Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सोलापुरातील बुद्धिवंतांचा सुशीलकुमार शिंदे यांना पाठिंबा
सोलापूर, २० एप्रिल/प्रतिनिधी

सुशीलकुमार शिंदे हे मातीशी इमान राखणारे आणि धाडशी निर्णय घेणारे तसेच प्रतिकूल परिस्थितीत झगडण्याची वृत्ती असणारे सर्वाच्या आवडीचे आहेत, असे मत सोलापूर विद्यापीठाचे

 

पहिले कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी व्यक्त केले.
सोलापूर राखीव लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी साहित्य, नाटय़, संगीत कला, क्रीडा, पत्रकारिता, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची स्नेहमेळाव्याचे आयोजन करताना बुद्धिवंतांनी त्यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांनी केले.
धर्माधता आणि जातीयवाद वाढत असताना साहित्यिकांनी मागे राहू नये, असे आवाहन करून आमदार रामदास फुटाणे यांनी प्रत्येकाची राजकीय मते वेगळी असताना केवळ श्री. शिंदे यांच्यासाठी विचारवंत एकत्र आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ‘उचल्या’चे लेखक लक्ष्मण गायकवाड यांनी श्री. शिंदे हे देशाला दिशा देणारे नेते असून भटक्या विमुक्तांना सामाजिक न्याय देणारा मुख्यमंत्री म्हणून देशात त्यांची ओळख झाल्याचे सांगितले. श्री. शिंदे हे राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे नेते असून साहित्यिक, कलावंत आणि विचारवंतांनी त्यांना साध द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांनी केले. कोणत्याही प्रश्नाची सहज सोडवणूक करणारे आणि कसलीही अपेक्षा न बाळगता सढळ हाताने मदत करणारे म्हणून श्री. शिंदे यांची ख्याती असल्याचे मत ज्येष्ठ शाहीर प्रा. डॉ. अजीज नदाफ यांनी व्यक्त केले. प्रा. एम. आर. कांबळे, डॉ. विनायक टेंभुर्णीकर यांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला.
बुद्धिवंतांच्या स्नेह मेळाव्यास कवी दत्ता हलसगीकर, बाबूराव मैंदगीकर, विजया जहागिरदार, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, आमदार सुभाष चव्हाण, अरुण शेवते आदी उपस्थित होते.