Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

बँका व महामंडळे वाचविण्यासाठी शेतकरी कर्जमाफी- शरद जोशी
सांगली, २० एप्रिल / प्रतिनिधी

शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस डांगोरा पिटत आहे. पण त्यांचे शेतकऱ्यांवर प्रेम नाही. केवळ आपल्या बगलबच्च्यांच्या बँका व महामंडळ वाचविण्यासाठीच कर्जमाफी दिली गेली आहे, असे सांगत शरद पवार यांचे शेतकऱ्यांचे प्रेम हे पुतनामावशीचे

 

असल्याची टीका खासदार शरद जोशी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केली.
सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अशोक माने यांच्या प्रचारार्थ शरद जोशी हे सांगलीत आले होते. त्यावेळी येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते. सध्या लोकसभा निवडणुकीत अनेक मुद्दय़ांचा विसर काँग्रेस व भारतीय जनता पक्षाला झाला आहे. देशासमोर आतंकवाद, जागतिक मंदी, महागाई असे अनेकविध विषय असतानाही गल्लीतील विषयांवर निवडणुका लढविल्या जात आहेत, हेच जनतेचे दुर्दैव आहे. स्वतंत्र भारत पक्षाने वर्षभरापूर्वीच निवडणुकीचा जाहीरनामा जनतेसमोर ठेवला होता. स्वातंत्र्य, संपन्नता व समर्थतता या तीन मुद्दय़ांवर स्वतंत्र भारत पक्ष महाराष्ट्र- पंजाबसह १४ ठिकाणी निवडणूक लढवित असल्याचेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांना दिलेल्या ७० हजार कोटी रूपयांच्या कर्जमाफीचा ढोल दोन्ही काँग्रेसकडून बडविला जात आहे. पण त्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी कर्जाच्या खाईत अडकला, हे मात्र ते मान्य करीत नाहीत. स्वातंत्र्यापासून ६० वर्षांत शेतीमालाला योग्य दर मिळाला असता तर शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज झाले नसते. देशाचे कृषिमंत्री असलेले शरद पवार हे तर सर्वात महापापी असून त्यांचे शेतकऱ्यांवरील प्रेम बेगडी आहे. आपल्या बगलबच्च्यांच्या बँका व महामंडळे वाचविण्यासाठीच ही कर्जमाफी दिली गेली आहे, असा आरोपही त्यांनी केला. सध्या देशात राजकीय अस्थिरतता निर्माण झाली असून कोणत्याही एका आघाडीला बहुमत मिळणार नाही. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या आघाडीची मदत त्यांना घ्यावी लागणार असल्याचे भाकीतही शरद जोशी यांनी केले.