच्या लाटेत सहभागी होऊन निष्क्रिय घराणेशाहीचे मतांच्या ताकदीने पानिपत करा, असे आवाहन अपक्ष उमेदवार अजित घोरपडे यांनी केले. घोरपडे यांनी जत तालुक्यातील येळवी, आसंगी, माडग्याळ, कोळगिरी, टोणेवाडी, बनाळी, वायफळ, शेगांव, वाळेखिंडी, मुचंडी, बेवनूर, तिप्पेहळ्ळी, कुंभारी, कोसारी आदी गावांचा प्रचार दौरा केला. जत येथील बाजार समितीच्या संकुलात प्रचार कार्यालयाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत जतचे आमदार सुरेश खाडे, प्रकाश जमदाडे, शिवाजी ताडे, रमेश बिराजदार, नीलेश बामणे, उमेश सावंत, विठ्ठल पवार, डॉ. पद्माकर कुलकर्णी, मुकुंद बंडगर, अमित कुलकर्णी आदी होते. काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील व रोहयोमंत्री मदन पाटील हे फसवे व भ्रष्ट नेते आहेत. सांगलीत विकास महाआघाडी सत्तेवर आल्यानेच महापालिका चांगली चालली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत जतमधील जनतेने परिवर्तन केल्याने त्याचे विभाजन थांबविता आले. त्यामुळेच आता जतमध्ये दोन कोटी रुपये खर्चून व्यापारी संकुल उभे राहिले आहे. यापुढे शेती केंद्र, कोल्ड स्टोअरेज, शेतकरी निवासही उभारले जाणार आहे. दुष्काळी तालुक्यांच्या प्रगतीच्या वाटा पादाक्रांत करताना दुष्काळी तालुक्याचा आवाज दिल्लीत पोहोचला पाहिजे. पाणीप्रश्न व केंद्राच्या विविध योजना आणण्यासाठी आपणाला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

आंबेडकर जयंतीनिमित्त इचलकरंजीत मिरवणूक
इचलकरंजी, २० एप्रिल / वार्ताहर

आंबेडकरी जनतेने ऐक्याचे दर्शन घडवत रविवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभूतपूर्व शोभायात्रा काढली. विविध विषयांवरील पोस्टर, फटाक्यांची आतषबाजी, झांजपथकासह पारंपरिक वाद्यांचा कल्लोळ, जयघोष करीत सहभागी झालेले हजारो नागरिक यामुळे ही शोभायात्रा वैशिष्टय़पूर्ण ठरली. परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी बांधकाम सभापती रवि रजपुते यांच्या नेतृत्वाखाली रविवारी भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डॉ.आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाजवळ हजारो स्त्री-पुरुष तळपत्या उन्हात जमले होते. गृहमंत्री जयंत पाटील, आमदार प्रकाश आवाडे, नगराध्यक्षा किशोरी आवाडे, मदन कारंडे, सतीश डाळय़ा, राहुल आवाडे आदींनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण केला. तिथून निघालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत मुख्य मार्गावरून जात होती. या मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. डॉ. आंबेडकर, शाहूमहाराज, गौतम बुद्ध आणि म. फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे डिजिटल फलक अनेक वाहनांवर उभारले होते. स्त्रीभ्रूणहत्येसारखे सामाजिक विषयही त्यामध्ये होते. निळे ध्वज घेतलेले कार्यकर्ते सातत्याने डॉ. आंबेडकरांचा जयघोष करीत होते. यानिमित्ताने शहरात विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या.